'उद्योगी' मराठी तरुणाईने शोधली स्वतःची वाट..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'उद्योगी' मराठी तरुणाईने शोधली स्वतःची वाट..!

उद्याच्या उद्योजकांचं स्वागत...
नोकरीच्या मळलेल्या पायवाटेवरून न चालता स्वतःच्या उद्योगाच्या वाटेवर धाडसानं पाऊल टाकणाऱया नव्या पिढीची स्वागत...
आपण किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींपैकी कोणी या वाटेवर पाऊल टाकलं आहे? 
आम्हाला कळवा...त्यांच्याबद्दल लिहा...
लाखो मराठी नेटिझन्ससोबत यशोगाथा शेअर करा...

आमच्यापर्यंत पोहचा:

'उद्योगी' मराठी तरुणाईने शोधली स्वतःची वाट..!

प्रत्येक तरुणाच्या मनात कुठे ना कुठे रतन टाटा, मुकेश अंबानी, स्टीव्ह जॉब्स दडलेला असतो. प्रत्येकाचीच मोठी स्वप्ने असतात. सगळेच ती पूर्ण करण्यात यशस्वी होतात असेही नाही. पण म्हणून त्यांचे प्रयत्न कधीच थांबत नाही. आपल्या आजूबाजूचे अनेक तरुण स्वतःचे व्यवसाय सुरु करुन त्यांच्या मोठ्या स्वप्नांची बीजे रोवत आहेत. व्यवसाय सुरु करणे एवढे सोपे नाही. हा रस्ता प्रचंड संयम पाहणारा आणि कष्टदायक असतो. स्वतःच्या क्षमतेबद्द्ल मनात कितीही शंका डोकावून गेल्या तरी नेहमी प्रोत्साहीत राहून प्रयत्न करत राहायला हवे. विद्येचे माहेरघर असणाऱ्या आपल्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून अनेक तरुण तरुणी व्यवसायांद्वारे आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. या मालिकेतील पहिला भाग वाचण्यासाठी क्लिक करा.

गावातली शाळा..
पुण्यात ज्ञानप्रबोधिनीसारख्या प्रतिष्ठित शाळेत शिक्षक म्हणून काम केल्यानंतर 'पुन्हा गावात जाऊन नव्याने शाळा सुरू करू' असा विचार कुणाच्याही डोक्‍यात येणं तसं अशक्‍यच! पण विनायक माळी आणि सुहास प्रभावळे या दोन तरुणांनी मात्र ज्ञानप्रबोधिनीमधील नोकरी सोडून कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी या आपल्या मूळगावी 'विद्योदय'ची स्थापना केली. 

ज्ञानप्रबोधिनी शाळेत शिकवत असताना माध्यमिक शाळेतील शिक्षणाच्या प्रयोगाने विनायक माळी भारावून गेला. विवेकानंदांच्या शिक्षणविषयक विचारांच्या प्रत्यक्ष कृती त्याने प्रबोधिनीच्या शाळेत पाहिल्या. पण 'पुण्यातून ही ज्ञानाची, विचारांची आणि कृतीची गंगा ग्रामीण भागात-निदान आपल्या मूळगावी कशी न्यायची' हाच विचार त्याच्या डोक्‍यात घर करून राहिला. त्याचवेळी रुकडीहून आलेल्या सुहास प्रभावळे या आपल्या मित्राला विनायकने हा विचार बोलून दाखविला. दोघांचेही यावर एकमत झाले. 

