चीनी दुतावास थिरकले 'नवराई माझी..'च्या तालावर !

मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

आणखी एका जादूत व्यासपीठावर आलेला तरूण चेहऱ्यावरील मुखवटे बदलत होता. मुखवटे त्याच्या चेहऱ्यावरून झटक्‍यासरशी सरकत होते. ते पाहून एका प्रेक्षकानं हळूच टिप्पणी केली, की चीनच्या राजकाणचं हे द्योतक असावं, की क्षणात मैत्री, क्षणात दुरावा, क्षणात भय दाखविणारा, अशी ही मुखवट्यांची किमया असावी!

भारत चीन दरम्यान झालेला डोकलामचा वाद 28 ऑगस्ट रोजी सुटला. त्यानंतर बरोबर महिन्याने 29 सप्टेंबर रोजी येथील चीनच्या दूतावासानं चीनच्या गणराज्य स्थापनेचा 68 वा वर्धापन दिन साजरा केला अन्‌ श्रोत्यांचं अन्‌ मराठी माणसाचं मन जिंकलं, ते 'नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग' हे ठेक्‍यातील गाणं व त्यासोबत अप्रतिम नृत्य सादर करून. नृत्याच्या नायिका होत्या चीनचे भारतातील राजदूत लुओ झावहुई यांची पत्नी खुद्द डॉ. जियांग यिली व दूतावासातील अन्य कर्मचारी महिला. डॉ जियांग यिली या हिंदु तत्वज्ञानाच्या अभ्यासक असून, दिल्ली विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले आहे. समारंभाला केंद्रीय आरोग्य व कुंटुंब कल्याण राज्यमंत्री सुप्रिया पटेल उपस्थित होत्या. 

चीन जन गणराज्याची (पीपल्स रिपब्लिक) घोषणा 1949 मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत भारताशी असलेल्या संबंधांचा आलेखच व्यासपीठावर उभारलेल्या स्क्रिनवरून दाखविण्यात आला. दूतावास रंगीबेरंगी दिव्यांनी सजला होता. सर्वत्र लखलखाट होता. पडद्यावरून सरकत होती, ती पंडित नेहरू व माओत्से तुंग, माओत्से तुंग व डॉ राधाकृष्णन, राजीव गांधी व डेंगझाव पिंग, डॉ. मनमोहन सिंग व हू जिंताव व वेन जियाबाब, सुषमा स्वराज व वांग यी, ली कशांग, यांग जेइची, झू रोंगजी, जियांग झमीन, शी जिनपिंग व नरेंद्र मोदी आदी नेत्यांच्या भेटींची छायाचित्रे. 1962 च्या युद्धाचा किंवा डोकलाम वा अन्य वादांचा कुठेही उल्लेख नव्हता. 

एका चीनी नृत्यांगनेने मोराचे नृत्य सादर केले. यावेळी भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर असल्याचे व त्याच्या नृत्यावर आधारीत कलाकृती सादर करण्यात येणार असल्याचे निवेदकाने सांगितले. काही वेळातच तरूण चीनी जादूगार व्यासपीठावर आला. आश्‍चर्यचकीत करणारे जादूंचे अनेक प्रयोग त्यानं सादर केले, पण क्‍लायमॅक्‍स सर्वांचं मन जिंकून गेला. त्यानं हात फिरवताच एक कांडी हाती आली, तो ती फिरवू लागताच त्याच्या दोन कांड्या होऊन त्यावर भारत व चीनचे राष्ट्रध्वज फडकू लागले! 

आणखी एका जादूत व्यासपीठावर आलेला तरूण चेहऱ्यावरील मुखवटे बदलत होता. मुखवटे त्याच्या चेहऱ्यावरून झटक्‍यासरशी सरकत होते. ते पाहून एका प्रेक्षकानं हळूच टिप्पणी केली, की चीनच्या राजकाणचं हे द्योतक असावं, की क्षणात मैत्री, क्षणात दुरावा, क्षणात भय दाखविणारा, अशी ही मुखवट्यांची किमया असावी! 

