फ्रान्समध्ये पुन्हा मॅक्रॉनपर्व?

फ्रान्समध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या पहिल्या फेरीत विद्यमान अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी आघाडी घेतली आहे.
emmanuel macron and marine le pen
emmanuel macron and marine le pensakal
Summary

फ्रान्समध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या पहिल्या फेरीत विद्यमान अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी आघाडी घेतली आहे.

- मालिनी नायर

फ्रान्समध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या पहिल्या फेरीत विद्यमान अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरीतही ते आघाडी घेत विजयी होतील, असा अंदाज अनेक सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांच्या निवडीवरून नागरिकांमध्ये मात्र प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या मतदारांची वाढती संख्या ही उमेदवारांसाठी चिंतेची बाब आहे.

फ्रान्सच्या अध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत उजव्या विचारसरणीच्या मेरीन ले पेन आणि तटस्थ विचारसरणीचे इमॅन्युअल मॅक्रॉन एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. उदरनिर्वाहाच्या प्रश्नामुळे त्रस्त असलेली फ्रेंच जनता या नेत्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीमुळे संतुष्ट नाही.

१० एप्रिल रोजी संपलेल्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीत ‘ला रिपब्लिकन एन मार्शे’ या उदारमतवादी पक्षाचे इमॅन्युअल मॅक्रॉन आणि नॅशनलिस्ट रॅली पक्षाच्या मेरिन ले पेन यांनी प्रत्येकी २७.८ टक्के आणि २३.१ टक्के मते मिळवून विजय मिळवला. या विजयासोबतच दुसऱ्या आणि अंतिम फेरीसाठी हे दोन्ही उमेदवार पात्र ठरले आहेत. डाव्या विचारसरणीचे जेन ल्युक मॅलेंचॉन २२ टक्के मते मिळवून तिसऱ्या स्थानावर राहिले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ते अपात्र ठरले असले, तरी डाव्या विचारांच्या समर्थकांची मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.

२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ले पेन यांना मिळालेल्या ३४ टक्के मतांच्या तुलनेत मॅक्रॉन यांनी ६६ टक्के मते मिळवत दणदणीत विजय मिळवला होता. तथापि यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे. मॅक्रॉन यांचा विजय निश्चित मानला जात असला, तरी त्यांच्या विजयाचे अंतर मात्र फार कमी असेल, असे अनेक सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. उदा. आयएफओपीच्या सर्वेक्षणात पेन यांना ४९ टक्के, तर मॅक्रॉन यांना ५१ टक्के मते मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘इप्सॉस फ्रान्स’च्या सर्वेक्षणात पेन यांच्या ४६ टक्क्यांच्या तुलनेत मॅक्रॉन यांना ५४ टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे फ्रान्सच्या अध्यक्षपदी मॅक्रॉन यांनाच पुन्हा संधी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.

यंदाच्या निवडणुकीत जवळपास चार कोटी ९० लाख मतदार पात्र होते. त्यापैकी ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी २०१७ सालच्या पहिल्या फेरीतील (६९.४ टक्के) टक्केवारीहून कमी आहे. म्हणजे फ्रान्समधील प्रत्येक चार मतदारांपैकी एका मतदाराने आपला हक्क बजावला नाही. विशेष म्हणजे यापैकी अनेक मतदार तरुण आहेत. सद्यस्थितीत कोणत्याही पक्षाला किंवा त्यांच्या उमेदवारांना फ्रान्सच्या नागरिकांना, कामगारांना नेमके काय हवे, हे ठाऊक नसल्याचे त्यांना वाटते. फ्रान्समधील बहुतांश मतदार योग्य उमेदवार किंवा पर्याय नसल्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन मतदान करतात. १९६५ नंतर मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्यांची ही टक्केवारी सर्वाधिक आहे. यंदा दुसऱ्या फेरीतील मतदानाकडे फ्रेंच जनतेने मोठ्या प्रमाणात पाठ फिरवल्यास मॅक्रॉन यांच्या विजयाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे आणि या गोष्टी मॅक्रॉन यांच्यासाठी चिंता वाढवणाऱ्या आहेत.

