परदेशांतले सण आणि सोहळे

एकदा सिंगापूरमध्ये असताना योगायोगाने चायनीज नवीन वर्ष तिथं साजरं केलं जात होतं.
Brasil Carnival
Brasil Carnivalsakal

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

एकदा सिंगापूरमध्ये असताना योगायोगाने चायनीज नवीन वर्ष तिथं साजरं केलं जात होतं. सर्व बाजूंनी सोयीचं असं उपनगर असलेल्या चायना टाउनमध्येच मी त्या वेळी राहत होतो, त्यामुळे या नवीन वर्षानिमित्त साजऱ्या होत असलेल्या उत्सवाच्या केंद्रस्थानीच जवळपास होतो.

रस्त्यावर चौकाचौकांत मोठमोठे देखावे केले होते, तसंच संध्याकाळी भव्य शोभायात्रासुद्धा निघाली. तेथील लोकांनी मला त्यांच्या सोहळ्यामध्ये सामावून घेतलं आणि शोभायात्रा संपेपर्यंत त्यांच्यासोबत मला सोहळा अनुभवता आला. खरंतर पर्यटनासाठी सिंगापूरमध्ये गेलो असताना अचानकपणे या सोहळ्याचं साक्षीदार होता आलं, हा सुखद अनुभव कायमस्वरूपी मनामध्ये कोरला गेला. जगभर दरवर्षी असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण सण, सोहळे, कार्यक्रम होत असतात आणि त्यांना एक पर्यटक म्हणून उपस्थित राहणं, हासुद्धा एक वेगळा अनुभव ठरू शकतो.

महाराष्ट्रातील गणेशोत्सव, वृंदावन इथं साजरी होणारी होळी, कुंभमेळा यांना गेल्या काही वर्षांपासून परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात हजेरी लावताना दिसत आहेत. स्थानिक संस्कृतीशी एकरूप होण्याच्या भावनेने परदेशी पर्यटक अशा सण-सोहळ्यांना आवर्जून उपस्थिती दर्शवतात.

ब्राझीलच्या रियो येथील कार्निव्हल, स्पेनच्या व्हॅलेंशियामधील ला टोमॅटिना, जर्मनीच्या म्युनिकमधील ऑक्टोबर फेस्ट हे तसे वार्षिक साजरे होणारे जगप्रसिद्ध सोहळे आहेत. अनेक देशांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत महत्त्वाच्या सणांनी होतं. हिंदू, चायनीज, बुद्धिस्ट किंवा स्थानिक कॅलेंडरप्रमाणे नववर्ष दिन साजरे होतात.

व्हिएतनाममध्ये तेट हा प्रारंभ दिन म्हणून, तर थायलंडमध्ये सोंगकार्न हा चालू वर्षाला अलविदा करण्याचा दिवस आहे. तेट सणाच्या दरम्यान संपूर्ण व्हिएतनाममध्ये रोषणाई केली जाते, घरांवर सजावट केली जाते, तसंच रस्त्यांवर आकर्षक कमानी उभारल्या जातात. थाई नवीन वर्ष म्हणून ओळखला जाणारा सोंगकार्न हा सण म्हणजे खरंतर रंगपंचमीसारखाच आहे.

सलग दोन-तीन दिवस चालणारा हा सण असून, सध्या मोठ्या संख्येने पर्यटक सोंगकार्न दरम्यान थायलंडला भेट देतात. ख्रिसमस दरम्यान संपूर्ण युरोपमध्ये अतिशय उत्साहमय वातावरण असतं, त्यामुळे तसा ऑफ सीझन असतानासुद्धा पर्यटक युरोपात गर्दी करताना दिसतात.

२४ नोव्हेंबर ते २ जानेवारी दरम्यान पूर्व युरोपातील चेक प्रजासत्ताकची राजधानी प्रागमध्ये विशेष वॉकिंग स्ट्रीट आणि मध्यरात्री सुरू होणारी मार्केट भरवली जातात. शॉपिंगवर मोठी सूट, खाद्यपदार्थांची रेलचेल, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे गेली काही वर्षं नाताळनिमित्त येणाऱ्या पर्यटकांचं हे विशेष आकर्षण बनलं आहे.

रमजानच्या महिन्यामध्ये आखाती देशांना भेट देणं, हा एक वेगळा अनुभव ठरू शकतो. कतार, अरब अमिराती, बहारीन, मोरोक्को, इजिप्त, लेबनॉन, ओमान इत्यादी देशांमध्ये स्थानिक बाजारपेठा गजबजून गेलेल्या असतात.

एरवी सहज न मिळणारे अनेक खाद्यपदार्थ या काळात उपलब्ध असतात. या काळात खरेदीवर मोठ्या ऑफर्स असतात, तसंच या देशांमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेटी दिल्यास प्रवेश मूल्य आकारलं जात नाही. बैरूत, कैरो, मारक्केश, दुबई ही शहरं रमजानकाळातील फूड स्ट्रीटसाठी जगप्रसिद्ध आहेत.

जगातील काही भागांत अजूनही काही विचित्र प्रथा साजऱ्या केल्या जातात. सर्वसामान्यपणे इतर देशांत दुःखद मानल्या जाणाऱ्या या प्रथा या देशांत मात्र मोठे सोहळे म्हणून साजऱ्या होतात. मेक्सिकोमध्ये दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘दिया दे लोस मुईतोस’ हा सोहळा मृत मित्र, नातेवाईक, प्रियजनांच्या आठवणी जपण्यासाठी साजरा केला जातो.

