सायकलचे दिवस (मनोहर जाधव)

manohar jadhav's saptarang article
manohar jadhav's saptarang article

स्वयंचलित दुचाकी किंवा चारचाकी चालविताना ड्रायव्हिंगचा आनंद मिळतो; पण सायकल चालवताना आपलं नातं जमिनीशी आहे हा ‘फिल’ येतो आणि तो मला महत्त्वाचा वाटतो. मनातला अहंकार किंवा ‘मी’पणा नकळत गळून पडतो. रस्त्यावर आपल्या बाजूनं जाणारे सामान्य लोक, कष्टकरीवर्ग यांच्याशी स्वतःला ‘रिलेट’ करता येतं. सायकल चालवितानाचा हा अनुभव जगण्याचंच तत्त्वज्ञान शिकवत असतो. मात्र इतकं ‘डाउन टू अर्थ’ राहायला शिकविणारी सायकल ही गोष्ट आपण सध्याच्या काळात गमावून बसलो आहोत...

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी-मद्रास’मधले विद्यार्थी आपल्या कॅम्पसमध्ये स्वयंचलित दुचाकी, चारचाकी चालवत नाहीत. तसा तिथं नियमच आहे. त्यामुळं कॅम्पसमधली मुलं-मुली सायकलवर फिरताना दिसतात. मुलांचा घोळका किंवा एखाद्‌-दुसरा मुलगा-मुलगी आपापल्या सायकलवर मजेत फिरत असतात. ग्रंथालय असो की कॅंटीन किंवा अंतर्गत शैक्षणिक विभाग असोत मुलं सायकलसहच नजरेस पडतात. अत्यंत उल्हसित आणि प्रसन्न वातावरण असतं. सगळीकडं हिरवाई...उंचच उंच वृक्ष...त्यावर वेली... हरणांचा कळप किंवा माकडांची टोळी...ही सगळी मंडळी एकमेकांच्या सोबतीनं गुण्यागोविंदानं तिथं नांदत असतात. आयआयटीला प्रवेश घेतला, की इतर आवश्‍यक गोष्टींप्रमाणं मुलं नवीन सायकल घेतात. शिक्षण पूर्ण झालं की एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेट म्हणून ती देऊन टाकतात, कमी किमतीत विकतात किंवा घरी घेऊन जातात. माझ्या मुलीचं एमटेक पूर्ण झालं आणि तिनं तिची सायकल रेल्वेनं बुक करून पुण्याला पाठवून दिली आणि लगोलग फोन करून सांगितलं ः ‘‘सायकल तुमच्यासाठी घरी पाठवतेय. रोज चालवायची. घरातली किरकोळ कामं सायकलवरच करायची. तब्येतीला चांगलं असतं.’’ म्हटलं, ‘आता आली का बला? गेली २०-२२ वर्षं सायकल चालवली नाही आणि आता एकदम कसं जमेल? पण म्हटलं आता मुलीनं पाठवलीच आहे सायकल तर चालवून बघू या.’ यथावकाश सायकल ताब्यात घेतली. सुरवातीला तर सायकलवर बसताच येईना. १५-२० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर मात्र सायकल जमायला लागली. अलीकडं वेगवेगळ्या प्रकारच्या फॅन्सी, कमी वजनाच्या, सुटसुटीत सायकली बाजारात आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यात लेडीज-जेंट्‌स असा फरक नसलेल्या सायकली आहेत. बारीक टायरच्या, जाड टायरच्या, गिअरच्या, गिअर नसलेल्या असे बरेच प्रकार त्यात दिसतात.

