कौटुंबिक हिंसाचार : व्यक्त होऊया...माणूसकी जपूया

Article on Women Harassment
Article on Women Harassment

युट्यूबचं एक चांगलंय. एखादा व्हिडिओ पाहून झाला की 'अप नेक्स्ट'मध्ये जे काही इतर व्हिडिओज येतात ते आपोआप डोळ्यांखालून जातात. परवा असाच एक व्हिडिओ पहिला आणि मन सुन्न झालं! 

एक अतिशय आलिशान ब्युटी पार्लर...तिथं अनेक उच्चभ्रू बायका बसल्यात. जशी जशी स्वतःच्या अपॉइन्टमेन्टची वेळ येईल तशा पुढे जाणाऱ्या. त्यांच्यात 'ती'सुद्धा आहे. सुंदर, लांबसडक, काळेभोर, रेशमी केस असणारी मोहक 'ती'. तिच्या डोळ्यांमध्ये मात्र कसलीतरी वेदना आहे. ती पार्लरलमधल्या त्या आरामदायक खुर्चीत बसते. तिथली ब्युटिशिअन तिला काय हवं नको ते विचारते. तिने अपॉइंटमेंट घेताना 'हेअरकट' करायचाय असं सांगितलेल असतं. 

पूर्वतयारी करताना ब्युटिशिअन विचारते ''कुठला कट?'
तिचं उत्तर असतं 'केस कमी करा.'  

ब्युटिशिअन थोडे केस कापते आणि विचारते 'बस्स?'. तेव्हा 'ती' म्हणते, 'अजून थोडे'. असं तीन-चार वेळा होतं. शेवटी न राहवून ती ब्युटिशिअन म्हणते, 'किती लेन्थ हवी मॅडम तुम्हाला?' 

'मला मारताना नवऱ्याच्या हातात केस येणार नाहीत इतकी..........'

आणि नंतर पाचेक सेकंद्‌स जीवघेणी शांतता. आणि कॅमेराचा फोकस तिच्या निर्जीव डोळ्यांवर, ज्यातून आता पाणी येणंही बंद झालंय. व्हिडिओ संपतो आणि ब्लॅक स्क्रीनवर अक्षरं झळकतात, 'Stop Domestic Violence.' मग पुढे येणाऱ्या सजेशन्समध्ये असे अनेक व्हिडिओज् दिसतात, 'Make-up tutorial to hide marks of domestic violence', 'Domestic violence in rural areas', 'Domestic violence- not limited to women', इत्यादी, इत्यादी... 

कौटुंबिक हिंसाचार...अत्यंत ज्वलंत आणि प्रचंड संवेदनशील विषय. ज्यावर अजूनही मोकळेपणाने बोललं जात नाही. अजूनही 'समाज काय म्हणेल?' या एका अत्यंत दांभिक वाक्‍याखाली त्रास सहन केला जातो. आणि याचे बळी फक्त स्त्रिया नाहीत तर पुरुषही आहेत, लहान मुलंही आहेत. कौटुंबिक हिंसाचारामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे 'माणुसकीचा अनादर'. या अशा अत्यंत नाजूक विषयावर आपण बोलणार आहोत. मोकळेपणाने बोला. व्यक्त व्हा. बघू, यातून कोणाला मदत झालीच तर.. माणुसकी जपल्याचं थोडंफार पुण्य मिळेल आपल्याला..  

सरिता - एक अशिक्षित बाई. धुणीभांडी करून संसाराला हातभार लावणारी कष्टकरी स्त्री. लग्नानंतर तिने अपेक्षेएवढा हुंडा आणला नाही म्हणून संतोषने लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून सुरु केलेली मारहाण आजही सुरू आहे. त्यामुळे दोनवेळा सरिताचा गर्भपात झालेला आहे. 

