उथळ अस्मितांचा बाजार...

representational image
representational image

दंगली भडकावणाऱ्या अस्मितांचा बाजार जिथे रोज भरतो, त्या देश वा समाजाने महासत्तेचे स्वप्न पाहणे, हा खरं तर प्रमादच! मग पंतप्रधानांनी किती परदेश दौरे केले, जगात देशाचे किती वजन वाढले, अर्थव्यवस्था किती मजबूत झाली, एखाद्या राज्य वा प्रदेशात किती पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या इ. इ. गोष्टींना काहीही महत्त्व राहत नाही. कारण मनाने दुभंगलेल्या समाजाच्या पायावर शाश्‍वत मानवी 'विकासा'चे मनोरे उभे राहत नाहीत. अशा व्यवस्थेत वर्षानुवर्ष केवळ उथळ अस्मितांचा बाजार भरत राहतो. तिथे राजकारणाची दुकाने तेजीत चालतात अन्‌ दंगलीत दगड फेकणाऱ्यांचे नि ते खाणाऱ्यांचे जिणे मात्र आणखी भकास होत जाते... 

नवं वर्ष सुरू होतं ते नवा उत्साह, उमेद अन्‌ उज्ज्वल भविष्याची आशा घेऊन... त्यामुळे सालाबादप्रमाणे यंदाही नव्या वर्षाचे स्वागत करताना अवघ्या विश्‍वात हीच भावना दाटून आली नि शुभेच्छा संदेशांनी मनामनांतले 'इनबॉक्‍स' ओसंडून वाहिले. चांगल्या वा भल्या दिवसांची नसली, तरी किमान बऱ्या दिवसांची अपेक्षा प्रत्येकालाच असते. नववर्ष हे त्यासाठी निमित्त ठरतं. पण, प्रत्यक्षात मात्र सगळे दिवस सारखेच असल्याचा अन्‌ कालच्या पेक्षा उद्याचा दिवस आणखी खडतर असल्याचाच प्रत्यय येऊ लागतो. 'अंधार दाटतोय, म्हणून मला यावंच लागेल', असं सांगत कुठंतरी 'रजनीकांत' उगवल्यानं मोहरुन गेलेल्यांना अचानक भडकलेल्या जातीयतेच्या वणव्यात नव्या वर्षाच्या ताज्या-टवटवीत शुभेच्छांची होळी होताना पाहण्याची वेळ येते... 'व्हाईट हाऊस'ने कुरापती 'शेजाऱ्या'चा दाणापाणी बंद करण्याचा इशारा दिल्यानं सुखावलेल्यांना त्याच व्हाईट हाऊसमध्ये एका टेबलावर अण्वस्त्र सोडण्याचं मोठ्ठं नि 'चालू' स्थितीतलं बटन असल्याचं कळतं अन्‌ जानेवारीच्या थंडीतही घाम फुटतो... 

एकीकडं सुख-शांतीची आस अन्‌ दुसरीकडं अस्वस्थ, अनिश्‍चित भविष्याचा फास अशी ही स्थिती. एका शायरानं तिचं चपखल वर्णन केलंय, तो म्हणतो...

आदमीने जब भी अम्न की कसम खायी है
लबे इब्लिसपे हलकीसी हसीं आयी है...


जेव्हा जेव्हा सुखा-समाधानात, सलोखा- सौहार्दात शांत आयुष्य जगण्याचा संकल्प करतो, त्या त्या वेळी इब्लिस अर्थात सैतानाच्या ओठांवर एक छद्मी हास्य उमटते. तुम्ही शांतपणे जगण्याचं स्वप्न पाहा; पण माझ्या मनात काय खेळ सुरूय, हे तुम्हाला काय माहीत? असाच भाव त्यात असतो. आपल्या अवतीभवतीच्या वातावरणातही अशी छद्मी हास्य अधूनमधून उमटंत असतात; आपल्याला ती ओळखता येणं महत्त्वाचं! राजकारण हे समाजकारणापासून दुरावत केवळ सत्ताकारण बनू लागल्यापासून या क्षेत्रातील यशाची साधने अन्‌ परिमाणे पुरती बदलली आहेत.

