'सुदिरसूक्त'चा वाद हा असाही

बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

विष्णू सूर्या वाघ यांच्या 'सुदिरसूक्त'वरून साहित्यिक वर्तुळात बरीच भवती न भवती झाली. मुंबईत यावरून निदर्शनेही झाली. सोशल मीडियावरच्या चकमकी सुरूच आहेत. याबाबत थेट गोव्यात काय परिस्थिती आहे, त्याबाबतचा हा कानोसा...  

गोव्यात सध्या शांत, सुशेगाद अशा सामाजिक वातावरणात अकारण वादाचे तरंग उठू लागले आहेत. भाजपचे माजी आमदार व नामवंत साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांच्या सुदिरसूक्त या गेली चार वर्षे फारसे कोणालाही आठवत नसलेल्या कवितासंग्रहावरून हे तरंग आकाराला येत आहेत. कोणी त्याला अभिजन विरुद्ध बहुजन अशा संघर्षाचे रूप देऊ पाहत आहे, तर कोणी त्यातून आपले इप्सित साध्य करू पाहत आहे. एकंदरीत गोमंतकीय कोकणी साहित्य क्षेत्रातील 'कारभारा'चाही पंचनामा यानिमित्ताने होत आहे. 

सुदिरसूक्त म्हणजे शुद्रांचे सुक्त. गोव्यात सारस्वत समाज विरोधात बहुजन समाज असा जो संघर्ष होता त्याची झालर या कविता संग्रहातील कवितांना आहे; मात्र वाघ यांच्यावर अन्याय केला जात आहे असे जे चित्र निर्माण केले जात आहे ते निखालस खोटे वाटते. गोवा सरकारने कोकणी साहित्य सेवा पुरस्कार देण्याची सर्व प्रक्रियाच रद्द केल्याने अन्याय झालाच असेल तर तो सर्वांवर झाला आहे. 

गोवा कोकणी अकादमी साहित्य सेवा पुरस्कार जाहीर करते. आजवर हे पुरस्कार कोणाला मिळाले हे पुरस्कार विजेते सोडल्यास अन्य कोणाला आठवण्याचेही कारण नाही. त्या पुरस्कारांचा जीवच तेवढा. त्यातील एक पुरस्कार विष्णू वाघ यांच्या सुदिरसूक्त या कवितासंग्रहाला मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आणि त्यातील कवितांच्या भाषेला आक्षेप घेण्यात आला. या सगळ्यांना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वेळीच गप्प केले. अन्यथा हा वाद वाढविण्यात रस असलेल्यांनी तो आणखीन लांबवला असता. 

पर्रीकर यांनी पुरस्कार ठरविण्यासाठी नेमलेल्या समितीवरील काही जण कसे 'लायकी'चे नव्हते त्यावर बोट ठेवत पूर्ण प्रक्रियाच रद्द केली. 'हितसंबंध गुंतलेल्या व्यक्ती या समितीवर होत्या', हे मुख्यमंत्र्यांचे उद्‌गार आजवर दिलेल्या पुरस्कारांच्या बाबतीत निश्‍चितपणे शंका उपस्थित करतात. अर्थात, साहित्य क्षेत्राला पुरस्कारासाठी होणारे लॉबिंग नवीन नाही. तरीही सरकारचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी त्याची चिरफाड करावी हे कोकणी साहित्य क्षेत्राला लांच्छनास्पद असेच आहे. त्याची चाड वा चीड कोणालाच नाही. दुसऱ्याच दिवशी हे पुरस्कार रद्द केले हे बरोबर की चूक याची चर्चा करण्यात सारेजण धन्यता मानत होते. 

मुळात वाघ यांच्या भाषेला आक्षेप घ्यायचाच असता तर तो आधीच घ्यायला हवा होता. सुदिरसूक्त प्रकाशित होऊन चार वर्षे झाली तरी कोकणी भाषेचे संरक्षणकर्ते गप्प का होते हा मूळ प्रश्‍न आहे. त्यामुळे या वादाला वैयक्तिक हिशेब चुकता करण्याचा वास येणे साहजिक आहे. 

