चित्र आणि चौकट (मंगला गोडबोले)

mangla godbole
mangla godbole

आदर्श बाईपण, आईपण, गृहिणीपण म्हणजे अमुकतमुक, नीतिमत्ता म्हणजे अमुकतमुक, "संसार सांभाळून' सगळं करणं अनिवार्य, मुलगा जन्माला घालणं अपरिहार्य या सर्व चौकटी मनामनांवर ठाम राज्य करताहेत. या चौकटी पुरुषांच्या, सोयीच्या, हिताच्या होत्या, आहेत. बायका ज्या प्रमाणात बदल स्वीकारत गेल्या, मेहनतीनं त्यांना सामोरं गेल्या, त्या प्रमाणात पुरुष काही बदलले नाहीत. चित्र व्यापक झालंय; पण त्याला अदबीनं बसवणाऱ्या फ्रेम्स, चौकटी नाहीत ही आजच्या स्त्रीजीवनातली खरी समस्या आहे. येत्या शुक्रवारी (ता. आठ) साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिलादिनाच्या निमित्तानं मंथन.

लहानपणापासून "स्त्रिया आणि मुलं' असं एकत्रित वर्गीकरण दिसलं, की अंमळ बुचकळ्यात पडल्यासारखं वाटायचं. पुरुषांसाठी एक रांग, स्त्रिया आणि मुलं यांच्यासाठी एक रांग. तेच वर्गीकरण खाण्याबाबत, करमणुकीबाबत, बसण्याच्या व्यवस्थेबाबत वगैरे आढळायचं. पुरुष एका गटात आणि "स्त्रिया आणि मुलं' एकत्रपणे दुसऱ्या गटात. ज्या बाईबरोबर तिच्या कडेवरचं मूल आपोआपच जाईल, तिच्याबाबत हे एकवेळ समजण्याजोगं वाटायचं; पण एरवी प्रत्येक बाबतीत "बायका-पोरं', "स्त्रिया आणि मुलं' सारखीच कशी ठरतात? म्हणजे अगदी एखादा चित्रपटही "बायका-पोरां'बरोबर बघण्यासारखा कसा काय ठरतो? सगळ्या बायका इतक्‍या बालबुद्धीच्या असतात का? का बायका-पोरांना एकत्र दूर केलं, की पुरुषांना हवी ती मोकळीक मिळते? असे नाना प्रश्‍न मनात यायचे. कुठंकुठं बिचकत विचारून पाहिले. उत्तर मात्र साधारण एकच अर्थाचं आलंः "या दोघांनाही पुरुषांच्या आधाराची किंवा संरक्षणाची गरज असते म्हणून!'

आजच्या रोजच्या वर्तमानपत्रात कुठंकुठं तान्ह्या मुलीवर, अपंग तरुणीवर, असहाय रुग्ण स्त्रीवर, वृद्धेवर, घरात, बसमध्ये, शेतात, एकट्यानं, समूहानं बलात्कार झाल्याच्या बातम्या येतात, तेव्हा नेहमी हा संरक्षणाचा मुद्दा आठवतो. खजील झाल्यासारखं वाटतं.
लहानपणी शाळेमध्ये विज्ञान विषयात पहिल्या येणाऱ्या मुलीला विशेष पारितोषिक नेमलेलं असायचं. कुतूहल वाटायचं. इतिहासात, मराठीत, नागरिकशास्त्रात वगैरे इतर विषयांमध्ये पहिलं येण्याची नोंद का घेतली जात नाही? विज्ञानात पहिलं येण्याचं एवढं काय कौतुक? जरा चौकशी केली, की कानावर यायचं ः "शेवटी शास्त्र, विज्ञान हे काही बायकांचे विषय नाहीत ना? पुरुषी विषयात बाईनं प्रावीण्य मिळवलं की त्याचं कौतुक जास्त' वगैरे वगैरे.

आता पुष्कळदा केवळ मुलींसाठी निघालेल्या इंजिनिअरिंग कॉलेजात परीक्षक म्हणून प्रमुख पाहुणी म्हणून जाते, तेव्हा हमखास हे आठवतं. तथाकथित पुरुषी विषयात मुलींनी मारलेली मजल बघत राहावीशी वाटते. लांबचा प्रवास करून आल्याबद्दल भरघोस दाद द्यावीशी वाटते. पुढे समारंभ संपल्यावर संस्थाचालकांबरोबर चहापान वगैरे असतं. तेव्हा मात्र वेगळा सूर कानी येतो. कोणी कोणी अनुभवी प्राध्यापक सांगत असतात ः ""जेवढ्या प्रमाणात पदवीधारक इंजिनिअर मुली दरवर्षी बाहेर पडताहेत ना, तेवढ्या प्रमाणात नोकऱ्या देणारे नाहीयेत अजूनही. इंजिनिअर मुलींना सामावून घ्यायला उद्योगधंदे उत्सुकही नाहीत तितकेसे. आधी बायकांना नेमणुकी द्या. मग लग्नासाठी- बाळंतपणासाठी वगैरे रजा द्या, पुढे पाळणाघरांची सोय द्या, बदल्या नकोत, नाईट शिफ्ट्‌स नकोत, स्पेशल सिक्‍युरिटी द्या. एवढा व्याप सांगितलाय कोणी?' एकदम एका सुबक देखण्या चित्रावर दोन-चार वेडेवाकडे रंगांचे फराटे मारल्यासारखं वाटायला लागतं मला.