स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांत आपल्या बहुसांस्कृतिक लोकजीवनातील जातीय, धार्मिक, भाषिक, वांशिक, प्रादेशिक भेद संपवण्याचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही. पण, त्याचवेळी ते पूर्णपणे संपणार नाहीत, याची दक्षता घेणारी व्यवस्थाही याच समाजात छुपेपणे कार्यरत होती, आजही ती वेगवेगळ्या रुपांत अस्तित्वात आहेच. ती कथित उजव्या- डाव्या, पुरोगामी- प्रतिगामी, धर्मनिष्ठ- धर्मनिरपेक्ष अशा प्रत्येक विचारगटांमध्ये कमी- जास्त प्रमाणात अन्‌ सुप्त वा जागृत अवस्थेत ती असतेच. तसे नसते तर कोरेगाव भीमा येथे आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात हिंसक संघर्ष उभा राहिला नसता. एकच दिवस आधी साऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या हातांतून दगड भिरकावले गेले नसते. याला केवळ सामाजिक स्थिती हेच एक कारण असू शकत नाही. दगड हाती घेणाऱ्यांच्या मानसिक अवस्थेवर होणारे किंवा केले जाणारे परिणामही अशा प्रकारांना तितकेच कारणीभूत असतात. त्यामुळेच इतरांसाठी 'शुभेच्छा' व्यक्त करताना मन अन्‌ मेंदूत उत्पन्न झालेला उदात्त भाव सोशल मीडियातील भडकावू मेसेजमुळे संकुचितपणात बदलतो नि कालचा मित्र आजचा शत्रू बनतो! अनेकांच्या अगदी न कळत हे होतं असतं, पण तोपर्यंत ते करवून घेणाऱ्यांचा हेतू सफल झालेला असतो... 

कशाची अस्मिता बाळगावी, याचे भान जिथे नसेल, तिथे हा खेळ अविरत सुरू राहतो. या देशात जन्मलेल्या प्रत्येकाला जात, धर्म-पंथ, भाषा यापेक्षाही केवळ देशाविषयी अस्मिता, अभिमान असला पाहिजे. सोशल मीडियात अशा आशयाच्या पोस्टही कोरेगाव भीमा प्रकरणानंतर फिरू लागल्या. पण, 'जात' जाता जात नाही अन्‌ त्यामुळेच जाती-धर्माच्या या एकाच 'इंधना'वर राजकीय लाभांच्या पोळ्या भाजण्याचे प्रकार वर्षानुवर्ष सुरू राहतात. मग प्रश्‍न निर्माण होतो, की आपली अस्मिता अस्सल आहे की कुणाच्या तरी स्वार्थी विचारांवर पोसलेली, बेगडी, तकलादू नि उथळ आहे? ज्या अस्मिता तत्वनिष्ठा वा विचारांच्या पायावर नव्हे, तर जाती-धर्माच्या आणि त्यातही सोशल मीडियासारख्या अनियंत्रित माध्यमातील हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या 'प्रबोधना'वर जोपासल्या जातात, बळकट होतात नि तारतम्य नसलेल्या कृतीला प्रवृत्त करतात, त्या व्यापक अर्थाने समाजाचे भले करु शकत नाहीत. मात्र, अल्पकाळात समाजाचं मोठं नुकसान करुन जातात. पण, हे 'कळे'पर्यंत या समाज माध्यमात वावरणारा, अशा फुकाच्या 'अस्मितां'नी फुरफुरणारा नि त्या आधारेच आपली मते बनवणारा कुणीही प्रवाहपतित होऊन हाती दगड घ्यायला प्रवृत्त होतो अन्‌ तिथेच हे माध्यम आपल्या स्वार्थासाठी हातळणाऱ्यांचे ईप्सित साध्य होऊ लागते. स्वार्थी, संकुचित राजकारणाच्या पटावर त्यांनी लीलया टाकलेल्या क्रिया- प्रतिक्रियांच्या नि पत्रके- 'पोस्ट'च्या सोंगट्या त्यांचा 'डाव' जिंकून देतात...