सकीनाने निकाह होऊन दोन वर्ष होऊन गेली तरी अजून बच्चा पैदा केला नाही म्हणून सलीम आणि त्याच्या घरचे रोज तिला रात्री तिला उपाशी ठेवायचे. सासू चिमट्याने चटके द्यायची. नवरा वाटेल तेव्हा वाटेल तसे अत्याचार करायचा. सकीनाने घरातून निघून जाण्याचा प्रयत्न केला पण दुर्देवाने तो असफल झाला. यानंतर तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांमध्ये आणखीनच वाढ झाली. मागच्या आठवड्यात तिने गळफास लावून आत्महत्या केली आणि आज सलीम त्याच्या तिसऱ्या निकाहाचा आनंद साजरा करतोय...

डॉ. रिटाला लग्नानंतर उच्च शिक्षण घायचं होतं. पण 'तुला आता काही गरज नाहीये शिकायची. झाली तेवढी नाटकं पुरे झाली. बायको म्हणजे दिवसा अन्नपूर्णा आणि रात्री रती असावी उगाच शिक्षण घेऊन नवऱ्याच्या पुढे जाण्याचा विचार सोडून दे. म्हणून जोसेफने तिला घरात नजरकैदेत ठेवलं, जवळच्या लोकांना भेटण्यास, त्यांच्याशी बोलण्यास मनाई केली. रिटाच्या माहेरच्यांनी 'करिअर नाही झालं तरी चालेल, संसार वाचला पाहिजे' असं म्हणून तिच्या महत्वाकांक्षेचे पंख छाटून टाकले आहेत.

आशिमा - लग्नाआधी शाळेत शिक्षिका होती. लग्नानंतर शहर बदललं त्यामुळे ती नोकरी करत नव्हती. साहजिकच ती नवऱ्याकडून पैसे घ्यायची.  त्याने घरखर्चाला दिलेले पैसे संपले म्हणून तिने एकदा दिराकडे पैसे मागितले. त्याने दिलेही. दोन-तीन वेळा असं झाल्यावर पुढच्यावेळेस दिराने अट घातली माझ्यासोबत शय्यासोबत केलीस तरच पैसे मिळतील. नाहीतर तुझी वाट्टेल तशी बदनामी करेन मी. अब्रुच्या भीतीने एकदा होकार दिलेल्या आशिमावर आज चार वर्ष झाली तरी लैंगिक अत्याचार सुरूच आहेत. तिने नवऱ्याकडे, देबोजितकडे तक्रार करायचा प्रयत्न केला, पण त्याने संपूर्णपणे दुर्लक्ष केलं. आज ती गर्भवती आहे. पण होणारं मूल देबोजितचं नाही असा त्याचा संशय असल्याने त्याने आशिमाला संसारातून, संपत्तीतून बेदखल केलं आहे. आज तिच्याकडे उत्पन्नाचे साधन नाही.

मीनाची लग्न करताना एक मुख्य अट होती. 'नवरा निर्व्यसनी हवा' लग्नानंतर मीनाला कळलं रोहित खूप आधीपासून दारू पितो आणि तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला आहे. तिने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा रोहितने दारूच्या नशेत तिच्या डोक्यावर वार केला. आज दोन वर्ष झाली तरी मीना कोमामध्येच आहे.

सासरचे लोक त्रास देतात अशी तक्रार घेऊन आलेल्या नावीन्याने मनमितच्या संपत्तीवर अधिकार सांगितला. चौकशीअंती लक्षात आलं, नाविन्याची तक्रार खोटी आहे. पण तोपर्यंत मनमीत अनु कुटुंबियांना तुरुंगवास सहन करावा लागला.

विनीत, एक चांगला शिकलेला नवविवाहित तरुण. लग्नाआधी मित्रांसोबत पार्टीला जाण्याची त्याची सवय लग्नानंतर काही काळ सुरु राहिली. त्याचा राग येऊन माधुरीने त्याला घालून पाडून बोलायला सुरुवात केली. सासरच्या मंडळींशी उद्धटपणे बोलून विनीतला त्यांच्याशी असणारे संबंध तोडायला लावले. तो बाहेर गेला की ती त्याचे चांगले कपडे फाडायची, बूट कापून ठेवायची जेणेकरून तो बाहेर जाणार नाही. विनीतने त्याविरुद्ध बोलायचा प्रयत्न केला तेव्हा रागावलेल्या माधुरीने त्याला थोबाडीत मारली, नाजूक जागी लाथा घातल्या. विनीतने पोलिसांकडे तक्रार केली तर पोलिसांनी सुरुवातीला त्याची चेष्टा केली. त्याच्या 'मर्द' असण्यावर शंका घेतली. एकाने तर बायकोला जशास-तसं वागवण्याचा सल्ला दिला. एकेदिवशी विनीतने स्वसंरक्षणांसाठी तिच्यावर हात उगारला तर तिने लगेच 'कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली' त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. हिच्यासोबत राहिलो तर आयुष्य उध्वस्त होईल या भीतीने विनीत घरातून पळून गेला. कुठे गेला, त्याचं काय झालं हे कोणालाच माहित नाही. आणि तिकडे माधुरी विनीतच्या संपत्तीची राणी बनून आरामात राहत आहे.