पुष्कळ नंतर माझ्या एका नातेवाईकांकडे तिन्ही मुलीच जन्मल्या. त्यांनी बर्फीऐवजी पेढे वाटून कन्याजन्म साजरे केले. मुलींना सर्वतोपरी फुलू दिलं. आपल्या ऐपतीबाहेरची शिक्षण दिली. मुलींनीही त्यांच्या कष्टांना भरघोस फळं दिली. माझी आणि त्या नातेवाईकांची कधीही गाठभेट झाली, की नेहमी मुलींचे शैक्षणिक पराक्रम, यश, हे बक्षीस, तो पुरस्कार, हा गौरव असंच ऐकायला मिळे. अलीकडे मात्र त्यांच्या बोलण्यातला उत्साह ओसरलेला जाणवे. मुली लग्नाच्या वयात आल्या म्हणून! "वेळच्या वेळी' लग्नं व्हावीत, लग्नानंतर करिअर करण्याची "परवानगी' देणारी सासरं मिळावीत म्हणून काळजीचं बोलत. हे "वेळच्या वेळी' प्रकरण मला दुर्घट वाटे. आणि "परवानगी' देणं तर असह्यच. म्हणजे त्यांच्या मुलींची सगळी कर्तबगारी कोणाच्या तरी परवानगीवर का अवलंबून राहणार आहे? याचसाठी केला होता का एवढा अट्टाहास? बायकांबाबत, स्त्रीदिनाबाबत विचार करताना अशी अनेक सुटी गुंतागुंतीची चित्रं डोळ्यासमोर येतात. काही मुळातच धूसर किंवा अस्पष्ट, काही तयार होताहोता मध्येच विस्कटलेली.

सव्वा-दीड शतकापूर्वी भारतातल्या, महाराष्ट्रातल्या स्त्रीजीवनाचं चित्र किती करुण, दारुण होतं हे दाखवणारा एक मराठी चित्रपट सध्या गाजतो आहे. मुलीचं लहान वयात लग्न होणं, प्रौढ पुरुषाची शारीर जवळीक सोसावी लागणं, शिक्षण- पैसा- संपर्कसाधनं नसणं, वारंवार बाळंतपणांना सामोरं जाणं, घरातलं बंदिस्तपण आणि त्यातले अन्याय-जुलूम सोसावे लागणं, कुपोषण, अनारोग्य, सार्वत्रिक दमन आणि अल्पवयात मृत्यू अशा भीषण चक्रात अडकलेल्या बायका होत्या. तेव्हाच्या "मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते' असंच वाटत असणार त्यांना.

पण सुटका करायला वैचारिक उत्थानाचा, रेनेसान्ससदृश काळ आला. इंग्रजी विद्येनं प्रभावित झालेले समाजधुरीण, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत लाभले. मुलींचं शिक्षण व्हावं, बालविवाह टळावेत, विवाहयोग्य वय ठरवावं, विधवाविवाहाला मान्यता मिळावी, बाईला मालमत्तेत वाटा मिळावा असे विचार टप्प्याटप्प्यानं यायला लागले. हा सगळा इतिहास, एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध व्यापतो- जो चरित्रांमध्ये, चरितकहाण्यांमध्ये उपलब्ध आहे.

हलकेहलके चित्र मोठं व्हायला लागलं. बाईला साक्षर करणं, निदान आपली फसवणूक होण्यापासून तिला वाचवणं ही स्त्रीशिक्षणाची प्राथमिक प्रेरणा; पण तेवढ्यावर थांबेल तर ते शिक्षण कसलं? बाईचं मुख्य काम घर चांगलं सांभाळणं. त्यासाठी तिला गृहोपयोगी शिक्षण द्यावं, बालसंगोपन आहारशास्त्र- वृद्धसेवा- गृहसजावट यामध्ये तरबेज करावं अशी गरज वाटायला लागली. शिवाय एखादीवर अर्थार्जनाची जबाबदारी पडलीच तर ती शिक्षिका किंवा परिचारिकाच होणार ना? त्यामुळे महर्षी कर्वे यांनासुद्धा स्त्रियांसाठी वेगळं शिक्षण देणारी "जी. ए.' किंवा "गृहितागमा' ही पदवी आणि तिचा अभ्यासक्रम योजावासा वाटला. दुर्गा भागवत यांच्यासारख्या विचारवंतांनी त्याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. निदान शिक्षणात तरी "हे खास बाईचं... हे पुरुषासाठी राखीव' असं म्हणू नये यासाठी. तरीही काही काळ हे वळण राहिलं.

