घनदाट प्रकाश; अथांग अवकाश

प्रख्यात कवयित्री आणि चित्रकार मीनाक्षी पाटील यांनी अलीकडच्या काळात साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात सुरू आहे.
Environment
EnvironmentSakal
Summary

प्रख्यात कवयित्री आणि चित्रकार मीनाक्षी पाटील यांनी अलीकडच्या काळात साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात सुरू आहे.

प्रख्यात कवयित्री आणि चित्रकार मीनाक्षी पाटील यांनी अलीकडच्या काळात साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात सुरू आहे. ‘लाईट विदिन’ अशा शीर्षकांकित चित्रमालिकेत अमूर्त शैलीतल्या २३ कलाकृती आहेत. या कलाकृतींमधील रंग, खोलवर पेरलेला प्रकाश आणि अथांग अवकाश चित्ररसिकांना खुणावणारा आणि विचार करायला लावणारा आहे.

वर्तुळाकार पृथ्वी पाहताना त्यातल्या विविध रंगी छटांचा आभास व्हावा, तशाच काहीशा चित्रकलाकृती साकारल्या आहेत प्रख्यात कवयित्री, लेखिका आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी. त्यांच्या या कलाकृतींचे प्रदर्शन सध्या मुबईतील जहांगीर कलादालनात सुरू आहे. भास-आभास हे अमूर्त चित्रशैलीचे बलस्थान असते, तीच ताकद मीनाक्षी पाटील यांच्याही रंगलेखनाचे खास वैशिष्ट्य आहे. त्याचीच प्रचिती या प्रदर्शनातील चित्रकलाकृतीतून होते.

पर्यावरणाच्या अवकाशात जे काही सुरू असते, त्याचे पडसाद आधी कलावंतांच्या अंतर्मनात घर करते. कालांतराने कलाविष्कृत करण्यासाठी खुणावते. त्यातूनच कलाकृती जन्माला येते. सध्या जगभरातील पृथ्वीतलावर ज्या उलथापालथी सुरू आहेत, त्या काही सुखावणाऱ्या आणि भयकंपित करणाऱ्याही आहेत. एकामागोमाग येणारी चक्रीवादळं, अथांग समुद्राचा रुद्रावतार, पाऊस कधीही अन्‌ कसाही कोसळतो. या साऱ्या हवामान बदलांचे ओरखडे निसर्गावरही उमटत असतात. निसर्गप्रेमी कलावंतांना ते ओरखडे प्रभावित करत असतात. त्याच प्रभावातून मीनाक्षी पाटील यांची ही चित्रमालिका जन्माला आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही चित्रमालिका ‘लाईट विदिन’ या शीर्षकाने प्रदर्शित करण्यात आली आहे. काही कलाकृतीत पृथ्वीतलावरची हिरवाई लक्ष वेधून घेणारी आहे. बहुतांश सर्वच चित्रांत स्पष्ट आकृतीचा अभाव असला, तरी रंगछटेत वाऱ्याच्या वेगाची दृश्‍यात्मकता आहे. रंग पसरलेले नाहीत, तर ते कॅनव्हासवर वेगवान झाले आहेत. हा वेग निसर्गचक्राच्या बदललेल्या भावस्वभावाची आठवण करून देतो. काही चित्रांतील भडक रंगांतून ज्वाळांचा आभास होतो. त्यातून उष्णतेच्या झळा रंगलेखिकेला अधोरेखित करायच्या असतील, ही शक्यता नाकारता येत नाही.

निसर्गातील वेगवेगळ्या छटांची उकल करताना मीनाक्षी पाटील यांनी रंगांच्या विणकामात कुठलेही धागे विस्कटू दिले नाहीत. आकाश, प्रकाश, अवकाशाची जुगलबंदी घडवून कलाकृतींचे सौंदर्य वाढले आहे. या साऱ्या कलाकृती वर्तुळाकार असल्याने चित्रातला अवकाश आहेच, त्याशिवाय चित्रापलीकडची अथांगता गुंतवून ठेवणारी आहे. समुद्राचा आभास निर्माण करणाऱ्या चित्रात लाटा आणि लहरी उद्रेकाचा एल्गार पुकारताहेत. लाटा येतात आणि किनाऱ्यावरचे सारे काही उद्‌ध्वस्त करून जातात. या चित्रात त्या उद्‌ध्वस्ततेचा उद्रेकाशेष प्रतिबिंबित झालेला दिसतो.

मीनाक्षी पाटील या कवयित्री आहेत. त्यांना नेमके शब्द कुठे वापरावेत, याची जाणीव आहे. तीच काव्यात्मकता त्यांच्या चित्रातही दिसते. लयबद्धता हा या कलाकृतीचा वैशिष्ट्याभिमान आहे. कवितेत शब्दांपलीकडे जसा हा अवकाश दिसतो, तसाच चित्रांतही रंगांच्या माध्यमातून विणण्याचा प्रयोग संवेदनशील कवयित्री मीनाक्षी पाटील यांनी केला आहे.

या कलाकृतींमधील रंग जसे घनदाट आहेत, तसाच प्रकाशही खोलवर पेरलेला आहे. अवकाश तर या चित्रशैलीचे वैशिष्ट्यच आहे. तो अवकाश अथांग आहे आणि तो कुठल्या चित्ररसिकांना कुठपर्यंत घेऊन जाईल, ते सांगणे कठीण आहे. सीमा पार करत हा अंथाग अवकाश घनदाट प्रकाशात अनुभवायचा असेल, तर हे प्रदर्शन २७ डिसेंबरपर्यंत चित्ररसिकांसाठी सुरू आहे.

mahendra.suke@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com