नाकारले जाण्यालाच नकार देणारी गोष्ट आत्मप्रीतीची!

बडोदा येथे राहणाऱ्या क्षमा बिंदू या तरुणीने स्वतःशीच लग्न केले आहे. असे करणारी ती भारतातील पहिलीच व्यक्ती आहे.
kshama bindu
kshama bindusakal
Summary

बडोदा येथे राहणाऱ्या क्षमा बिंदू या तरुणीने स्वतःशीच लग्न केले आहे. असे करणारी ती भारतातील पहिलीच व्यक्ती आहे.

- मालिनी नायर

बडोदा येथे राहणाऱ्या क्षमा बिंदू या तरुणीने स्वतःशीच लग्न केले आहे. असे करणारी ती भारतातील पहिलीच व्यक्ती आहे. पारंपरिक विवाहाचे प्रतिनिधित्व करणारी प्रतीकात्मक वचनबद्धता यात आहे. ही प्रथा भारतात नवीन असली, तरी गेल्या काही वर्षांपासून पश्चिम आणि इतर देशांमध्ये प्रचलित आहे. पहिली नोंद असलेला एकल विवाह लिंडा बेकर या महिलेने १९९३ मध्ये केला होता. महिला उच्चशिक्षित, सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत. पुरुषाच्या आधाराची गरज आता त्यांना नाही. पतीशिवाय लग्न करणे, ही बाईने समाजाला दिलेली प्रतिक्रिया आहे. जो समाज तिला सांगत असतो की, आनंदी राहण्यासाठी तिला एका पुरुषाची गरज आहे. लज्जित होण्याला, नाकारले जाण्यालाच ती नकार देत आहे; ती तिचे आयुष्य निवडत आहे, ती स्वतःला निवडत आहे.

गुजरात राज्यातील बडोदा येथे राहणारी क्षमा बिंदू ही तरुणी थोड्या वेगळ्या पद्धतीने विवाहबद्ध झाली. ती दुसऱ्या कुठल्या व्यक्तीऐवजी स्वतःशीच वचनबद्ध झाली आहे. या तरुणीने स्वतःशीच लग्न केले आहे! असे करणारी ती भारतातील पहिलीच व्यक्ती आहे. तिच्या या निर्णयावर आणि कृत्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी तिला मानसिक रुग्ण आणि आत्ममग्न म्हटले. पण, अनेकांनी तिच्या निर्णयाचे कौतुकही केले.

स्वतःशीच लग्न करण्याला सोलोगामी (एकल विवाह) किंवा ऑटोगामी म्हणतात. या विवाहाला कायदेशीर मान्यता नाही. पण, पारंपरिक विवाहाचे प्रतिनिधित्व करणारी प्रतीकात्मक वचनबद्धता यात आहे. ही प्रथा भारतात नवीन असली, तरी गेल्या काही वर्षांपासून पश्चिम आणि इतर देशांमध्ये प्रचलित आहे. पहिली नोंद असलेला एकल विवाह लिंडा बेकर या महिलेने १९९३ मध्ये केला होता. त्यानंतर १९९६ मध्ये एनबीए खेळाडू डेनिस रॉडमॅनने स्वतःशी लग्न केल्याचे जाहीर केले. स्वत:शी लग्न करून स्वत:वर प्रेम व्यक्त करण्याची कल्पना गेल्या काही वर्षांत खूप लोकप्रिय झाली आहे. इतकी की अनेक टीव्ही कार्यक्रमांत ती एक सामान्य प्रथा म्हणून दाखवली आहे. जसे की संगीत मालिका ग्ली, जॅम, द एक्स, गाय व चिकन आणि डॉक्टर. एक कोरियन नाटक आहे ज्यात महिला स्वतःशीच लग्न करते. अगदी हॉलीवूड चित्रपट झुलँडरमध्ये बेनेडिक्ट कंबरबॅचने एका ट्रान्सजेंडर सुपरमॉडेलची भूमिका केली आहे जी स्वतःशी लग्न करते.

