संघाच्या परिवारातील 'वाद'! 

मंगळवार, 16 जानेवारी 2018

एकाच वैचारिक मुशीतून तयार झालेल्या सहप्रवाशांची वैचारिक भांडणे हा खरे तर समाजवादी बाणा; पण संघपरिवारातही असाच वाद शिरला असल्याचे प्रवीण तोगडिया यांच्या पत्रपरिषदेने स्पष्ट झाले आहे. मतभेद असण्यात काही गैर नाही; पण ते मनभेद असतील तर कठीण होते. 

एकाच वैचारिक मुशीतून तयार झालेल्या सहप्रवाशांची वैचारिक भांडणे हा खरे तर समाजवादी बाणा; पण संघपरिवारातही असाच वाद शिरला असल्याचे प्रवीण तोगडिया यांच्या पत्रपरिषदेने स्पष्ट झाले आहे. मतभेद असण्यात काही गैर नाही; पण ते मनभेद असतील तर कठीण होते. 

कुटुंबे एक राहावीत, माणसांची आणि संस्थांचीही ही सर्वसाधारण लोकभावना! मांगल्याची प्रार्थना करणाऱ्या देशव्यापी संघपरिवाराला तर असे वाटणे स्वाभाविकच. त्यामुळेच आज विश्‍व हिंदू परिषदेचे डा.ॅ प्रवीण तोगडिया यांनी पत्रपरिषदेत 'माझे एन्काउंटर करण्याचा डाव आखला जात आहे' असा जाहीर आरोप करणे धक्‍कादायक आहे. तोगडिया हे परिवारातील अतिजहाल प्रवाहाचे प्रतिनिधी! त्रिशूल दीक्षा देणे असेल किंवा लव्ह जिहादसारख्या संस्कृतीरक्षणाच्या तथाकथित कामात सक्रिय होणे असेल, तोगडिया ते सरसावून करतात. ऑन्कोलॉजिक सर्जन कॅन्सरसंबंधित शस्त्रक्रिया करणारा एखादा उच्चशिक्षित इसम टोकाची मते समाजात कशी पसरवतो, हे खरे तर कोडेच. पण तोगडिया सातत्याने एककल्ली विचारांची पखरण करत हिंडत असतात. 

अल्पसंख्यांक समाजाच्या लांगुलचालनाचा अतिरेक भारतात झाल्यामुळे प्रतिक्रियावादासाठी बहुसंख्य हिंदू सक्रिय झाले. विश्‍व हिंदू परिषदेसारख्या संघटना पूर्वीचे शांततामय काम सोडून आक्रमक झाल्या. मात्र बहुसंख्यांकांनी समाजात शांती राखण्याची जबाबदारी सरसावून स्वीकारायची असते, या वास्तवाचा विसर झालेले जे परिवारातले चेहरे आहेत त्यात तोगडिया अग्रेसर राहिले. गुजरात अस्वस्थ असताना गोध्रा हत्याकांडानंतर जे आक्रमक रौद्र रूप धारण केले गेले. त्याचा चेहरा तोगडिया होते. तोगडिया त्या काळी नव्यानेच गुजरातचे मुख्यमंत्रीपद हाती घेतलेल्या नरेंद्रभाई मोदी यांचे जवळचे होते. मोदी यांनी भाजपचे तर तोगडिया यांनी विहिंपचे काम करावे, हा निर्णय परिवाराने घेतला. मात्र गुजरात दंगली शांत झाल्यानंतर समाजाला कायम पेटते ठेवणे अनावश्‍यक असल्याची जाणीव सरकार या नात्याने मोदींना झाली तेव्हापासून तोगडियांशी असलेले त्यांचे संबंध दरुत्वाकडे झुकू लागले. 

अंतर वाढत गेले, तोगडियांचे हस्तक म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या विश्‍वासू सहकाऱ्यांना मोदींनी मंत्रिमंडळातून, सत्तेतून दूर हटवले अन मग एकेकाळी ज्या वैचारिक सहप्रवाशाच्या खांद्याला खांदा लावून काम केले तो हेतुपूर्वक अंतर पाडू लागल्याने तोगडिया कमालीचे दुखावले. त्यामुळेच तोगडिया सातत्याने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलत असतात. विमानात शेजारी बसलेल्या अनोळखी माणसाशीही बोलतानाही ते मोदी यांना दूषणे देतात. मोदी सत्तेत येताच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कारवाई करतील असे भाकीत करण्यापर्यंतची मजल तोगडियांनी काही वर्षांपूर्वीच गाठली होती. 