सायकल जमायला लागली तेव्हापासून मॉर्निंग वॉकच्या ऐवजी सायकलिंग सुरू केलं. ट्रॅक, पॅंट, टी शर्ट, स्पोर्टस शूज आणि डोक्‍यावर कॅप अशा वेशभूषेत रोज पहाटे सायकलिंगला जाऊ लागलो. डोक्‍यावर कॅप अशासाठी, की हा माणूस सायकल गरजेपोटी नव्हे; तर हौस म्हणून चालवतोय, हे समोरच्याला कळावं! आजूबाजूच्यांनी दमानं आपली वाहनं चालवावीत, असाही उद्देश त्यामागे होता; पण तो नेहमी सफल होतोच असं नाही. लोक मारक्‍या म्हशीप्रमाणं आपली वाहनं दामटत असतात. असो. जमेल तसं पहाटे उठून मी विमानतळाच्या दिशेनं सायकलस्वारी करत निघतो. हा रस्ता तुलनेनं मोठा, अधिक रुंद असल्यामुळं रस्त्याच्या कडेनं निवांतपणे सायकल चालवता येते. सकाळी सकाळी वाहनांची वर्दळ कमी असते आणि मॉर्निंग वॉकला निघालेली ज्येष्ठ आणि तरुण मंडळी असतात. हव्याहव्याशा थंडीत आठ-दहा किलोमीटर सायकल चालवणं हे मनाला आणि शरीरालाही ताजंतवानं करतं. बऱ्याचदा या रस्त्यानं गिअरची सायकल पिटाळत जाणारी तरुण मुलं भेटतात. डोक्‍यावर हेल्मेट, समोरच्या दांड्याला पाण्याची बाटली क्‍लिपनं बसवलेली, टी. शर्ट, शॉर्ट पॅंट अशा दिमाखात बारीक टायर असलेली (रेसर) सायकल ही मुलं कमरेत वाकून भन्नाट वेगात चालवत असतात. त्यांची माझी दृष्टादृष्ट झाल्यावर ती गालातल्या गालात हसतात. त्यांच्या सायकलिंगच्या छंदाचं मला कौतुक वाटतं.

सायकलमुळं कसा आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम होतो, हा स्वतंत्र विषय आहे. या विषयावर तूर्त इथं बोलायचं नाहीय...म्हणून जिममधली सायकल चालवणं मला यांत्रिक वाटतं. फक्त रस्त्यावर सायकल चालवणं हीच गोष्ट मोठी आनंददायी आहे, असं माझं मत. आपल्या लयीत, तब्येतीनं सायकल चालवणं ही गोष्ट फार मजेशीर आहे. रस्ता जर परिचयाचा, पायाखालचा असेल तर आपण सरावानं सायकल चालवतो. चालवताना आपल्यातच मग्न होतो. इतकं मग्न, की नकळत एखाद्या विषयावर चिंतन सुरू होतं. मॉर्निंग वॉक करताना एखादी व्यक्ती जशी विचारात गढून गेलेली दिसते, तसा अनुभव सायकल चालवतानाही येतो. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त मी १९८६ मध्ये शिक्षण घ्यायला आलो, तेव्हा सायकल हीच माझी प्रमुख सोबती होती. मी सगळं पुणे शहर त्या वेळी सायकलवर फिरलो आहे. नंतरच्या काळात याच विद्यापीठात नोकरीला लागल्यामुळं स्वयंचलित दुचाकी वाहन असो वा चारचाकी, पुणे शहरात फिरताना कोणतीच अडचण जाणवली नाही. सगळं पुणं परिचयाचं होतं; पण अलीकडं साधारणतः सहा महिन्यांनंतर पुण्याच्या एखाद्या परिसरात गेलो तर मला गोंधळायला होतं. इतक्‍या अल्पावधीत तिथं बांधकामाच्या नवनव्या योजना सुरू असलेल्या दिसतात आणि आपण लक्षात ठेवलेल्या रस्त्यावरच्या खुणा जुन्या झालेल्या असतात किंवा लुप्त तरी झालेल्या असतात. एक मात्र खरं, की स्वयंचलित दुचाकी किंवा चारचाकी चालवताना ड्रायव्हिंगचा आनंद मिळतो; पण सायकल चालवताना आपलं नातं जमिनीशी आहे हा ‘फिल’ येतो आणि तो मला महत्त्वाचा वाटतो. मनातला अहंकार किंवा ‘मी’ पणा नकळत गळून पडतो. रस्त्यावर आपल्या बाजूनं जाणारे सामान्य, कष्टकरी यांच्याशी आपण स्वतःला ‘रिलेट’ करतो. मला वाटतं, सायकल चालवतानाचा हा अनुभव जगण्याचंच तत्त्वज्ञान शिकवत असतो. इतकं down to earth राहायला शिकवणारी सायकल ही गोष्ट आपण सध्याच्या काळात गमावून बसलो आहोत, यासारखं दुःख नाही.
नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावला हायस्कूलमध्ये शिकत असताना आम्ही मित्र तर सर्रास डबल किंवा ट्रिपल सीट सायकल चालवायचो. मी तेव्हा बारका असल्यामुळं मागच्या सीटवर दोन्ही बाजूंना पाय टाकून बसायचो आणि चढ आला की पॅडलवर पाय ठेवून, जोर देऊन सायकल चालवणाऱ्या मित्राला मदत करायचो. असं आम्ही चक्क २०-२५ किलोमीटरही कित्येकदा गेलेलो आहोत. कारण काय तर परगावी जाऊन एखाद्या मित्राला भेटायचं किंवा जवळच्या मोठ्या शहरात एखादा सिनेमा बघायला जायचं. मात्र, या सगळ्यापेक्षा सायकल चालवण्याचं जे ‘थ्रिल’ असायचं तेच लाजबाब होतं. अर्थातच घरातून दिवसभरासाठी आम्ही परागंदा असायचो; पण घरच्यांना याबाबत काहीही खबरबात नसायची. इतके आम्ही सगळे मित्र सायकलिंगच्या नादी लागलेले होतो. त्यातच मश्‍गूल होतो.

