हसवणुकीच्या पडद्याआड...

एका कॉमेडी शोमध्ये भारत गणेशपुरे आणि भाऊ कदम. विनोदावर आधारित कार्यक्रमांशिवाय टीव्ही वाहिन्यांचं पानच हलत नसल्याचं चित्र आहे.
एका कॉमेडी शोमध्ये भारत गणेशपुरे आणि भाऊ कदम. विनोदावर आधारित कार्यक्रमांशिवाय टीव्ही वाहिन्यांचं पानच हलत नसल्याचं चित्र आहे.

भाऊ कदमनं साकारलेल्या खट्याळ मोरूला मॅडम म्हणजे किशोरी आंबिये विचारतायत : ‘‘मास्तर, तुझी तक्रार करत होते, की वर्गात तू म्हणजे नुसता मुलींशी गप्पा मारतोस?’’ 
मोरू एक पॉझ घेतो आणि म्हणतो... : ‘‘मॅडम, मी मुलींशी नुसत्याच गप्पा मारतो.’’ 
भाऊ एका विशिष्ट टायमिंगनं हे वाक्य उच्चारतो आणि प्रेक्षागृह हास्यकल्लोळात बुडून जातं. 

तिकडे बंगळुरूमध्ये निशांत सुरी ‘आतंकवादी जिन की दिल्ली पुलिस को है तलाश’ या पोस्टरला ‘‘वॉव! ये ‘वाँटेड’का पोस्टर है या जावेद अख्तर की शायरी है?’’ असा प्रश्न विचारतोय आणि आयटीयन्स हसून लोटपोट होतायत. 
सातारा जिल्ह्यातल्या कुठल्या तरी खेड्यात पोरं ‘गावाकडच्या गोष्टी’चे व्हिडिओ बघत लोटपोट होतायत, तर दुसरीकडे कपिल शर्मा त्याच्या शोमध्ये ‘‘जगातला सगळ्यांत जुना प्राणी कोणता?’’ या प्रश्नावर ‘‘झेब्रा-कारण, त्याच्या अंगावर ब्लॅक अँड व्हाइट पट्टे असतात,’’ असं उत्तर देतोय. 

कुणी हसवतंय, कुणी हसतंय. कुणी एकेका विनोदावर कोट्यवधी कमावतोय, तर कुणी लोकप्रियतेची शिखरं पादाक्रांत करतोय. कुणी परीक्षक कॉमेडी शोमध्ये नुसताच खदाखदा हसतोय, तर एखाद्या विनोदी चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळतोय. नवीन चॅनेल काढताना कुणी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर वेगळ्या प्रकारच्या कॉमेडी शोसाठी हटून बसलाय, तर कुठलं प्रॉडक्शन हाऊस ‘विनोदी व्यक्तिरेखा असल्याशिवाय वेब सिरीज् करायचीच नाही’ म्हणतंय. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

...वेलकम टू द वर्ल्ड ऑफ कॉमेडी!!! हास्यनगरी, विनोदनगरी...नावं काही द्या; पण इथं लोकांना हसवण्याचं काम केलं जातंय. ‘बिझनेस ऑफ कॉमेडी’ म्हणा ना. ‘कॉमेडी इज अ सीरिअस बिझनेस’ हा सुविचार मात्र इथं फार गांभीर्यानं घेतला जातोय. महाराष्ट्रात अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि भारतात विजापूरपासून कानपूरपर्यंत सगळीकडं ही ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ जोरात धावतेय. वाईतला नीलेश साबळे येतो आणि बघता बघता ‘कॉमेडी आयकॉन’ बनून जातो. कुठला तरी अभिमन्यू उपमन्यू, झकीर खान, राहुल सुब्रमण्यम बघता बघता स्टँडअप् कॉमेडीद्वारे भारतभरातल्या उच्चभ्रू मध्यमवर्गीयांत लोकप्रिय होतात. हसवता हसवता कपिल शर्माची संपत्ती दोन-अडीचशे कोटींच्याही पुढं जाते आणि ‘‘मला इतके पैसे मिळतात की मला हसावंच लागतं,’’ असं अर्चना पूरणसिंग हसत हसत म्हणते. बंगळूरची ओळख अचानक ‘भारताचं स्टँडअप् कॉमेडी हब’ म्हणून होऊ लागते आणि सोलापुरातले दीपक देशपांडे टीव्हीमुळे राज्यातल्या कानाकोपऱ्यात माहीत होतात. 

विनोदाची ही नगरी आहे तरी कशी? विनोदावर हसायला सोपं आहे हो; पण या विनोदवीरांना हे सगळे विनोद सुचतात तरी कधी, कसे? ‘मी आत्तापर्यंत अडीचशे स्किट्स लिहिली आहेत,’ असं कुणी सांगतं तेव्हा अक्षरशः हसावं की रडावं असा प्रश्न पडतो. विनोदवीर ही ओळख या मंडळींना भूषण वाटते की अडसर? हास्यास्पद विनोदांना हसून काही परीक्षक स्वतःचं ‘हसं’ का करून घेतात? एकेकाळी भारताला खदाखदा हसवणारा सिद्धार्थ सागर स्वतः मात्र चक्क तीन महिने कारमध्ये राहतो आणि जिच्या विनोदांची नशा चढते त्या भारतीसिंगचं नाव अचानक नशेच्या बातमीत येतं. घरातल्या घरात विनोद करता करता कुणाचं तरी युट्यूब चॅनेल लाखो हिट्स मिळवतं आणि एके काळी विनोदांसाठी प्रसिद्ध असलेले काही कलाकार नंतर अचानक कुणाला तरी गंभीर वाटायला लागतात. 

...इट्स अ मॅड मॅड मॅड वर्ल्ड. विनोदाचं जग तर आणखीच वेडं. कुणाला तरी वेडं करणारं आणि कुणाला वेडं बनवणारं. या जगाचा एक तिरका छेद घेऊ या? विनोदवीरांच्या आयुष्यापासून विनोदनिर्मितीपर्यंतच्या क्षणांचा वेध घेऊ या? बाहेरून झगमगीत दिसणारी ही हास्यनगरी आतून कशी आहे हे पाहू या? लेट्स स्टार्ट द जर्नी. या हास्यनगरीची गोष्ट आपण जाणून घेऊ. काही प्रश्न विचारू, काही चर्चा करू. कुणाला भेटू, कुणाबद्दल जाणून घेऊ. हास्याचे धबधबे, हास्याची कारंजी वगैरे शब्द आपण उच्चारतोय; पण त्यांचा स्रोत नक्की कुठं असतो ते जाणून घेऊ. हा प्रवास तुम्हाला हसवेल का? अर्थातच नाही; पण पुढच्या वेळी हसाल तेव्हा एक नवा दृष्टिकोन मिळेल हे नक्की. मग, येताय या हास्यनगरीत?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com