Morocco : मोरोक्को : सहारा संस्कृतीची ओळख

अरब राष्ट्रांपैकी सर्वांत दूरचे अरब राष्ट्र म्हणून मोरोक्को ओळखले जाते
malojirao jagdale over Morocco introduction to Saharan Culture
malojirao jagdale over Morocco introduction to Saharan Culturesakal

- मालोजीराव जगदाळे

उत्तर आफ्रिकेत इजिप्तपासून लिबिया, ट्युनिशिया, अल्जेरिया असं पश्चिमेकडे सरकत भूमध्य सागर आणि अटलांटिक सागर या दोघांचा किनारा लाभलेला देश म्हणजे मोरोक्को. भौगोलिक दृष्ट्या अडचणीच्या ठिकाणी असल्याने भारत किंवा बहुतांश आशियाई देशांसाठी मोरोक्कोला पोहोचण्यासाठी थेट विमानसेवा नाही.

युरोप किंवा आखाती देशामार्गे इथे पोहोचणे जास्त सोपे आहे. अरब राष्ट्रांपैकी सर्वांत दूरचे अरब राष्ट्र म्हणून मोरोक्को ओळखले जाते. आफ्रिकेतील उत्तम कायदा आणि सुव्यवस्था असलेल्या मोजक्या विकसनशील देशांमध्ये हा देश मोजला जातो.

अरब राष्ट्र असून सुद्धा इथल्या संस्कृतीवर समाज जीवनावर स्पॅनिश आणि फ्रेंच प्रभाव मोठा आहे. इथल्या सर्वसाधारण नागरिकाला अरबी, दरिजा (मोरोक्कन अरबी), स्पॅनिश, इंग्रजी, फ्रेंच भाषेतून संवाद साधता येतो.

इतर कोणत्याही मार्गांपेक्षा स्पेनमार्गे मोरोक्कोला पोहोचणे सर्वांत सोपे आहे, मोरोक्को मधील टैंजियर शहरापासून स्पेनची भूमी समुद्रामार्गे फक्त १४ किलोमीटर लांब आहे. शेंगेन विजा (युरोपियन विजा) असेल तर मोरोक्को ला थेट प्रवेश मिळतो.

भारतीयांसाठी पूर्वी बऱ्यापैकी किचकट अशी मोरोक्कोची व्हिसा प्रक्रिया होती पण नुकतीच भारतीयांसाठी ई व्हिसाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

रबात ही मोरोक्कोची राजधानी तर सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले कॅसाब्लांका शहर हे आर्थिक केंद्र आहे. मोरोक्कोन दिरहम चलन हे इतरत्र उपलब्ध नसल्याने भारतातून डॉलर्स नेऊन तेथे बदलून घेणे सोयीस्कर आहे,

तसेच देशाबाहेर मोरोक्कोचे चलन नेऊ नये असा येथे कायदा असल्याने देश सोडताना याची काळजी घेतली पाहिजे. पूर्वीच्या काळी प्रवासी युरोपातून मोरोक्कोच्या उत्तरेकडची शहर असलेल्या टैंजियरमार्गे माली देशातील टिम्बक्तू पर्यंत चालत अथवा उंटांच्या मदतीने प्रवास करायचे हाच मार्ग कारवान रूट म्हणून प्रसिद्ध झाला.

संपूर्ण प्रवास ५२ दिवसाचा आणि साधारण तीन हजार किलोमीटर्सचा त्यावेळी होता, परंतु आता मात्र पर्यटक टैंजियर ते मारकेश अशी सहारा डेझर्ट सफारी करतात जी साधारण ८-१२ दिवसांची असते. सुरुवात टैंजियर शहरापासून केली जाते. जगप्रसिद्ध प्रवासी इब्न बतुता हा मोरोक्कोचा, त्याचे स्मारक टैंजियर मध्येच आहे.

एकेकाळी रोमन साम्राज्याचा भाग असल्याने उत्तरेकडील भागात मोठ्या प्रमाणावर रोमन अवशेष पाहायला मिळतात. टैंजियर जवळच वोल्युबिलिस या प्राचीन रोमन शहराचे अवशेष आहेत. टैंजियर पासून पुढील टप्पा ११० किमी दूर असणारे शेफशावेन शहर आहे.

१४७१ मध्ये पोर्तुगीज आक्रमणापासून बचावासाठी या शहराची स्थापना केली गेली. शहरातील सर्व घरे निळ्या रंगात रंगवली असल्याने शहराला ब्लू सिटी सुद्धा म्हटले जाते. मोरोक्को मधील सर्व जुन्या शहरांची रचना मेदिना म्हणजे मध्यभागी असलेल्या सर्वात जुन्या इमारतींचे ठिकाण आणि बाजूने सुक म्हणजे बाजारपेठ अशी आहे.

इथेसुद्धा मेदिना भागात अनेक जुन्या इमारती असून त्यातील कसबाह आणि हम्माम चौक प्रेक्षणीय आहेत. शेफशावेनपासून साधारणतः चार तासांवर फेझ शहर आहे. जगातील सर्वांत मोठे कार फ्री शहर म्हणून सुद्धा याची ओळख आहे. येथील मेदिना नवव्या शतकातील असून येथील प्रमुख आकर्षणसुद्धा आहे.

शक्यतो या सर्व शहरांमध्ये मेदिना भागात राहण्यास पसंती द्यावी जेणेकरून येथील इतिहास, संस्कृती यांची जवळून ओळख होईल आणि स्थानिकांशी जवळून संवाद साधता येईल. मोरोक्को कातड्यापासून बनवलेल्या वस्तुंसाठी आफ्रिकेत प्रसिध्द आहे, कातडे कमावण्याचे १५ व्या शतकापासून चे जुने कारखाने फेझ मध्ये आहेत.

फेझपासून पुढचा प्रवास अटलास पर्वतरांगांच्या दिशेने सुरू होतो, समुद्रसपाटीपासून ५ हजार ५०० फूट उंचीवर असलेल्या इफ्रानमध्ये आपण येऊन पोहोचतो. तिथून जंगले आणि डोंगर दर्या पार करत मिदेल्ट शहरात मुक्कामासाठी जाता येते.

एकप्रकारे सहारा वाळवंटाच्या सीमेवरून मागे बघताना बर्फाच्छादित एटलास पर्वतरांगांचा अफलातून नजारा बघायला मिळतो. प्रवास करताना मोरोक्को च्या उत्तर, मध्य आणि दक्षिण भागातून जावे लागते. त्यामुळे येथील स्थापत्य शैलीवर असलेला विविध सत्तांचा प्रभाव दिसून येतो.

पुढचा प्रवास सखल वाळवंटी भागातून होतो जेथे अनेक सुकुर मधून आपल्याला जावे लागते. सूकुर म्हणजे मध्ययुगीन तटबंदी असलेली गावे. हा प्रवास ओरझुझात या ठिकाणी येऊन संपतो, या साधारण लाखभर लोकसंख्या असलेल्या शहराला हॉलिवूड ऑफ मोरोक्को म्हणतात ते इथे शूट झालेल्या इंडियाना जॉन्स, ग्लॅडिएटर सारख्या डझनभर हॉलिवूड चित्रपटांमुळे.

येथील सिनेमा म्युझियम आणि ॲटलास म्युझियम प्रसिध्द आहेत. शेवटचा थांबा असलेल्या मारकेशच्या दिशेने पुढचा प्रवास करण्यापूर्वी ऐत बेनहोदू हे जगप्रसिद्ध गाव लागते. सहारा वाळवंटाची ओळख असलेली मातीची घरे सर्वत्र इथे आहेत. अगदी १४ व्या १५ व्या शतकात असल्याचा भास इथे होतो, इतकं जसच्या तसं हे गाव जपलय.

शेवटच्या टप्प्यात म्हणजे मारकेश या मोरोक्को च्या सांस्कृतिक राजधानीत आगमन होते आणि इथेच मोरोक्कन सहारा सफारी ची सांगता होते. शेवटचे आणि सर्वात महत्वाचे हे ठिकाण आहे, जगप्रसिध्द अशा मोरोक्कन स्थापत्यशैली आणि मोरोक्कन टाईल्स चे विविध प्रकार इथे पाहायला मिळतात. जेम्मा अल्फना ही जगातल्या सर्वात जुन्या बाजारपेठे मधील एक आहे.

बाजारपेठेसोबत हे एक मोठे सांस्कृतिक केंद्र सुद्धा आहे. संध्याकाळच्या वेळी हा परिसर अतिशय गजबजलेला असतो. चौकात खेळ करून दाखवणारे, भविष्यवाले, नर्तकांचा समूह, हिकायत दार म्हणजे दरिजा भाषेत प्रवासवर्णने आणि कहाण्या सांगणारे असे बर्बर आणि सहारन संस्कृतीचे दर्शन घडवणारे अनेक कलाकार इथे दिसतात. प्रवासाची आठवण म्हणून इथल्या बाजारपेठेतून आवर्जून खरेदी करावी. इथल्या जगप्रसिध्द रेस्टॉरंट्स मध्ये स्थानिक पदार्थाचा आस्वाद घ्यावा.

अरेबिक खाद्यसंस्कृती सारखी इथली संस्कृती नाही त्यामुळे ठराविक अरबी पदार्थांपेक्षा वैविध्यपूर्ण, कलरफुल, फ्लेवरफूल खाद्य पदार्थांची रेलचेल बघायला मिळते. अंडलुशियन, मेडीटरेनियन, बर्बर, फ्रेंच, सब सहारन अशा अनेक संस्कृतींचा प्रभाव थेट इथल्या खानपानावर आहे. कुस्कुस, टाकटुका, झालुक, बिसारा, खोब्ज खामेर आणि बाग्रिर हे ब्रेड चे प्रकार, ताजिन, चारमला आवर्जून ट्राय करावेत.

इथल्या पारंपरिक पद्धतीच्या घरांमध्ये गेस्ट हाऊस पद्धतीने राहण्याची सोय केलेली असते त्याला रिआद म्हणतात, अशा घरामध्ये सुध्धा आवर्जून मुक्काम करावा. बर्बर आणि सहारन लोकसंस्कृती आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याने मोरोक्को ची सफर निश्चितपणे वेगळा अनुभव देणारी ठरेल.

तीन हजार पेक्षा जास्त वर्षांचा अतिशय संपन्न इतिहास या देशाला लाभलेला आहे. रोमन, बर्बर, स्पॅनिश, फ्रेंच अशा अनेक सत्ता येथे राज्य करून गेल्या. संपूर्ण राजेशाही व्यवस्थेनुसार हा देश चालतो. १९९९ साली सिंहासनारूढ झालेले अलावी घराण्याचे मोहम्मद (सहावे) हे सध्या मोरोक्कोचे राजे आहेत. सुधारणावादी नेते आणि शासक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या कारकिर्दीतच मोरोक्कोचा कायापालट होऊन देशाने आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली.

(लेखक जगभर भटकंती करत असतात. साहसी पर्यटनावर त्यांचा भर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com