एकेकाळी पुणे शहराची ओळख ही ‘सायकलींचं शहर’ अशी होती; पण काळ बदलला. शहराचा नियोजनशून्य विस्तार झाला. शहर बकाल झालं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं पेकाट मोडल्यामुळं स्वयंचलित दुचाकींचं प्रमाण वाढलं. ते इतकं वाढलं की एका घरात तीन-चार दुचाकी झाल्या. त्यामुळं पुणे शहर आता ‘स्वयंदुचाकींचं प्रदूषित शहर’ झालं आहे! नाही म्हणायला, शहराच्या काही भागांत शोभेसाठी सायकल ट्रॅक महापालिकेनं तयार केलेले आहेत; पण ते तसे नावालाच! हे ट्रॅक तसे मोकळे कधीच नसतात. कुणी ना कुणी त्यांच्यावर सदोदित आक्रमण केलेलंच असतं. त्यामुळे कितीही इच्छा असली, तरी शहरात सायकल चालवण्याचा हवा तसा आनंद घेता येऊ शकत नाही. उलट वाहनांच्या साठमारीत अडकून पडण्याची भीतीच जास्त.
सध्याच्या काळात तर सायकल चालवणं कमीपणाचं मानलं जातं. ‘ज्याला साधी स्वयंचलित दुचाकीही घेता येऊ शकत नाही किंवा जे कष्टकरी आणि कामगार आहेत, तेच सायकल चालवतात,’ असा एक समज दृढ झालेला दिसतो. तो खरा असेलही; पण जो मध्यमवर्गीय आहे किंवा आर्थिकदृष्ट्या संपन्नही आहे, त्या व्यक्तीला कितीही वाटलं, तरी ती व्यक्ती स्वतःच्या मनाला मुरड घालून सायकल चालवायला नाखूश असतो. लोक काय म्हणतील, अशी भीती तिच्या मनात असते. नकळत हा सामाजिक दबाव स्वीकारला जातो. ‘लोक काय म्हणतील’ या आजारामुळं आपल्या समाजातले खूप लोक बेजार असतात आणि आपलं नैसर्गिक आनंददायी जगणं हरवून बसतात. आमचे मित्र आणि प्रसिद्ध लेखक लक्ष्मण गायकवाड यांनी चीनदेशाचा दौरा केला, त्या वेळी त्यांनी भारतीय लेखकांच्या शिष्टमंडळासोबत बीजिंग विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेतली. विद्यापीठाच्या आवारात कुलगुरूंची वाट पाहत असताना स्वतः कुलगुरुमहोदय सायकलवर त्यांना भेटायला आले आणि सगळ्या शिष्टमंडळाला आश्‍चर्याचा धक्का बसला. ‘चिनी मातीतील दिवस’ या प्रवासवर्णनात गायकवाड यांनी ही घटना सांगितली आहे. मी स्वतः ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त प्राध्यापक आहे. कमी वयात गुणवत्तेच्या आधारे मला अनेक संधी मिळाल्या. त्या संधीसाठी आपण पात्र आहोत, हे सिद्ध करताना मला परिश्रम करावे लागले आणि त्यातून आनंद मिळवला. या पुढं कोणत्या संधी मिळोत न्‌ मिळोत; पण ‘बीजिंग विद्यापीठातल्या कुलगुरूंसारखी आपण नित्यनेमानं सायकल चालवावी,’ असं मी मनाशी ठरवलं आहे. तरुणपणात मी सायकल खूप चालवली आणि आता प्रौढपणीही सातत्यानं सायकल चालवायची असं मी ठरवलं आहे. म्हणजे एकूण काय, त, माझे आनंदाचे, ‘सायकलीचे दिवस’ पुन्हा परत आले आहेत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com