गोव्याबाहेरील साहित्यिकांना हा वाद वाघ यांच्याविरोधात आहे, असे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे वाघ यांच्या बाजूने साहित्य विश्‍वातून प्रतिक्रिया येणे साहजिक आहे. या प्रकरणाची सुरुवात कशी झाली हे पाहिले तर याची बऱ्यापैकी उकल होईल असे वाटते. कवी संजीव वेरेकर या समितीच्या सदस्यपदी होते. त्यांनी वाघ यांच्या पुस्तकाला पुरस्कार मिळत आहे आणि तो मिळता कामा नये, अशी भूमिका पुरस्कार जाहीर होण्याआधीच घेतली. यावरून तरी वेरेकर यांनी हा वाद सुरू केला असे दिसते. आता वाघ यांच्याशी वेरेकर यांची वाकडीक असण्याचे काही कारण नाही; मात्र त्यांची वाकडीक या पुस्तकाच्या प्रकाशिका असलेल्या हेमा नाईक यांच्याशी असू शकते. अनेक वर्षे कोकणी साहित्य क्षेत्रात वावरणाऱ्या वेरेकर यांना आजवर साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला नाही याचे शल्यही असू शकते. वाघ यांनीही तसे यापूर्वी एका स्थानिक दैनिकातही लिहीले आहे. 

कोकणी अकादमीच्या अध्यक्षपदी साहित्यिक पुंडलिक नाईक अनेक वर्षे होते. त्यांच्यामुळे आपल्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला नसावा, असे वेरेकर यांना वाटू शकते. हेमा या पुंडलिक यांच्या पत्नी, त्यामुळे हा वाद का सुरू झाला याची उकल अशी असू शकते; मात्र आपला वाद, वाघ यांच्याशी नाही तर काही कवितांतील शब्दांना आपला आक्षेप आहे, असे वेरेकर यांचे म्हणणे आहे. 

आता महत्त्वाचा दुसरा मुद्दा शिल्लक राहतो तो कवितेतील भाषेचा आणि बहुजन अभिजन वादाचा. हा वाद पूर्वीही होता. गोवा मुक्तीपूर्वकाळात बहुजनांच्या मालमत्ता अभिजन वर्गाने काढून घेतल्या ही वस्तुस्थिती आहे. उच्च जातीविषयी बहुजन समाजात तिडक होती. आजही खासगीत तसे उल्लेख येतात, पण तुरळकपणे. त्यात पूर्वीचा अभिनिवेश आज शिल्लक नाही. वाघ यांनी कवितांत वापरलेली भाषा कधीकाळी बहुजनांच्या तोंडात होती; मात्र आता भाषेवरून जात ओळखण्याचे दिवस मागे पडत गेले आहेत. कोकणी चळवळीमुळेच कोकणीचे प्रमाणीकरण झाले आणि त्याचा जातीनिहाय, विभागनिहाय असलेला तोंडवळा गळून पडला आहे. 15 लाख लोकसंख्येच्या गोव्यात आता मूळ गोमंतकीय किती हा संशोधनाचा विषय झाला आहे. 1963 ते 1990 पर्यंत देशभरातील नानाविध प्रांतातले लोक गोव्यात स्थायिक होत गेले आहेत. त्यामुळे गोव्याने कधी बहुभाषी तोंडवळा धारण केला हेच समजून आलेले नाही. 

केवळ वादापुरता वाद म्हणून सुदिरसूक्तबाबतच्या वादाकडे सध्या पाहिले जात आहे. यातून समाजमन ढवळून निघेल याची काही शक्‍यता वाटत नाही. वाघ सध्या आजारी आहेत. ते ठीक असते, तर या वादात समोरच्याला बोचकारे काढत त्यांनी निश्‍चितपणे उत्तरही दिले असते; पण मुळात ते उत्तर देण्याच्या स्थितीत असताना हा वाद करण्याचे धाडस तरी कोणी केले असते का हाच खरा प्रश्‍न आहे. 

नव्या घडामोडींनुसार वाघ यांचे सुदिरसूक्त आता अनेक भाषांत भाषांतरीत होणार आहे. त्यासाठी एन. शिवदास, देविदास आमोणकर आणि रोहिदास शिरोडकर या साहित्यप्रेमींनी कंबर कसली आहे. त्याशिवाय सुदिरसूक्तमधील कवितांचे वाचन राज्यभरात केले जाणार आहे. एखाद्या कोकणी पुस्तकाला (कोकणीला राजमान्यता मिळाल्यापासून) असा मान पहिल्यांदाच मिळत आहे याची नोंद इतिहासात होईल; मात्र वाद का झाला हे कालपरत्वे विसरले जाईल... गोव्यातील साहित्य क्षेत्राच्या दृष्टीने तेच योग्य ठरेल.

Web Title: marathi news marathi websites vishnu surya wagh goa Avit Bagle