नकारात्मक परिस्थितीला सामोरे जाणे हेच व्यवस्थापन

डॉ. मृणालिनी नाईक
गुरुवार, 21 मे 2020

संघर्षाला न घाबरता आणि समोर वाढून ठेवलेल्या नकारात्मक परिस्थितीला सामोरे जाता यायला हवे. थांबला तो संपला, हे असेच काही कोणी म्हटले नसावे. संदर्भ लागल्याशिवाय जसं वाक्‍य पूर्ण वाटत नाही तसंच अर्थ असल्याशिवाय आयुष्य. मग या आयुष्याला अर्थ आणायचा कसा, हे तर आपल्याच हातात आहे.

महाभारतातील युद्ध जरी घराण्यातील संघर्षावर आधारित असले, तरी ते गृहयुद्धच होते, असे म्हणण्यास हरकत नाही. युद्धाची शोकांतिका, विशाल काया आणि विध्वंसकपणासाठी धर्म आणि मानवी वर्तनाचे सर्व घटक संबोधित करणे तिथे आवश्‍यक होते. माणसाच्या स्वभावातील सर्व सामर्थ्य व कमकुवतपणा दर्शविणारा उत्तेजक तसेच विरोधाभासी वर्णदेखील इथलाच. ते एक युग होतं जिथे कृष्ण होता. हे एक युग आहे जिथे आपण कृष्ण शोधत आहोत.
आपण आज सामर्थ्यवान असलो तरी अविश्वसनीय धोक्‍यांसह जगत आहोत, असे म्हणण्यास हरकत नाही. गोंधळ आणि संघर्ष जगाला वळसे घालतात आणि आपली संसाधने जेव्हा ताणली जातात तेव्हा आम्ही कृष्णाला शोधतो. मग आम्हाला वाटत असतं की, आमची माहिती आणि तंत्रज्ञान केवळ भयंकर नवीन शस्त्रे तर नाही ना तयार करत फक्त? की आता काय ते biological weapon म्हणजेच जैविक शस्त्र तयार करत आहोत. मग त्यात कृष्ण शोधताना वरून भर ती मनावर नियंत्रण ठेवण्याची आणि आंतरिक शांती शोधण्याची, आणखीनच त्रासदायक? मग तर शांती देणारे सगळेच कृष्ण. आता कोण सांगेल की, ही नवीन साधन आपल्याला बाह्य लबाडीपासून मुक्त करू शकतील की नाही. आपल्या बुद्धीने आणि देवाकृपेने आपली स्वतःची सखोल चेतना शोधणे म्हणजे काय, हा खरंतर मोठा प्रश्नच? आता सांगा या अशा सगळ्या कचाट्यात व्यवस्थापन वगैरे करायचे कसे? या न पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला जर कृष्णही आज बाहेर पडला असता, तर कदाचित हरवला असता सगळा संघर्ष प्रकार पाहून.
असो... संघर्ष कुठे करत नाही आपण? प्रत्येक ठिकाणी संघर्ष, विरोध हे मतभेद आहेतच. तेव्हा कौरव आणि पांडवांमध्ये होते; आता प्रत्येक ठिकाणी आहेत. खरंतर जेव्हा आपण इतर लोकांच्या सहवासात येतो तेव्हा हा संघर्ष तिथे असतोच. आधी म्हटलं तसं विरोध आणि मतभेद हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत आणि म्हणूनच तर आपण प्रत्येक ठिकाणी करत असतो व्यवस्थापन. खरं सांगा जर हे नसते, तर मग गरज पडली असती का त्या व्यवस्थापन शब्दाची? मग आपण व्यवस्थापनात काय करतो? जिथे आपण जगत आहोत ते मर्यादा आणि द्वैत या दोन महत्त्वाच्या घटकांचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात जेव्हा आपण पाय ठेवतो तेव्हा आपल्याला विविध संकट, विरोधाभास, मतभेद, लढा अशा गोष्टींना सामोरे जायला लागतं. या क्षेत्रात जेव्हा आपण पदार्पण करतो तेव्हा आपल्या काहीही करण्याचा नाकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण, विचार करा, काहीही जर केलेच नाही, तर काय होईल? आयुष्यच नकारात्मक नाही का होणार. हे विरोध, हे संघर्ष खरं तर आपल्याला जगायला शिकवतात.
एखादा बैल अंगावर धावून आलाच तर माझ्या अंगावर याआधी कधी बैल असा धावून आला नाही म्हणून आता मला या बाबतीत काही करता येणार नाही, असं म्हणून आपण बैलासमोर उभे राहत नाही मरणाला तोंड देत. त्या स्थितीला आपण लढा देतो. मग लढा देण्याचा आणि स्वतः जीव वाचविण्याचा मार्ग आपापला, आपल्या कुवतीवर आधारलेला असतो. तेव्हा एखादी पैज जशी जिंकायची ओढ लावते, तशीच संघर्षाशी होणारी चकमक व्यवस्थापन शिकवते. मग कार्यालय असो वा घर, व्यवस्थापन कितीही गुंतागुंतीचं असलं तरी सोपं होत जातं. कारण विरोध आणि मतभेद आपल्याला नवे मार्ग देत असतात. कधी-कधी म्हणतात ना, हिरवी मिरची दातांखाली घेतल्याशिवाय ती किती तिखट आहे सांगता येत नाही; तसेच काहीसे या व्यवस्थापनाचे. खरंच जर व्यवस्थापन करायचे असेल, तर संघर्षाला न घाबरता आणि समोर वाढून ठेवलेल्या नकारात्मक परिस्थितीला सामोरे जाता यायला हवे. थांबला तो संपला, हे असेच काही कोणी म्हटले नसावे. संदर्भ लागल्याशिवाय जसं वाक्‍य पूर्ण वाटत नाही तसंच अर्थ असल्याशिवाय आयुष्य. मग या आयुष्याला अर्थ आणायचा कसा, हे तर आपल्याच हातात आहे. घाबरून मागे जायचं की संघर्ष देत सामोरे. निर्णय कोणताही घेतला तरी परिणामाला कारणीभूत आपणच. मग व्यवस्थापनाच काय? विचार करा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Management to handle negative situation

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: