आवाज... जात्याच्या आतले अन्‌ बाहेरचे! 

विजय बुवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

तीन- साडेतीन वर्षांत बदललेल्या राजकारणाच्या पटावर अनेक उलटीसुलटी समीकरणे जुळत आहेत. सत्ताकारणाचं जातं गरगर फिरत कुणाला ना कुणाला भरडत राहील, या धास्तीने भांडणे, राग, विद्वेष विसरून कालचे विरोधक एकत्र येत आहेत. हे जातं कधी अन्‌ कुठे थांबेल, याचा अंदाज प्रत्येक जण घेतो आहे. किमान पुढे जाऊन ते थांबवण्यासाठी एखादी मोट बांधली जाऊ शकते का, याची चाचपणी या भेटीगाठींतून होऊ शकते. अर्थात अशा कुठल्याही बेरजेच्या गणितात मतदाररुपी सामान्य जनतेला पुन्हा "हातचे' धरले जाईल. आज एकमेकांवरच्या अन्यायाबद्दल चर्चा करणाऱ्यांनी गेल्या निवडणुकीत परस्परांवर आसूड ओढताना जसं लोकांना गृहीत धरलं होतं, अगदी तसंच..! 

कुठल्या ना कुठल्या कारणाने असहाय, अगतिक झाला की त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काहीही करायला तयार होतो. किंबहुना त्याच्यावर तशी वेळच येते. एखाद्या दुखण्याचा इलाज डॉक्‍टरांकडेच होईल हे ठाम माहीत असलं, तरी श्रद्धेपोटी तो मंदिराच्या पायऱ्या झिजवतो. कधी कुणाच्या सांगण्यावरून वा स्वतःच्याच अंधश्रद्धेतून तांत्रिक- मांत्रिकांच्या दारीही जातो. अस्वस्थ अवस्थेतून, जीवघेण्या त्रासातून आपली लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठीच त्याचा हा अट्टहास असतो. मैत्री अथवा शत्रुत्व किती काळ टिकवावं नि ते सोयीनं कसं वापरावं, याचा "आदर्श' वस्तुपाठ देणाऱ्या राजकारणात तर प्रत्येकावर अशी वेळ कधी ना कधी येतेच. इथे कधीही कुणालाही कुणाचीही गरज पडू शकते. त्या स्थितीत मित्र असलेला वा तसा वाटणारा ऐनवेळी आपले दार खाडकन्‌ बंद करून घेतो नि शत्रू मानलेल्याच्या वाड्याचा दिंडी दरवाजा अंधारातही अलगद उघडला जातो..! तसे नसते तर कधीकाळी "भुजा'तील अफाट "बळ' दाखवणाऱ्यांना "कृष्णकुंजा'त जाऊन "राज की बात' करण्याची गरज पडली नसती... 

