'फिटनेस लेव्हल चांगली हवी' (मलखान सिंग)

malkhan singh
malkhan singh

फिटनेसमुळं कणखरपणा येतो. त्यामुळं तुमची फिटनेस लेव्हल शक्‍य तितकी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. मी आताही हातावर चालणं, कोलांटउडी मारणं यासाठी प्रयत्न करतो. एखादा जिम्नॅस्टिक खेळाडू निवृत्त होतो, तेव्हा म्हणजे वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी मी हे सुरू केलं. त्यामुळं तुम्ही केव्हाही काहीही करू शकता, हेही लक्षात असू द्या. आयुष्य खूप सुंदर आहे. हे जगही भव्य-दिव्य आहे. या दोन्हीही गोष्टींचा मनमुराद आनंद घ्या.

आपलं शरीर अतिशय महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय आपण काहीही करू शकणार नाही. आपलं शरीर म्हणजे देवानं दिलेली सर्वोत्तम देणगी आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वपूर्ण म्हणजे आपला आत्मा. त्यामुळंच फिटनेस माझ्यासाठी देव आहे. काम, क्रोध, मोह, ईर्षा यापासून जपून राहायला हवं. त्यांना आपला मित्र बनवून ठेवायला पाहिजे; म्हणजे आपल्याला त्यांचा योग्य वापर करता येतो. उत्तम आरोग्यासाठी सकाळी लवकर उठायला पाहिजे. लोक म्हणतात शांत झोप लागली पाहिजे. त्यासाठी झोपताना देवाचं नाव घ्या. तुमच्या लक्षात येईल, की चार तास झोपूनही तुम्ही एकदम तजेलदार आहात. गेल्या वर्षी एका गाण्याचं काम सुरू होतं, तेव्हा मी हे करून पाहिलं. चित्रीकरणानंतर साधारणत: 11 किंवा 12 वाजता मी घरी जायचो अन्‌ पहाटे साडेचार-पाच वाजता उठून सहा वाजता जिममध्ये जायचो आणि तिथून थेट चित्रीकरणासाठी जात होतो. तरीही माझी चिडचिड होत नव्हती. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपताना तणावरहित राहणं गरजेचं आहे.

आहारामध्ये मी दिवसभरात तीन वेळा 350 ग्रॅम पनीर आणि एक वाटी डाळ खातो. पोळी आणि साखर कमी प्रमाणात खातो. मात्र, 10-15 दिवसांतून एकदा तरी त्याचा स्वाद घेतो. माझ्या मते कमी खाणं आरोग्यासाठी नेहमीच चांगलं असतं. कारण, अति खाण्यानं आरोग्य बिघडतं. आपल्याला शक्‍य होईल, तेवढ्या प्रमाणात जिभेवर ताबा ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण ताजेतवाने राहाल, हलकंफुलकं वाटेल अन्‌ बोजडपणा जाणवणार नाही. शक्‍य तितकं आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. एखाद्या कार्यक्रमाला वा लग्न समारंभाला गेला, तरी मोजकंच खाणं गरजेचं आहे.
शक्‍यतो मी सकाळीच व्यायाम करतो. चित्रीकरणाला सुटी असेल, त्या दिवशी मी दोन-अडीच तास जिम करतो आणि योगासनं मात्र न चुकता रोज करतो. जिम करतानासुद्धा योगा माध्यमाचा वापर करतो. हे सर्व करताना मला प्रत्येक श्‍वासही जाणवतो. व्यायामामध्ये मी सलमान खान यांना गुरू मानतो. कारण मी त्यांना गेली 35 वर्षं पाहतोय आणि ते नेहमीच सुंदर दिसतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक निराळंच तेज आहे. असं तेज मला बॉडी बिल्डर्सच्या चेहऱ्यावरही सहसा पाहायला मिळत नाही. मी जिममध्ये साधारणत: पुलअप्स, चिनअप्स आणि डिप्स हे तीन व्यायाम प्रकार न चुकता करतो. जिमसाठी मी अमोल शेट्टी यांचं मार्गदर्शन घेतो. ते माझ्याकडून खूप छान व्यायाम करवून घेतात. अंधेरी वेस्टमधल्या त्यांच्या "फिटनेस फ्युजन'मध्ये मी जिमला जातो. तिथं मी जवळपास अर्धा तास तरी व्यायाम करतो.

शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठीही अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मन:शांतीसाठी सर्वांत महत्त्वाचं म्हणजे "सोडून देणं' हे होय. बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. लहानांवर रागावता येतं, मोठ्यांवर नाही. मला असं वाटतं, की कोणी छोटं-मोठं नसतं. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या लक्षात येत नसेल किंवा तुम्ही समजावू शकत नसाल तेव्हा समोर छोटा असो किंवा मोठा माणूस असो- आपल्या मतांवर ठाम राहावं, कारण जे तुम्हाला आवडलं ते तुमच्या आत्म्याला पण आवडलंय. त्यात लहान-मोठं काही नाही. शक्‍य असेल तितक्‍यांबाबत सोडून द्यायला शिका. झोपताना मात्र एकदम निर्धास्तपणे झोपा. सर्व काही त्या ईश्‍वराला समर्पित केलं आहे असं समजून झोपा. गीतेत शिकवण आहे, की जे कर्म कराल ते करून ईश्‍वराला समर्पित करा. मला असं वाटतं, की आपण आपलं काम पूर्ण निष्ठेनं करावं आणि नंतर ते समर्पित करावं. हेच तत्त्व मी गेली कित्येक वर्षं पाळत आलोय आणि त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. मात्र, आपण तसं नाही केलं, तर त्याचं फळ मिळायला खूप त्रास होतो.

