अमेरिकेला नमवणारा देश...

काही देश तुम्हाला पहिल्या भेटीतच प्रेमात पाडतात... त्यात तो देश फिरण्यासाठी जगातल्या सर्वांत स्वस्त देशांपैकी एक असेल, तर बिनधास्त पाहिजे तितका खर्च खाण्या-पिण्यावर करता येतो.
vietnam country
vietnam countrysakal
Summary

काही देश तुम्हाला पहिल्या भेटीतच प्रेमात पाडतात... त्यात तो देश फिरण्यासाठी जगातल्या सर्वांत स्वस्त देशांपैकी एक असेल, तर बिनधास्त पाहिजे तितका खर्च खाण्या-पिण्यावर करता येतो.

- मालोजीराव जगदाळे jagdaleomkar5@gmail.com

काही देश तुम्हाला पहिल्या भेटीतच प्रेमात पाडतात... त्यात तो देश फिरण्यासाठी जगातल्या सर्वांत स्वस्त देशांपैकी एक असेल, तर बिनधास्त पाहिजे तितका खर्च खाण्या-पिण्यावर करता येतो. व्हिएतनाम हा देश त्यांपैकीच एक आणि त्याची आर्थिक राजधानी हो ची मिन्ह शहर ऊर्फ साईगोन. व्हिएतनाममधला पहिला दिवस अक्षरशः इमिग्रेशन आणि भाषेच्या अडचणीमुळे हॉस्टेल शोधण्यात गेला; पण एकंदर सगळं स्ट्रगल करताना मजा आली. बाइक टॅक्सीचा पहिला अनुभव भाषेमुळे थोडा अडचणींचा झाला; पण मी धीर सोडला नाही. शहरात फिरताना सगळीकडे मी बाइक टॅक्सीच वापरली.

मी ज्या हॉस्टेलमध्ये राहिलो त्याचं नाव होतं द कॉमन रूम प्रोजेक्ट; पहिल्या मजल्यावर कॉमन एरिया, किचन, दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावर राहण्यासाठी डॉर्मस आणि चौथ्या मजल्यावर एक सुंदर बार आणि कॅफे असं हे हॉस्टेल होतं. एमिली नावाची एक चुणचुणीत सुंदर पोरगी हे हॉस्टेल चालवते.

माझी तिथली लोकल गाइड किमसोबत दुसऱ्या दिवशी हो ची मिन्ह शहराची भटकंती केली, स्थानिक आकर्षणं पाहिली. तिथली युद्ध संग्रहालयं, सुंदर असा रिव्हरफ्रंट आणि अफलातून असं कॅफेज फिरलो. तिथल्या लोकल असणाऱ्या जितक्या काही डिश आहेत, त्या ट्राय केल्या.

मुंबईइतकंच प्रचंड व्यग्र असलेलं हे शहर असल्याचा प्रत्यय रस्त्यावरून धावणाऱ्या लाखो बाइक्स बघितल्या की येतोच. साधारण ३०० व्हिएतनामीज डाँग म्हणजे १ भारतीय रुपया. इन फॅक्ट इथलं खाणं-पिणं आणि वाहतुकीचा खर्च आपल्यापेक्षा कमी आहे. जेवणाचा विषय निघालाच आहे तर अगदी १५ रुपयांपासून स्ट्रीट फूड आणि १० रुपयांपासून होम मेड बिअर इथं मिळते. व्हिएतनामीज कॉफी जगभर प्रसिद्ध आहे. फक्त खाण्यासाठी आणि कॉफीसाठी इथं वर्षभर ठाण मांडून बसता येईल इतके सुंदर इथले कॅफे आणि रेस्टॉरंट्स आहेत. भाषेची थोडीफार अडचण सोडली, तर इथले लोक प्रचंड फ्रेंडली आहेत.

व्हिएतनाममध्ये शोधायचा होतं शिवरायांचा पुतळा आहे का? हो ची मिन्ह यांच्यावर शिवाजी महाराजांचा प्रभाव होता का? व्हिएतनामने वापरलेल्या गनिमी काव्यामागची प्रेरणा शिवराय होते का? या प्रश्नांचा माग घेत, याची उत्तरं व्हिएतनाममध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. हो ची मिन्ह यांची स्मृतिस्थळं, अनेक अश्वारूढ स्मारकं, युद्ध संग्रहालयं यांना भेट देऊन खात्रीशीर माहिती गोळा केली.