राजकारण हे सत्ताकारण बनल्यापासून या क्षेत्रातील मित्रत्व अन्‌ शत्रुत्वाची सारी परिमाणेच बदलून गेली आहेत. कुठं कालचा मित्र, साथी-सहकारी आजचा विरोधक नि उद्याचा दुश्‍मन या कॅटेगरीत टाकला जातो; तर कुठं कालचा वैरी हा आजचा कैवारी अन्‌ उद्याचा तारणहारी, संकटनिवारी मानला जाऊ लागतो. ज्याची त्याची सत्ताकांक्षा हेच एकमेव कारण त्यामागे असते. अर्थात अशी सत्ता लोकांच्या भल्यासाठीही राबवता येते, ती तशी काहीवेळा राबवलीही जाते, पण हे अर्धसत्य आहे. प्रत्यक्षातील सत्ता बहुतांश स्वतःसाठी, पक्षासाठी वा आप्तेष्टांसाठी वापरली जाते अन्‌ तिचा अल्पांश लोकांसाठी उरतो. सत्तेतून यश, यशातून पुन्हा सत्ता, त्यातून नवे यश नि आणखी नवी सत्ता हे सूत्र साध्य करण्यासाठी राजकारण्यांना तगडं सैन्य हाताशी ठेवावं लागतं. अर्थात तेही पोटावरच चालतं. मग सत्तेच्या भाकऱ्यांनी आपल्या सैन्याचं पोट भरायचं, तर हाताशी "तयार' भाजणीचं पीठ लागतंच. त्यासाठी अधिकारांच जातं सतत फिरतं ठेवावं लागतं. त्यात "गरजे'प्रमाणं नको ते दाणे हव्या तेवढ्या प्रमाणात टाकत राहिलं, की "पाहिजे तसं' पीठ पडत राहतं. पण, यामध्ये फिरवणाऱ्याचा अंदाज नसल्यानं कधी कोण जात्यात अन्‌ कोण सुपात असेल, हे सांगता येत नाही. त्यामुळं तशी "वेळ' आज त्याच्यावर आली आहे, उद्या कुणावरही येईल, म्हणून बाहेरच्यांना "आतल्यां'बद्दल सहानुभूती वाटू लागते. त्याचवेळी या भरडणुकीतून सुटका करून घेण्यासाठी आतलेही बाहेरच्यांची मदत घेतात. किमान या दुष्टचक्रातून सहीसलामत निसटण्यासाठी बाहेर असलेल्यांची शक्ती आपल्याला मिळावी, झालंच तर एखादी युक्तीही कळावी, यासाठी त्यांचे समर्थक, साथीदार, शिलेदार कामाला लागतात. त्यातूनच मग ज्यांच्याशी कधीकाळी उभा दावा मांडला होता, त्यांच्याच गडावर जाऊन "राज'दरबारात मसलती केल्या जातात..! 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नाशकातील समर्थक नेते- कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं "भुजबळ समर्थक जोडो' अभियान राजकीय पटलावर चर्चेचा विषय बनले आहे. आपल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी समविचारी पक्षनेत्यांप्रमाणेच प्रसंगी वैचारिक विरोधकांची मदत घेण्याचे असे प्रयोग राजकारणात नवे नाहीत. कधी अशी मदत उघडपणे, तर कधी छुप्या पद्धतीने दिली जाते, एवढाच काय तो फरक. भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर दोन वर्षांपासून कारागृहात आहेत. त्यांच्याशी सरकार सूडबुद्धीने वागत आहे आणि हा अन्याय दूर करण्यासाठी दबाव निर्माण व्हावा, म्हणून या समर्थकांनी विविध पक्षांच्या नेत्यांशी "अन्याय पे चर्चा'ही सुरू केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन भुजबळ समर्थकांनी गाऱ्हाणे मांडले, तेव्हा राज यांनीही "भुजबळ समर्थक जोडो' नव्हे तर "भुजबळ जेलसे छोडो' आंदोलन राबवण्याची सूचना केली. राजकारणात एकाच पक्षाच्या किंवा विचारसरणीच्या दोन नेत्यांमध्ये कमालीचा दुजाभाव असू शकतो, तसा दोन परस्परविरोधी नेत्यांमध्ये वैचारिक मतभेदांच्या पलीकडेही मैत्री वा स्नेहभाव असू शकतो. शिवसेनेमुळे राज यांचे तर भुजबळ, नारायण राणे या दोघांशीही चांगले संबंध राहिले. त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन पाठबळ मागण्यात भुजबळ समर्थकांना काही गैर वाटले नसावे... 