योगासनामध्ये मी दररोजच प्राणायाम करतो. तसंच, मी नेहमी 20 मिनिटं शवासन करतो. आपल्याला थकलोय असं जाणवेल, तेव्हा तुम्ही 20 मिनिटं शवासन करा, त्यामुळं आपल्याला एकदम ताजंतवानं वाटेल. त्यानंतर चार-सहा तास सहज काम कराल. योगासनं करणं सोडू नका, ते खूप महत्त्वाचं आहे. योगाबद्दल एक शब्दात सांगायचं झालं, तर योग म्हणजे समानता. तुम्ही सर्वांकडं एका दृष्टीनं पाहू शकता. कोणताही भेदभाव न ठेवता, सगळ्यांना मान द्या, सर्वांशी प्रेमानं बोला. स्पॉट बॉय असेल, तर त्याच्याशी कसंही बोलायचं आणि दिग्दर्शकाशी एकदम चांगल्या प्रकारे बोलायचं असं नको. माझ्या मते सर्वांशी चांगल्या पद्धतीनं वागलं पाहिजे. तसं केलं, की तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जे ठरवलंय तसं नक्की होईल.

खरं तर अभिनयात असल्यामुळं कलाकारांना व्यक्तिरेखेप्रमाणं बदलावं लागतं. मलाही त्याचा अनुभव आला आहे. मी "गॅंगस्टर' या चित्रपटात काम करत होतो, त्यावेळी मी वजन अन्‌ दाढीही वाढवली होती. हा चित्रपट 18 सप्टेंबर 2015 रोजी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी माझ्या भूमिकेचं खूप कौतुकही केलं होतं. खरं तर वजन वाढवणं अन्‌ ते कमी करणं आपल्याच हातात आहे.

सध्या मी सोनी टीव्हीवरच्या "विघ्नहर्ता गणेश' या मालिकेमध्ये शिवशंकराची भूमिका साकारत आहे. खरं तर एवढ्या मोठ्या देवाची भूमिका साकारणं माझ्यासाठी आव्हानच होतं; पण मी या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरण्यासाठी शंकराच्या मंदिरामध्ये जात होतो. तिथलं वातावरण अनुभवत होतो. तसंच, भाविकांच्या प्रतिक्रियाही जाणून घेत होतो. भगवान शिवशंकरासारखं व्यक्तिमत्त्व होण्यासाठी मी माझ्यावरच अनेक प्रयोग केले. यामध्ये योगासनांचा मला खूपच उपयोग झाला. शंकरासारखी शरीरयष्टीही दिसण्यासाठीही मी प्रयत्न केले. तसंच, जास्तीत जास्त शांत कसं राहता येईल, याचाही प्रयत्न केला. त्यामुळंच माझी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

माझ्या मते, कुटुंब सर्वांत महत्त्वाचं असतं. त्यात तुमचा मित्रपरिवारही येतो. त्यात तुमचे चाहते अन्‌ ज्यांना तुम्ही आवडत नाही ते लोकही येतात. तुम्ही सर्वांकडं एकसारखं पाहिलं, की सर्वजण तुमचेच होऊन जातात. माझ्या कुटुंबात आई-वडील म्हणजे माझ्यासाठी देवच आहेत. त्यांच्यासह पत्नी, अन्‌ लहान भावांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवतो. त्याचबरोबर चित्रीकरण झाल्यानंतर एका नाक्‍यावर तास-दीड तास मित्रांबरोबर बसून आम्ही गप्पा मारतो. कारण, मित्रांशिवाय जीवन अपूर्ण आहे. मित्र तुमच्या आयुष्यातल्या अनेक अडचणींवर मात करण्यात मदत करतात. लहान मुलांसारखं हसत-हसत जगा. आपल्यातल्या लहान मुलाला सतत जिवंत राहू द्या आणि तरुणांसारखे काम करा. ज्येष्ठांसारखा समर्पित भाव ठेवा, त्यासाठी वय वाढण्याची वाट नका पाहू.

फिटनेसमुळे कणखरपणा येतो. त्यामुळं शक्‍य तितकी तुमची फिटनेस लेव्हल चांगली ठेवा. मी आताही हातावर चालणं, कोलांटउडी मारणं यासाठी प्रयत्न करतो. मी हे सर्व अठ्ठाविसाव्या वर्षी सुरू केलं- त्या वयात एखादा जिम्नॅस्टिक खेळाडू निवृत्त होतो. त्यामुळं तुम्ही केव्हाही काहीही करू शकता, हेही लक्षात असू द्या. हे याच वयात केलं पाहिजे, असं काही नाही. मी अठ्ठाविसाव्या वर्षी पहिल्यांदा उलटी कोलांटउडी मारली होती. हातावर चालायला सुरू केलं होतं. आता हातावर चालतो, उलटी कोलांटउडी मारू शकतो. मन इतकं कणखर केलं, की बाकी सर्व गोष्टी किरकोळ वाटाव्यात. माझ्या आयुष्यात एक महत्त्वाचं वाक्‍य आहे : "सगळं माझ्यापाशी सुरू होतं आणि माझ्यापाशीच संपतं.' तुम्ही पण तुमच्या जीवनात तितकेच महत्त्वाचे आहात, तुमचंही जीवन तुमच्यापाशीच सुरू होतं आणि तुमच्यापाशीच संपणार आहे. कुठल्याही गोष्टीची भीती बाळगू नका. भीतीही आपला एक मित्र आहे, तो तुम्हाला सांगेल, की जाड होताय, थोडंसं पळायला पाहिजे. त्यामुळं आयुष्य खूप सुंदर आहे. हे जगही भव्य-दिव्य आहे. या दोन्हीही गोष्टींचा मनमुराद आनंद घ्या.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com