देशोदेशीची खाद्य-भटकंती...

‘आपली खाद्यसंस्कृती हे आपलं सर्वस्व आहे, आपल्या राष्ट्रीयत्वाची भावना आहे... आपलं राज्य, आपला भूभाग, आपलं लोकजीवन, आपला समाज, आपला इतिहास, आपले पूर्वज यांची ओळख म्हणजे आपली खाद्यसंस्कृती आहे.’
Jalan Aalor Food Street
Jalan Aalor Food Streetsakal
Summary

‘आपली खाद्यसंस्कृती हे आपलं सर्वस्व आहे, आपल्या राष्ट्रीयत्वाची भावना आहे... आपलं राज्य, आपला भूभाग, आपलं लोकजीवन, आपला समाज, आपला इतिहास, आपले पूर्वज यांची ओळख म्हणजे आपली खाद्यसंस्कृती आहे.’

- मालोजीराव जगदाळे, agdaleomkar5@gmail.com

‘आपली खाद्यसंस्कृती हे आपलं सर्वस्व आहे, आपल्या राष्ट्रीयत्वाची भावना आहे... आपलं राज्य, आपला भूभाग, आपलं लोकजीवन, आपला समाज, आपला इतिहास, आपले पूर्वज यांची ओळख म्हणजे आपली खाद्यसंस्कृती आहे.’ प्रसिद्ध फूड ट्रॅव्हलर (खाद्यभ्रमंतीकार) अँथनी बोर्डेन यांची ही वाक्यं कालजयी आहेत. एखाद्या देशाबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल जर सखोल जाणून घ्यायचं असेल, तर सुरुवात त्यांच्या खाद्यपदार्थांपासून करायला हवी.

आपल्याकडील बहुतांश पर्यटकांची मानसिकता परदेशातील खाद्यपदार्थ चाखून बघण्याची नसते, याउलट आपण भटकंतीला बाहेर पडलो तरी त्या त्या ठिकाणी भारतीय रेस्टॉरंट कुठं आहेत का याचा शोध घेतो आणि तिथंच जेवणं पसंत करतो. स्थानिक खानपानाची नाळ इथल्या संस्कृतीशी जोडली गेली असल्यानं आपण एका मोठ्या अनुभवाला मुकतो. भारतीय खाद्यपदार्थ जसं जगभर प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे इतर देशांतील खाद्यपदार्थसुद्धा जगप्रसिद्ध आहेत.

त्यातील चायनीज आणि इटालियन पदार्थ तर आपल्या रोजच्या जीवनातील आहेत. भारतीय पदार्थांचा मोठा प्रभाव भारतीय उपखंडातील देशांवर आहे जसं की - पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि म्यानमार. त्यामुळे या देशांमध्ये फिरत असताना कदाचित समान अनुभव येऊ शकतो. म्हणूनच या देशांमध्ये आपण सहजतेनं वावरतो; पण यापलीकडे इतर देशांमध्ये जेव्हा आपण प्रवास करतो, तेव्हा मात्र आपण स्वतःला भारतीय खाद्यपदार्थांपुरतं मर्यादित करून टाकतो.

bui vien street
bui vien streetsakal

हैदराबादला बिर्याणी, लखनऊचा कबाब, श्रीनगरचा वाजवान, अमृतसरचं बटर चिकन, राजस्थानची दालबाटी व लाल मांस इत्यादींसाठी जसं आपण आग्रही असतो, तसंच देशोदेशीचे काही सिग्नेचर पदार्थ आहेत, जे आवर्जून ट्राय करायलाच हवेत. इंडोनेशियामधील ‘तुम अयाम’ हे केळीच्या पानांमध्ये गुंडाळून वाफवलेलं चिकन आणि भात. जपानमधील सुशी व रामेन, विविध प्रकारच्या भाज्या, मांसाहारी पदार्थ आणि भाताचा बेस असलेलं कोरियातील बिबीमबाप, तुर्कीमधील बकलावा आणि डोनर कबाब, इजिप्तची पूर्णपणे शाकाहारी असणारी कोषारी, आखाती देशांमधील अरब अमिरातीमधील दुबई शहरापासून ते अगदी जॉर्डनच्या अम्मानपर्यंत प्रसिद्ध असलेलं फलाफल, शावरमा, ग्रीसमधील सॅलडचे विविध प्रकार, थायलंडमधील थाई करी, व्हिएतनाममधील फो... अशी काही प्रतिनिधिक उदाहरणं घेता येतील. इथं उदाहरणादाखल घेतलेले पदार्थसुद्धा अगदी साधे आणि सुलभपणे उपलब्ध होणारे आहेत. त्या त्या देशांमध्ये कोणत्याही चौकात किंवा शहराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला हे पदार्थ सापडतील.

अनेकदा काही देशांमध्ये साप, विंचू, किडे इत्यादी खाल्ले जातात म्हणून अनेक पर्यटक त्या देशातील सर्वच खाद्यपदार्थ वर्ज्य करतात. स्थानिक संस्कृती आणि इतिहास यांची थोडीफार ओळख असली की, काही गैरसमज दूर होण्यास मदत होते. उदाहरणादाखल व्हिएतनाम, कंबोडिया यांच्यासारखे देश सलग तीस-तीस वर्षं युद्धात होरपळून निघालेले होते. सलग दोन पिढ्या युद्धात गेल्याने त्यांची खाद्यसंस्कृती जवळपास नष्ट झाली. पिकं नाही, जनावरं नाहीत... अशा परिस्थितीत खाणार काय, म्हणून तिथल्या जंगलांमध्ये उपलब्ध असलेले प्राणी, पक्षी, किडे इत्यादींचा समावेश आहारात झाला आणि हे पदार्थ पुढील काळात तिथल्या जीवनशैलीत सामावून गेले.

