'डेरा सच्चा सौदा' आणि गुरमीत राम रहीम सिंग प्रकरण नेमके आहे तरी काय?

अभय सुपेकर
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले 'डेरा सच्चा सौदा'चे प्रमुख गुरमीत रामरहीम सिंग यांच्याविरोधातील खटल्यामुळे सिरसामधील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर, गुरमीत सिंग आणि 'डेरा सच्चा सौदा' नेमके आहे काय, याचा 'सकाळ संशोधन व संदर्भ सेवे'ने घेतलेला हा आढावा.

 

 • राम रहीम यांच्याविरोधात असलेल्या केसेस - तीन
 • त्यांचे स्वरूप - बलात्कार, खून आणि बेकायदा शस्त्र बाळगणे 

1990 च्या दरम्यान पंजाबातील दहशतवादी कारवायांना पुरता अटकाव झाल्याने त्यांचा उपद्रव कमी झाला होता त्या काळात गंगानगर (राजस्थान) जिल्ह्यातील तेवीस वर्षीय गुरमीत राम रहीम जाट शिख मुलगा पंजाबातील सिरसा येथील डेरा सच्चा सौदा या धार्मिक पंथाचा प्रमुख झाला. भारतापासून पंजाब अलग करण्याचा खंदा पुरस्कार करणाऱ्या गुरूजंतसिंग राजस्थानी या खलिस्तान लिबरेशन फोर्सच्या (केएलएफ) कडव्या दहशतवाद्याशी तो जवळीक राखून होता. रहीम यांच्या आधीचे गादीचे वारसदार परमपिता शाह सतनाम सिंगजी महाराज यांच्या कपाळात गोळ्या घालून त्यांची गुरूजंतसिंगने हत्या केली होती, त्यानंतर रहीम डेराप्रमुख झाला. त्यावेळी त्याने आपले नाव हजूर महाराज संत गुरमीत राम रहीम सिंग असे घेतले. 1948 मध्ये सुरू झालेल्या डेरा सच्चा सौदाला नवे रूप रहीम यांनी मिळवून दिले. त्याच्या आधीपर्यंत पंथाचे काम शांततेने सुरू होते.

पंजाबमधील राजकीय नेत्यांच्या मतमतांतरांच्या धुळवडीमध्ये डेराचे लाखो लोक अनुयायी झाले आहेत. सिरसामधील अनेक उद्योगांना सरकारने करामध्ये सवलती दिल्या आहेत, त्याच परिसरात डेराकडे सुमारे सातशे एकर जमीन आहे, यातील काही जमीन त्यांनी लाटल्याचा आरोप केला जात आहे. 'डेरा'मध्ये शिस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेथे शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तेथे राहणारे ब्रह्मचर्य पाळतात, मात्र रहीम हे तीन मुलांचे वडील आहेत. 

'डेरा'मध्ये गैरकृत्ये चालतात, यावर 2002 मध्ये प्रकाश पडला. त्यावेळी एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून रहीम यांनी बलात्कार केल्याचा आणि तेथे मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण केले जात असल्याचा आरोप केला होता. येथे तीस ते चाळीस मुलींनी आपल्या छळवणुकीचा आरोप केला होता. त्यातील एकीने पत्रात, 'आपणाला देवी म्हणवले जाते पण प्रत्यक्षात वेश्‍येसारखे वागवले जाते, आपल्याला जिवाला धोका आहे,' असे नमूद केले होते. 

त्यानंतर विविध घटनांमध्ये राम रहीम याच्यावर बेकायदा कृत्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. जुलै 2002 मध्ये त्याच्यावर एका साध्वीच्या भावाचा खून केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला. याच युवकाने तिचे पत्र पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्याचे बोलले जाते. 

मे 2007 मध्ये पंजाबातील दोन दैनिकांमध्ये राम रहीम यांनी शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंदसिंह यांच्यासारखा पेहेराव केल्याचे छायाचित्र एका जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याने मोठ्या प्रमाणात असंतोष आणि संताप व्यक्त झाला. 'डेरा'चे सदस्य आणि कडवे शिख यांच्यात नेहमीच खडाजंगी होत असते. या घटनेनंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांच्यासमोरील विविध गुन्ह्यांबाबत त्यांना अटक केली होती. त्याने जनतेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. तथापि त्याने 'सीबीआय' बधले नाही. त्याने राम रहीम यांच्याविरोधात बलात्कार आणि दोन खून याबद्दल आरोप दाखल केले. 

