मनावर उतरत जाणारी "सेपिया'रंगी व्यक्तिचित्रं (मल्हार अरणकल्ले)

मल्हार अरणकल्ले
रविवार, 14 एप्रिल 2019

"व्यक्तीचा अंतर्बाह्य वेध घेण्यासाठी लागणारी लय आणि सूक्ष्मातिसूक्ष्म शब्दच्छटा चितारणारी समचित्त वृत्तीची लेखणी आनंद अंतरकरांजवळ आहे. अशा वैशिष्ट्यांमुळंच रेखीव नि घोटीव शैलीतून ते आपल्या प्रिय व्यक्ती क्ष-किरणांच्या भेदकतेनं जिवंत करतात,' असं निरीक्षण "जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'चे माजी अधिष्ठाता प्रा. मं. गो. राजाध्यक्ष यांनी "सेपिया'च्या मलपृष्ठावर नोंदविलं आहे. "सेपिया'तील दहाही व्यक्तिरेखांत ही लय आणि सूक्ष्माच्याही पलीकडं पाहणारी दृष्टी यांचं मनोज्ञ मिश्रण आढळतं. अंतरकर हे "जे. जे. स्कूल'चे विद्यार्थी.

"व्यक्तीचा अंतर्बाह्य वेध घेण्यासाठी लागणारी लय आणि सूक्ष्मातिसूक्ष्म शब्दच्छटा चितारणारी समचित्त वृत्तीची लेखणी आनंद अंतरकरांजवळ आहे. अशा वैशिष्ट्यांमुळंच रेखीव नि घोटीव शैलीतून ते आपल्या प्रिय व्यक्ती क्ष-किरणांच्या भेदकतेनं जिवंत करतात,' असं निरीक्षण "जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'चे माजी अधिष्ठाता प्रा. मं. गो. राजाध्यक्ष यांनी "सेपिया'च्या मलपृष्ठावर नोंदविलं आहे. "सेपिया'तील दहाही व्यक्तिरेखांत ही लय आणि सूक्ष्माच्याही पलीकडं पाहणारी दृष्टी यांचं मनोज्ञ मिश्रण आढळतं. अंतरकर हे "जे. जे. स्कूल'चे विद्यार्थी. रेषा, आकार, रंग यांची त्यांच्या वृत्तीत मुळातच असणारी सौंदर्य-प्रतिपदा या "स्कूल'मध्ये पौर्णिमास्वरूप झाली. त्यामुळंच अंतरकरांच्या लेखनाला दृश्‍यात्मकतेचं अनोखं कोंदण लाभलं आहे. "हंस'चं संपादन करताना वडील अनंत अंतरकरांचं, म्हणजे अण्णांचं नैष्ठिक रूप त्यांना जवळून पाहता आलं. हाती आलेल्या लेखनापैकी काहींवर बारा-चौदा तास संपादकीय संस्कार केल्यावर, मूळचा आशय कसा उठावदार होतो, चपखल शीर्षकाचा विचार करण्याची आवर्तनं किती अस्वस्थ करणारी असतात, लेखनातील विरामचिन्हांच्या नेमक्‍या जागा संगीतातल्या समेसारख्याच किती अर्थपूर्ण असतात, यांसारख्या संपादनातल्या "अंतरकरी' कसबाचे धडे त्यांना अण्णांच्या सहवासात गिरविता आले. रंग-रेषांच्या लोभातले आनंद अंतरकर इथंच शब्दाकृतींच्या सौंदर्यातही गुंतून गेले. अंगावर पाऊसझड झेलावी, तसा "हंस'च्या कचेरीत सुरू असलेला नामांकित साहित्यिकांचा राबता त्यांच्या मनात अखंड नवोन्मेषांचं सर्जन करीत राहिला. वयांतलं अंतर बाजूला होऊन लाभलेलं या मंडळींचं अकृत्रिम मैत्र अंतरकरांना समृद्ध करीत राहिलं. त्यांच्या नजरांच्या कोनांची पेन्सिल स्केच बुकातल्या पानांवर व्यक्तिरेखांचे शब्दाकार रेखाटत गेली. संध्याकालाबरोबर सर्व दिशांनी मिसळत जाणाऱ्या काजळदाटीत बुडून गेलेलं पानगर्द झाड फुलांच्या गंधकोवळिकेनं पहाटे बहरून जावं, तसा कोरीव व्यक्तिरेखांचा प्रसन्न ऋतू "सेपिया'मध्ये पानांच्या फांद्याफांद्यांत उमाळून आला आहे.