एकेकाळी जगासाठी आपली दारं बंद केलेल्या व्हिएतनामने जागतिकीकरणामुळे गेल्या ८-१० वर्षांत बरीच प्रगती केली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या हो ची मिन्ह शहरामध्ये उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारती याची साक्ष देतात. सलग तीन दशकं युद्धात होरपळलेला हाच तो देश का, याचा प्रश्न पडावा इतका बदल आज इथं झालेला आहे. मुंबई आणि बँकॉकशी तुलना करावी असं ट्रॅफिक इथं आहे. रस्त्यावर एकाच वेळी इतक्या लाखोंनी दुचाकी चालवणारं हे जगातलं पहिल्या क्रमांकाचं शहर असावं.

गनिमी कावा वापरून व्हिएतनामने अमेरिकेवर विजय मिळवला. खरं म्हणजे उत्तर व्हिएतनामने दक्षिण व्हिएतनाम आणि अमेरिकेवर हा विजय मिळवला, ज्यामुळे आजच्या सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनाम देशाची निर्मिती झाली. या निर्मितीचे जनक होते व्हिएतनामचे राष्ट्रपिता मानले जाणारे हो ची मिन्ह.

व्हिएतनामने गनिमी कावा वापरून कशाप्रकारे अमेरिकेला हरवलं हे सर्वप्रथम जाणून घेण्याची इच्छा होती, त्यामुळे हो ची मिन्ह यांच्या त्यांचंच नाव दिलेल्या हो ची मिन्ह शहरातील स्मारकाला भेट दिली. त्यानंतर युद्धाचे स्मृतिअवशेष जिथं जतन करून ठेवण्यात आलेत, त्या वॉर रेमेनंट्स म्युझियमला भेट देऊन युद्धाची दाहकता काय होती हे अनुभवता आलं. त्या ठिकाणी उत्तर व्हिएतनामने पाडलेले अमेरिकेचे अनेक फायटर जेट्स, हेलिकॉप्टर्स ठेवलेली आहेत. आवर्जून बघावं असं हे संग्रहालय आहे.

हो ची मिन्ह शहरापासून ५० किमी अंतरावर युद्धकलेचं एक जागतिक आश्चर्य लपलेलं आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राशी समोरासमोर लढून विजय मिळणार नाही हे माहीत असल्याने व्हिएतनामीज आर्मीने लपण्यासाठी जमिनीखाली एक संपूर्ण शहर तयार केलेलं होतं, ज्यात हॉस्पिटल्स होते, बंकर होते, राहण्याच्या क्वार्टर्स होत्या, शस्त्रागार होतं, स्टोअरेज हाउसेस होती आणि हे एकमेकांना जोडण्यासाठी भुयारांचं शेकडो किलोमीटर्सचं जाळंसुद्धा होतं.

काही ठिकाणी स्वतः उतरून आतमध्ये जाऊन ही भुयारं आणि त्यांची व्याप्ती बघता आली. ज्याप्रमाणे मराठ्यांनी आपल्याहून शंभरपट ताकदीच्या मुघल साम्राज्याचा पाडाव केला, अगदी त्याचप्रमाणे आधुनिक काळात लहानग्या व्हिएतनामने अतिबलाढ्य अशा अमेरिकेचा पराभव केला होता. उत्तर व्हिएतनाम आणि अमेरिकेमध्ये झालेल्या या युद्धाला रेसिस्टन्स वॉर अगेन्स्ट अमेरिका असंही म्हटलं जातं. १ नोव्हेंबर १९५५ ला सुरू झालेलं हे युद्ध ३० एप्रिल १९७५ ला सैगोन म्हणजेच आजच्या हो ची मिन्ह शहराच्या पाडावानंतर संपुष्टात आलं.