ऑगस्ट 2007 मध्ये 'तहेलका'ने डेरा प्रमुखांचा माजी चालक आणि त्यांच्या इनरसर्कलमधील खट्टासिंग याची मुलाखत घेतली. त्यात त्याने राम रहीम यांच्या लोकांनी सात जणांचे खून केल्याचे सांगितले होते. त्याचे गुप्त रेकॉर्डिंग केले गेले होते. 'सीबीआय'ने त्याचीही दखल घेतली. 

अशा विविध आरोपांच्या भोवऱ्या डेरा सच्चा सौदा आणि राम रहीम होते तरीही त्याच्या अनुयायांची संख्या मात्र वाढत होती. राम रहीमने आडमुठेपणाची भुमिका कायम ठेवली, गुरू गोविंदसिंह यांच्यासारखा पेहेराव केल्याबद्दल कधी माफीही मागितली नाही. उलट तो जेव्हा अंबाला न्यायालयात हजर व्हायला आला तेव्हा त्याच्या कारबरोबर 50 कारचा ताफा होता. सव्वा लाख अनुयायी रस्त्यावर आले होते. शाळा, महाविद्यालये बंद ठेवली होती. 

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्समधील नेत्रतज्ञ आदित्य इन्सान डेराचे प्रवक्ते आहे. ते 'डेरा'वरील सर्व आरोप फेटाळून लावतात. विरोधी राजकारणी या डेराबाबत अपप्रचार करतात. कोणत्याही प्रकारचे लैंगिक शोषण केले जात नाही. आपली स्वतःची मेव्हुणी डेरामध्ये राहिलेली आहे, असे ते सांगतात. 

डेरा सच्चा सौदाबाबत एवढे आरोप होऊनही त्यांच्यावरील खून, बलात्कार, लैंगिक शोषण, बेकायदा पद्धतीने शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जमविणे, लोकांना बडविणे या घटनांचा अद्याप हवा तसा तपास झालेलाच नाही. 

काय आहे डेरा सच्चा सौदा 

 • 1948 मध्ये मस्ताना बलुचिस्तानी यांनी अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, या हेतूने डेरा सच्चा सौदाची हरियाणातील सिरसी येथे स्थापना केली. 'डेरा'ने अल्पावधीत रक्तदान शिबिरे, वृक्षरोपण मोहीमा हाती घेऊन मोठी प्रसिद्धी मिळवली. अनेकदा तो वादाच्या भोवऱ्यातही सापडला. 
 • 'सच्चा सौदा' हा शब्दप्रयोग गुरू नानकदेवजी यांच्या जीवनातील घटनेवरून घेतलेला आहे. एकदा वडिलांनी गुरू नानकदेव यांना ते तरूण असताना बोलावून घेऊन त्यांना काही पैसे दिले आणि सांगितले की, हे पैसे घे आणि त्यातून असा काहीतरी व्यवसाय कर की जेणेकरून तू नफा कमावशील आणि व्यवसायाची काही गुण अवगत करशील. गुरू नानकदेवजी यांनी त्या पैशांमधून अन्न विकत घेतले आणि ते गरिबांना वाटून दिले. त्यानंतर आपल्या वडिलांकडे जावून आपण खरा सौदा (सच्चा सौदा) केला आहे, असे सांगितले. 
 • मस्ताना बलुचिस्तानी यांच्यानंतर शाह सतनामसिंग त्यांचे उत्तराधिकारी झाले. त्यांची हत्त्या झाल्यानंतर त्यांच्या जागी गुरूमित राम रहीम सिंग गादीवर विराजमान झाले. 

डेरा सच्चा सौदाचे आध्यात्मिक तत्वज्ञान 
बलुचिस्तानातून आलेल्या शाह मस्तानाजी महाराज यांनी घालून दिलेल्या मार्गाने पंथाची वाटचाल सुरू आहे. त्याची तत्वे अशी - 

