युद्धरहित जगाच्या दिशेनं....

सससजगाने दोन जागतिक युद्धांचा सामना केला असून, त्याच्या झळा लाखो-करोडो नागरिकांना बसल्या आहेत, ते अद्याप होरपळत आहेत.
a world without war
a world without warsakal
Summary

सससजगाने दोन जागतिक युद्धांचा सामना केला असून, त्याच्या झळा लाखो-करोडो नागरिकांना बसल्या आहेत, ते अद्याप होरपळत आहेत.

सससजगाने दोन जागतिक युद्धांचा सामना केला असून, त्याच्या झळा लाखो-करोडो नागरिकांना बसल्या आहेत, ते अद्याप होरपळत आहेत. जगातील कोणत्याही दोन देशांत एखाद्या छोट्या कारणावरून संघर्षाची ठिणगी पडते आणि जग तिसऱ्या जागतिक महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं असल्याची चर्चा सुरू होते. ज्येष्ठ लेखक संदीप वासलेकर यांनी याच विषयाची चर्चा त्यांच्या ‘अ वर्ल्ड विदाउट वॉर’ या नव्या पुस्तकात केली आहे. आपल्या देशाच्या तथाकथित सुरक्षेसाठी शस्त्रास्त्रांची खरेदी करण्यासाठी उडालेली झुंबड मानवाच्या अस्तित्वावरच घाला घालत असताना लेखक युद्धाशिवायच्या जगाची कल्पना मांडतात आणि ती योग्य प्रकारे पटवूनही देतात.

देशीवाद ते असहिष्णुता

जगभरात देशीवाद आणि असहिष्णुता वाढीस लागली असल्याचं चित्र दिसत असून, त्यामुळे मानव कधी नव्हे एवढा युद्धजन्य स्थितीमध्ये वावरताना दिसतो आहे. आपण वैश्विक तापमानवाढ, विविध जीवघेण्या साथींचा सामना करतो आहोत व त्यावर मात करण्याचा यशस्वी प्रयत्नही करीत आहोत. मात्र, आण्विक युद्धाची ठिणगी पडल्यास मानव वंश वाचण्याची शक्यता अगदीच कमी असेल. अनेकांना ही शक्यता खूपच कमी आहे असं वाटत असलं, तरी अनेक देशांतील एकाच नेत्याकडे किंवा नेत्यांच्या छोट्या गटाकडे आण्विक युद्ध सुरू करण्याचे अधिकार एकवटले आहेत. त्यामुळे आण्विक युद्धाची शक्यता खरी आहे आणि तिच्यात मानवी संस्कृती नष्ट करण्याची ताकदही आहे. त्यात आण्विक तंत्रज्ञानाला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि सायबर तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने हे युद्ध अधिकच घातक बनणार आहे. त्यामुळे मनुष्य किंवा सैनदलांचं आण्विक शस्त्रांवर अत्यंत कमी नियंत्रण असेल व अल्गोरिदम आणि मशिन्स युद्धाचा निर्णय घेतील. अशा वेळी एखादी घटना, एखादा अपघात किंवा इच्छेनुसार जागतिक युद्ध सुरू होऊ शकतं. अशा वेळी केवळ युद्ध रोखणं नव्हे, तर मानवी संस्कृती अधिक सकारात्मक दिशेने नेणं हे खूपच मोठं आव्हान ठरेल व यातून बाहेर पडणं मानवासाठी मोठं आव्हान ठरेल.

लेखकाला या पुस्तकाची कल्पना फ्रान्समधील कॉन येथे २०१९मध्ये एका परिषदेदरम्यान सुचली. या परिषदेला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले अनेक वक्ते उपस्थित होते. या परिषदेचा जाहीरनामा तयार करीत असतानाच या विषयावर एखादं पुस्तक लिहिता येईल एवढी ताकद असल्याचं श्री. वासलेकर यांना जाणवलं. जग शीतयुद्धाच्या काळात अनेकदा आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभं होतं, अनेकांना हे युद्ध केवळ कर्मधर्मसंयोगाने झालं नाही असं वाटतं; मात्र अनेक व्यक्ती, संस्था आणि नेत्यांनी एकत्रित प्रयत्न केले. या सर्वातून अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन व सोव्हिएत रशियाचे मिखाईल गोर्बाचोव्ह यांच्यावर शांतता चळवळीतील कार्यकर्त्यांनी दबाव आणला आणि त्यामुळेच युद्ध टळलं. त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न जगाला सातत्याने करीत राहावं लागणार असल्याचं लेखक आपल्या पुस्तकातून अधोरेखित करतात.