राजकारणासाठी प्रादेशिक वा भाषिक अस्मितांची चाचणी घेताना सोशल मीडियाचा नकारात्मकच वापर होतो, असेही नाही. अभिनेता रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशामागे माध्यमे अन्‌ समाजमाध्यमांच्या वापराचे तंत्रही आहेच. केवळ दक्षिणेतच नव्हे, तर देशात अन्‌ जगभरात अभिनेता रजनीकांत यांची प्रचंड 'क्रेझ' आहे. त्यांच्या 'सुपरस्टार' असण्यात त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांइतकाच त्यांच्या मागे असलेल्या चाहत्यांचाही मोठा वाटा आहे. पण, चित्रपटातील व्यक्तिरेखा नि त्यातून निर्माण झालेली अफाट, अचाट कर्तृत्व असलेल्या 'हीरो'ची प्रतिमा वेगळी आणि प्रत्यक्षातील राजकारणात उतरुन समाजासमोरची आव्हाने पेलणे वेगळे. अर्थात वास्तवाची समज असलेला कुणीही हे मान्य करेल. पण, रजनीकांत यांच्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करणाऱ्यांना नि त्यांचे चाहते असल्याचीच अस्मिता जपणाऱ्यांना ते पटेलच असे नाही. म्हणूनच जगातील कुठलीच गोष्ट अशक्‍य नसलेल्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याचे राजकारणात येणे हीच सर्वसामान्यांचे दुःख-दैन्य, अडचणी-समस्या चुटकीसरशी सुटण्याची अन्‌ केवळ घोषणेत अडकलेले नि स्वप्नात पाहिलेले 'अच्छे दिन' प्रत्यक्षात येण्याची नांदीच आहे, असे त्यांना वाटू लागते. केवळ चाहता असल्याची उथळ अस्मिता त्यांना एका आशेच्या, स्वप्नांच्या विश्‍वात घेऊन जाऊ शकते. पण, उद्या निराशा वा स्वप्नभंग झाला, तर एका अंध अस्मितेमुळे डोळस नि संवेदनशील अभिनेत्याविषयी असलेल्या मनस्वी भावनांचा बळी गेला, असेच म्हणायची वेळ येईल... 

खरे तर, समाजजीवनात वावरताना देशाबद्दलच्या अस्मितेशिवाय अन्य कोणताही अभिमान वा गर्वाचा विषय नागरिकांमध्ये असूच नये. जोपर्यंत एखाद्या समाजात अशा संकुचित अस्मिता रुजलेल्या असतात, तोवर त्या देशाची सर्वार्थाने प्रगती होत नाही. दंगली भडकावणाऱ्या, उथळ अन्‌ बिनकामाच्या अस्मितांचा बाजार जिथे रोज भरतो, त्या देश वा समाजाने महासत्तेचे स्वप्न पाहणे, हा खरं तर प्रमादच! मग पंतप्रधानांनी किती परदेश दौरे केले, जगात देशाचे किती वजन वाढले, परराष्ट्र धोरणात किती यश आले, अर्थव्यवस्था किती मजबूत झाली, एखाद्या राज्य वा प्रदेशात किती पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या इ. इ. गोष्टींना काही महत्व राहत नाही. कारण हे दिखावू यश जाती-धर्म, भाषा- प्रांत यांच्या पोकळ अस्मितांवर उभे असते. परिणामी 'विकासा'चा फक्त आभास निर्माण होतो. मनाने दुभंगलेल्या समाजाच्या पायावर शाश्‍वत मानवी 'विकासा'चे मनोरे उभे राहत नाहीत. अशा व्यवस्थेत वर्षानुवर्ष केवळ उथळ अस्मितांचा बाजार भरत राहतो. तिथे राजकारणाची दुकाने तेजीत चालतात अन्‌ दंगलीत दगड फेकणाऱ्यांचे नि ते खाणाऱ्यांचे जिणे मात्र आणखी भकास होत जाते...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com