कडेलोट, अंत की नवी पहाट? (मंगेश नारायणराव काळे)

मंगेश नारायणराव काळे mangeshnarayanrao@gmail.com
रविवार, 9 एप्रिल 2017

उत्तराधुनिक कलेचं सर्वाधिक चर्चित, प्रभावी नि वादग्रस्त प्रारूप म्हणजे संकल्पनकलेकडं पाहता येईल. साठोत्तरी काळात उदयाला आलेल्या या संप्रदायाची व्याप्ती पाश्‍चात्य संस्कृतीपुरती किंवा विशिष्ट एका संस्कृतीपुरती नि कालखंडापुरती मर्यादित न राहता जगातल्या जवळजवळ सगळ्याच कला-संस्कृतींमध्ये या संप्रदायानं शिरकाव केलेला दिसतो.

उत्तराधुनिक कलेचं सर्वाधिक चर्चित, प्रभावी नि वादग्रस्त प्रारूप म्हणजे संकल्पनकलेकडं पाहता येईल. साठोत्तरी काळात उदयाला आलेल्या या संप्रदायाची व्याप्ती पाश्‍चात्य संस्कृतीपुरती किंवा विशिष्ट एका संस्कृतीपुरती नि कालखंडापुरती मर्यादित न राहता जगातल्या जवळजवळ सगळ्याच कला-संस्कृतींमध्ये या संप्रदायानं शिरकाव केलेला दिसतो.

‘प्रेक्षकानं एखाद्या वस्तूकडं/कृतीकडं ‘कला’ म्हणून पाहिल्यावरच त्या ‘वस्तू’ला किंवा ‘कृती’ला कलारूप प्राप्त होत असतं’ ही धारणा साठोत्तरी काळात पाश्‍चात्य संस्कृतीत रुजलेल्या संकल्पनकला (Conceptual art)कर्त्यांची होती. इथं सुरवातीलाच ही धारण साक्ष म्हणून याचसाठी, की कलापरंपरेतली स्थित्यंतरं जरी अनेक असली, तरी आधुनिक कलेचं पारंपरिक रूप पूर्णतः नाकारून नव्या रूपाचा शोध घेणारी ही एक महत्त्वाची चळवळ होती किंवा DADA च्या परंपरेतलं ‘पॉपआर्ट’नंतरचं आलेलं महत्त्वाचं वळण. मात्र, या वळणाचा धांडोळा घेण्यासाठी तत्कालीन आधुनिक दृश्‍यकला विचारसरणी ज्या दोन ध्रुवांवर तपासली जाते, ती आधुनिकता नि उत्तराधुनिकता समजून घेणं महत्त्वाचं नि गरजेचं ठरतं. कारण कोणत्याही कलेचं आकलन हे केवळ अभिव्यक्तीचं तंत्र, त्याचं रूपतत्त्व, त्याचा प्रभाव एवढ्यापुरतंच मर्यादित नसतं, तर त्यासाठी ज्या काळाच्या पृष्ठभागावर या कलांचं सर्जन झालेलं असतं, त्या काळाची चिकित्सा करणंही गरजेचं असतं नि अशा चिकित्सेतूनच कलेचं आकलन सुलभ होतं.

१८९० ते १९६० हा काळ जवळजवळ ७० वर्षांचा कालखंड आधुनिकतेच्या सावलीत उभा असलेला दिसतो. त्यातही पहिलं महायुद्ध (१९१४) ते दुसरं महायुद्ध (१९४५) हा तीन दशकांचा कालखंड आधुनिकतेच्या उत्कर्षाचा कालखंड म्हणता येईल. आधुनिकतावादानं पारंपरिक व प्रस्थापित कलासाहित्यातली मूल्यं, संकेत नाकारले. त्या जागी नव्या संकल्पना, आशय, विषयशैली, घाट, रूपबंधांचं आगमन कलासाहित्यात झालेलं दिसतं. त्यानंतर हा स्रोत भारतातल्या कलासाहित्यात आला. भारतीय कलासाहित्याचा पारंपरिक चेहरा यातून बदलत गेला. जागतिक आधुनिक कलेतून भारतानं भरभरून घेतलं.