दरम्यान, विनायकने मागील दोन वर्षांपासून 'टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स' येथे 'एम. ए.'चे शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या प्रयोगातून सध्याच्या 'घोका आणि ओका' व्यवस्थेवर उपाय शोधण्याचे काम सुरू केले. या संस्थेतील सहकाऱ्यांच्या साथीने झोपडपट्टीतील मुलांसाठी 'अपनी शाला' हा फिरत्या शाळेचा प्रयोग सुरू केला. टाकाऊ वैज्ञानिक खेळण्यांच्या साह्याने मुलांमध्ये शिक्षणाची चेतना जागविण्याचे काम 'अपनी शाला'तर्फे केले जाऊ लागले. याच काळात म्हणजे 2014 मध्ये नव्या शिक्षणप्रणालीच्या कल्पनेसह रुकडी येथील कामाला प्रारंभ झाला. पुरेसा अनुभव आणि सर्वांगीण शिक्षणाचे विचार यांचा पाया 'विद्योदय'च्या रुपाने घातला गेला. सुहासच्या रुकडी येथील वाडा-वजा घरामध्ये या शैक्षणिक केंद्राचा प्रारंभ झाला. वेगवेगळ्या वैज्ञानिक उपकरणांनी आणि आकर्षक पेपर क्विलिंगने घरातील एक छोटीशी खोली सजली; तर शेजारचा जुना पोल्ट्री फार्म असणारा हॉल स्वच्छ करून त्यात मुलांना बसण्यासाठी भारतीय बैठक, ग्रंथालयासाठी पुस्तके, कपाटे यांच्यासाठी जागा केली. 

प्रबोधिनीतील कामाचा अनुभव घेऊन सुहासने प्रत्यक्ष कामाला सुरवात केली. विनायकही 'अपनी शाला'चे काम सांभाळात, वेळ काढून प्रत्यक्ष येऊन संस्थेची आखणी करू लागला. त्यातच, घाटगे पाटील या कोल्हापूरमधील ट्रान्सपोर्ट कंपनीने आपल्या महिन्याचा अडीच लाख रुपयांचा 'सीएसआर' दिला. त्यानंतर सुहासने रुकडी आणि आसपासच्या चार-पाच छोट्या गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आठवीच्या 40 हुशार मुलांची निवड केली आणि त्यांच्या पालकांसमोर 'रविवारची शास्त्र शाळा' हा प्रस्ताव मांडला. पालकांनीही याला होकार दिला आणि जुलै 2014 पासून पहिली बॅच सुरू झाली. 

'विद्योदय'मधील रविवारचा दिनक्रम 
सुरवातीला राष्ट्रगीत होते. त्यानंतर दिनप्रमुखाने गेल्या रविवारी ठरविल्याप्रमाणे निवडलेल्या विषयावर त्याने लिहून आणलेले विचार अर्धा तास मांडायचे. त्यानंतर याच विषयावर मुलांमध्ये चर्चा होते. पुढील एक तास हा वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांसाठी राखून ठेवलेला असतो व त्यानंतर मान्यवर भेटींमध्ये विविध अधिकारी, कलात्मक काम करणाऱ्या व्यक्ती, तसेच विशेष काम करणाऱ्या व्यक्ती आपापले अनुभव सांगतात. जेवणाच्या अर्ध्या तासाच्या सुटीनंतर ग्रामीण भागातील मुलांमध्ये स्त्री-पुरुष समानता रुजविण्यासाठी मुला-मुलींचे एकत्र बैठे खेळ घेण्यात येतात. 'विद्योदय'च्या रुपाने ही मुले अनोख्या पद्धतीने रविवार साजरा करतात. 

'बून्स' बास्केट 
मानवाला निसर्गाने फळे, भाज्या, सुका मेवा अशा अनेक स्वरूपांत भरभरून वरदान दिले आहे. याचा आपल्या रोजच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात वापर करून मनुष्य आयुष्यभर आरोग्यदायी राहू शकतो. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि पाश्‍चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याच्या नादात हा साधा, सरळ, सोपा आहार मनुष्य विसरत चालला आहे. 

