उत्तर कोरियाला रोखणार कोण?

किम जोंग उन
किम जोंग उन

उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग ऊन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या अरेरावीतून
अणुयुद्धाचे संकट जगापुढे उभे राहणार की काय, यावर सध्या सर्वत्र काथ्याकूट सुरू आहे.

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे काय? या प्रश्‍नाचे उतर 'होय' व 'नाही', असे दोन्ही आहे. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन याने एका पाठोपाठ पाच अण्वस्त्र चाचण्या केल्या. अलीकडेच हैड्रोजन बॉंबचीही चाचणी केली. एवढेच नाही, तर अमेरिका, दक्षिण कोरिया व जपानला बेचिराख करण्याच्या घोषणा तो सतत करीत आहे. त्यादृष्टीने त्याची निर्णायक पावले पडत असून, गेली अनेक वर्षे चीनच्या पदराखाली वावरणारा उत्तर कोरिया आता चीनलाही जुमानत नाही. त्यात भर पडली आहे, ती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व किम जोंग उन यांच्यात सुरू असलेली बाचाबाची व एकमेकांना देण्यात येणाऱ्या जाहीर धमक्‍यांची.

'लिटल रॉकेट मॅन' (किम जोंग उन) याने अण्वस्त्र चाचण्या आणि अमेरिका व मित्र राष्ट्रे (जपान व दक्षिण कोरिया) यांच्यावर अण्वस्त्रे डागण्याच्या धमक्‍या थांबविल्या नाहीत व प्रत्यक्ष कृती केली, तर उत्तर कोरियाला अमेरिका बेचिराख करील, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करीत किमने ट्रम्प यांना 'भुंकणारा कुत्रा' अशी उपमा दिली. त्यापुढे जाऊन उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री री योंग हो राष्ट्रसंघाच्या आमसभेत शनिवारी केलेल्या भाषणात म्हणाले, ''ट्रम्प हे आत्महत्येच्या मोहिमेवर निघाले आहेत. त्यांना साधा शिष्टाचारही नाही. आमच्या देशाचा त्यांनी ढळढळीत अपमान करून घोडचूक केली आहे, त्यामुळे आमची रॉकेट्‌स अमेरिकेवर डागणे अपरिहार्य आहे.'' ते म्हणाले, की उत्तर कोरियाकडे हैड्रोजन बॉंब आहे व तो टाकण्यासाठी आंतरखंडीय क्षेपणास्त्रही आहे. उत्तर कोरिया नव्हे, तर अमेरिकेचा जगाला धोका आहे. कारण, इराककडे संहारक अण्वस्त्रे नसतानाही, खोटी कारणे सांगून अमेरिकेने इराकवर आक्रमण केले होते. योंग यांचे भाषण संपताच राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अन्तोनिओ गुटरेस यांनी त्यांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली. किम याने गेल्या आठवड्यात ट्रम्प यांचे 'मेन्टली डिरेन्ज्ड्‌ डोटार्ड'(मानसिक संतुलन ढळलेला म्हातारा) असे वर्णन केले. त्यामुळे ट्रम्प यांचा पारा अधिक चढला.

संभाव्य अणुयुद्धाचे संकट जगापुढे उभे राहणार की काय, यावर सध्या सर्वत्र काथ्याकूट सुरू आहे. प्रशांत महासागरातील अमेरिकेचा नौदल तळ ग्वामवर अण्वस्त्र डागण्याची धमकी किमने दिली आहेच, त्याबरोबर हवाई, लॉस एंजल्स, सॅनफ्रान्सिस्को, सोल, टोकियो व जपानमधील अन्य शहरेही हल्ल्याच्या टप्प्यात येतील, असेही म्हटले आहे. या धमकीमुळे जपानमधील नागरिक इतके भयभीत झालेत, की प्रत्यक्षात हल्ला झाल्यास स्वतःला वाचवायचे कसे, याचे सराव व प्रात्यक्षिके तेथे सुरू झाली आहेत.