१९७० च्या दशकात उत्तराधुनिकतावाद कलासाहित्य प्रांतात रुळला, रुजला नि त्यानंतर जगभरातल्या दृश्‍यकला, संगीत, साहित्य अशा सगळ्याच कलांची छाननी उत्तराधुनिकतेच्या चष्म्यातून करणं अनिवार्य होत गेलं. आधुनिकतेचं अपत्य असलेला अभिजनवाद नि त्याचंच प्रॉडक्‍ट असलेली उच्चभ्रू कला उत्तराधुनिकतावादानं नाकारली. या नकारातूनच १९६० च्या दशकात आलेलं आधुनिक कलेतलं दुसरे बंड असलेल्या ‘पॉप आर्ट’ या संप्रदायाचा उदय झाला. हा कालखंड एकीकडं जसा आधुनिकतेच्या अंताचा होता, तसाच तो उत्तराधुनिकतेच्या पायाभरणीचाही होता. इथं विशेष घटना म्हणजे, आधुनिक कलेतलं तिसरं बंड हे दुसऱ्या बंडाच्या पाठोपाठच आलेलं दिसतं. याअगोदरचा कला-साहित्याचा इतिहास तपासून पाहिला तर ध्यानी येईल, की परंपरेतलं बंड किंवा वळण हे साधारणतः सरासरी तीन दशकांनंतर आलेलं आहे. मात्र, इथं तिसऱ्या बंडाची चाहूल पाठोपाठ आलेली दिसते. यातला अजून दुसरा विशेष म्हणजे, हे बंड या वेळी एकटं नसून एकमेकांशी सहोदर असलेल्या बंडांचा समूह एकामागोमाग ठळक होत गेलेला दिसतो नि या बंडाची उतरंड पुढच्या दोन-तीन दशकांत सुटत गेलेली दिसते. यातली काही वळणं DADA प्रभावातून जशी जन्माला आली, तशीच काही वळणं आधुनिक कलेच्या अभिजात परंपरेतूनही आलेली दिसून येतात, तर काही वळणांमध्ये दोन्ही परंपरांचा संकरही पाहता येतो. सादरीकरणकला (Performing art), संकल्पनकला (Conceptual art), प्रक्रियाप्रधान कला (Process art), घटिते (Happening), लघुतमवाद (Minimalism), वास्तववाद (Realism), काव्यात्म अमूर्तीकरण (Lyrical abstraction) असे लहान-मोठे अनेक प्रवाह या तीन दशकांत (१९७० ते १९९०) आधुनिक कलेच्या परंपरेत सुखनैव नांदलेले दिसतात.

या पार्श्‍वभूमीवर आधुनिक कलेतल्या तिसऱ्या वळणाचं स्वरूप काय आहे? या बंडाचा उठाव एकाच वेळी न होता पुढच्या दोन-तीन दशकांत त्यांची उपस्थिती का वाढत गेली? या बंडानं आधुनिक कलेला काय दिलं, काय गमावलं? उत्तराधुनिक काळातल्या या संप्रदायांचा भारतीय कलेवर काय परिणाम झाला? भारतीय कलेनं हे संस्कार कसे पचवले, स्वीकारले? की केवळ अंधानुकरण करण्यातच धन्यता मानली? की डोनाल्ड कुस्पिटनं ज्या कला-अंताची घोषणा केली, त्या कडेलोटाच्या टोकावर आज आधुनिक कला उभी आहे? अशा अनेक प्रश्‍नांच्या शोधातच या वळणांना, बंडांना समजून घेण्याचा प्रयत्न इथं अभिप्रेत आहे.

