येथे 'बाबा'चे समर्थक रस्त्यावर; इतर देशांत बलात्काऱ्यांचे काय होते पाहा

टीम ई सकाळ
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

सोशल मीडियावर बाबा राम रहीम व त्याच्या समर्थकांवर जोरदार टीका झाली. अनेक वाचकांनी 'ई सकाळ'कडे राम रहीमचा निषेध करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख व स्वयंघोषित धर्मगुरू बाबा राम रहीम सिंग याची अमानूष, क्रूर व लाजिरवाणी कृत्ये समोर आली आणि त्यानंतर अनेक वर्षांनी त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली. या दरम्यान त्याच्या कथित भक्तांनी, समर्थकांनी खुले आम त्याला पाठिंबा दिला. आक्रमकपणे रस्त्यावर उतरून प्रशासकीय यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. 

या प्रकाराबद्दल जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. 'जिथे बलात्कारी बाबासाठी लोक रस्त्यावर उतरत असतील तिथे नवरात्रोत्सव कशासाठी करायचा?' अशा प्रश्न महिला वाचकांनी उपस्थित केला. तसेच, पुढील संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
'एका वेश्या वस्तीत लिहिलेल्या या ओळी वाचा. येथे देहविक्रय केला जातो. तुम्हाला इमान विकत घ्यायचं असेल तर पोलिस स्टेशन पुढच्या चौकात आहे!'

या पार्श्वभूमीवर इतर देशांमध्ये स्त्रियांवरील अत्याचाराचे खटले कसे चालतात, अशा नराधमांना काय शिक्षा केली जाते हे पाहू या.

भारतात 2013 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या बलात्कारविरोधी विधेयकानुसार 7 ते 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा केली जाते. अपवादात्मक प्रकरणांत बलात्काऱ्यास फाशीची शिक्षा देण्याचीही तरतूद आहे. तथापि, काही प्रकरणे अनेक वर्षे प्रलंबित राहतात. 

अमेरिका : पीडित महिलेचे वय आणि गुन्ह्याचे क्रोर्य लक्षात घेऊन जन्मठेप किंवा 30 वर्षांची शिक्षा दिली जाते. 

रशिया : 3 ते 30 वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा. 

चीन : चीनमध्ये तर अशा गुन्ह्यांमध्ये खटला चालविणे, सुनावण्या घेणे अशा प्रक्रियेत प्रकरण प्रलंबित ठेवले जात नाही. वैद्यकीय चाचणीत बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले की थेट मृत्युदंड दिला जातो. सुत्रांच्या माहितीनुसार, काही प्रकरणांमध्ये बलात्कारी नराधमाचे लिंग कापण्याची शिक्षाही दिली जाते. 

इराण : बलात्कार करणाऱ्यास येथे थेट सार्वजनिक ठिकाणी लोकांसमोर फाशी दिली जाते किंवा गोळ्या घालून मारले जाते. पीडित स्त्रीने परवानगी दिल्यास मृत्युदंड रद्द होऊ शकतो, मात्र तरीही त्याला जन्मठेप किंवा चाबकाच्या शंभर फटक्यांची शिक्षा दिली जाते. 

नेदरलँड्स : परवानगीशिवाय घेतलेल्या चुंबनासह (फ्रेंच किस) कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार हा बलात्काराएवढाच गंभीर मानला जातो. बलात्कारी व्यक्तीच्या वयानुसार त्याला 4 ते 15 वर्षांची शिक्षा ठोठावली जाते. वेश्येवरील लैंगिक अत्याचाराबद्दलही किमान 4 वर्षांची शिक्षा दिली जाते. इतर देशांमध्ये वैश्यांवरील अत्याचाराकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसते. 

फ्रान्स : येथे 15 वर्षे छळ करून शिक्षा दिली जाते. महिलेवर झालेल्या अत्याचाराची तीव्रता लक्षात घेऊन या शिक्षेत वाढ केली जाते. जन्मठेपही दिली जाते. 

उत्तर कोरिया : येथे हुकूमशाही असून, बलात्काराच्या गुन्ह्यात कोणतीही दया दाखवली जात नाही. डोक्यात गोळी घालून बलात्कार पीडित स्त्रीला त्वरीत न्याय दिला जातो.

अफगाणिस्तान : गुन्हा केल्यापासून चार दिवसांच्या आत बलात्काऱ्याच्या डोक्यात गोळ्या घालून न्याय दिला जातो. 

नॉर्वे : गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार 4 ते 15 वर्षांचा तुरुंगवास.

सौदी अरेबिया : बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यास खटल्याच्या काळातच दोषी व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली जाते. 

इस्राईल : किमान 4 वर्षे आणि जास्तीत जास्त 16 वर्षांची शिक्षा. 

UAE : लैंगिक अत्याचार किंवा बलात्कारासाठी मरेपर्यंत फाशी. बलात्काराचा गुन्हा केल्यानंतर 7 दिवसांत त्याला फाशी देण्यात येते. दंड किंवा नुकसान भरपाईची तरतूद येथे नाही. 

पोलंड : येथे बलात्काऱ्यास डुकरांसमोर टाकून त्यांच्याकडून मृत्यू दिला जाई, असे सांगण्यात येते. अलीकडे येथे मृत्युदंडाच्या शिक्षेवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. 

इराक : सार्वजनिक ठिकाणी मरेपर्यंत शिक्षा दिली जाते. 

दक्षिण आफ्रिका : 20 वर्षे तुरुंगवास.

इजिप्त : गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिली जाते. 

Web Title: marathi news baba ram rahim punishments for rapists