 • धर्मनिरपेक्षता, समानता, संपत्तीचा हव्यास धरायचा नाही, सत्य आणि सर्वांवर विश्‍वास, प्रार्थना आणि ध्यान धारणा हेच सत्याचे मार्ग आहेत, वैयक्तिक शिस्तीचे काटेकोर पालन, सामाजिक संकेतांची शिस्त पाळणे, कठोर परिश्रम, पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्तीसाठी ध्यान धारणा या मार्गांचा अवलंब करणे 
 • शाह सतनामजी ग्रीन एस वेल्फेअर फोर्स या सेवाभावी संस्थेची डेरा सच्चा सौदाने वेगळी स्थापना केली आहे. त्याचे 44 हजारांवर सेवाभावी कार्यकर्ते असून, त्यामध्ये डॉक्‍टर, इंजिनियर, निमवैद्यकीय मंडळी, व्यापारी, बचाव कार्य करणारी मंडळी यांचा समावेश आहे. या संस्थेच्या सेवेकऱ्यांनी देशात विविध ठिकाणी मदत आणि बचावकार्य राबवलेले आहे. न्यूझीलंडमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाच्या मोहिमा राबवल्या आहेत. 
 • जागतिक रेकॉर्ड - या संस्थेने जगात आपल्या कार्याने काही उच्चांकही स्थापीत केले आहेत. यामध्ये त्यांनी घेतलेले सर्वाधिक रक्तदानाची शिबिरे, सर्वाधिक डोळे तपासणी शिबिरे आणि जगात सर्वात मोठ्या संख्येने वृक्षरोपण मोहीम राबवणारी संस्था या वैशिष्टांचा समावेश आहे. वेश्‍यांचे विवाह करून त्यांना त्या व्यवसायातून बाहेर पडायला मदत करण्याच्या हेतूने मोहीम राबवण्यात आली, त्याला एक हजार 450 वर अनुयायांनी प्रतिसाद देऊन त्यांची सूचना अंमलात आणली आहे. 'शाही बेटीयॉं बसेरा' उपक्रम राबवून त्यांनी मुलींची होणारी हत्या रोखण्याचा प्रयत्न केला आहे. 

आणखी काही..

 • या संस्थेने जगात आपल्या कार्याने काही उच्चांकही स्थापीत केले आहेत. यामध्ये त्यांनी घेतलेले सर्वाधिक रक्तदानाची शिबिरे, सर्वाधिक डोळे तपासणी शिबिरे आणि जगात सर्वात मोठ्या संख्येने वृक्षरोपण मोहीम राबवणारी संस्था या वैशिष्टांचा समावेश आहे. वेश्‍यांचे विवाह करून त्यांना त्या व्यवसायातून बाहेर पडायला मदत करण्याच्या हेतूने मोहीम राबवण्यात आली, त्याला एक हजार 450 वर अनुयायांनी प्रतिसाद देऊन त्यांची सूचना अंमलात आणली आहे. 'शाही बेटीयॉं बसेरा' उपक्रम राबवून त्यांनी मुलींची होणारी हत्या रोखण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरातमध्ये 2001 मध्ये झालेल्या भूकंपावेळी डेरा सच्चा सौदाचे अनुयायी मदतीसाठी धावून गेले होते. 
 • 2004 मध्ये परमपिता शाह सतनामजी एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून सिरसा येथे शाह सतनामजी क्रिकेट स्टेडियम बांधण्यात आले. आशियातील दुसरे मोठे असलेल्या या स्टेडियमचा विस्तार शंभर एकर जागेवर असून, त्यांची आसन क्षमता तीस हजार लोकांची आहे. त्याची उभारणी दहा हजार लोकांनी 45 दिवस राबून केली आहे. 
 • इंद्रिय आणि नेत्र दानाला डेरा सच्चा सौदाने प्रोत्साहन दिले आहे. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाल्याने याबाबतीत ही संघटना आघाडीवर असल्याचे बोलले जाते. 
 • 10 ऑक्‍टोबर 2002 रोजी राम चंदर छत्रपती या सिरसा येथील 'पूरा सच'च्या संपादकाचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्या प्रकरणी दोघांना अटक केली होती. छत्रपतींनी डेरामधील घटनांबाबत वृत्तमालिका प्रसिद्ध करणे सुरू केले होते, त्यानंतर ही घटना घडली. या प्रकरणाच्या तपासात गोळीबारासाठी वापरलेली बंदूक डेराचा व्यवस्थापक कृष्णलाल याच्या नावावर असलेली आढळली. तसेच त्यांच्या संवादासाठी वापरलेली वॉकीटॉकी यंत्रणेचा परवाना डेराच्या नावावर असल्याचे लक्षात आले. तसेच सीबीआयने डेराचा अनुयायी गोबीराम याने सीबीआय न्यायाधीश ए एस नारंग यांच्यासमोर आपल्या विधान मागे घेतल्याने सीबीआयने त्याचे नावही काढून टाकले होते. 

(सकाळ संशोधन व संदर्भ सेवा)

Web Title: marathi news marathi websites Punjab News Dera Saccha Sauda Gurmeet Ram Rahim Singh