इथं सुरवातीलाच आधुनिकता नि उत्तराधुनिकतावादाचे कालखंड नि या दोन्ही कालखंडातली कलारूपं, चळवळीचं सूचन केलं, ते याचसाठी, की उत्तराधुनिक कलेतली वळणं किंवा ज्याला आधुनिक कलेतलं तिसरं बंड म्हणता येईल, त्या बंडाची वेगवेगळ्या काळातली उत्थानरूपं समजून घेता यावीत नि त्यासाठी या दोन्ही ‘खिडक्‍या’ (आधुनिकता-उत्तराधुनिकता) आवश्‍यक आहेत. या खिडक्‍यांमधून डोकावून पाहिल्याशिवाय या संप्रदायाचं ‘प्रेरणा’ तत्त्व समजून घेता येत नाही नि या अभिव्यक्तीचं आकलनही नीटसं करता येत नाही.

जुन्या आणि नव्या कलाशैलींचा संकर किंवा जवळीक हे उत्तराधुनिक कलानिर्मितीचं प्रमुख वैशिष्ट्य. म्हणजे आधुनिक कलेच्या परंपरेतल्या वेगवेगळ्या कालखंडांतल्या वळणांवरच्या शैलींचा स्वीकार करून त्यांचा वर्तमानातल्या कलाशैलींशी संकर घडवणं किंवा पूर्वसुरी-शैलींना वर्तमानातल्या नव्या शैलींच्या जवळ आणून फेरमांडणी करणं इथं अनुस्यूत आहे. या पुनर्सर्जनात झालेल्या संकरामुळं किंवा सान्निध्यामुळं जुन्या शैलीतला आशय, रूपतत्त्वाचा लोप होऊन नव्या अन्वयार्थांचं सर्जन होताना दिसतं. एका अर्थानं हा दोन किंवा अधिक परंपरांचं एका नव्या परंपरेत पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न म्हणता येईल नि अशा प्रयत्नांनाच उत्तराधुनिक कलेचं महत्त्वाचं लक्षण  (Sign) म्हटलं गेलं आहे.