ही सगळी उदाहरणं आहेत कौटुंबिक हिंसाचाराची अर्थात, Domestic Violence ची. या प्रकारच्या विकृतीसाठी हिंसाचार हा एकच शब्द योग्य आहे. वर उल्लेख केलेली उदाहरणांवरून लक्षात येईल, या विकृतीचा आणि धर्म, जात, आर्थिक स्थिती, पीडित व्यक्तीचं वय, लिंग, सहभागी व्यक्तींचं शिक्षण याच्याशी फारसा संबंध नाही. शिक्षण जास्त असेल तर आढळून येणारं प्रमाण मात्र कमी आहे. तिथे शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास जास्त सहन करावा लागतो.

आपल्याला बऱ्याचदा वाटतं कौटुंबिक हिंसाचार म्हणजे केवळ शारीरिक त्रास. तर तसं नाही. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे शारीरिक, शाब्दिक, लैंगिक, मानसिक किंवा आर्थिक छळ. हुंडा किंवा मालमत्ता देण्यासाठी स्त्रीला अपमानित करणे, शिवीगाळ करणे, विशेषत: अपत्य नसल्यामुळे तिला हिणवणे किंवा धमकावणे, त्रास देणे, दुखापत करणे, जखमी करणे,  मनाविरुद्ध गर्भधारणेची सक्ती करणे, गरोदर स्त्रीवर बाळाच्या लिंगनिदानासंबंधी तपासणी करण्याची सक्ती करणे, जबरदस्तीने गर्भपात करवणे, पीडित महिलेचा जीव धोक्यात आणण्यास भाग पाडणे किंवा तिच्या कोणत्याही नातेवाईकाकडे हुंडयाची मागणी करणे व या सर्व गोष्टींचा दुष्परिणाम पीडित व्यक्ती अथवा तिच्या नातेवाईकांवर होणे तसेच आर्थिक छळ करणे म्हणजे महिलेचे स्वत:चे उत्पन्न, स्त्रीधन, मालमत्ता किंवा इतर आर्थिक व्यवहार किंवा तिच्या हक्काच्या कोणत्याही मालमत्तेपासून तिला वंचित करणे, घराबाहेर काढणे, या सर्व बाबींना कौटुंबिक हिंसाचार म्हटले जाते. 

या हिंसाचाराच्या बळी केवळ स्त्रियाच आहेत असं नाही तर कित्येक पुरुषही आहेत. त्यांच्यावरही अत्याचार होतात. बऱ्याचदा पुरुष अन् त्याचे कुटुंबीय 'कौटुंबिक हिंसाचार कायद्या-अंतर्गत' खोट्या आरोपांमध्ये अडकले जातात. आपल्या पितृसत्ताक पद्धतीला पुरुषांवर अत्याचार होऊ शकतात ही गोष्टच मान्य नाही. आणि आजच्या घडीला भारतीय कायदाही पुरुषांच्या बाजूने नाही. या दोन गोष्टींमुळे भारतीय पुरुष तक्रार करत नाहीत किंवा करू शकत नाहीत. परंतु, आशा करूया की काही वर्षांत परिस्थिती नक्कीच बदलेल, तोपर्यंत पुरुष 'पुरुष हक्क संरक्षण समिती' किंवा 'सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन'सारख्या संस्थांची मदत घेऊ शकतात. पण तोपर्यंत त्यांना एकच दिलासा आहे - ‘कारणाशिवाय पुरुषाला/कुटुंबाला अटक केल्याचे निदर्शनास आलं, तर संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर ‘कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई केली जाते. कायद्याच्या या मर्यादेमुळे सध्यापुरतं आपण पीडित व्यक्ती ही स्त्री असेल तर काय काय होतं यावर लक्ष केंद्रित करूया.