एकल विवाह करणारे लोक त्यांच्या स्वातंत्र्याचा दावा करतात आणि पारंपरिक सामाजिक नियमांपासून मुक्त होतात. पारंपरिक विवाह म्हणजे स्वतःशिवाय इतर कोणाला तरी प्राधान्य देणे. यात बाईची पारंपरिक भूमिका म्हणजे एक कर्तव्यदक्ष पत्नी, मुलगी, आई, बहीण आणि सून बनणे. आणि परंपरा हे सांगते की एकवेळ स्वतःचे हित बाजूला ठेवून स्त्रियांनी त्यांची कुटंबाप्रतिची कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. तेव्हा स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. मुख्यतः गृहिणी, आई आणि सून या भूमिकेतच त्यांना पाहिले जायचे. सधन कुटुंबात लग्न करणारी स्त्री यशस्वी मानली जात असे. आज मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. महिला उच्चशिक्षित, सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत. पुरुषाच्या आधाराची गरज आता त्यांना नाही. त्या स्वतःची काळजी घेण्यास सक्षम आहेत; पण यशस्वी महिलाही योग्य जोडीदार शोधण्यासाठी धडपडत असतात. तेव्हा अविवाहित राहणे हा एक चांगला पर्याय वाटतो आणि असे एकटे राहणे दोन्हीकडून साजरे केले जात आहे.

पतीशिवाय लग्न करणे ही बाईने समाजाला दिलेली प्रतिक्रिया आहे, जो समाज तिला सांगत असतो, की आनंदी राहण्यासाठी तिला एका पुरुषाची गरज आहे. लज्जित होण्याला, नाकारले जाण्यालाच ती नकार देत आहे; ती तिचे आयुष्य निवडत आहे, ती स्वतःला निवडत आहे.

स्वत: पूर्णपणे आनंदी राहायला शिकणे हे एक महत्त्वाचे कौशल्य नाही का? दुर्दैवाने समाजात एकटे राहणाऱ्यांच्या बाबत खोलवर रुजलेला एक पूर्वग्रह आहे, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत. बहुसंख्य लोक रूढ अर्थाने लग्नाच्या वयात असलेल्या स्त्रीचा संबंध उच्छृंखलपणाशी जोडतात आणि तिचे चारित्र्य ठीक नाही, असे मानतात. मग इतर कुठल्याही लग्नासारखेच स्वतःशीच लग्न करणे हे एखाद्या वचनबद्ध नात्याचे द्योतक नाही का? तुम्ही ‘कुणाची’ तरी वाट पाहण्यात तुमचे आयुष्य घालवता, हे न जाणून घेता की ते ‘कुणी’ तुम्हीच आहात. स्वतःशी लग्न करणे म्हणजे एकल राहणे, हा जीवन जगण्याचा व्यवहार्य पर्याय असल्याचे निदर्शक आहे. मग ते अल्प काळासाठी असेल, विशिष्ट काळासाठी किंवा तुमच्या प्रौढ वयातील मोठ्या काळासाठी असेल. तुम्ही कुणासोबत तरी नात्यात असतानाही एकटेपणा शोधणे आणि स्वतःच्या सहवासाचा आनंद घेणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे. अनेक विवाहित जोडप्यांना याची जाणीव झाली जेव्हा त्यांना कोविडच्या काळात चोवीस तास एकत्र राहणे भाग पडले. त्या काळात जोडपी नको तितकी एकमेकांच्या जवळ होती आणि एकटेपणा फार कमी होता. सोलोगॅमिस्ट स्वतःला वेळ देत आहेत आणि स्वतःकडे जास्त लक्ष देत आहेत जे एक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे.

पण, एकटे राहण्यामुळे केवळ स्त्रियाच सामाजिक परंपरांच्या ओझ्यापासून मुक्त होतात, असे नाही; तर पुरुषही होतात. आपल्या संस्कृतीत पुरुष उघडपणे भावना प्रदर्शित करू शकत नाहीत. तसेच परिस्थितीला तोंड देण्यास ते कमी समर्थ असल्याने त्यांना अनेकदा अडचणीत येतात. ब्रिटनमध्ये दर वर्षी महिलांपेक्षा तिप्पट पुरुष आत्महत्या करतात. आता तर २० ते ४९ वर्षे वयोगटातील पुरुषांचा मृत्यू इतर कारणांपेक्षा आत्महत्येमुळेच जास्त होत आहे. ही एक अतिशय भयानक स्थिती आहे.