उत्तराधुनिक कलेतलं अजून एक वेगळेपण म्हणजे, आधुनिक कलेतलं ‘आव्हां गार्दे’ हे बंडखोरीचं, विद्रोहाचं तत्त्वही उत्तराधुनिकतेनं नाकारलं नि अर्थातच आधुनिकतेशी निगडित असलेल्या प्रागतिकता, दार्शनिकता नि पुरोगामिता या संकल्पनाही दूर लोटल्या. पुढच्या काळात उत्तराधुनिक कलेत अनेक विरोधाभासी घटकांचा शिरकाव किंवा उलटसुलट प्रवाह मिसळत गेलेले दिसतात. काही वेळा तर कलेचा संकोचही होत गेलेला दिसतो. (म्हणजे कलेचं ‘कला’पणच दुर्लक्षिलं जाणं किंवा कलारूपाला दुय्यमत्व येऊन प्रक्रियेला महत्त्व येणं, कल्पनेला महत्त्व येणं. उदाहरणार्थ ः प्रोसेस आर्ट किंवा संकल्पनाकला). असं असलं तरी ज्याला उत्तराधुनिक कलेची मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल अशा संकरता-गुणवैशिष्ट्यांचा जन्मही याच नकारातून झालेला दिसतो नि त्यांचे प्राबल्यही या कालखंडातल्या कलेत वाढत गेलेलं दिसतं. यातलं प्रमुख गुणवैशिष्ट्य म्हणजे संकरता. यातूनच ‘कोलाज’ संकल्पनेचा विकास झाला. सुरवातीच्या काळात रंग, रेषा, कागद, कॅनव्हास यांच्यापुरतंच मर्यादित असलेलं ‘कोलाज’चं जग नंतरच्या काळात विस्तारत गेलेलं दिसतं. कधी DADA प्रणित ‘रेडीमेड’च्या कल्पनाशील वापरातून, तर कधी रॉशेनबर्गच्या ‘कम्बाइन’ तंत्रापासून प्रेरित होऊन. यात ‘घडवलेलं’ रेडीमेड, सामान्य ‘वस्तू/कृती’ यांपासून रोजच्या जीवनातल्या, कधीच कलेच्या परिघात नसलेल्या, सामान्य वस्तूंची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसते. शिवाय वस्तूच्या/ कृतीच्या ‘संकरा’तून तयार झालेली नवी वस्तू, नवं ‘रेडीमेड’ हे नवं कलारूप म्हणून समोर आलेलं दिसतं. याशिवाय सादरीकरण, जोडणी/जुळणी, भिन्न माध्यमांचा एकत्रित व्यापार, व्हिडिओ, संगणक, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू अशी नवीन साधनं नि नव्या कल्पनांचा वापर करून नव्या कलारूपांचा शोध घेण्याचा प्रयत्नही उत्तराधुनिक कलेत मोठ्या प्रमाणावर झालेला पाहता येतो. ‘कलेतल्या मूल्यधारणा या अप्रामाणिक असतात’ अशी धारणा असलेल्या उत्तराधुनिक अभिव्यक्तीचं प्रारूप हे खंडित स्वरूपाचं, तुकड्या-तुकड्यांचं (एकसंध नसलेलं, असंख्य शकलं झालेलं) Fragmented दिसतं आणि या अशा खंडित अभिव्यक्तीत उपरोध, विडंबन, उपहासात्मक (Satirical) चिकित्सेचं प्राचुर्यही आढळून येतं. आधुनिकतेकडून- उत्तराधुनिकतेकडं होत गेलेल्या स्थानांतरात एक विनासायास होत गेलेली गोष्ट म्हणजे उच्चभ्रू नि कनिष्ठ संस्कृतीचा झालेला संकर. उत्तराधुनिक कलेनं जशा नव्या कल्पना, नवी साधनं, नवा विचार पुढं नेला, तसंच पुनर्स्थापना करून पूर्वसुरींची साधनं, विचारही वापरले. त्यामुळं कळत-नकळत उत्तराधुनिक अभिव्यक्ती ही ‘प्युअर आर्ट’ न राहता एका अर्थानं ती ‘संकरकला’ होत गेली. शिवाय दोन संस्कृती एकमेकींवर आदळून-मिसळून अभिजनांची कला (उच्चभ्रू संस्कृती) नि लोकप्रिय कला (कनिष्ठ संस्कृती) यांच्यातली दरी नष्ट होण्याचं ऐतिहासिक कार्यही झालं. न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये १९९० मध्ये भरवण्यात आलेलं ‘हाय अँड लो प्रोफाइल कल्चर अँड मॉडर्न आर्ट’ हे प्रदर्शन याचं एक ठळक उदाहरण.

उत्तराधुनिक कलेचं सर्वाधिक चर्चित, प्रभावी नि वादग्रस्त प्रारूप म्हणजे संकल्पनकलेकडं (Conceptual art) पाहता येईल. साठोत्तरी काळात उदयाला आलेल्या या संप्रदायाची व्याप्ती पाश्‍चात्य संस्कृतीपुरती किंवा विशिष्ट एका संस्कृतीपुरती नि कालखंडापुरती मर्यादित न राहता जगातल्या जवळजवळ सगळ्याच कला-संस्कृतींमध्ये या संप्रदायानं शिरकाव केलेला दिसतो. सन १९७० ते २०१६ म्हणजे आजपर्यंतच्या जवळपास ५० वर्षांच्या कालखंडानंतरही या संप्रदायाचं आकर्षण अजूनही कमी झालेलं दिसत नाही. १९६२ मध्ये हेन्री फ्लिंट (Henry Flint) या आँवा गार्दे संगीतकार-विचारवंतानं संकल्पनेची मांडणी एका निबंधातून केली नि पुढच्या काळात जोसेफ कोसूद (Joseph Kosuth), रॉबर्ट बॅरी (Robert Barry) या संकल्पन-कलावंतांनी केलेली मांडणी पुढच्या चळवळीसाठी दिशादर्शक ठरली. १९७० मध्ये न्यूयॉर्क इथं झालेल्या प्रदर्शनानंतर मात्र संकल्पनात्मक कलेला मान्यता मिळत गेलेली दिसते.