कौटुंबिक हिंसेबाबत सर्वाधिक शरमेची बाब म्हणजे ही पीडित व्यक्तीच्या घरात, तिच्या आपल्या माणसांकडून घडते. सामान्यतः या प्रकाराला सुरुवात होते ती छोट्या-मोठ्या कुरबुरींमुळे. तेव्हा जर एका जोडीदाराने समजूतदारपणा दाखवून माघार घेतली तर प्रकरण चिघळत नाही. बऱ्याचदा स्त्री अशी माघार घेतेही. लहानपणासूनच नमतं घेणं मनावर बिंबवलेलं असतं ना त्याचाच हा परिणाम. यानंतर भांडणं झाली नाहीत तर त्या माघार घेण्याला अर्थ राहतो. पण बऱ्याचदा प्रत्यक्षात मात्र, तिला पती अथवा सासरच्या घरचे अपमानित करतात. 'तुझंच काही तरी चुकलं असेल, तो तर रागीटच आहे. तुच सांभाळून घेतलं पाहिजे' असे सल्ले तिला दिले जातात. त्याला मात्र कोणी काही सांगत नाही. अशावेळेस तिचा माहेरी ओढा वाढला तर त्यावरूनही टोमणे सुरु होतात. अनेकवेळा तिला माहेरहूनही आधार मिळत नाही. 'एवढा खर्च करून घरच्यांनी लग्न लावून दिलं, आता त्यांच्याकडे तक्रार केली तर त्यांना सहन होणार नाही' या भीतीने स्त्रियाही फारशा बोलत नाहीत. अशावेळेस त्यांचा मानसिक त्रास वाढू लागतो. सतत असे प्रसंग येत राहिले तर पती-पत्नीमध्ये दुरावा वाढू लागतो. कुरबुरीची तीव्रता वाढते. तिची अगतिकता लक्षात आल्यावर पती व सासरचे लोकही दबावतंत्राचा उपयोन करून तिला नमवायला बघतात. अशा प्रसंगांत जोडप्यांमधील शारीरिक संबंध तणावपूर्ण, बऱ्याचदा जबरदस्तीचे होतात. त्यांच्यामधील दुरावा वाढू लागतो. पत्नी हळूहळू प्रतिकार करू लागते. बोलू लागते. तिच्यावर उद्धटपणाचा आरोप लागतो. परिणामी हिंसाचार वाढू लागतो. ज्याची परिणीती स्त्रीने घर सोडून जाणे, घटस्फोट घेणे किंवा आत्महत्या करणे यापैकी कशातही होऊ शकते.

या सर्व गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी २००५ साली कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात स्त्रियांना संरक्षण देणारा नवा कायदा 'कौटुंबिक हिंसाचार कायदा- 2005' अस्तित्वात आला. आणि 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू झाला. याशिवाय फौजदारी कायद्यातील 498 अ या कलमाखाली पोलिसांच्या अधिकारकक्षा वाढवून स्त्रियांना हुंडाविरोधी संरक्षण मिळाले. अशा वेळी गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई केली जाते. विवाहानंतर 7 वर्षांच्या आधी कोणा विवाहितेचा मृत्यू झाला तर आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्याची जबाबदारी पतीची व तिच्या सासरच्या लोकांची असते. भारतात केंद्र सरकारने कौटुंबिक न्यायालय कायदा 1984 साली अस्तित्वात आणला. या कायद्यान्वये ठिकठिकाणी कौटुंबिक न्यायालये स्थापन झाली. विवाहविषयक कायद्यांच्या तरतुदीप्रमाणे या न्यायालयांतील न्यायाधीशांना विशेष अधिकार प्रदान केले गेले. या कायद्यांतर्गत विवाह समुपदेशक यांची मदत न्यायाधीशांना उपलब्ध व्हावी, अशी तरतूद झाली. आजकाल न्यायालयात होणारे समुपदेशन सक्तीचे करण्यात आलेले आहे. 