नेमका हाच मुद्दा लक्षात घेऊन पुण्यातील स्मितल नाईकने 'बून्स बास्केट'ची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पुढाकार घेतला. 'बून्स बास्केट'तर्फे संपूर्ण पुण्यात ताजी फळे व सुका मेवा यांचे बॉक्‍समधून वाटप केले जाते. या संकल्पनेचे वैशिष्ट्‌ये म्हणजे दर आठवड्याला पौष्टिकतेच्या गरजेनुसार यात बदल केले जातात. तसेच, प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची संख्या लक्षात घेऊन विविध आकारांचे बॉक्‍स उपलब्ध केले जातात. तसेच गर्भवती महिला, मधुमेही, लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठीही वेगळे बॉक्‍स उपलब्ध आहेत. या सर्व गरजा रोजच्या असल्याने ग्राहकांच्या सोयीसाठी महिन्याचे सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे. 

या दैनंदिन गरजांबरोबरच एकूणच समाजातील आनंद साजरा करण्याचा दृष्टिकोनही बदलण्यासाठी स्मितलने खास 'हेल्दी सेलिब्रेशन' आणि 'गिफ्ट बास्केट्‌स'सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत. जेणेकरून वाढदिवस असो वा कुठलेही गेट-टुगेदर.. प्रत्येक आनंद हादेखील नैसर्गिक आणि हेल्दी अशा फळांनी आणि सुका मेव्याने साजरा केला जाईल. अल्पावधीतच स्मितलने पुण्यात एक हजारांहून अधिक बास्केट्‌स डिलिव्हर केल्या आहेत आणि दिवसेंदिवस ग्राहकांचा प्रतिसाद वाढतच आहे. 

वर्डस ऑफ अक्षय 
इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग करूनही कविता करण्याला आणि लिखाणाला आपले सर्वस्व देणाऱ्या तरुणाला आजच्या जगात वेडेच ठरविले जाईल. यात एकप्रकारचे वेड आहेच; पण ते त्याच्या कवितांनी आणि लिखाणाने तरुणाईला लावले आहे. अक्षय दळवी हा मूळचा मुंबईचा.. त्याने इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. एखादा ब्रॅंड तयार करण्यासाठी काय करावे लागते, याचे शिक्षण आणि प्रेरणा त्याला इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात इंटर्नशिप करताना मिळाली. याच काळात त्याने टी-शर्ट आणि वेबसाईट डेव्हलपमेंटचा व्यवसायही केला. 

सध्या अक्षय कन्टेंट रायटिंग, ब्रॅंडिंग आणि 360 डिग्री डिजिटल मार्केटिंगची कामे करतो. व्यवसायातील अनुभवांवर अक्षयने पुस्तकही लिहिले आहे. लहानपणापासून असलेला कविता करण्याचा आणि लघुकथा लिहिण्याचा छंद त्याने अजूनही जपला आहे. याच छंदाला हक्काचे व्यासपीठ मिळावे, म्हणून त्याने 'फेसबुक'वर WordsOfAkshay या नावाने एक पेजही सुरू केले. त्याच्या या पेजला एक लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. याच छंदाला त्याने पुढे व्यवसायाचे रूप दिले आणि तो आता विविध ब्रॅंड्‌सला त्यांच्या प्रसिद्धीसाठी स्क्रिप्ट्‌स आणि लघुकथा लिहून देतो. आजची तरुण पिढी ही उच्च शिक्षण घेण्याच्या आणि पैसे कमाविण्याच्या नादात आपली आवड काय आहे, हेच मुळात विसरून गेली आहे. पण अक्षयने आपली आवड जिवंत ठेवत त्यातूनच आपल्या व्यवसायाला सुरवात केली, हेच त्याचे वैशिष्ट्यं..! 

कनेक्‍ट कॅनडा इमिग्रेशन सर्व्हिसेस इंक 
काहीही पूर्वानुभव नसतानाही केवळ जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर एका मराठी माणसाने कॅनडाच्या कॅल्गरी या अत्याधुनिक शरात 'टॉप थ्री बेस्ट रेटेड कंपनीज'मध्ये मानाचे स्थान मिळवून मराठी पताका परदेशात फडकवत ठेवली. घरगुती खानावळ ते टॉप रॅंकिंग कॅनडीयन कंपनी हा प्रवास अत्यंत खडतत असला, तरीही तो तितकाच प्रेरणादायी आहे. 