हाँगकाँग, सिंगापूर यांसारख्या देशांमध्ये जेवणासाठी लागणारी सर्व सामग्री विकत घेऊन घरी जेवण बनवण्यापेक्षा बाहेर स्ट्रीट फूड खाणं हे आर्थिकदृष्ट्या जास्त परवडणारं आहे, त्यामुळे स्ट्रीट फूड अशा देशांमध्ये जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. इतर देशांमध्ये फिरताना विशेषतः अमेरिका, युरोप किंवा इतर महागडे देश असतील, तर अशा ठिकाणी भारतीय खाद्यपदार्थांचा आग्रह खिशाला मोठी चाट पाडू शकतो.

Thali in Varung
Thali in Varungsakal

अतिशय सर्वसाधारण पद्धतीचे स्थानिक जे पदार्थ असतात ( कम्फर्ट फूड) यांना साधारणपणे ‘वन डॉलर मिल’ असं संबोधलं जातं. म्हणजे असं जेवण, ज्याची किंमत ८०-१०० रुपयांपेक्षा जास्त नाही. हे सर्वच देशांमध्ये विविध स्वरूपात उपलब्ध असतात. जसं की - बाली किंवा इंडोनेशियामध्ये वारुंग नावानं ठिकठिकाणी स्थानिक रेस्टॉरंट्स आढळतात. ‘वारुंग’चा शब्दशः अर्थ खानावळ असा होतो. येथील जेवण अक्षरशः पन्नास रुपयांपासून सुरू होतं. व्हिएतनाममध्ये तर फो (सूपचा प्रकार), बांह मी (तिथला वडापाव) आणि कॉफी या तिन्ही गोष्टींची किंमतसुद्धा मिळून शंभर रुपये होत नाही. थायलंडमधली पाड थाई ही त्यांची नॅशनल डिश जर एखाद्या रेस्टॉरंटला जाऊन खाल्ली तर साधारण दोनशे-अडीचशे रुपये खर्च येतो; पण तेच स्ट्रीट फूड म्हणून पन्नास रुपयांनासुद्धा उपलब्ध आहे. अमेरिकन हॉट डॉग, तुर्कीचा डोनर कबाब, इजिप्शियन फितिर ही आणखी काही वन डॉलर मिल आहेत.

आधीच्या काळात पर्यटक देशाटनाला गेले की, मोठ्या हॉटेलमध्ये राहत, जिथं कॉन्टिनेन्टल, अमेरिकन ब्रेकफास्टसह पाश्चिमात्य पद्धतीच्या जेवणाची सोय असे. क्वचितच पर्यटक तिथले स्थानिक खाद्यपदार्थ खात असत, तेही चांगल्या नावाजलेल्या रेस्टॉरंटमध्ये. नंतरच्या काळामध्ये बीबीसीसह अनेक चॅनेल्ससाठी खाद्यभ्रमंती केलेल्या अँथनी बोर्डेन, सेलिब्रिटी शेफ गॉर्डन रामसे, बीझार फूड टीव्ही शोचे अँड्रयू झिमर्न, जगभर भटकंती करून देशोदेशीची खाद्यसंस्कृती सर्वांपर्यंत पोहोचवणारे लोनली प्लॅनेटचे इयान राइट, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वक्तृत्वशैलीमुळे प्रसिद्ध असणारे रिक स्टीव्ह यांनी स्ट्रीट फूडला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. इतकं की, या रस्त्यांवरच्या पदार्थांचा समावेश फाइव्ह स्टारच्या मेनू कार्डमध्ये झाला.

परदेशातून पर्यटक या देशांमध्ये फक्त इथले पदार्थ चाखण्यासाठी येऊ लागले. भारतातसुद्धा असे प्रयत्न आताच्या काळात कुणाल कपूर, विकास खन्ना, गगन आनंद यांनी केले. प्रोग्रेसिव्ह इंडियन फूड या प्रकारातून त्यांनी शेकडो वर्षांची भारतीय खाद्यसंस्कृती नव्या रूपात आणली. सोशल मीडियामुळे आता जग आणखी जवळ आलं आहे. अनेक फूड ब्लोगर्स खाद्यपदार्थांचे व्हिडिओ यूट्यूबवर टाकून त्यासंदर्भातली माहितीसुद्धा सर्वांपर्यंत पोहोचवत असतात.

क्वालालम्पूरमधील जलान अलोर, बँकॉकमधील खाओसान, बालीमधील लिजियान स्ट्रीट, बाकूमधील निजामी स्ट्रीट, दुबईमधील ला मेर, साईगोनमधील बुई विएन, कंबोडियाच्या सिएम् रिपमधील पब स्ट्रीट अशी जगभरातील कित्येक ठिकाणं तर तिथं मिळणाऱ्या पदार्थांमुळेच पर्यटकांच्या यादीत आली. संस्कृती, जनमानस, खाद्य आणि भूभाग हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत, त्यामुळे स्थानिक लोकांशी समरस होण्याचा रस्ता त्यांच्या खानपानातून जातो. आपल्या पर्यटकांनी स्वतःच्या कोशातून बाहेर येऊन हे वेगळं जग अनुभवायला हवं. खाण्यासाठी जन्म आपुला म्हणत फक्त खाद्यभ्रमंतीसाठीच विविध देश फिरायला काय हरकत आहे?

(लेखक साहसी पर्यटन प्रकाराची भटकंती करतात)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com