स्वतःची काळजी घेण्याची गरज यामुळे अधोरेखित होते. अशा परिस्थितीत स्वतःशीच वचनबद्ध असण्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे नाही का? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की एखादी व्यक्ती स्वतःवर प्रेम करण्याचा निर्णय घेते, याचा अर्थ असा नाही, की ती भविष्यात दुसऱ्या व्यक्तीची प्रेमळ आणि काळजी घेणारी जोडीदार बनू शकणार नाही. एकल विवाह करणे म्हणजे पारंपरिक विवाहाचा तिरस्कार करणे नव्हे; तर एकटेपणा, दुःख यांच्यामुळे स्वतःबद्दल जी घृणा निर्माण होते, आत्मद्वेष आणि असुरक्षिततेची भावना वाढते, त्याला पर्याय आहे.

म्हणजे एकल विवाह हा इतर सर्व गोष्टींपेक्षा स्वतःला प्राधान्य देण्याचा विचार आहे. ही एक प्रकारे स्त्रीवादी कृती आहे जी लग्न, वचनबद्धता आणि प्रेमाशी संबंधित रुढीवादाला नाकारते. स्त्रिया आता इतरांना खूश करण्यासाठी स्वतःचा किंवा स्वतःच्या आनंदाचा त्याग करणार नाहीत. सोलोगामिस्ट स्वतःसाठी जी शपथ घेतात, त्यात अगदी स्पष्टपणे लिहिलेले असते की ‘मी माझ्यासाठी करतो.’ हे एका चाळीस वर्षीय अमेरिकन व्यक्तीने लिहिले आहे, जिने लॉकडाऊनमध्ये बराच काळ एकट्याने घालवल्यानंतर स्वतःशी लग्न केले. या काळात ती जास्तीत जास्त अंतर्मुख झाली. ती किती स्वावलंबी आहे आणि तिला स्वतःला प्राधान्य द्यायचे आहे, याची तिला जाणीव झाली. अगदी क्षमाच्या मेहंदीतूनही तिने हेच सांगितले की, एक मुलगी जिने स्वतःची काळजी घेण्यासाठी प्रयत्न केला. आत्मप्रीती हा मानसोपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याची शिफारस मानसशास्त्रज्ञ करतात. लोकांनी स्वतःवर प्रेम केले पाहिजे. कोणत्याही चुकीसाठी स्वतःला माफ करणे शिकले पाहिजे. स्वतःसोबत जगण्यास आणि आनंदी राहण्यास शिकले पाहिजे. किंबहुना अनेकदा मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, जे लोक स्वत:ची लहान-मोठी कामगिरी साजरी करण्यासाठी स्वत:ला फुले किंवा काहीतरी खास भेटवस्तू विकत घेतात, ते त्यांच्या जीवनात काहीतरी अधिक चांगले करू शकतात. सोलोगामी एका दुःखी आणि एकाकी अविवाहित स्त्रीची कहाणी बदलण्याचा आणि एकलपणाला आनंदी बनवण्याचा एक सुंदर मार्ग आहे.

सोलोगामी म्हणजे आत्मरती नव्हे. आत्मरती म्हणजे सहानूभुतीचा अभाव. ज्यामुळे समाधानकारक नातेसंबंध राखण्यात अपयश येते, असे मानसशास्त्र सांगते. जेव्हा व्यक्ती स्वतःवर प्रेम करणारी नसून आत्मकेंद्रित असते तेव्हा ती आत्मरत असते. सोलोगामी म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. स्वतःशी आणि जगाशी सहानुभूती दाखवणे. सोलोगामी ही असुरक्षिततेच्या विरोधात स्वतःचे मूल्य वाढवते. सोलोगामी म्हणजे दुसऱ्यांचे किंवा दुसऱ्यांच्या भावनांचे अवमूल्यन करणे नव्हे, तर अधिक व्यापकपणे मानवी संबंध प्रस्थापित करणे होय.

पश्चिमी देशांत आणि युरोपमध्ये एकल असणे आणि आत्मप्रेमाची संकल्पना केवळ दिखावेगिरी म्हणून नाही, तर एक आदर्श म्हणून स्वीकारली गेली आहे. तिथे एकल विवाह समारंभ आयोजित करणारे इव्हेंट मॅनेजरसुद्धा आहेत. या समारंभांमध्ये नेहमीच्या पारंपरिक लग्नात असते ते सर्व काही असते. फुले, सजावट, उत्तम ठिकाण, मोहक फलक, चांगले खाद्यपदार्थ, पेये, लग्नाचा केक आणि डिझायनर कपडे घातलेली वधू किंवा वर सर्व काही असते, फक्त तथाकथित अनुरूप जोडीदाराशिवाय. या भागात अशा प्रकारचे हजारो विवाह समारंभ नियमित होत आहेत. एवढेच नाही, तर हे इव्हेंट मॅनेजर एकल लग्न केलेल्याला (सोलोगामिस्ट) त्याच्या मधुचंद्राचे नियोजनही करून देतात. व्हँकुव्हरमध्ये ‘स्वतःशी लग्न करा’ नावाची संस्था आहे, जी अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करते.