भुजबळ समर्थकांनी मुंबईत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचीही भेट घेऊन भुजबळांना समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला. नाथाभाऊ गेल्या काही दिवसांपासून स्वतःवरील अन्यायाबाबत आवाज उठवताहेत. अर्थात त्यांच्या एकाकी झुंजीला पाडळसे येथे नुकत्याच झालेल्या लेवा पाटीदारांच्या महाअधिवेशनाने काही प्रमाणात का होईना समूहशक्तीची साथ असल्याचे दिसले. खडसे भुजबळांसारखेच आक्रमक नेते असल्याने पक्षाच्या सरकारविरोधात बोलायला ते मागेपुढे पाहात नाहीत. भुजबळ समर्थकांच्या भेटीतही त्यांचा हा पवित्रा कायम राहिला. पण, त्यांच्या आवाजालाही मर्यादा आहेत. जात्यात भरडत असलेल्याच्या वेदना कानी आल्या, तरी सुपात असलेल्याला आपला आवाज जात्यापेक्षा मोठा करता येत नाही की आपल्या करारीबाण्याने जात्याची घरघर थांबवता येत नाही..! इतक्‍या वर्षांत ज्यांची उष्टावणे आपण केली, असे अनेक जण दहाच्या दहा बोटे सत्तेच्या तुपात बुडवून चाखत असताना उपेक्षेच्या सुपात दिवस बदलण्याची वाट पाहणे, हे जात्यात असण्यापेक्षा जास्त वेदनादायक असू शकते. त्यामुळं भुजबळ समर्थकांना नाथाभाऊंची सहानुभूती मिळू शकते. पण, जातं थांबवण्याची शक्ती त्यांच्याकडेही नाही, हे वास्तव स्वीकारावे लागेल... 

गेल्या विधानसभेच्या वेळी नाशकातील रणांगणावर छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांचे द्वंद्व तुफान रंगले होते. भुजबळांनी राज यांची नकलाकार म्हणून संभावना केल्यावर राज यांनी भुजबळांचीच नक्कल करीत त्यावरही कडी केली. रोज वेगळा मफलर गळ्यात घालणाऱ्या भुजबळांवर एका क्षणी विखारी टीका करताना राज यांनी केलेलं, "असं वाटतं, मफलरने गळा आवळून कायमचं बांधकाम करावं...' हे वक्तव्य प्रचंड वादग्रस्त ठरलं. मग त्याचाच आधार घेत भुजबळांनी किणी प्रकरणाचा उल्लेख करीत राज यांना पुन्हा लक्ष्य केलं. आरोप- प्रत्यारोपांचा हा सिलसिला निवडणूक काळात सुरू राहिला. मुद्दे हरवलेल्या अशा पातळीहीन प्रचाराचा फायदा दोघांपैकी कुणालाच झाला नाही. अर्थात हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आता सुरू झालेली "अन्याय पे चर्चा'! अशा भेटी नि चर्चांतून काय साध्य होईल? खरेच दबाव निर्माण होऊन भुजबळांची सुटका होईल का, याचे निश्‍चित उत्तर समर्थक आणि ते भेटत असलेले नेते यापैकी कुणाकडेही नाही... 

तीन- साडेतीन वर्षांत बदललेल्या राजकारणाच्या पटावर अनेक उलटीसुलटी समीकरणे जुळत आहेत. सत्ताकारणाचं जातं गरगर फिरत कुणाला ना कुणाला भरडत राहील, या धास्तीने भांडणे, राग, विद्वेष विसरून कालचे विरोधक एकत्र येत आहेत. हे जातं कधी अन्‌ कुठे थांबेल, याचा अंदाज प्रत्येक जण घेतो आहे. किमान पुढे जाऊन ते थांबवण्यासाठी एखादी मोट बांधली जाऊ शकते का, याची चाचपणी या भेटीगाठींतून होऊ शकते. अर्थात अशा कुठल्याही बेरजेच्या गणितात मतदाररुपी सामान्य जनतेला पुन्हा "हातचे' धरले जाईल. आज एकमेकांवरच्या अन्यायाबद्दल चर्चा करणाऱ्यांनी गेल्या निवडणुकीत परस्परांवर आसूड ओढताना जसं लोकांना गृहीत धरलं होतं, अगदी तसंच..! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon news Raj Thackeray chhagan bhujbal