

Best Maharashtrian breakfast in Mumbai
esakal
चांगल्या चवीच्या खाद्यपदार्थांबरोबर आदरातिथ्य, पदार्थांचा दर्जा आणि माफक किमतींमुळे ‘मामा काणे यांचे स्वच्छ उपाहारगृहा’तील भेट कधीच शेवटची ठरत नाही. मुंबईसारख्या मेट्रो शहरात अनेक समुदायांची लोकं एकत्रितपणे नांदत असताना आणि दिवसेंदिवस वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीची मूळ उथे रुजत असताना मामा काणे यांनी मराठी खाद्यसंस्कृती अतिशय अभिमानाने जपली आहे.
एखादी गोष्ट स्वेच्छेने, आनंदाने करत राहणे आणि तो वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी मूळ हेतू स्पष्ट असावा लागतो. ग्राहकांची वर्गवारी करून त्यांना सेवा देण्यापेक्षा चांगली सेवा देत राहण्याचे कर्तव्य पार पाडले, तर त्याचा लाभ सर्वांना होईल, या भावनेने परिश्रमपूर्वक व्यवसाय करत राहिल्यास त्याची शतकोत्तर वाटचाल झाली नाही तर नवलच. आगामी वर्षात एकशेसोळाव्या वर्षात पदार्पण करत असतानाही इथे प्रथम प्राधान्य स्वच्छता, पदार्थांची गुणवत्ता, माफक दर आणि साधेपणाला आहे. मुंबईतील प्रमुख स्थानक असलेल्या दादर येथील सेनापती बापट मार्गावरील स्मृती-कुंज इमारतीत असलेले ‘मामा काणे यांचे स्वच्छ उपाहारगृह’ हे मुंबईची मराठमोळी खाद्यसंस्कृती जपणारी अतिशय महत्त्वाची जागा आहे. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असल्याने अनेकदा रस्त्यावरून जाणारी मंडळी भूक क्षमविण्यासाठी हॉटेलच्या नावाचा बोर्ड न पाहताच आत शिरतात. प्रत्येकाची आवड-निवड जोपासेल असा इथला भरगच्च मेन्यू नसला तरी ठरावीक पदार्थ ऑर्डर करून खाल्ल्यानंतर आत शिरण्याचा निर्णय चुकीचा नव्हता याचे येथे पहिल्यांदा येणाऱ्या ग्राहकांना समाधान वाटते.