ॲमेझॉनवर या विषयावर पुस्तके आहेत. चित्रपट, टेलिव्हिजन मालिकांमध्ये याविषयी अधिकाधिक दाखवले जात आहे. जेणेकरून ही प्रथा सर्वमान्य होईल. भारतीय पालकसुद्धा आपल्या पाल्यांना यासाठी परवानगी देत आहेत, हे पाहून आनंद वाटतो. २४ वर्षीय ब्लॉगर आणि समाजशास्त्राची विद्यार्थिनी क्षमा बिंदूचे प्रकरण पाहिले, तर याची खात्री पटते. तिच्या आई-वडिलांनी तिला आशीर्वाद दिले आणि स्वत:च्या लग्नाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. तिचे कौतुक यासाठी, की ती स्वतःच्या लैंगिक जाणिवेविषयीदेखील स्पष्टपणे बोलली. ती द्वैलिंगी असल्याचे तिने कबूल केले, ज्या समाजात महिला आपल्या विवाहपूर्व संबंधांविषयी बोलायलादेखील कचरतात.

हे सर्व तिच्यासाठी वाटते तितके सोपे नव्हते. तिला ट्रोल केले गेले. तिच्या कृतीबद्दल शेजारी आणि इतर लोकांनी टीका केली. क्षमा बिंदूने सुरुवातीला बडोदा येथील एका मंदिरात स्वतःशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु तिच्या अनोख्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, तिच्यावर खूप टीका झाली. त्यामुळे ११ जूनला तिच्या लग्नाच्या दिवशी विघ्नसंतोषी लोक बाधा आणतील, अशी तिला भीती होती. तेव्हा दोन दिवस आधीच लग्न उरकून तिने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आपल्या घरीच तिने लग्न केले. या वेळी तिने लाल लेहंगा परिधान केला होता, कपाळावर सिंदूर, हातावर मेहंदी आणि गळ्यात मंगळसूत्र घातले होते. काही निवडक मित्र तिच्यासोबत होते. या सर्वांनी तिच्या निवडीला पाठिंबा दिला आणि तिच्यासोबत तिच्यासाठी महत्त्वाचा असणारा दिवस साजरा केला. क्षमा ही द्वैलिंगी आहे. याआधी तिने पुरुष आणि स्त्री दोन्ही संबंधांचा अयशस्वी अनुभव घेतला आहे. सर्व नात्यांमध्ये निराशा आल्यानंतर तिने स्वतःशीच जोडून घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिला असे जाणवले, की स्वतःवर प्रेम करणे आणि काळजी घेणे, ही तिनेच तिला दिलेली सर्वोत्तम भेट आहे.

आपल्याला माहीत आहे, की स्त्रियांना असे शिकवले जाते, की जेव्हा त्यांना स्वतःचा राजकुमार सापडेल, तेव्हाच त्या आनंदी होतील. स्त्री ही पुरुषाच्या संरक्षणाखाली असेल, तरच ती आनंदी असेल, असेच आपण वाचलेल्या सर्व परिकथा सांगतात. माझ्या पिढीने आणि माझ्या आधीच्या पिढ्यांनी अविवाहित राहणे किंवा लग्न करण्याआधी लिव्ह-इनचा प्रयोग करून काही अडथळे तोडले आहेत; परंतु नव्वदची पिढी याच्याही पुढे आहे. ते आत्मभान असलेले, अधिक स्वतंत्र आणि महत्त्वाकांक्षी आहेत.

ज्या लिंगभावासह ते जन्माला आले, त्याच्या मर्यादा त्या मर्यादांना ते झुगारून लावतात. त्यांच्या आधीच्या पिढीपेक्षा ते समानतेचा अनुभव घेतात. आमच्या पिढीने या तरुण पिढीला जगण्याचा हक्क आणि निवडीचा अधिकार या मूल्यांची शिकवण दिली. त्यामुळे ही पिढी आत्मविश्वासपूर्ण आणि अधिक स्वतंत्र झाली. याचे श्रेय मी आमच्या पिढीला देईन.

nairmalini2013@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com