विनोदातला ‘सहज’योगी

हा आहे रितेश देशमुख नावाचा अवलिया. हिंदी चित्रपटांमध्ये हरवत चाललेला कॉमेडियनचा दुर्लक्षित स्लॉट त्यानं बरोबर हेरला आणि आता बऱ्यापैकी मांड ठोकली आहे.
Ritesh Deshmukh
Ritesh DeshmukhSakal

तो धमाल आहे, तो खट्याळ आहे, तो वेडा आहे. नायकांनी फक्त कॉमेडीकडे लक्ष दिलं, तर त्यांना जास्त यश मिळत नाही हा समज त्यानं पार मोडून टाकलाय. त्याचं खरं बळ आहे ते मल्टिस्टारर चित्रपटांतल्या कॉमेडी स्लॉटमध्ये; पण तो काही पूर्वी असायचे तसा ‘साइडचा कॉमेडियन’ नाही. तो आहे नायकच; पण त्यानं दुसरा नायक करू शकणार नाही ते धाडस करून स्वतःचं वेगळं स्थान तयार केलं आहे. भूमिका स्वीकारताना आणि साकारताना तो कुणाच्याही प्रतिक्रियेची पर्वा करत नाही, तिच्यात जीव ओततो आणि स्वतःचा ठसा उमटवतो. अॅडल्ट कॉमेडीसारख्या वाह्यात प्रकारांचा भाग असला, तरी सहकुटुंब बघता येणाऱ्या मेनस्ट्रीमधल्या कॉमेडीवरही त्यानं नजाकतीनं होल्ड ठेवला आहे.

हा आहे रितेश देशमुख नावाचा अवलिया. हिंदी चित्रपटांमध्ये हरवत चाललेला कॉमेडियनचा दुर्लक्षित स्लॉट त्यानं बरोबर हेरला आणि आता बऱ्यापैकी मांड ठोकली आहे. रितेश देशमुख हा तुलनेनं दुर्लक्षित नायक आहे; पण खरं तर त्यानं अतिशय चतुराईनं आणि विनोदबुद्धीचा वापर करून उभारलेलं करिअर हा खास अभ्यास करण्याचा विषय आहे. आज ‘मस्ती’, ‘क्या कूल है हम’, ‘धमाल’, ‘हाऊसफुल्ल’ अशा विनोदाशी संबंधित सगळ्या ‘फ्रॅंचायझीं’चा तो अविभाज्य भाग आहे. बॉलिवूडमधली घराणेशाही, छोट्यामोठ्या कुरबुरींमुळे एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होणं, एखाद्या कॅंपमधल्या चित्रपटात असल्यास दुसऱ्या कॅंपकडून बहिष्कार किंवा दुर्लक्ष होणं असं सगळं असताना रितेशचा सर्वव्यापी संचार हाही विशेष नोंद घेण्यासारखा आहेच. भल्याभल्यांना जे जमलं नाही ते त्याला जमू शकलं आहे ते त्याच्या खास कॉमेडी टायमिंगमुळे.

गंमत म्हणजे हे वेगळेपण त्यानं ठरवून केलेलं नाही. त्याला बनायचं होतं ते मेनस्ट्रीम नायकच. त्याचा पहिला चित्रपट ‘तुझे मेरी कसम’ ही एक उत्तम प्रेमकहाणी होती. रितेश तशाच प्रकारचे चित्रपट पुढंही करू शकला असता; पण त्याला नशिबानंही कॉमेडीकडे वळवलं. त्याला दुसरा चित्रपट मिळाला तो होता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ ही रोमॅंटिक कॉमेडी. तिसरा चित्रपट होता ‘मस्ती’ हा फक्त कॉमेडी. हिट झालेला चौथा चित्रपट होता ‘क्या कूल है हम’ हा अॅडल्ट कॉमेडी. विनोदाच्या या चढत्या भाजणीनं रितेशला त्याची अक्षरशः ‘जागा’ दाखवून दिली. रितेशनं मग विनोदाच्या बहुतेक सगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये त्याची खास स्टाईल दाखवून दिली.