यानिमित्त मोठ्या शोभायात्रा ठिकठिकाणी काढल्या जातात. हाडांचे सापळे, भुतांचे मुखवटे इत्यादींची चित्रविचित्र आरास केली जात असल्याने या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्यास जगभरातील पर्यटक हजेरी लावताना दिसतात.

इंडोनेशियामधील अनेक हिंदू राजघराणी काही शतकांपूर्वी बाली बेटावर स्थायिक झाली. येताना त्यांनी सोबत त्यांच्या विशिष्ट प्रथासुद्धा आणल्या. राजघराण्यातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर अतिशय मोठा सोहळा केला जातो, ज्याला पित्र यज्ञ असं म्हणतात. लाखो रुपयांपासून ते काही कोटी रुपयांपर्यंत या विधीसाठी खर्च केला जातो.

अग्निसंस्कार करण्यासाठी ३५ ते ४० फूट उंचीचे लाखेपासून बनवलेले बैल, वराह, गरुड, हत्ती इत्यादी प्राण्यांच्या आकाराचे पुतळे बनवले जातात, ज्यांच्या पोटात शव ठेवले जाते. सुमारे दीड-दोनशे लोक हे पुतळे उचलतात, त्यांच्या मागे हजारो लोक पारंपरिक वेशामध्ये हातात झेंडे, विविध वस्तू घेऊन चालतात.

उत्तरक्रियेच्या मैदानावर पोचल्यानंतर लाखेच्या पुतळ्याला अग्नी दिला जातो. घडलेली घटना दुःखद असली तरी हा सोहळा इतका दिमाखदार आणि बालीनीज हिंदू संस्कृतीचं पारंपरिक दर्शन घडवणारा असतो, की हजारो परदेशी पर्यटक हा सोहळा बघण्यासाठी गर्दी करतात.

सणांसोबतच विशेष दिवससुद्धा साजरे केले जातात, जे स्थानिकांसोबतच पर्यटकांसाठीसुद्धा महत्त्वाचे आहेत. युरोपात विशेषतः फ्रान्स, इटलीमधील संग्रहालयं, ग्रीसमधील प्राचीन स्मारकं यांची तिकिटं पर्यटकांसाठी बऱ्यापैकी महाग असतात; पण वर्षातील काही दिवस जर आपण लक्षात ठेवले आणि या दरम्यान युरोपातील देशांमध्ये आपण प्रवास करत असाल, तर संग्रहालय, स्मारक यांसारख्या आकर्षणांना मोफत प्रवेश मिळू शकतो. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रवेश मोफत असतात, तसंच आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन, देशाचा राष्ट्रीय दिन या दिवशीसुद्धा अनेक आकर्षणांना मोफत प्रवेश दिला जातो.

बहुतांश युरोपियन देशांमध्ये ऑक्टोबर ते मार्च दरम्यान महिन्यातील एक दिवस सर्व ठिकाणी मोफत प्रवेश दिला जातो. कधी महिन्याचा पहिला रविवार किंवा पहिला गुरुवार अथवा शेवटचा रविवार असे दिवस साधारणपणे असतात. ट्रीप प्लान करण्याअगोदर भेट देणार आहात त्या देशाच्या पर्यटन विभागाच्या वेबसाइटवर माहिती घ्यावी.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही देशांकडून किंवा काही ऑर्गनायझेशनकडून मोठमोठ्या इव्हेंट्सचं आयोजन केलं जातं. नुकतंच दुबईमध्ये प्रदर्शन पार पडलं, यामध्ये जगातील १९२ देशांनी सहभाग घेतला होता आणि १८२ दिवस हे प्रदर्शन चाललं, ज्याला जगभरातील दोन कोटी चाळीस लाख पर्यटकांनी भेट दिली.

अशा मोठ्या इव्हेंट्सचं वेळापत्रक वर्षभर आधीच प्रसिद्ध केलं जात असल्याने योग्य नियोजन केल्यास पर्यटनासोबतच वैयक्तिक आवड व उद्योगधंदे याविषयी संबंधित प्रदर्शनांना भेटी देता येणं शक्य आहे. बेल्जियममध्ये दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या म्युझिक फेस्टिव्हलला जगभरातील पर्यटकांचा तुडुंब प्रतिसाद असतो. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठं प्रदर्शन, जे ‘सीईएस’ नावाने ओळखलं जातं, ते अमेरिकेच्या लास वेगास शहरामध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यात भरतं.

उद्योगधंद्यांमधील नवीन संधीमध्ये उत्सुकता असणाऱ्यांसाठी चीनच्या गोंझाऊमध्ये दरवर्षी कॅन्टन फेअर हा इम्पोर्ट-एक्सपोर्टसंबंधित जगातील सर्वांत मोठा ट्रेड शो आयोजित केला जातो. तसंच, जगभरातील मोबाईल फोनप्रेमींसाठी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसचं आयोजन स्पेनमधील बार्सिलोना इथं केलं जातं.

वेगवेगळ्या देशांमध्ये साजरे होणारे सण-सोहळे हे पूर्वी त्यांच्यापुरतेच मर्यादित असत; परंतु जागतिकीकरणामुळे आणि लोक आणखी अगत्यशील झाल्याने पर्यटकांना स्थानिक संस्कृतीत सहज सामावून घेतलं जात आहे.

(लेखक जगभर भटंकती करतात, साहसी प्रर्यटनावर त्यांचा भर असतो.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com