तरल अन् ओघवतं आत्मकथन !

कथा, कविता, गझल, चित्रपट लेखन, दिग्दर्शन अशा बहुविध क्षेत्रात मुशाफिरी केलेले आणि देशाची फाळणी ते कोरोनाचे महासंकट, अशा दोन स्थित्यंतरांदरम्यानचा काळाचा पट अनुभवलेले हिंदी चित्रपटसृष्टीतले ख्यातनाम गीतकार, दिग्दर्शक गुलजार म्हणजे अनुभव संचिताचा एक महाकोशच.
mahima thombre writes on Gulzar Indian poet
mahima thombre writes on Gulzar Indian poetsakal
Summary

कथा, कविता, गझल, चित्रपट लेखन, दिग्दर्शन अशा बहुविध क्षेत्रात मुशाफिरी केलेले आणि देशाची फाळणी ते कोरोनाचे महासंकट, अशा दोन स्थित्यंतरांदरम्यानचा काळाचा पट अनुभवलेले हिंदी चित्रपटसृष्टीतले ख्यातनाम गीतकार, दिग्दर्शक गुलजार म्हणजे अनुभव संचिताचा एक महाकोशच.

- महिमा ठोंबरे

कथा, कविता, गझल, चित्रपट लेखन, दिग्दर्शन अशा बहुविध क्षेत्रात मुशाफिरी केलेले आणि देशाची फाळणी ते कोरोनाचे महासंकट, अशा दोन स्थित्यंतरांदरम्यानचा काळाचा पट अनुभवलेले हिंदी चित्रपटसृष्टीतले ख्यातनाम गीतकार, दिग्दर्शक गुलजार म्हणजे अनुभव संचिताचा एक महाकोशच. काळाच्या प्रचंड अवकाशाबद्दल आणि त्यात अनुभवलेल्या माणसांबद्दल लिहिण्यासारखं, बोलण्यासारखं त्यांच्याकडे अर्थातच खूप काही आहे. गुलजारांनी (अजूनतरी, भविष्यातलं माहीत नाही ) आत्मचरित्र लिहिलेले नसल्याने या सगळ्या काळाबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल एकसलग असे काही वाचण्यासाठी उपलब्ध नाही. परंतु, ‘धूप आने दो’ या त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकातून या अनुभवांचे काही तुकडे मात्र उलगडतात.

अरुण शेवते यांनी पुस्तकाचं संपादन केलंय. ‘ऋतुरंग’च्या दिवाळी अंकात १९९३ ते २०२१ या काळात गुलजार यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन म्हणजे ‘धूप आने दो’! प्रत्येक वर्षीचा नवा विषय, नवा विचार अन् नवा लेख. प्रत्येक लेखागणिक गुलजारांनी अनेक विषयांना स्पर्श केला आहे.

गुलजारांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही जवळचे कप्पे, ज्यात त्यांचा नातू समय, मुलगी मेघना, अब्बू (वडील), त्यांचा कुत्रा ‘पाली’ (त्याला गुलजारांनी कधीही कुत्रा म्हटले नाही) आणि ‘कॅरेक्टर’ स्वरूपातच उलगडणारं त्यांचं जन्मगाव दीना, या सगळ्याबद्दल गुलजार भरभरून लिहितात. मुलीच्या जन्मावेळी जबाबदारीच्या जाणिवेने प्रौढत्व आलेला बाप ते नातवाच्या जन्मावेळी जबाबदारीपेक्षा निखळ आनंद अनुभवण्याची सवलत असलेले आजोबा, हा प्रवास ‘सूर्यमालेतील तो सूर्य’ आणि ‘बोस्की’ या लेखांतून उलगडतो. वडिलांबद्दल, जन्मगावाबद्दल बोलताना फाळणीचे संदर्भ आणि जखमा नकळत डोकावतात. मात्र कुठेही त्याबद्दल नकारात्मक सूर उमटत नाही.

लता दीदी, पंचमदा, सलील चौधरी, हेमंतकुमार, मीनाकुमारी अशा काही व्यक्तिचित्रणांचाही यात समावेश आहे. गुलजार यांच्यामधला कवी या माणसांमधलं वेगळेपण शोधतो. त्यामुळे इतरांना न दिसलेले या माणसांचं व्यक्तित्व ते उलगडून दाखवतात. गुलजार म्हटलं की कविता आपसूकच येणार. त्यामुळे अनेक लेखांमध्ये आणि स्वतंत्रपणेही या पुस्तकात कवितांचा समावेश आहे. मात्र गुलजारांचे अप्रतिम शब्द आणि अचूक ठिकाणी कवितांची पेरणी केल्यामुळे त्या रसभंग न करता मूळ आशयाला अधिकच खुलवतात. गुलजारांची प्रवासाची आवड, शिक्षण व्यवस्थेवरचं त्यांचं टोकदार भाष्य, त्यांच्या चित्रपटांमागील विचार, काही किस्से अशा अनेक गोष्टी या लेखांच्या अनुषंगाने समोर येत जातात. गुलजारांची सतत नवं शिकण्याची वृत्ती आणि जुनं तेच कवटाळून न बसता नव्या बदलांचं खुल्यादिलाने स्वागत करण्याचा उमदेपणा त्यांच्या लिखाणातून जाणवत राहतो. कोरोनाच्या काळात स्थलांतरितांची झालेली अवस्था पाहून ते अस्वस्थ होतात. फाळणीच्या वेदनांशी त्यांना या वेदनांची तुलना करावीशी वाटते. पण ही नकारात्मकताही लगेच झटकत ‘धूप आने दो’ची आर्त साद घालतात.

अशी उत्कृष्ट साहित्यमूल्य असलेल्या पुस्तकाची निर्मितीमूल्येही उत्तम आहेत. सतीश भावसार यांचं मुखपृष्ठ, उत्कृष्ट बांधणी आणि मोजक्या पण समर्पक छायाचित्रांच्या समावेशामुळे पुस्तक देखणं झालं आहे. प्रत्येक लेख वेगवेगळ्या व्यक्तींनी अनुवादित आणि शब्दांकित केला असला, तरी या लेखांमध्ये एकसंधपणा टिकून आहे, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. गुलजारांचं ओघवतं अन् तरल आत्मनिवेदन असणारं हे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखंच आहे, हे नक्की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com