"रत्नकीळ'नंतरचा अंतरकरांचा हा दुसरा व्यक्तिचित्रसंग्रह. व्यक्तिचित्रं किंवा चरित्रं अनेकांनी लिहिली आहेत. काही केवळ माहितीची जंत्री असलेली. काही स्वभाववैशिष्ट्यं किंवा विशिष्ट लकबींचं चित्रण असलेली. काही अनुभवांतून व्यक्तिरेखा उलगडणारी; तर काही त्या त्या व्यक्तींच्या आसपास वावर होत असल्याची अनुभूती देणारी. अंतरकरांना शब्दभाषा, चित्रभाषा आणि छायाचित्रभाषा यांची उत्तम जाण असल्यानं, त्यांची व्यक्तिचित्रणं म्हणजे या मंडळींबरोबरची "वाह! क्‍या बात है' किंवा "बहुत खूब' अशी मन:पूर्वक दाद पुन:पुन्हा मिळविणारी मैफलच बनली आहे. आपापल्या अनुभवांचं तबक घेऊन वाचक इथं येतो; आणि इथले नाजूक पुष्पसडे उचलून घेता घेता "अनंत हस्ते कमलावराने' अशा अवस्थेच्या वेल्हाळ वावटळीत तो वेढून जातो. "तीच ती नेहमीची किंवा वापरून गुळगुळीत झालेली विशेषणं, शब्दसमुच्चय, शब्दजाती किंवा "एक्‍स्प्रेशन्स' यांच्यासाठी नव्या शब्दांची निर्मिती साधता येईल का, वेगळी काही अर्थच्छटा दाखविता येईल का, अधिक व्याप्ती सामावणारा शब्द किंवा समास योजता येईल का, याचा मला सतत ध्यास लागलेला असतो. या छंदातूनच मी नव्या शब्दयोजना करीत असतो. लेखन करीत नसतानाही नवनव्या शब्दांचा विचार करीत असतो', असं अंतरकरांनी म्हटलं आहे. "रत्नकीळ' असो किंवा "सेपिया' असो, पुस्तकाच्या; तसंच प्रत्येक व्यक्तिचित्रलेखाच्या शीर्षकापासूनच अंतरकरांची अशी शब्दकारागिरी ठिकठिकाणी भेटत राहते; आणि आपल्याला वाचनाचा समृद्ध अनुभव येत जातो. "सेपिया' हा छायाचित्रकलेच्या परिभाषेतला इंग्रजी शब्द आहे. कृष्ण-धवल छायाचित्रावर विशिष्ट कालान्तरानं रासायनिक घटकांमुळं जी एक तपकिरी रंगाची छटा चढते, तिला "सेपिया' म्हणतात. छायाचित्रामध्ये त्यामुळं आपोआपच प्राचीनत्वाच्या भासाचं किंवा ऐतिहासिक दुर्मिळतेचं मोल निर्माण होतं. ही व्यक्तिचित्रं वाचताना, शब्द, त्यांचे अर्थ, त्यांच्या छटा, संबंधितांचं मनावर उमटणारं व्यक्तिमत्त्व या सगळ्यांवर वाचकांच्या मनात साठलेला "सेपिया' झिरपत जातो; आणि ही मैफल जणू जिवंत सुरांनी भारून जाते.
"त्यांच्या अंतरीच्या बोलांना स्वरयंत्रातून बाहेर पडताना एका अभीष्ट लाघवाचं व्यंजन लाभत असे.' ("वागीश्वरी' : शांताबाई शेळके), "भावेकाकांच्या लयदार वाक्‍यांनी माझ्या मनात पावसाळी पागोळ्यांचा नाद निर्माण केला होता.' ("ढग' : पु. भा. भावे), "रुखसार'मधील "ख'तल्या नुक्‍त्यासह महेंद्र कपूरनं केलेला आघात काळजात बाणासारखा घुसतो.' ("रूपक' : सी. रामचंद्र), "मिष्किलपणे हसताना त्यांच्या गौर गालावर पुसटशी पुरुषी खळी पडे. क्‍लार्क गेबलसारखी.' ("मारवा' : बाळ गाडगीळ), "कथा जिथं संपते, तिथून ती वाचकाच्या मनभर पुन्हा समुद्रलहरींसारखी खेळत-उचंबळत राहते.' ("जवळ...दूर' : राजेंद्र बनहट्टी), "आजूबाजूला गुलाबी थंडीचा अंमल आणि अंगअंग उल्हासवणाऱ्या केशरी उन्हाचा उबदार शिडकावा. साऱ्या सृष्टीत सोनचाफ्याचा गंध मिसळलेला.' ("दूत' : म. द. हातकणंगलेकर) अशी एकेक वाक्‍यं वाचकाला पानापानांवर गुंतवून ठेवतात. जलोपसर्ग, जाग्रणातिरेक, शिस्ताचरण, व्यालोल वातावरण, रक्तस्नात शब्दांचा पाऊस, भविष्यहृत चेहरा, तरबत्तर, साहित्यशौंड, निसरसांड असे "खास ंअंतरकरी' शब्द त्यांच्या निर्मितीचं रहस्य शोधायचं आव्हान निर्माण करतात; आणि वेगवेगळी भाषिक सौंदर्यस्थळं पुन:पुन्हा उलगडून दाखवितात. पुस्तकातली सारी व्यक्तिचित्रं पूर्वप्रसिद्ध आहेत. त्यांचा लेखनकाल 1974 ते 2017 असा दीर्घ आहे. त्यामुळं शब्दार्थांचा, अनुभवांचा आणि स्वभाववैशिष्ट्यांचा मुरत गेलेला "सेपिया' रंग अधिक गर्द होत वाचकाच्या मनावर उतरत जातो, हेच या लेखनाचं वेगळेपण आहे.

पुस्तकाचं नाव : सेपिया
लेखक : आनंद अंतरकर
प्रकाशक : हंस प्रकाशन, पुणे
पानं : 240, किंमत : 250 रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malhar arankalle write book review in saptarang