रितेशनं विनोदवीर हे स्थान तयार करताना दाखवलेला बोल्डपणा दुसरं कोणी फारसं दाखवू शकलेलं नाही ही गोष्ट जितकी खरी, तितकाच रितेशच्या विनोदातला आणि अभिनयातलाही एक प्रकारचा निरागसपणा आणि ‘सहज’योग ही गोष्टही वैशिष्ट्यपूर्ण. तुम्ही बघा, अनेक कुटुंबांमध्ये एक किंचित वाह्यात विनोद करणारा आणि वातावरण हलकं ठेवणारा एखादा दादा असतो आणि तो त्या कुटुंबांमध्ये खूप लोकप्रिय असतो. रितेश साधारण तसाच असल्यानं प्रेक्षकांचंही त्याच्यावर प्रेम आहे आणि त्यामुळेच त्याच्या करिअरला ब्रेक लागू शकलेला नाही. शिवाय रितेश हा फक्त विनोदी संवाद म्हणणारा अभिनेता नाही, त्याची स्वतःचीही एक शार्प विनोदबुद्धी आहे आणि दुसरं म्हणजे स्वतःवरसुद्धा विनोद करण्यात किंवा विनोदाचा विषय होण्यात त्याला फार काही वाटत नाही. विनोदवाट निवडली असल्यामुळे रितेश इतर नायकांसारखा चित्रपटांत ‘हेरॉइक ॲक्ट्स’ करू शकत नाही आणि त्यामुळे त्याची उत्तुंग इमेज तयार होऊ शकत नाही; पण त्यानं त्याला फरक पडत नाही.

राजकीय कुटुंबातला असूनही रितेशनं एकीकडे करिअरसाठी राजकीय फायदा घेतला नाही आणि दुसरीकडे त्याच्या खास भूमिका करताना राजकीय परिणाम काय होईल याचाही ताण घेतलेला नाही. त्याला आणि कुटुंबाला झालेले फायदे-तोटे हा भाग तूर्त बाजूला ठेवू; पण रितेशचे निर्णय त्याच्या करिअरसाठी काळाच्या ओघात ‘हास्यास्पद’ ठरलेले नाहीत हे मात्र खरं. रितेश हा उत्तम अभिनेता आहे. ‘एक व्हिलन’, ‘डरना जरुरी है’, ‘लई भारी’ असे चित्रपट त्याच्या अभिनयातल्या अष्टपैलुत्वाची साक्ष देतात. तिथं मात्र लोक त्याच्याकडे ‘कॉमेडियन’ या नजरेनं बघत नाहीत. हीच फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच रितेशच्या करिअरचा वेगळा अभ्यास करणं गरजेचं आहे असं म्हटलं ते त्यामुळेच.

ससा आणि कासवाच्या शर्यतीत कधी ससा जिंकतो, तर कधी कासव. रितेशला ससाही व्हायचं नाही आणि कासवही. त्याची शर्यत स्वतःशीच आहे. त्याच्याबरोबर काम करणारे तुषार कपूर, आफताब शिवदासानी, विवेक ओबेराय या बहुतेक मंडळींचं करिअर उतरणीला लागलं आहे. त्या तुलनेत रितेश त्याच्या त्याच्या वेगानं धावतोच आहे. त्याच्या यशात सातत्य आहे. अर्थात तो अनेकदा ज्यांच्याबरोबर काम करतो, त्या अक्षयकुमारसारख्या नायकांपेक्षा त्याला यश कमी मिळालं असलं तरी त्याला त्यांच्याशी स्पर्धा करण्यातही रस नाही. रितेश हा खऱ्या अर्थानं ‘कूल’ नायक आहे आणि म्हणूनच ‘मस्ती’ करूनही त्याचं करिअर ‘लई भारी’ राहिलं आहे हे महत्त्वाचं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com