मॅक्रॉन यांचे तटस्थ विचार फ्रान्सच्या राजकारणास पारंपरिक पक्षांपासून आणि त्यांच्या विचारधारेपासून दूर नेण्यास मदत करतील. तसेच कामगारांच्या प्रश्नांवर चांगल्या सुधारणा घडवून आणतील, असा सर्वसामान्य मतदारांचा विश्वास होता. त्यामुळे मॅक्रॉन यांचा २०१७ मध्ये दणदणीत विजय झाला होता; परंतु आता त्यांच्याबाबतचा नागरिकांमधील विश्वास हळूहळू कमी होत आहे. विजयाच्या अवघ्या एका वर्षाच्या आतच मॅक्रॉन यांना त्यांच्या करधोरणाविरुद्ध रोषाचा सामना करावा लागला. मॅक्रॉन हे सर्वमान्य नेते आहेत म्हणून त्यांचा विजय होणार आहे असे नाही, तर उजव्या विचारसरणीच्या ले पेन यांना सत्तेपासून दूर ठेवायचे आहे म्हणून त्यांचा विजय होणार आहे.

इमॅन्युअल मॅक्रॉन हे फ्रान्सचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. माजी अर्थमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष फ्रँनकोईस ओलांद यांना श्रद्धास्थान मानत असलेले मॅक्रॉन हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीपूर्वी बँकिंग क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी जुन्या समाजवादी आणि रिपब्लिकन एलिट क्लबला आव्हान दिले होते. राजकीय अभिजात वर्ग सामान्य नागरिकांच्या गरजा समजून घेण्यास असमर्थ आहे आणि मॅक्रॉन त्या गरजा पुरवू शकतील, असा विश्वास कामगारवर्गामध्ये निर्माण झाला होता. फ्रान्ससाठी चांगल्या आर्थिक भविष्याची आशा आणि वचन देणारा माणूस म्हणून मॅक्रॉन यांच्याकडे पाहिले गेले होते; मात्र पाच वर्षांनंतर पुन्हा निवडणुकांना सामोरे जात असताना फारसे काही हातात न पडल्यामुळे मतदार संतप्त झाले आहेत.

मॅक्रॉन यांनी यंदा थोड्या उशिरा प्रचाराला सुरुवात केली. रशिया-युक्रेनदरम्यानच्या संवादात त्यांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे प्रचाराला विलंब लागल्याचे ते सांगतात. मॅक्रॉन यांचा प्रचार निवृत्तीचे वय ६२ वरून ६५ पर्यंत वाढवणे आणि बेरोजगारांसाठीच्या योजनेच्या फायद्याभोवती फिरत होता. बेरोजगारांना साप्ताहिक १५ ते २० तासांच्या कामाच्या आधारावर सरकारी अनुदानाचा लाभ मिळेल, अशी ही योजना आहे. साहजिकच या दोन्ही योजना मोठ्या प्रमाणात वादग्रस्त, तसेच नागरिकांच्या डोळ्यात येणाऱ्या ठरल्या; परंतु सध्या मॅक्रॉन यांच्या समर्थनार्थ असलेली बाजू म्हणजे युरोपीय युनियनमधील २७ देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युरोपियन कौन्सिलचे ते प्रमुख आहेत. या माध्यमातून ते रशियावर निर्बंध लादण्यात आणि युक्रेनला शस्त्रास्त्रांची मदत करण्यात महत्त्वाचे नेते बनले आहेत. युरोपिय युनियनमधील जर्मनी आणि इटलीसारख्या देशांमध्ये फ्रान्सला महत्त्व प्राप्त करण्यास मदत मिळाली आहे. मॅक्रॉन यांना पुन्हा निवडून आल्यानंतर फ्रान्सचा संरक्षण खर्च वाढवण्याची इच्छा आहे.

फ्रान्समधील बेरोजगारी १० टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे मॅक्रॉन यांचे ध्येय होते आणि जवळपास ७.४ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात ते यशस्वी झाले आहेत. कोरोना महामारी असतानाही त्यांनी बेरोजगारी कमी करण्यासाठी केलेले काम उल्लेखनीय ठरले. प्रचारादम्यान सर्व फ्रेंच जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्याचा दावा त्यांनी केला. तसेच घरे आणि व्यवसायासाठी वर्षाला १.२३ लाख कोटी कर कमी करण्याचे आश्वासनही दिले. मॅक्रॉन यांनी असाही दावा केला की, त्यांच्या सरकारने महागाई नियंत्रणात ठेवली. अमेरिकास्थित मॅकिन्सीसारख्या सल्लागारावर आंधेळपणाने विश्वास ठेवल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली. मॅक्रॉन यांनी इंधन कराचा प्रस्ताव मांडला, तेव्हा जनतेतील अस्वस्थता शिगेला पोहोचली होती. कामगारांनी मोठ्या प्रमाणात निषेध केल्यामुळे अखेर त्यांनी २०१८ मध्ये हा कर मागे घेतला होता.