बारावीनंतर काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छेपोटी संतोष यांनी हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेतला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अभ्यासक्रमाची फी भरण्यासाठी त्यांनी अनेक हॉटेल्समध्ये वेटरची कामे केली. याचबरोबर बी.कॉमचे शिक्षणही पूर्ण केले. कुकिंगमध्ये प्राविण्य मिळवूनही अनुभव नसल्याने नोकरी मिळणे कठीण जात होते. शेवटी शैलेश लोहाटी या मित्राच्या ओळखीने पुण्याच्या बंडगार्डन रोडवरील हॉटेल हॉलिडे इनमध्ये (सध्याचे 'सन अँड सॅंड) त्यांना स्ट्युअर्डची नोकरी मिळाली. जेमतेम अडीच हजार रुपये महिना पगारावर त्यांनी वर्षभर काम केले. पण मूळ आवड स्वयंपाकघरात असल्याने ती नोकरी सोडून त्यांनी स्वत:ची खाणावळ सुरू केली. त्यांनी जवळजवळ दोन वर्षे बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला डबे पुरविले. पण विद्यार्थ्यांनी ठेवलेली उधारी आणि कमी उत्पन्न यामुळे त्यांनी खाणावळ बंद करावी लागली. 

दोन वर्षांचा खाणावळीचा आणि केटरिंगच्या कुकिंगचा अनुभव घेऊन संतोष 2004 मध्ये अमेरिकेतील नॉर्वेजियन क्रूझ लाईनमध्ये कूक म्हणून रुजू झाले. इथे चार वर्षं काम केल्यानंतर 'फेअरमाऊंट हॉटेल्स' या आघाडीच्या कॅनेडियन कंपनीत संतोष यांनी कूक म्हणून काम केले. 2008 ते 2014 या सहा वर्षांत सहा प्रमोशन्स घेत कूकपासून शेफपर्यंतची वाटचाल केली. ऑगस्ट 2008 मध्ये कॅनडाला येण्यापूर्वी चारच महिने संतोष यांचे लग्न झाले होते. पण त्यांची पत्नी अर्चना यांना व्हिसा न मिळाल्याने संतोष एकटेच कॅनडाला आले. त्यानंतर तीन वेळा अर्ज करूनही अर्चना यांना व्हिसा मिळाला नाही. अखेर 2011 च्या नोव्हेंबरमध्ये अर्चना यांना व्हिसा मिळाला. 

याच प्रसंगाने त्यांच्या व्यवसायाला पूर्णपणे कलाटणी दिली. संतोष आणि त्यांची पत्नी अर्चना यांना जो त्रास सहन करावा लागला, तोच इतरांना सहन करावा लागू नये म्हणून कोणतेही शुल्क न घेता इमिग्रेशन आणि व्हिसाच्या कागदपत्रांमध्ये संतोष मदत करू लागले. त्यातूनच पुढे नोकरी सांभाळत संतोष यांनी इमिग्रेशन लॉचा औपचारिक अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर 2014 च्या सप्टेंबरमध्ये त्यांनी 'कनेक्‍ट कॅनडा इमिग्रेशन सर्व्हिसेस इंक' या कंपनीची स्थापना केली. 