आज मात्र एअरोनॉटिक्‍स, बायोटेक्‍नॉलॉजी, स्पेस रिसर्च, मरिन इंजिनिअरिंग अशी एकाहून एक अद्ययावत ज्ञानक्षेत्रं बायका ढुंडाळताहेत. देशाची संरक्षणमंत्रीसुद्धा एक बाई आहे. "अजून बायकांना हवंच काय?' असं विचारणाऱ्यांना हे पुरेसं आहे. ज्ञान आणि अर्थाजन या दोन महत्त्वाच्या खात्यांवर आज तत्त्वतः बायकांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे, ही या चित्राची उजळ, प्रकाशमान बाजू आहे; पण मिळवलेल्या ज्ञानाचं चीज करणं आणि मिळवलेल्या पैशाचा हवा तसा विनियोग करणं किती बायकांना शक्‍य होतंय असं बघायला गेलो, की अंधारे कोपरे आलेच म्हणून समजा.
स्त्रीजीवनाचं चित्र टप्प्याटप्प्यानं मोठं आणि देखणं करण्यामागे अनेक पुरुष विचारवंतांचा, समाजधुरिणांचा, द्रष्ट्यांचा हात आहे यात शंकाच नाही. आज हवं ते शिक्षण घेण्याचा, लग्न करण्याचा, लग्न न करण्याचा, केलेलं लग्न मोडण्याचा, मूल हवं किंवा नको म्हणण्याचा, स्वतः कमावण्याचा किंवा वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा मागण्याचा, आहार- विहार- विचार यांच्या स्वातंत्र्याचा असे अनेक अधिकारी बायकांना आहेत, ज्यामुळे त्यांची त्यांच्या आयुष्यावरची पकड वाढते आहे. यामागं अनेक कर्त्या पुरुषांचं पाठबळ आहे हे नाकारता येत नाही; पण असं असूनही आजही स्त्रीजन्मदर घटतोच आहे, असिफा होतेच आहे, शबरीमलाचा वाद पेटतोच आहे, कोणीतरी कौमार्यचाचणी करायला धजावतोच आहे, खाप पंचायती बसतातच आहेत. या सगळ्यांना या चित्रामध्ये कुठं-कसं सामावून घ्यायचं हा मोठा गंभीर प्रश्‍न आहे.
एकीकडे काळाबरोबर होणारे काही बदल अपरिहार्य आहेत. स्वातंत्र्याच्या बदलत्या कल्पना आहेत, प्रवास- संपर्क- माध्यमं यांच्या आधारानं बरंच काही करता येतंय, विदेशी नवविचारांचं वारं वाहतंय, त्यामुळे सारखी चित्रात भर घालण्याची ऊर्मी येतेय. दुसऱ्या बाजूनं या बदलत्या चित्राला आता निसर्गही काही हातभार लावतो आहे. मुली लवकर वयात येताहेत. पूर्वी तेरा किंवा चौदाव्या वर्षी ऋतुप्राप्ती व्हायची ती आता अनेकींना अकराव्या-साडेअकराव्या वर्षीच सामोरी येते आहे. कोण म्हणतं, कृत्रिमरित्या पोसवलेलं मांस खाण्यानं स्त्रीविशिष्ट हार्मोन्स "ग्रंथी' लवकर प्रेरित होताहेत. कोणी म्हणतं एकूणच वाढत्या पोषणमूल्यांचा मुबलक आहार आणि वैचारिक स्वातंत्र्य यामुळे हा बदल घडतोय; पण प्रत्येक शतकामध्ये मुलींची वयात येण्याची कालमर्यादा खाली खाली येतेय हे विज्ञानानं मान्य केलंय. एवढ्या लवकर वयात आलेली मुलगी लग्नाच्या बोहल्यावर मात्र उशिरानं चढतेय. शिक्षण किमान पदवीपर्यंत तरी व्हावं, जमल्यास पदव्युत्तर व्हावं, त्यानंतर नोकरीव्यवसाय सुरू करावा, त्यातही पुरेसं स्थैर्य यावं अशी अपेक्षा करताकरता अनेक मुलींना वयाच्या पंचविशीच्या आत लग्नाचा विचारही आवडू शकत नाहीये. म्हणजेच आपलं यौवन किंवा देहाची एकूण उत्सुकता त्याना किमान बारा ते पंधरा वर्ष थोपवून धरावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूनं सहशिक्षण, नोकरी, प्रवास, घराबाहेर एकट्यानं राहावं लागणं यामुळे अनोळखी बायका-पुरुष एकमेकांच्या वारंवार संपर्कात येणारच आहेत. अशा वेळी कधी ना कधी भावना अनावर होणं आणि शारीरिक आकर्षणाला बळी पडणं बायकांच्याही बाबतीत शक्‍य आहे. नैतिकतेचा चष्मा काढून याकडे पाहिलं, तर हे पटण्यासारखंही आहे. हे विवाहपूर्व वास्तव स्वीकारलं, तरी विवाहोत्तर वास्तवही वेगळं आणि विचारात घेण्याजोगं आहेच.