विश्‍व हिंदू परिषद ही काही अंशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही डोईजड होऊ लागल्याची चर्चा सुरू होतीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च्याच प्रेमात पडलेले 'नार्सिसिस्ट' असल्याचे कित्येकांचे मत! त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातल्या काहींच्या मनात थेट मोदींना आव्हान देणाऱ्या तोगडियांबददल उत्सुकता! छोटया संस्थांमध्येही मतभेदांचे आग्यामोहोळ कायम जागे, इथे तर संघपरिवारासारखा प्रचंड पसारा आहे. 'संघटनेपेक्षा व्यक्‍तीवादाचे स्तोम माजले आहे', अशी परिवारातल्या काहींची मोदींबद्दलची टिप्पणी असते. त्यामुळे तोगडियांच्या मोदीविरोधाचा अंतर्गत टीआरपी गुजरातेत तर एकेकाळी कमालीचा वाढलेला! 

राजस्थानात कधीतरी नोंदवलेल्या गुन्ह्यासंदर्भातल्या पकड वॉरंटमुळे त्यांना अहमदाबादेत पोलिस पकडायला आले होते. झेड सुरक्षा असलेले तोगडिया पोलिस पथकाला सापडले कसे नाहीत हे अप्रूपच! त्यातच विहिंपने 'सुरक्षेचे कवच असलेला आपला नेता गायब झाला आहे', अशी तक्रार जाहीर मंचांवरून केली. मग मधुमेहाच्या आजाराशी सामना करणारे तोगडिया बेशुध्द होऊन पडलेले आढळले. रूग्णालयातून उपचार घेऊन बरे झाल्यावर आज त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता 'माझ्या जीवाला धोका आहे' असे विधान केले. 

सोहराबुद्दीन प्रकरणापासून मोदी आणि शहा या जोडगोळीवर जे आरोप होतात, त्यामुळे प्रसारमाध्यमे तोगडिया यांचे आरोप चर्चेत ठेवतील हे निश्‍चित आहे. संघटनेत डोईजड ठरतील, असे वाटताच संजय जोशी या सहकाऱ्याला बदनाम करणारी सीडी प्रकाशात आणल्याचा आरोप या दोघांवर दबक्‍या आवाजात केला जातोच. ती कथित सीडी खरी होती का खोटी होती हा मुद्दा महत्त्वाचा आहेच; पण आपल्याच परिवारातल्या सहप्रवाशांना अशा प्रकारे संशयात टाकण्याचा दोघांवरचा आरोप खरा तर नाही ना अशी शंका घेण्याच्या जागा आहेत. 

डॉ. तोगडियांनी 'आपण धर्मरक्षणाचे, गोरक्षणाचे कार्य करतो' असे आजच्या पत्रपरिषदेत भावनिक डूब देत सांगितले. त्यांनी हाती घेतलेले काम असे असेल तर त्यासाठी त्रिशूल पूजनाची गरज काय? भारतासारख्या देशात यासाठी कायदे अस्तित्वात आहेत. वैचारिक मूस एक असलेल्यांचे सरकार सत्तेत असताना तोगडिया यांना आपले एन्काउंटर होईल या शंकेने पछाडले जातेच कसे? अशा टोकाच्या शंकांचे विखार मनात फुत्कारत का असावेत? सरन्यायाधीशांना आव्हान देणारी चार न्यायाधीशांची कृती घटनात्मक संकेतांचा भंग करणारी होती. उजव्या विचारांना आणि त्या विचारसरणीच्या सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयांवर टीकेचे आसूड ओढणाऱ्या पवित्र्यामुळे वैतागलेल्या परिवारातील काही मंडळींनी न्यायाधीशांची ही भयावह आगळीक डाव्यांचे षडयंत्र ठरवली. चहूबाजूंनी टीका सहन करणाऱ्या मोदी सरकारवर निर्गल वाटणारे आरोप करणाऱ्या तोगडियांचे काय.. ते तर परिवाराशी संबंधित आहेत. 

हताश झालेल्या तोगडियांची वाक्‍ताडने अन्यांना आतषबाजी वाटणार, हे उघड आहे. संघाचा संयत स्वर विहिंपत कितपत ऐकला जातो, हा प्रश्‍न खराच; पण तरीही तोगडियांनी उभे केलेले वादळ संघालाच हाताळावे लागणार आहे. काळ सोकावतो आहे.. एक दिलाने एकसंघपणे काम करण्याचे उद्दिष्ट विपदांमध्ये पार पाडणाऱ्या संघ परिवाराला नको त्या आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. भारतीय मजदूर संघाचे प्रणेते कुशाग्र मती दत्तोपंत ठेंगडी यांनी वाजपेयींना छोटे ठरवले होते.. जाहीरपणे आरोप केले होते.. नंतर तर सर्वोच्च पदावरुन वाजपेयी-अडवाणी यांनी पेटी पोलिटिशियन संबोधले गेले. वाजपेयींची सत्ता अशा अनेक योग्यपणे न हाताळल्या गेलेल्या वादांच्या ज्वाळांचे लक्ष्य ठरली. इतिहासाची अशी पुनरावृत्ती टाळणे गरजेचे नाही काय?

Web Title: marathi news marathi websites Pravin Togadia VHP Narendra Modi BJP RSS