राजदूत झावहुई यांच्या भाषणात चीनमधील प्रगती व भारतीय संस्कृतीचा संगम अशा दोन्ही गोष्टी होत्या. 'चीनमधील बुलेट ट्रेन्सची गती दोन आठवड्यापूर्वी ताशी तीनशे किलोमीटरवरून तीनशे पन्नास कि.मी. पर्यंत वाढविण्यात आली. त्याचप्रमाणे हायपर लूप वाहतुकीबाबत पाहाणी चालू असून तासाला हे वाहन एक हजार ते चार हजार कि.मी. जाऊ शकेल,' असे सांगून ते म्हणाले, की चीनी बनावटीच्या सी-919 या प्रवासी जेटने नुकतेच चाचणी उड्डाण केले. चीनमध्ये चार नवशोधांबाबत चर्चा सुरू आहे. पहिला, जलदगती रेल्वे, दुसरा, भारतीय पेटीएमप्रमाणे चीनमध्ये "अलीपे"चा प्रारंभ. त्याचा उद्देश मोदी म्हणतात, तसे कॅशलेस समाजाकडे वाटचाल करणे, तिसरा सायकलचा सामुहिक (सहभागाने) वापर व चौथा, ऑनलाईन शॉपिंग. हे शोध चीनच्या प्राचीन चार शोधापेक्षा कितीतरी अभिमानास्पद आहेत. चीनच्या प्राचीन शोधात कागदनिर्मिती, छपाई , कंपास व बंदुकीतील पावडर (दारूगोळा) यांचा समावेश होतो. चीनच्या दरडोई सकल उत्पन्नाचे प्रमाणे 8500 डॉलर्सवर पोहोचले आहे. 

गेल्या आठवडयात झावहुई यांनी पाँडेचेरीला (पुडुचेरी) भेट दिली. तेथील अरोबिंदो आश्रमात झावहुई यांचे शिक्षक प्रा. शू फॅनचेंग यांनी तब्बल तीस वर्ष अध्यापन केले होते. 'उपनिषिदे, भगवत्‌गीता, शाकुंतल यांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी मूळ संस्कृतमधील या ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर करून भारतीय संस्कृती व अरोबिंदो यांची चीनला ओळख करून दिली. प्रा. फॅनचेंग 1945 ते 1978 दरम्यान पुडुचेरीत राहिले. अरोबिंदो आश्रमात प्रा. फॅनचेंग यांची तीनशे तैलचित्रे आहेत,' असे सांगून झावहुई म्हणाले, की प्रा. फॅनचेंग हे भारत व चीन दरम्यानचे सांस्कृतिक सेतु होते. त्यांच्याप्रमाणेच फाहिएन, ह्युएनत्संग, बोधिधर्म यांची आठवण दोन्ही देशांची ध्यानात ठेवली पाहिजे.' असे सांगताना झावहुई यांचा स्वर बराच मवाळ झाला होता. शियामेन येथे अलीकडे झालेल्या ब्रिक्‍स संघटनेच्या शिखर परिषदेचा उल्लेख करून दुतर्फा संबंधात सुधारणा झाल्याचा दावा केला. 'सहकार्य व मेळ" (रिक्‍न्सिलिएशन अँड कोऑपरेशन) यांच्या साह्याने दुतर्फा संबंधात नवे पान उघडून त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. आपण एकत्र नाचले पाहिजे (ड्रॅगन अँड एलेफन्ट शुड डान्स टुगेदर) व एक अधिक एक म्हणजे दोन नसून अकरा अशी बेरीज करून पुढे गेले पाहिजे,' अशी पुस्ती त्यांनी जोडली. 

येत्या ऑक्‍टोबरात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे 19 सम्मेलन (19 वी कॉंग्रेस) बीजिंगमध्ये होत आहे. त्याकडे जगाचे लक्ष लागले आहे. कारण, अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वावर या सम्मेलनात पुढील चार वर्षांसाठी शिक्कामोर्तब होणार असून, त्यामुळे त्यांचे नेतृत्व अधिक बळकट होईल. त्यांची तुलना माओत्से तुंग यांच्या नेतृत्वाशी केली जाते.

  • भारत चीन व्यापाराची उलाढाल 2016 अखेर 70.1 अब्ज डॉलर्स आहे.
  • सुमारे पाचशे चीनी कंपन्यांनी भारतीय रोखेबाजारात 4.8 अब्ज डॉलर्स गुंतवणूक आहे.
  • चीनच्या साह्याने भारतात सुरू असलेल्या प्रकल्पांचे मूल्य तब्बल 68 अब्ज डॉलर्सवर आहे.
  • सुमारे दहा लाख चीनी व भारतीयांनी 2016 मध्ये परस्परांच्या देशात प्रवास केला. 

(विजय नाईक यांच्या आणखी ब्लॉग पोस्ट वाचा)

Web Title: Marathi blog Vijay Naik writes about Chinese national day