खरंतर, जगातील १९३ देशांपैकी २० देशांकडे आपलं स्वतःचं सैन्यदलच नाही व त्यांना आपल्या सुरक्षेची कोणतीही चिंता वाटत नाही. यामध्ये जगातील सर्वांत महत्त्वाचा कालवा असलेला पनामा हा देश, कोस्टारिका, स्वित्झर्लंड अशा देशांचा समावेश आहे. जगातील १२२ देशांनी आम्हाला आण्विक अस्त्रं नकोत, असं ठरवलं आहे. त्यातच १७० देशांचा संरक्षण अर्थसंकल्प १ अब्ज डॉलरपेक्षाही कमी आहे. या देशांना युद्ध नको आहे. त्यांना शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेमध्ये कोणताही रस नाही. अशाप्रकारे केवळ १५ ते २० देशच शस्त्रांच्या या स्पर्धेत असल्याचं दिसून येतं.

या देशांनी इतर देशांचं अनुकरण केल्यास, संरक्षणावर असलेला खर्च कमी केल्यास जग आण्विक युद्धापासून दूर जाऊ शकतं, असं लेखक अधोरेखित करतात.

शस्त्रास्त्र स्पर्धाच अडथळा

जगाला शस्त्रविरहित बनवण्यातील सर्वांत मोठा अडथळा सैन्यदल आणि शस्त्र उत्पादक कंपन्यांतील साटंलोटं असल्याचंही लेखक सांगतात. अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांमुळे शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीस लागली आहे. हे सर्व समस्यांचं मूळ आहे व हे सामान्य मनुष्याने समजून घेतलं पाहिजे. सैन्यदल आणि कंपन्यांतील हा ‘व्यवसाय’ आटोक्यात आल्याशिवाय युद्धविरहित जग ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणं कठीण आहे. यासाठी ग्लोबल सोशल कॉन्ट्रॅक्ट अत्यंत गरजेचा आहे. आता युद्धाचा विचार करता, आपण केवळ एका देशाकडे पाहू शकत नाही. आपण सोशल कॉन्ट्रॅक्टकडे जग, देश आणि समाज अशा दृष्टिकोनातून पाहायला लागेल. यातूनच संयुक्त राष्ट्रसंघालाही आपल्या विचारसरणीत बदल करावा लागेल आणि जग युद्धांपासून दूर जाण्याची शक्यता निर्माण होईल.

जगातील शस्त्रास्त्रं कमी करणं, हा युद्धं थांबण्यावरील उपाय नाही. शस्त्रं युद्ध सुरू करीत नाहीत, मनुष्य करतो, यावर लेखक भर देतात. याची सुरुवात देशाच्या संकल्पनेमधून (आयडिया ऑफ नेशन) सुरू झाली, त्या वेळी देशप्रेम ही सकारात्मक गोष्ट ठरली. यातून भारतासारखे अनेक देश स्वतंत्र झाले. मात्र, काळाबरोबर यात बदल होत गेला. देशप्रेमाचं स्तोम वाढत गेलं व त्यातून आमचा देश तुमच्यापेक्षा सरस आहे हे सांगण्यासाठी शेजारच्या देशावर हल्ले होऊ लागले. यात देशप्रेमाबरोबरच धार्मिक अस्मितेलाही महत्त्व आलं. स्वतःचं देशप्रेम इतर देशांना नष्ट करण्यासाठी वापरलं गेल्यास युद्धाची ठिणगी पडू शकते, हा इशारा रवींद्रनाथ टागोर आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यासारख्या विचारवंतांनी पूर्वीच दिला होता व तो आता खरा ठरताना दिसतो आहे.

एकमेकांकडे असलेल्या आण्विक शस्त्रांकडे पाहून व त्यामुळे नुकसान होण्याच्या भीतीने आण्विक युद्धं टाळली जातील, त्यांना प्रतिबंध होईल, अशी थिअरी हल्ली मांडली जाते. मात्र, ती खरी नसल्याचंही लेखक आपल्या पुस्तकात पटवून देतात. याचं कारण अर्थातच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि सायबर तंत्रज्ञान आहे. समोरच्या देशाची पुन्हा हल्ला करण्याची स्थिती किती आहे हे मोबाईल लॉन्चर, पाण्याखालील मानवरहित वाहनं सांगू शकतील. त्यामुळे आण्विक अस्त्रांची एकमेकांना वाटणारी भीती भविष्यात कमी होत जाणार आहे. त्यामुळे यावरील उपाय अण्वस्त्रबंदी हाच आहे. शांततापूर्ण, एकमेकांच्या राष्ट्रवादाचा आदर करणारं, शस्त्रास्त्र स्पर्धेपासून दूर व युद्धरहित जग ही परिकल्पना वाटत असली, तरी ती प्रत्यक्षात आणणं मानवी संस्कृती टिकून राहण्यासाठी आवश्‍यक आहे. हे पुस्तक या दिशेने एक पाऊल टाकतं व ते प्रत्यक्षात आणण्यासाठीचे काही उपायही सुचवतं. संदीप वासलेकर यांच्या या पुस्तकाचं हेच फलित आहे.

पुस्तकाचं नाव : अ वर्ल्ड विदाउट वॉर

लेखक : संदीप वासलेकर

प्रकाशक : हार्पर कॉलिन्स इंडिया लिमिटेड

पृष्ठं : ३४६, मूल्य : ५९९ रुपये (पेपरबॅक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com