यात अमेरिकेचा पराभव होऊन त्यांना व्हिएतनाममधून माघार घायला लागली. अमेरिकेचे युद्धात तब्बल ६० हजार सैनिक मारले गेले, तर तीन लाखांहून अधिक जखमी झाले. २० वर्षं युद्ध चाललं. या कालावधीत सुमारे २७ लाख अमेरिकन सैन्याने आणि सपोर्ट स्टाफने व्हिएतनाममध्ये लढाई केली. जंगल, भूभाग आणि प्रचंड चिवटपणा याच्या जोरावर या लहानशा देशाने अमेरिकेचा पराभव केला. युद्धाचा सर्वांत महत्त्वाचा टप्पा असणारं साईगोन शहरासाठीचं निर्णायक युद्ध जिंकण्यासाठी व्हिएतनामने जमिनीखाली एक संपूर्ण शहर तयार केलं. ज्याप्रमाणे जमिनीवर शहराचे भाग, उपनगरं रस्त्यांच्या जाळ्याने जोडलेली असतात, त्याचप्रमाणे हे जमिनीखालचं शहर होतं.

आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात. शिवाजी महाराज व्हिएतनाममध्ये लोकांना माहिती आहेत का? याचं उत्तर ‘हो’ असं आहे; पण यामागचं कारण आहे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ. या एअरपोर्टवर उतरल्यामुळे किंवा हे एअरपोर्ट माहीत असल्याने या लोकांना शिवराय माहीत आहेत.

हो ची मिन्ह शहरातील जो पुतळा शिवरायांचा आहे म्हणून दाखवलं जातं, तो अश्वारूढ पुतळा नेमका कुणाचा? तर हा पुतळा आहे Trn Nguyên Hãn त्राण नागूएन हान या १५ व्या शतकात होऊन गेलेल्या व्हिएतनामीज सेनापती योद्ध्याचा. शहरातील अतिशय प्रसिद्ध अशा बेन तान मार्केटसमोर हा पुतळा होता; पण सध्या हा तिथून काढण्यात आलेला आहे. मी स्वतः बेन तान मार्केटला भेट दिली असता समोर असा कोणताही पुतळा नव्हता, त्या जागी मोठ्या टॉवरचं काम सुरू होतं. व्हिएतनाम किंवा हो ची मिन्ह यांनी शिवरायांपासून प्रेरणा घेतली का? मी तिथं हो ची मिन्ह यांच्या जीवनावरची काही पुस्तकं चाळली, लोकांशी बोललो; पण यासंदर्भात काहीच माहिती मिळू शकली नाही.

मग मुळात ही कथा पसरली कशी काय, तर काही दशकांपूर्वी एका व्याख्यात्याने भाषणात ही गोष्ट ठोकून दिली की, व्हिएतनामला शिवरायांपासून प्रेरणा मिळाली. मुळात त्या काळात व्हिएतनामचे दरवाजे जगासाठी खुले नव्हते, परदेश प्रवास वगैरे तर सर्वसामान्यांसाठी स्वप्न होतं, त्यामुळे व्हिएतनाममध्ये जाऊन ही गोष्ट पडताळणं अशक्य होतं. पण आता स्वस्त विमान प्रवास, बहुराष्ट्रीय कंपन्या, सोशल नेटवर्किंगमुळे हे सोपं झालं आणि या दंतकथेचं पितळ उघडं पडलं. या दंतकथेच्या आधारावर नंतरच्या काळात अनेक प्रसिद्ध वर्तमानपत्रं, राष्ट्रीय वर्तमानपत्रं यांनीसुद्धा चुकीची माहिती छापली.

लक्षात घ्या, शिवाजी महाराज त्यांच्या हयातीतच जवळपास अर्ध्या जगात लोकांना माहिती झाले होते. शिवरायांना मोठं करण्यासाठी कोणत्याही दंतकथेचा आधार घेण्याची गरज नाही. शिवरायांच्या कार्याची दखल त्यांच्या हयातीतच युरोपियन वर्तमानपत्रांनी घेतलेली होती. शिवरायांचे पराक्रम, त्यांची राज्यव्यवस्था, दुर्गस्थापत्य, युद्धकला या गोष्टींची दखल जगभरात अनेक अभ्यासकांनी घेतलेलीच आहे; पण चुकीची माहिती पसरवून आपण या देदीप्यमान शिवचरित्रावर डाग पडतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे.

(लेखक इतिहास अभ्यासक असून, अनेक देशांमध्ये त्यांनी साहसी पर्यटन स्वरूपाची भटकंती केली आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com