सार्वजनिक गणेशोत्सवासमोर आव्हान समाज सांधण्याचे... 

File photo
File photo

गणेशोत्सवाची सुरवात लोकमान्यांनी केली का भाऊसाहेब रंगारी यांनी याबाबतचा वाद चिघळला असताना समाज दुभंगण्याची दुश्‍चिन्हे दिसू लागली आहेत. देवघरातल्या आणि प्रामुख्याने काही वरिष्ठ मानल्या गेलेल्या जातींकडूनच पूजल्या जाणाऱ्या गणेश देवतेला पुण्यातील समाजधुरिणांनी रस्त्यावर आणून त्याचे पूजन बहुजनांनाही खुले केले ते ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी, स्वराज्य मिळविण्यासाठी. त्याच गणेशाच्या सार्वजनिक पूजनाची गरज आता भासते आहे ती तडे जात असलेल्या समाजाला पुन्हा सांधण्यासाठी... शतकोत्तर रौप्यमहोत्सव गाठून पुढची वाटचाल करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवापुढचे महत्त्वाचे आव्हान आहे ते हे...! 

देशात स्थिरावलेल्या ब्रिटिशांविरोधात उठाव करण्यासाठी विविध आयुधांचा वापर सुरू झाला आणि आपण एक झालो तर काय करू शकतो, या स्वताकदीचा साक्षात्कार समाजपुरूषाला व्हावा याकरिता गणेशोत्सव, शिवजयंतीचा वापर करता येईल, अशी कल्पना त्यावेळच्या द्रष्ट्या समाजधुरिणांना सुचली. सरदार खासगीवाले यांनी ग्वाल्हेरच्या राजदरबारातील गणेशोत्सव पाहिला आणि तसाच उत्सव पुण्यात का होऊ नये, असा प्रश्‍न त्यांच्या मनात आला. ते पुण्यात परतले आणि त्यावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील समाजधुरिणांची बैठक झाली ती शालूकर बोळातील भाऊसाहेब जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी यांच्या घरी. अर्थात ग्वाल्हेरहून परतलेल्या खासगीवाले यांच्यासहित महर्षि अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटवडेकर, लखूशेठ दंताळे, बळवंत नारायण सातव, नाना नारायण भोर, खंडोबा तरवडे, बळवंत नारायण कोकाटे, मामा हसबनीस, गंगाधर रावजी खैर, रामभाऊ बोधने, दगडूशेठ हलवाई आदी त्यास उपस्थित होते. सार्वजनिक उत्सव साजरा करण्याचा आणि लोकांना एकत्र आणण्याचा निश्‍चय या बैठकीत झाला. खासगीवाले 1888 पासून उत्सव करीत असले तरी त्यांनीही उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याचे ठरविले. पहिल्या वर्षी भाऊसाहेब रंगारी, खासगीवाले आणि गणपतराव घोटवडेकर यांनी गणपती बसवले. त्यानंतर हळूहळू उत्सवातील मंडळे वाढू लागली. या सगळ्या समाजधुरिणांचे उद्दिष्ट एकच होते समाज एकत्र करणे. लोकमान्य टिळक हे खासगीवाले यांच्या घरी झालेल्या बैठकीला उपस्थित नव्हते तरी उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची त्यांची सुस्पष्ट भूमिका त्यांनी उत्सवाच्या अगदी प्रारंभीच्या वर्षांत "केसरी'मध्ये लिहिलेल्या अग्रलेखांमध्ये दिसून येते. "या उत्सवास जे सार्वजनिक स्वरूप प्राप्त होते आहे त्याबद्दल दोन शब्द... राष्ट्राच्या अभ्युदयाकरिता असे उत्सव असणे जरूरी आहे... कोणत्याही लोकांत ऐक्‍याची वृद्धि होण्यास अनेक साधने असतात. एक उपास्यदैवत असणे हे त्यापैकींच एक कारण आहे... मेळेवाल्यांनी प्रत्येक पदांत काही तरी सार्वजनिक हिताहिताचा उल्लेख केलेला होता, मग तो एकीने वागण्याबद्दल असो, रायगडी जाण्याबद्दल असो... गणेशोत्सवास राष्ट्रीय स्वरूप यावे अशी "केसरी'कारांची उत्कट इच्छा आहे... ' (अग्रलेख -- 3 सप्टेंबर 1895 आणि 22 सप्टेंबर 1896.) 

गणपती उत्सव सार्वजनिक करण्याचा निर्णय सर्वांनी एकमताने घेतला होता. त्यामुळेच सार्वजनिक उत्सवाच्या पहिल्याच वर्षी खासगीवाले यांच्या गणपतीसमोर प्रा. जिनसीवाले यांचे व्याख्यान टिळकांच्या अध्यक्षतेखाली झाले होते आणि 1894 मध्ये तर स्वतः टिळकांनी विंचूरवाड्यात आपला उत्सव सुरू केला. 