या कायद्याअंतर्गत जी पीडित स्त्री आहे त्या स्त्रीची व्याख्या खूप विस्तारित स्वरूपात मांडली आहे. पीडित स्त्री म्हणजेच लग्न झालेली स्त्री एवढाच नाही. तर अशा सर्व स्त्रिया ज्या कौटुंबिक संबंधात राहत आहेत किंवा कुणावर अवलंबून राहत आहेत. याशिवाय पीडितांमध्ये कुठलाही मनुष्य, स्त्री असो वा पुरुष, लहान मुले, आई-वडील, नोकर मंडळी किंवा कौटुंबिक संबंधात राहणारे कुणीही या कायद्याचा आश्रय घेऊ शकतात. 

आता महत्वाचा मुद्दा येतो. हिंसाचार होत असेल तर स्त्रीने नक्की काय करावं... 

  1. महिलांना मदत करण्यासाठी पोलीस खात्याने 103 क्र. असलेला दूरध्वनी उपलब्ध केला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास तातडीने पोलिसांची मदत मिळू शकते.
  2. राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग. स्त्रियांसाठी काम करण्याऱ्या अनेक समाजसेवी संस्था, विवाहविषयक कलहांमध्ये समुपदेशन करण्याचे, कायदेशीर सल्ला पुरवण्याचे, वकिलांची सोय करून देण्याचे काम करतात. पीडित स्त्री अशा ठिकाणाहून मदत घेऊ शकते. या सेवा मोठय़ा शहरांतूनच नव्हे तर ग्रामीण भागांतही कार्यरत आहेत. स्त्रियांसाठी या सेवा अनेक ठिकाणी विनामूल्य आहेत.
  3. जिल्हा पातळीवरील न्यायाधीशांच्या पुढाकाराने काही उपक्रम राबवले जातात. त्यातील एक म्हणजे ‘उंबरठ्याशी न्यायदान’ ही अभिनव पद्धत अंगिकारून राज्य सरकारने ‘फिरते न्यायालय’ ही संकल्पना राबविली आहे. पक्षकारांच्या जवळ जाऊन न्यायदान करण्यासाठी विशेष गट कार्यरत असतो. वाहनातून गावोगावी जाऊन हा गट कार्य करतो. ग्रामीण भागांतील स्त्रियांना हा मोठा दिलासा आहे.

हुंड्यामुळे कौटुंबिक हिंसाचार होणं थांबवणं मुलीच्या पालकांच्या हाती आहे. 'जर लग्नाची बोलणी सुरू असतानाच प्रतिपक्षाकडून हुंड्याची, पैशाची, रोख दागिने अथवा स्थावर संपत्ती वगैरेबाबत मागणी आली, तर स्पष्टपणे नकार देऊन टाकावा. एखादे स्थळ केवळ आपल्यापेक्षा वरचढ म्हणून कर्जबाजारी होऊन पूर्तता करू नये, कारण लालचीपणा हा न संपणारा रोग आहे. एकदा तुम्ही मागण्यांची पूर्तता केली, की त्या वाढतच जातात.’ 

लग्नात खूप हुंडा दिला म्हणून आपली मुलगी सुखी राहील, हे सपशेल खोटं आहे.' सुखी संसारासाठी दोन व्यक्ती, दोन कुटुंबांनी एकत्र येऊन सामंजस्याने राहण्याची गरज असते. आपल्या मुलीवर/बहिणीवर असे अत्याचार झालेले आपल्याला चालत नाहीत मग आपणदेखील कोणावर ते तसे करता कामा नये हे लोकांना कळायला हवं. तरच कौटुंबिक हिंसामुक्त जीवन शक्य आहे. कारण, हिंसामुक्त, निरोगी जीवन हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे. आणि तिचा तो अधिकार अबाधित राहणं ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.

तन्मया पंचपोर यांनी लिहिलेले इतर लेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com