मराठी भाषा गौरव दिन विशेष | आमची मराठी, आमची माणसं

जगाच्या पटलावर आमची मराठी दहाव्या नंबरवर नमूद केली गेली आहे. २५ वर्षांचे पुढचे जे भाषाधोरण तयार केले, त्यात ‘मराठी ही देशातील जवळपास एकदशांश लोकांची मातृभाषा आहे.
marathi-bhasha-din
marathi-bhasha-dinsakal

बोली आणि प्रमाण अशी रेघ मारलेले आपण सगळे लोक जोश भाषा समजून घेतो, शिकतो, अभ्यासतो, लिहितो, बोलतो तेव्हा या सगळ्याच प्रक्रियेत मराठीचे भव्य ‘सागरस्थान’ समजून घेण्यासारखे आहे. याच मायमराठीने शेवटच्या काठांवर उभ्या असलेल्या सामान्य माणसाला हाक घातली आहे. साद घातली आहे. हीच मराठी आमच्या माणसांची मराठी आहे.

जगाच्या पटलावर आमची मराठी दहाव्या नंबरवर नमूद केली गेली आहे. २५ वर्षांचे पुढचे जे भाषाधोरण तयार केले, त्यात ‘मराठी ही देशातील जवळपास एकदशांश लोकांची मातृभाषा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये मराठीचे स्थान अजोड आहे.’ ही मजबूत नोंद करण्यात आलेली आहे. इतकी ताकद असलेला तुकोबांसारखा महाकवी या मराठीचे अक्षरलेणे असून, जगातही याप्रकारचा महाकवी इतर दुसरा कोणी नसावा. संतांची एकूण नीतीभक्तीने समाजमन घडवणारी लेखणी मराठीएवढी जगात इतरत्र असण्याची शक्यता नसावी. गाथा, ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र, दृष्टान्तपाठ, जनमन जागविणारे शाहीर, भूगोल बदल दाखविणारे समृद्ध लोकवाङ्‍मय, लोकसंगीत, लोकगीते, लोककथा आणि पंडिती वाङ्‍मय ही एक महाविस्तारकारी परंपरा; जी मराठीला आहे तेवढी इतर भाषांना कमी असण्याची शक्यता आहे!

मुळात, हा वारसा, ही संपदा आमच्या संस्कारांची प्रधान वाहिनी ठरते. समाज वाचत आणि समाजाला सोबत घेऊन निघालेल्या साहित्य-संस्कृतीच्या ह्या दिंडीची परंपरा जशी प्राचीन आहे, तद्‌वतच संपन्न आणि वाङ्‍मयश्रीमंतही आहे. आमची मराठी आणि एकंदर आमची माणसं ह्या सर्वच परंपरेत बघायला मिळतात. जगण्याचे बळ देतात. सारांश, ही मराठी कुठेही कमी नाही. येथील समाजसुधारक, येथील विचारवंत, येथील विचारक चळवळी, येथील संत कवयित्री-लेखिका ह्यांनी समाजमन जागविले. ह्यांनी प्रबोधन घडवले. ही सगळी आपली म्हणजे मराठीची माणसं आहे, ज्यांनी मराठी माणसांसाठी जिवाची बाजी लावली. अनेक लढे उभारले. लेखन केले. जनमन जागविले. नेमका हाच आपला मराठीचा वारसा सत्वर बळच देत राहतो. स्वातंत्र्यसंग्रामांमध्ये मायभूमीसाठी आणि जनतेच्या उज्ज्वल अस्मितेसाठी अवघे जीवन समर्पित केले, त्या वीरांचीही आठवण तीव्रतेने आणि अतीव आत्मीयतेने मराठीचा असा गौरव करताना होतच राहणारी आहे.

‘माझ्या मराठी मातीचा

लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या

दऱ्याखोऱ्यांतील शिळा’

असे सांगणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी मायमराठीचा समर्पक गौरव करताना मराठीचे मांगल्य आणि ह्या मराठीचे विशालत्व नोंदवून ठेवलेले आहे. शिवाय हाती लेखणी नसलेली किंवा आपली गावबोलीची जीभ संवाद आणि विनिमयासाठी वापरणारी कोट्यवधी माणसे इथेच मराठी बोलतात. अशा सामान्य माणसांनाही व्यापून असलेली ही आमची मराठी आहे. बोली आणि प्रमाण अशी रेघ मारलेले आपण सगळे लोक जेव्हा भाषा समजून घेतो, शिकतो, अभ्यासतो, लिहितो, बोलतो तेव्हा या सगळ्याच प्रक्रियेत मराठीचे भव्य ‘सागरस्थान’ समजून घेण्यासारखे आहे. ह्याच मायमराठीने शेवटच्या काठांवर उभ्या असलेल्या सामान्य माणसाला हाक घातली आहे. साद घातली आहे. हीच मराठी आमच्या माणसांची मराठी आहे. मराठी गौरवाच्या निरूपणात ह्या माणसांची जागा मोठी आहे.

खरं म्हणजे भूगोल बदलला, पाणी बदलले, हवा बदलली, उत्सव-श्रम-सण-वार बदलले की, बोली बदलते. गाणी बदलतील, हे विविध भाषेतही घडते. तुलनेत मात्र मराठीत जास्त घडते, दिसते, जाणवते, कळते. महादेव मोरेंसारखा श्रेष्ठ कथालेखक, पुरुषोत्तम बोरकर यांच्यासारखा कादंबरीकार, विठ्ठल वाघांसारखा कवी, किंवा राजकुमार तांगडेसारखा नाटककार, किंवा तिकडे पलीकडे विष्णू सुर्व्या वाघ, महेश केळूसकर, अशोक कौतिक कोळी, वीरा राठोड, संतोष पद्माकर पवार, प्रतिमा इंगोले, विठ्ठल कुलट, आत्माराम कणिराम राठोड, लक्ष्मण गायकवाड ते आजच्या माधव जाधव यांच्यापर्यंतचा प्रदेश-बोलीला धरून लिहिणाऱ्या शंभर-दोनशे संख्येतील प्रतिभावंतांचा बोलीभाषांचा-सामर्थ्यांचा प्रवास हा व्यवस्थित समजून आपण घ्यायला हवा.

सशक्त, वास्तव, जोरकस, जिवंत, पूर्णतः नवी भाषा-बोलभाषा, की जी ‘मराठी’ आहे; ती अशा प्रचंड संख्येतील सशक्त लेखकांनी साहित्यात आणून साहित्यश्रीमंत वाढवलेलीच आहे. ही मराठी आपली आहे. ही मराठी वापरणारी जगणारी माणसं आपली आहे. ते सगळे लेखक आभाळातले सांगत-मांडत नाही. भवतालातले, जवळचे, जळते वास्तव प्रखरसत्य सांगतात; जे मराठी आहे, मराठीचे आहे! किंवा भुजंग मेश्राम आणि हिम्मतराव बाविस्कर ह्या दोन अगदी निराळ्या नावांचा ‘भूगोल-बोली-साहित्य’ असा त्रिस्तरीय उल्लेख करायला हवा. ज्यांनी वेगळे जगणे, वेगळेपण सशक्त बोली त्यांच्या वेदनेसह अथवा सर्व सांस्कृतिक संदर्भांसह लेखनात पेरली, रुजवली. असे विपुल दाखले नोंदवता येणारे आहेत. ज्यामध्ये आपल्या मराठीची आपली माणसं सर्वहारा जाणिवांसह भेटतात.

 (लेखक महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com