संभाव्य संकटाची तुलना 55 वर्षांपूर्वी ऑक्‍टोबर 1962 मध्ये झालेल्या 'क्‍युबन क्षेपणास्त्र संकटा'शी केली जाते. तेव्हा अमेरिका व रशिया हे तिसऱ्या (अण्वस्त्र) महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले होते. तेरा दिवस हे संकट शिगेला पोचले होते. तो शीतयुद्धाचा काळ होता. क्‍युबाचे तत्कालीन अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांना पदच्युत करण्याचा अमेरिकेने घाट घातला व तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या नेतृत्वाखाली 'सीआयए'ने क्‍युबानजीक 'बे ऑफ पिग्ज'वर आक्रमण केले. परंतु, कॅस्ट्रो यांच्या लष्कराने अमेरिकेचा पराभव केला. त्यामुळे रशिया व अमेरिकेने अण्वस्त्रे डागण्याचा केलेला विचार अखेर केनेडी व निकिता क्रुश्‍चेव्ह यांच्यातील उच्चस्तरीय शिष्टाईतून बदलला. 'किम यांना आवर घाला,' असे ट्रम्प चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना सांगत आहेत. उत्तर कोरियाची मुस्कटदाबी करण्यासाठी राष्ट्रसंघाने अलीकडे त्या देशावर आर्थिक निर्बंधही लादले. त्यामुळे किम अधिकच चेकाळला आहे. विशेष म्हणजे, निर्बंधांना चीनचा पाठिंबा असला, तरी उत्तर कोरियाची अगदीच उपासमार होऊ नये, म्हणून कोळसा व ऊर्जा या दोन्ही गोष्टी त्यातून वगळण्यात आल्या.

उत्तर कोरियाकडील अणुबॉंबची क्षमता दहा किलोटनपासून ते शंभर किलोटन असू शकते व अणुबॉंबची संख्या 13 ते 21 असावी, असा अंदाज आहे. हिरोशिमावर अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉंबची क्षमता 15 किलोटन होती. त्या व नागासाकीवर टाकलेल्या बॉंबमुळे काय संहार झाला, याचा इतिहास जगापुढे आहे. त्यामुळेच किमने अण्वस्त्र डागण्याचा वेडेपणा केला, तर जगावर कोणते संकट उद्भवेल, याची कल्पनाही करता येणार नाही. अण्वस्त्रांबाबत अमेरिकेची भूमिका दुटप्पी असल्याचे स्पष्ट दिसते. तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी महत्‌प्रयत्नांनी इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून परावृत्त केले. पण त्या समझोत्यातून ट्रम्प यांनी अंग काढून घेतले. त्यामुळे, तो अण्वस्त्रधारी देश होणार, अशी चिन्हे दिसत आहेत. एकीकडे, उत्तर कोरियाने अण्वस्त्र निर्मिती करू नये, म्हणून त्यावर बंधने लादायची व दुसरीकडे जपान, दक्षिण कोरियावरील सुरक्षाछत्र काढून घेण्याचा इशारा देत त्यांनी आपापली अण्वस्त्रे निर्माण करावी, असे सांगायचे हा दुटप्पीपणा नव्हे तर काय?

उत्तर कोरियाचे संकट टाळायचे असेल, तर जागतिक प्रयत्नांव्यतिरिक्त प्रमुख जबाबदारी चीनवर आहे. चीनच्या पंखाखाली उत्तर कोरिया वावरत आहे. चीनने तिबेटप्रमाणे त्याचा 'बफर'सारखा वापर केला आहे. अमेरिकेवर डूख धरण्यासाठी किम जोंग उन परस्पर धमक्‍या देत आहे, हे बरेच आहे, असे आजवर चीनला वाटत आलेय. परंतु, किम अथवा ट्रम्प यांच्या अरेरावीतून अण्वस्त्रयुद्ध झाले, तर त्यातून चीनही सुटणार नाही. केवळ आशियाच नव्हे, तर संपूर्ण जगावर संकट कोसळेल, याची जाणीव अमेरिकेला ठेवावी लागेल. रशिया काय भूमिका घेईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनेक 'जर- तर' च्या कचाट्यात असलेले संभाव्य संकट टाळावयाचे असेल, तर डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग व व्लादिमीर पुतिन यांनी एकत्र येऊन किमला आवर घालावा लागेल, तसेच पुतिन व जिनपिंग यांना किम व ट्रम्प यांना थोपवावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com