सुरवातीच्या काळात यात प्रेक्षकांचा सहभाग जास्त निकडीचा समजला जात होता. प्रेक्षकानं एखाद्या वस्तूकडं, कृतीकडं कला म्हणून पाहिल्यानंतरच त्या ‘वस्तू’ला/‘कृती’ला कलारूप प्राप्त होतं. ही धारणा पुढच्या काळात विस्तारच गेलेली दिसते. उदाहरणार्थ ः एखाद्या वस्तू/कृतीकडं विशिष्ट अशा कलारूपात पाहण्याचा आग्रह तर सुरवातीला होताच; मात्र तशाच अभिप्रेत रूपात प्रेक्षकानंही पाहावं, यासाठी संकल्पक किंवा दृश्‍यरचनाकार हे तशा प्रकारची वातावरणनिर्मिती करू लागले. इथं ‘त्या’ रूपाची अनुभूती प्रेक्षकांना होवो, न होवो त्यानं दृश्‍यरचनाकाराला अभिप्रेत असलेल्या ‘रूपा’तच या कलेकडं पाहावं, हा अट्टहास इथं दिसतो. शिवाय या कलेत ‘कृती’ करण्यासाठी किंवा अभिव्यक्तीसाठी प्रत्यक्षात चित्र रंगवणं, काढणं किंवा पारंपरिक चित्रकार म्हणून अवगत असलेलं कोणतंही हस्तकौशल्य असण्याची गरजच निरर्थक ठरली. एखादी कल्पना एक किंवा एकापेक्षा जास्त सहायक तंत्रकुशल कामगारांच्या साह्यानं घडवणं- हे स्वरूप होत गेल्यानं हा संप्रदाय वेगानं वाढत गेला. शिवाय यात संकल्पना (Concept) हीच महत्त्वाची असल्यानं अनेक ‘स्मार्ट’ उत्तराधुनिक कलावंतांनी (?) या कलेला थेट बाजाराशी जोडून मोठं क्रय-विक्रय मूल्य उभं केलं. व्यक्ती, संस्था, गॅलरीज्‌ अशा अनेक पातळ्यांवर ही उत्तराधुनिक कला मोठ्या प्रमाणावर ‘प्रमोट’ होत गेलेली दिसते. मात्र, या संप्रदायाच्या ‘वाढी’साठी लागणारा राजाश्रय पाहता नि तिचं बदललेलं रूप पाहता तिचं रूपांतरण कनिष्ठ कलेत न होता (‘संकरकला’ असूनही) पुन्हा एकदा उच्चभ्रू कला होत गेलेली दिसून येते. एका अर्थानं हे या संप्रदायाचं अपयशच म्हणता येईल.

सध्याच्या जगातला एक नावाजलेला दृश्‍यरचनाकार असलेल्या डेमियन हिर्स्ट (Damien Hirst) या अमेरिकी कलावंतानं साकारलेलं ‘मदर अँड चाइल्ड डिव्हायडेड (Mother and child divided-१९९३) हे चित्रशिल्प या संप्रदायाचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून सांगता येईल. उभी-सरळ रेषेत कापलेली गाय (दोन खापा केलेली) नि या गाईचं शरीर एका भल्या मोठ्या काचेच्या पेटीत द्रावणात ठेवलेलं. डेमियनचं हे जे काही बीभत्स मांडणीशिल्प आहे, ते भारतीय मानसिकतेला नुसतं चकितच करणारं नव्हे, तर हादरवूनही टाकणारं आहे. याच प्रकारची निर्मिती तत्कालीन काळात मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. आज जगभरात संकल्पनकलेचा किंवा तत्सम संप्रदायांचा बोलबाला सर्वत्र दिसत असला तरी या प्रवाहाचं एकसुरी होणं, कल्पकतेच्या नावाखाली विकृतीपूर्ण आविष्कार साकारणं, हास्यास्पद होत जाणं यामुळं मोठ्या प्रमाणावर टीकेची झोडही उठू लागल्याचं दिसतं.

