जगण्याचा रस्ता... (महेश काळे)

mahesh kale
mahesh kale

अनेकदा आपण नकारात्मक विचारांनी स्वतःला इतकं बंदिस्त करून घेतो, की मार्गच सापडत नाही. "राइज' या वेब सिरीजचा नायक असाच दिशाहीन झालेला आहे. एका "रोड ट्रिप'मुळं त्याला अक्षरशः "दिशा' सापडते आणि जगण्याचं गमकही कळतं. अतिशय छोट्याछोट्या प्रसंगांतून, संवादांतून जगण्याचं मर्म सांगणाऱ्या या वेब सिरीजविषयी...

आपण रोजच्या जगरहाटीत इतके गुंतून गेलेले असतो, की आपल्याला कामाच्या डेडलाइन्स, मंथली टारगेट्‌स याशिवाय दुसरं काही डोळ्यासमोर येतच नाही. काम एके काम आणि काम दुणे काम. नोकरीमधले चढ-उतार, कामाच्या ठिकाणी येणारं यश-अपयश, डोक्‍यावर असणारी टांगती तलवार यातच जीव मेटाकुटीस येतो. मग आपल्या आवडीनिवडी, आपले छंद, आपली पॅशन, आपली एखादी सुप्त महत्त्वाकांक्षा, कैक वर्षांपासून उराशी बाळगलेलं एखादं स्वप्न हे सगळं कुठंतरी दूर अडगळीत जाऊन पडतं.

आयुष्य मोठं गमतिशीर असत आणि वेळ आल्यावर ते बरोबर जादू घडवून आणतं. आयुष्याचा रोड मॅप हा सरळ, सरधोपट कधीच नसतो. त्यात खाचखळगे येणार, चढ-उतार येणार, अनेक नवनवीन वळणंही येणार. सगळंच काही आपल्या मनासारखं घडणार नाही. कधी सुखाची फोडणी, तर कधी दुःखाचा तडका अनुभवायला मिळणार. नकारात्मक दृष्टिकोनामुळं आपल्याला छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सचही ओझं वाटायला लागतं. "माझ्या बाबतीतच का?', "हे सर्व आत्ताच व्हायला पाहिजे होतं का,' हे मनाला पडणारे प्रश्न खरंतर निरर्थकच असतात. सर्व गोष्टींचा समतोल राखत, आपल्या आवडीनिवडी जपत, नाउमेद न होता आयुष्याचा आनंद घेत जगणं हीच तर खरी कसरत आहे, त्यात तर खरी गंमत आहे. खचून न जाता आपला आतला आवाज ऐकला, तर आपलं आयुष्य आपल्याला नक्की मार्ग दाखवतं आणि आपलं स्वप्न पूर्ण करायला शिकवतं. "राइज' या वेब सिरीजची गोष्टही अशीच काहीशी आहे, जी आपल्याला आयुष्याकडं सकारात्मक दृष्टीनं बघायला शिकवते.

कल्पना करा, की तुम्ही पै-पै साठवून, कर्ज काढून तुमची महागडी ड्रीम बाईक खरेदी करता आणि मस्तपैकी ऑफिसला जाऊन सगळ्यांसमोर मिरवता. एका वेगळ्याच धुंदीत असताना नेमक्‍या त्याच दिवशी तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येतं. नुसतं ऐकूनच पोटात गोळा आला ना?... "राइज'चा नायक "श्रे'च्या बाबतीतही असंच घडतं आणि क्षणार्धात त्याच्या चेहऱ्यावरचा नूरच पालटतो. नैराश्‍याचं भूत मानगुटीवर बसतं आणि सुन्न मनस्थितीत तो घरी येतो. आपण घेतलेली बाइकच अशुभ आहे, अशी तो मनाची समजूत करून घेतो. जॉब गेला असल्यामुळं बाइक विकून थोडी पैशाची जमवाजमव करावी, असा मनोदय तो वडिलांजवळ व्यक्त करतो. बाप-लेकांमधला इथला संवाद आपल्याला खूप जवळचा वाटतो. "सपनोंपे कभी धूल नहीं जमती', "अपने सपनों के लिये लडो' हे "श्रे'च्या वडिलांच्या तोंडचे संवाद मनाचा ठाव घेतात. निराश झालेल्या "श्रे'चं मन पुन्हा भरारी घेतं आणि तो निघतो सोलो रोड ट्रिपवर, त्याचं अधुर स्वप्नं पूर्ण करायला.