भाऊसाहेब रंगारी यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देण्यात बजावलेली कामगिरी महत्त्वपूर्ण अशीच होती. एक तर त्यांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या निवासस्थानी जाणत्यांची बैठक आयोजित केली. भाऊसाहेबांनी स्वतः केलेली गणेशमूर्ती ही राक्षसाशी युद्ध करणारी होती. या मूर्तीतील राक्षस म्हणजे ब्रिटीश सत्ता होती आणि त्या स्फूर्तिदायी मूर्तीमुळे ब्रिटिशांविरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा युवकांना मिळू लागली. क्रांतिकारकांना भाऊसाहेब रंगारी यांनी शस्त्रास्त्रे पुरवली. तसेच सावरकर- सुभाषचंद्र बोस-पंडित मदन मोहन मालवीय-सेनापती बापट-दादासाहेब खापर्डे-लोकमान्य टिळक आदी क्रांतिकारक-समाजसुधारकांपर्यंतच्या अनेकांची व्याख्याने आयोजित करून ब्रिटिश सत्ता उलथवून टाकण्याची मोहीम राबविण्याचे मोलाचे कामही भाऊसाहेबांनी केले. या सर्वच समाजधुरिणांना केवळ ध्येय दिसत होते, त्यापुढे त्यांना वैयक्तिक कोणतीच महत्त्वाकांक्षा नव्हती आणि त्यासाठी ते सर्व जण जात-पात-धर्म न पाहता तसेच श्रेयाचा विचारही मनात न आणता एकदिलाने उत्सव करीत होते. त्यामुळेच भाऊसाहेब रंगारी आणि इतर समाजधुरिणांचे लोकमान्यांनी 26 नोव्हेंबर 1893 च्या "केसरी'त जाहीर आभार मानले होते. "यंदा येथे गणपती पोचविण्याचा समारंभ (विसर्जन मिरवणूक) सालाबादपेक्षा निराळ्या तऱ्हेने होऊन त्यास बरेच सार्वजनिक स्वरूप आले आहे...करिता यंदाच्या साली ज्या गृहस्थांनी खटपट केली त्यांचे लोकांनी आभार मानिले पाहिजेत,' अशी लोकमान्यांची वाक्‍ये भाऊसाहेब रंगारी आणि इतर पुढाकार घेणाऱ्यांसाठीचीच आहेत, हे निस्संशय. 

उत्सवातील मंडळांचा सहभाग एक-दोन वर्षांतच भरपूर वाढला. तीन गणपतींच्या उत्सवानंतर पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती, अखिल मंडई मंडळ, पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्‍वरी, अखिल नवी पेठ-हत्ती गणपती, शनिपार मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ यांनी उत्सव सुरू केला. ऐन पारतंत्र्यात उत्सव सुरू करण्यात आला तो स्वराज्यासाठी. या उद्दिष्टपूर्तीसाठी मेळ्यांचा वापर सुरू झाला. देशभक्ती निर्माण करण्यासाठी ऐक्‍याचा मंत्र जपण्यात येऊ लागला. लोकमान्यांनी 20 सप्टेंबर 1907 च्या गणेश विसर्जन प्रसंगी मुठा नदीच्या काठावर झालेल्या समारोपात्मक भाषणात म्हटले होते, ""गणपति-विसर्जनानंतर घरी गेल्यावर तुम्हाला ओकेओके वाटेल, ज्या गोष्टीची सवय होते ती नाहिशी झाल्याने तिचा मनाला चटका लागणे साहजिक आहे. यावर माझे असे सांगणे आहे की, हजारो वर्षे जी गोष्ट तुम्ही भोगलीत ती गोष्ट - म्हणजे स्वराज्य - गेल्यावर तुमच्या मनाला किती चटका लागला पाहिजे याचा विचार करा... गणपतीची आरती करताना स्वाराज्यं, वैराज्यं, पारमेष्ठ्यं हे मागण्याची आपली पूर्वापारची चाल आहे. तुम्ही या शब्दांचा अर्थ विसरून गेला होता... स्वराज्याची प्राप्ति व्हावी असे आम्ही इच्छावयाचे आहे. विशेष वैभवाने, उत्साहाने, स्वातंत्र्याने गणेशोत्सव करता यावा, असे इच्छावयाचे आहे... विसर्जनानंतर स्वदेशी व बहिष्कार ही वाळू येथून नेऊन तुम्ही आपापल्या घरात पसरावी...,'' 

उत्सवाचा पहिला टप्पा गाजवला तो मेळ्यांनी. वेगवेगळी पदे सुस्वर स्वरात गाणाऱ्या या मेळ्यांनी वातावरणात वेगळाच उल्हास पसरत असे. मेळ्यांपाठोपाठ अभिजात, शास्त्रीय संगीतानेही पुणेकरांची मने रिझू लागली होती. अनेक ख्यातनाम कलावंत आपली कला गणेशोत्सवात सादर करण्यासाठी येऊ लागले. शहनाईसम्राट बिस्मिल्ला खॉं, पंडित नारायणराव व्यास, भीमसेन जोशी, मोगूबाई कुर्डीकर, छोटा गंधर्व, ओंकारनाथ ठाकूर, कृष्णराव फुलंब्रीकर, हिराबाई बडोदेकर, सुरेशबाबू माने, सरस्वतीबाई राणे, गंगूबाई हनगळ, ज्योत्स्ना भोळे, इंदिराबाई खाडिलकर, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, जयमाला शिलेदार, बाबूराव खळदकर असे एकसे बढकर एक कलाकार पुणेकरांना तृप्त करीत होते. त्याचबरोबर भावगीतेही रसिकांना आवडू लागली होती. जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे, सुधीर फडके, मालती पांडे, गोविंद कुरवाळीकर, बबनराव नावडीकर, अशोक जोगळेकर, दत्ता वाळवेकर, सरस्वती काळे यांची गीते तरूणांमध्ये गाजत. 