आज अनेकदा व्यावसायिक तडजोडींमुळे अनेक पती-पत्नींना नेहमी एका ठिकाणी एकत्र राहता येत नाही. काही व्यवसायांमध्ये सलग सहा-आठ महिन्यांचा दुरावा येतो, तर काहींमध्ये आठवड्याकाठी, महिन्याकाठी एकदा एकत्र येण्याची संधी जोडप्यांना मिळते. याचेही खूप ताण असतात. मोहाचे-निसरडे क्षण येणं किंवा नैसर्गिक प्रेरणा सतत दडपल्यामुळे वैफल्यग्रस्त होणं या शक्‍यता राहतात. यावरून लगेच संबंधित मुलीला, स्त्रीला, पत्नीला मोडीत काढायचं, की चित्राच्या या छटाही समजून घ्यायच्या हा प्रश्‍न येतो. यात भर पडतेय ती दीर्घायुष्याची. एकूण आयुर्मान वाढलंय, त्यात बायकांचं अजूनच वाढलंय. एवढं लांबच लांब आयुष्य कंठताना कंटाळ्यापोटी, मनोविकलतेपोटी, साहसाच्या भलभलत्या कल्पनांपोटी पारंपरिक चौकटीच्या बाहेरचं आयुष्य कधीकाळी जगावंसं वाटणंही शक्‍य आहे. या सगळ्याचं समर्थन किंवा विरोध करण्यापेक्षा यातली अपरिहार्यता समजून घ्यायला हवी आहे. महत्प्रयासानं घेतलेल्या शिक्षणाचं समाधान, व्यक्तिगत गरजा, शरीराच्या मागण्या, सामाजिक दबाब अशा नाना दिशांनी आज या चित्राची ओढताण होते आहे. सर्वांत गंभीर समस्या आहे, ती हे सगळं आपल्या परंपरेतल्या स्त्रीत्वाच्या चौकटीमध्ये बसवण्याचा खटाटोप करणं. अजूनही ही चौकट मोडायची किंवा किमान ओलांडायची बहुतेकांची तयारी नाही. यात "बहुतेकी'ही नकळतपणे येताहेत. आदर्श बाईपण, आईपण, गृहिणीपण म्हणजे अमुकतमुक, नीतिमत्ता म्हणजे अमुकतमुक, "संसार सांभाळून' सगळं करणं अनिवार्य, मुलगा जन्माला घालणं अपरिहार्य या सर्व चौकटी मनामनांवर ठाम राज्य करताहेत. महानगरांमधल्या किंवा शहरी उच्चभ्रू स्त्रियांचं जगणं वरवर बघून तमाम स्त्रीजीवनाबद्दल मतं बनवण्यात हशील नाही. शहरांपासून 100-125 मैल अंतर्भागात गेलं, तरी स्त्रियांचं सरासरी जगणं नाना प्रकारे कुचंबलेलं आहे. भौगोलिक अंतरापेक्षा सांस्कृतिक अंतर फार जास्त आहे.

या चौकटी कोणी ठोकल्या? ठरवल्या? तर मुख्यत्वे पुरुषप्रधान समाजरचनेनं. साहजिकच त्या पुरुषांच्या, सोयीच्या, हिताच्या होत्या, आहेत. बायका ज्या प्रमाणात बदल स्वीकारत गेल्या, मेहनतीनं त्यांना सामोरं गेल्या, त्या प्रमाणात पुरुष काही बदलले नाहीत. स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा कोण पाडून घेईल? उलट बायकांच्या रस्त्यावर नवनवे धोंडे टाकणं बरं. तसाच प्रकार सुरू आहे. चित्र व्यापक झालंय; पण त्याला अदबीनं बसवणाऱ्या फ्रेम्स, चौकटी नाहीत ही आजच्या स्त्रीजीवनातली खरी समस्या आहे. चित्र लहान करा, कापा-छटा-तासा असं कोणी म्हणणार नाही, म्हटलं तरी बायका आता ऐकणार नाहीत. आता चौकटी मोठ्या कशा करता येतील यावर लक्ष देणंच बरं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com