संतोष आणि त्यांची पत्नी अर्चना यांनी घरातून सुरू केलेली ही कंपनी आज 1500 स्क्वेअर फूटच्या जागेत आठ कर्मचाऱ्यांच्या साह्याने व्हिसा आणि इमिग्रेशन सर्व्हिसेस या क्षेत्रात तत्पर सेवा पुरवत आहे. शून्यातून चालू केलेल्या या कंपनीची उलाढात आज 50 हजार डॉलरपर्यंत गेली आहे. या कंपनीचे कॉर्पोरेट ऑफिस कॅल्गरीमध्ये आहे आणि पुण्यात नांदेड सिटीमध्ये एक शाखा आहे. यंदाच्या जूनमध्ये संतोष यांच्या कंपनीला 'टॉप थ्री बेस्ट रेटेड कंपनीज इन कॅल्गरी' हा पुरस्कार मिळाला. 

केल्विन 77 
रोल आईस्क्रीमसारखी वेगळी कल्पना घेऊन स्वत:चा 'केल्विन 77' हा ब्रॅंड तयार करण्याचा प्रयत्न औरंगाबादमधील तीन तरुणांनी केला आहे. पंकज गरुड (मेकॅनिकल इंजिनिअर), महेश रोडगे (एमबीए), मयूर गोलटगावकर (फोटोग्राफी) असे या प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे; पण स्वत:चा व्यवसाय उभा करण्याचे हे तिघांचेही स्वप्न होते. 'यू-ट्युब'वर एकदा त्यांच्यापैकी एकाला 'रोल आईस्क्रीम' हा प्रकार समजला. त्यासंदर्भात आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. 

या तिघांपैकी कुणालाही 'फूड इंडस्ट्री'मध्ये अनुभव नव्हता. त्यामुळे त्यांना शून्यापासून सुरवात करावी लागली. दिल्ली, मुंबई, सूरत, पुणे या ठिकाणी अशा प्रकारचे आईस्क्रीम मिळते. औरंगाबादमध्ये अद्याप हा प्रकार नसल्याने इथे हा व्यवसाय चांगला चालेल, या कल्पनेने त्यांनी याच व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला हा व्यवसाय करणाऱ्या करणाऱ्या कंपन्यांची फ्रँचायझी मिळते का, हे त्यांनी पाहिले; पण नंतर स्वत:चा ब्रॅंड बनविण्याचे ठरविले. 

त्यासाठी या तिघांना सूरत, दिल्ली या ठिकाणी असलेल्या आऊटलेटला भेट दिली. 'रोल आईस्क्रीम'साठी लागणाऱ्या मशिनरी आणि इतर सामग्रीची माहिती मिळविली व काम सुरू केले. औरंगाबादमध्ये कॅनॉट प्लेस या गर्दीच्या ठिकाणी त्यांना जागा मिळाली. यासाठी लागणारे भांडवल तिघांनी मिळून उभं केलं. मयूर आणि पंकज यांनी आधी नोकरी करत असल्याने थोडीफार बचत केली होती; तर महेशने बॅंकेतून थोडं कर्ज मिळवलं. ऑगस्ट 2016 मध्ये त्यांनी मशिनरी विकत घेतली. ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या काळात त्यांनी 'यू-ट्युब'वर व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या रेसिपी तयार करण्याची तयारी केली. या दोन महिन्यांत त्यांनी इंटिरिअर डिझाईन, लोगो, मेन्यू या गोष्टींवरही अभ्यास केला व त्यातील सर्वोत्तम पर्याय निवडले. यासाठी मित्रांची मदत घेतल्याने ते पैसे वाचले. 

10 ऑक्‍टोबर 2016 रोजी सुरू केलेले हे आऊटलेट कमी काळातच प्रसिद्ध झाले. आज 100 वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्समधील 'रोल आईस्क्रीम' त्यांच्याकडे मिळतात. सुरवातीच्या काळात दुसऱ्या एखाद्या आईस्क्रीमच्या मालकीची फ्रँचायझी मिळावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या या तरुणांचा 'केल्विन 77' हा ब्रॅंड इतका प्रसिद्ध झाला आहे, की येत्या दोन महिन्यांत त्यांची पुणे व हैदराबाद या ठिकाणी फ्रँचायझी सुरू होणार आहे.