कलेच्या अंताची घोषणा करणाऱ्या डोनाल्ड कुस्पिट या कलाभ्यासकानं यासंदर्भात ‘निहिलिझम’ (Nihilism) ही संकल्पना अधोरेखित केलीय. कुस्पिटचं म्हणणं आहे, की आपण सर्वजण ‘निहिलिझम’च्या शेवटच्या खेळात वावरत आहोत. म्हणजे आयुष्याच्या निरर्थकतेवर तेवढा आमचा विश्‍वास असून, नैतिकता किंवा आध्यात्मिक मूल्यं आम्ही नाकारणार या धारणेला धरून असलेला हा खेळ आहे किंवा आजच्या कलाविश्‍वाला त्यानं ‘विनापायलट जेट विमाना’ची’ उपमा दिली आहे. म्हणजे प्रचंड शक्ती तर आहे; पण स्टिअरिंगच नाही! त्यामुळं ते कुठं जाऊन धडकेल, याची कल्पनाच करता येणार नाही, अशी आजच्या कलाविश्‍वाची अवस्था झाली आहे, असं तो म्हणतो नि कलेच्या वाढलेल्या किमतीबद्दल, बाजाराच्या वाढत्या हस्तक्षेपाला त्यानं ‘व्यवसायासाठी सुरू केलेलं खोटं म्युझिमय’ असं संबोधलं आहे. म्हणजे कुस्पिटची धारणा- कलेचं कलापण आजच्या काळात हरवलं असून ‘कला-उद्योगातलं एक प्रॉडक्‍ट’चं रूप आजच्या कलेनं घेतल्याचं सूचित करते. अर्थात उत्तराधुनिक काळात जिथं प्रत्यक्ष माणसाचं रूपांतर वस्तूत होत असताना; विशेषतः जागतिकीकरणोत्तर काळात ते अधिक ठळक होत असताना कलेचा बाजार होणं ही घटना फारशी अनाठायी म्हणता येणार नाही. मात्र तंत्रानं (Technic) अनुभवाचा ताबा घेणं आणि त्यातून निर्माण होणारी ‘कृत्रिम’ निर्मिती ही एका अराजकाची नांदी आहे.’ ही धारणा किंवा आपण सगळेच आता ‘कलेतर जगा’त (Post-art age) वावरत असल्याची कुस्पिटची धारणा योग्य वाटते.

संकल्पनकलेपासून प्रेरणा घेऊन किंवा पूर्वसुरींच्या संप्रदायापासून प्रेरित होऊन पुढच्या काळात हॅपनिंग्ज, इन्स्टॉलेशन, व्हिडिओ आर्ट, परफॉर्मन्स आर्ट असे अनेक प्रवाह जगभरातल्या कलावर्तुळात शिरत, रुजत गेलेले दिसतात. पाश्‍चात्य संस्कृतीत जन्माला आलेल्या या संप्रदायांचं आकर्षण जगभरातल्या कलावंतांना असलेलं दिसत असलं, तरी आपल्या संस्कृतीची म्हणून काहीएक गरज असते, तिचा म्हणून एक स्वतंत्र चेहरा असतो, तिचं स्वतःचं एक स्वभाववैशिष्ट्य असतं, याचा विचार न करता किंवा गरज तपासून न पाहता भ्रष्ट अंधानुकरणामुळं अनेक हास्यास्पद, उथळ, विक्षिप्त स्वरूपाचे प्रयोग तत्कालीन काळात मोठ्या प्रमाणावर झालेले दिसतात. हेच विधान भारतात गेल्या ५० वर्षांत झालेल्या या संप्रदायाच्या प्रयोगाबद्दल, अभिव्यक्तीबद्दलही करता येतं.

Web Title: mangesh kale's article in saptarang