आपल्या या ट्रिपबद्दल तो त्याच्या एका मित्राजवळही बोलतो. या मित्राचे एक काका आहेत शर्माजी, ज्यांना बॉलिवूडमधले सीन्स प्रत्यक्षात अनुभवण्याचा आगळावेगळा छंद आहे. संयोगानं म्हणा अथवा नाइलाजानं "श्रे'ला या शर्माजींना बरोबर घेऊनच आपली रोड ट्रिप सुरू करावी लागते. पुढची कथा प्रामुख्यानं श्रे (विक्रांत मेस्सी) आणि शर्माजी (अतुल श्रीवास्तव) या दोन पात्रांभोवती फिरते. शर्माजींच्या बॉलिवूडच्या वेडापायी ते दोघं जण बऱ्याचदा गोत्यातही येतात. "धूम' चित्रपटामधला रॉबरीचा सीन प्रत्यक्षात अनुभवण्याच्या नादात शर्माजींमुळं "श्रे'ला चक्क मारही खावा लागतो. त्यामुळं "श्रे' शर्माजींवर चांगलाच रागावतो आणि सुरवातीला त्यांच्याशी काहीसा फटकूनच वागतो. वयात फरक असूनही पुढं प्रवासादरम्यान दोघांची चांगली गट्टी जमते. दोघंही आपापल्या आयुष्याचा पट एकमेकांना उलगडून दाखवतात आणि एकमेकाला समजून घेतात. या शर्माजींच्या दृष्टीनं आयुष्य म्हणजे एक सिनेमा आहे. आपणच आपल्या आयुष्याचे हिरो आहोत. त्यात कधी कॉमेडी असणार, तर कधी ट्रॅजेडी असणार; पण आयुष्याचा आनंद घेणंही तितंकच महत्त्वाचं आहे. रोड ट्रिपदरम्यान कोलकत्याच्या एका बारमधल्या प्रसंगात बोलताबोलता शर्माजींच्या आयुष्यातली दुःखद बाजू समजताच "श्रे' आणि पर्यायानं आपण प्रेक्षकसुद्धा भावूक होऊन जातो. कोलकता शहराशी असलेलं शर्माजींच भावनिक नातं त्याला समजतं. आपली सहचारिणी गमावूनही आपल्या दुःखाचा गवगवा न करता हा माणूस जीवनाकडं किती सकारात्मक दृष्टीनं बघतो आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, याचं "श्रे'ला आश्‍चर्य वाटतं. तिथंच या दोघांच्या नात्यातली वीण आणखी घट्ट होते. एक वेळ अशी येते, की शर्माजींना निरोप देताना त्याची पावलं उचलत नाहीत; पण शर्माजींशी बोलून तो आपली उरलेली रोड ट्रिप पूर्ण करण्यासाठी चालू पडतो. शर्माजींच्या स्वभावामुळं आणि जीवनाकडं बघण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळं "श्रे' भारावून जातो आणि आलेली मरगळ झटकून टाकतो.

एकुणात, ही वेब सिरीज हलकीफुलकी आहे; पण प्रसंगी भावूक करणारी आणि तितकीच प्रेरणादायीही आहे. मुख्य म्हणजे आजच्या तरुणाईशी रिलेट करणारी आहे. दुसऱ्या भागात काही ठिकाणी ती थोडीशी कंटाळवाणी वाटते; पण तिसऱ्या भागात पुन्हा वेग पकडून चौथ्या भागात तर कमालच करते. चौथा भाग "सफर' हा तर या सिरीजचा कळसाध्यायच म्हणावा लागेल.

पटकथा-संवाद, दोन गुणी अभिनेत्यांचा सहजसुंदर अभिनय, त्यांच्यातली केमिस्ट्री ही या सिरीजची बलस्थानं म्हणावी लागतील. सिनेमेटोग्राफी इतकी लाजवाब, की आपण स्वतः रोड ट्रिप अनुभवल्याचा भास व्हावा. विक्रांत आणि श्रीवास्तव हे अर्थातच मुख्य भूमिकांमध्ये असून, त्यांना अक्षय भगत (गुलशन), मेधा बर्मन (शिवानी), कुमार वरूण (अभिषेक), सुनीता नंदा("श्रे'ची आई) आणि शिशिर शर्मा ("श्रे'चे वडील) यांनीही तितकीच तोलामोलाची साथ दिली आहे. त्यातही "श्रे'चे त्याच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसमवेतचे आणि मित्रांबरोबरचे प्रसंग, त्यांच्या गप्पाटप्पा, त्यांची संभाषणं हे सर्व अगदी छान जमून आलं आहे. प्रथमेश पाटील आणि सुमित सक्‍सेना या द्वयीनं ही वेब सिरीज दिग्दर्शित केली आहे. पटकथेचा मूळ गाभा लक्षात ठेवून त्यावरची पकड कायम ठेवत त्यांनी दिग्दर्शनाची बाजू अतिशय उत्तमरित्या सांभाळली आहे. त्याबद्दल त्यांना निश्‍चितच दाद द्यायला हवी. विशेष भावणारी गोष्ट म्हणजे चारही एपिसोड्‌सना देण्यात आलेली शीर्षकं. "स्पीड ब्रेकर', "टेक दॅट रोड ट्रिप', "द ड्रीम बाइक' आणि "सफर' ही सर्व शीर्षकं आपल्याला कथेच्या आणखी जवळ घेऊन जातात.
प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या "लॉस अँजलिस वेब फेस्ट'साठी नामांकन प्राप्त झालेली ही एकमेव भारतीय वेब सिरीज होती. त्या "वेब फेस्ट'साठी विविध देशांमधून शेकडो प्रवेशिका आल्या होत्या, हेही तितकंच महत्त्वाचं. त्या अनुषंगानं मिळालेलं हे यश निश्‍चितच गौरवास्पद म्हणावं लागेल. एकूण चार भागांमध्ये प्रसारित झालेली ही सिरीज प्रत्येक भागात आपलं मनोरंजन करते आणि उत्कंठा वाढवून चांगले संदेशही देते.

सिरीजचा शेवट एक वेगळाच ठसा उमटवून जातो. बॅकग्राऊंडला "डीपर यू फॉल हायर यू राइज', "यू डोंट लूज फाइट बीकॉज यू फॉल, यू लज बीकॉज यू रिफ्युज टू राइज' या संवादांची जोड आणि एकेक पाऊल आत्मविश्वासानं टाकत उंच पर्वतराजींवर पोचणारा आपला नायक "श्रे.' चला तर मग ,आपणही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करूया आपापल्या रोड ट्रिपवर.... "क्‍योंकि सपनों की कोई एक्‍स्पायरी डेट नही होती!'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com