दुसरीकडे मेरीन ले पेन या अनेक दशकांपासून फ्रान्समधील अतिउजव्या पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात. २०१७ मध्ये त्यांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीतील त्यांची कामगिरी अधिक चांगली आहे. ५३ वर्षीय माजी खासदार ले पेन यांना २०१७ मध्ये ३४ टक्के मते मिळाली होती. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पक्षाची पुनर्बांधणी केली आणि नॅशनल रॅली असे पक्षाला नाव दिले. अलिकडच्या काळात त्यांनी स्वीकारलेल्या सुरक्षित भूमिकेमुळे त्यांना पहिल्या फेरीत उजव्या पक्षाचे पारंपरिक उमेदवार एरिक झेम्मर यांच्यामुळे काही मते गमवावी लागली. तथापि अध्यक्षपदाच्या अंतिम लढतीत प्रवेश करणाऱ्या त्या एकमेव उजव्या विचारसरणीच्या उमेदवार असल्यामुळे त्यांना ही मते पुन्हा मिळतील, अशी आशा आहे. त्यामुळे त्यांच्या झोळीत किमान सात टक्के मते पडायला हवीत, अशी अपेक्षा आहे. ले पेन यांचा प्रचार स्थलांतरविरोधी, युरोपिय युनियनविरोधी राहिला. ले पेन यांनी स्थलांतर प्रतिबंधित करण्यासाठी सार्वमत घेऊन निर्वासितांचे अधिकार काढून घेण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्यावर बंदी आणण्याचेही आश्वासन दिले. मॅक्रॉन आणि इतरांनी हा प्रचार वर्णद्वेषी मानला.

वरील सर्व मुद्दे वादग्रस्त आहेत आणि दुसरी फेरी जिंकण्यासाठी ले पेन यांना हानिकारक ठरू शकतात. त्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या जवळच्या सहकारी आहेत आणि युक्रेन संकटापूर्वी रशियन नेत्यासोबतचा त्यांचा फोटो प्रचाराचा भाग होता. तथापि, त्यांनी रशियाच्या कृतीवर टीका करून संबंधांना बळकटी दिली. मॅक्रॉन यांची धोरणे आणि महागाईविरुद्धच्या भूमिकेमुळे मतदारांच्या नजरेत वादग्रस्त मुद्द्यांचा समतोल राखण्यात त्यांना यश आले आहे. प्रचारांदरम्यान त्यांनी ३० वर्षांखालील नागरिकांचा प्राप्तिकर माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कंपन्यांनी कामगारांचे वेतन १० टक्के वाढवल्यास कंपन्यांना करातून सवलत देण्याचे आश्वासनही दिले आहे.

तिसऱ्या क्रमांकावर असलेले मॅलेनचॉन पेनविरुद्ध एका टक्क्याच्या किरकोळ अंतराने पराभूत झाले. या निवडणुकीमध्ये त्यांचे मतदार ही निर्णायक शक्ती ठरू शकते. सर्व डाव्यांनी पेन यांच्याविरुद्ध मतदान करण्याचे आवाहन केले आहे. परिणामी ही मते मॅक्रॉन यांनाच जाणार आहेत. मॅक्रॉन यांच्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे; परंतु दुर्दैवाने मॅक्रॉन यांच्याविरुद्ध मतदान करण्याचा पर्याय म्हणजे पेन यांना मतदान करणे होय.

प्रथमतः मतदान न करणाऱ्या मतदारांची टक्केवारी वरील तीन पक्षांच्या वैयक्तिक मतांइतकीच आहे. यापैकी कोणीही फ्रेंच जनतेचा स्पष्ट कौल असल्याचा दावा करू शकत नाही. मॅक्रॉन विजयी झाले तरी त्यांची निवड कायदेशीर झाल्याचा दावा करू शकणार नाही, अशी मॅक्रॉन यांना चिंता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी प्रत्यक्षात मतदान केले, त्यांच्या मनातसुद्धा नेत्यांबद्दल तीव्र असंतोष आहे. अशा परिस्थितीत मतदार आपल्या कमी पसंतीच्या पक्षाला स्पर्धेबाहेर ठेवण्यासाठी मतदान करत आहेत. त्यात ले पेन यांचा अतिउजव्या विचारसरणीचा पक्ष आहे. या दोघांपैकी कोणीही निवडणूक जिंकली तरी खरे गेमचेंजर तेच मतदार असतील, ज्यांनी डाव्या विचारसरणीच्या मॅलेनचॉन यांच्या पारड्यात मते टाकतील. या निवडणुकीनंतर जो कोणी सत्तेवर येईल, त्याला जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे हे नक्की!

nairmalini2013@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com