उत्सवाच्या सव्वाशे वर्षांत पुण्यावर अनेक संकटे आली असतानाही उत्सव मात्र उत्साहाने साजरा होत राहिला. 1897 मध्ये आलेली प्लेगची साथ असो, 1942 च्या स्वातंत्र्यालढ्यात निर्माण झालेल्या तणावाने तब्बल चाळीस दिवसांनी झालेले विसर्जन असो, 1961 चा पानशेतचा पूर असो. त्याचा उत्सवावर कमीअधिक परिणाम होऊनही उत्सव सुरूच राहिला. 

पुण्याचा गणेशोत्सव पाहायला जाणे, ही बाब महाराष्ट्राच्या विविध भागांतील रहिवाशांना पर्वणी असे. पुण्याच्या गणेशोत्सवाची आरास पाहण्याजोगी होती आणि त्यात काळानुसार बदल होत गेले. सुरवातीच्या काळात काचेच्या हंड्या आणि बेल्जियमचे आरसे यांची आरास प्रामुख्याने होती. आरश्‍यामध्ये गणेशाच्या एका मूर्तीच्या अनेक प्रतिमा दिसत असल्याने लोक खूश होत. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीमागे कापसाचे ढग करून त्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रकार करण्यात आला. त्या काळात प्रकाशझोत ही कल्पना नवीन असल्याने त्याला प्रतिसादही भरपूर मिळाला. 

एखादा विषय घेऊन तो मांडवामध्ये मांडणे ही प्रथा गेल्या सुमारे साठ वर्षांपूर्वी सुरू झाली. भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळविल्याचा देखावा गाजला. सुरवातीला धार्मिक-पौराणिक देखाव्यांवर भर असे. कालांतराने त्यात सामाजिक विषय हाताळण्यात येऊ लागले. त्यात व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, हुंडाबळी पर्यावरणाची हानी असे देखावे करण्यात येऊ लागले. आराशीमध्ये देखाव्यांबरोबरच संगीताच्या तालावर नाचणारी विद्युतरोषणाई प्रेक्षकांना पसंत पडत गेली. "गाईड' चित्रपटातील "होटों पे ऐसी बात...' तसेच "तिसरी मंझील' चित्रपटातील "आजा आजा, मैं हूं प्यार तेरा...' अशी गीते अनेक दशके आपली लोकप्रियता टिकवून आहेत. बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मंडळासारखी काही मंडळे रोषणाईसाठी तर चिंचेची तालीम सारखी मंडळे संगीताच्या तालावर नाचणाऱ्या कारंज्यासाठी प्रसिद्ध आहेत. दर्जेदार देखावे करण्याची परंपरा तुळशीबाग, हुतात्मा बाबु गेनू, हिराबाग, साखळीपीर तालीम, खडकमाळ आळी, शाहू चौक, हत्ती गणपती, दत्त क्‍लब, खजिना विहीर यांसारख्या मंडळांनी राखली. हजारो दिव्यांनी नटलेल्या विविध मंदिरांच्या प्रतिकृतीमध्ये विराजमान झालेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, नेहमीच प्रसन्नता देणारा अखिल मंडई मंडळाचा शारदा-गणेश ही पुण्याच्या उत्सवाची वैशिष्ट्ये ठरतात. विसर्जन मिरवणुकीत दर्जेदार रथांची परंपरा मंडई मंडळाने सुरू केली. पेरूगेट, नातूवाडा यांसारखी काही मंडळे वैज्ञानिक देखाव्यांसाठी प्रसिद्धीस आली. 

स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाने लोकशिक्षणाची जबाबदारी पार पाडायला सुरवात केली. अनेकविध विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करण्याचे काम उत्सवाने केले. त्याचप्रमाणे "सार्वजनिक कार्यकर्ते तयार करण्याची शाळा' अशीही ख्याती उत्सवाने मिळविली. एकाच गल्लीत राहणारे तरूण उत्सवासाठी एकत्र येतात, ही बाब समाज घडविण्यासाठी उपयोगी ठरली. कार्यकर्त्यांची उत्सवाआधी होणारी बैठक, त्यात देखाव्यापासून ते मिरवणुकीपर्यंतची होणारी चर्चा आणि त्यातील निर्णयांचा नंतर होणारा अंमल यांतून एकीची भावना दृढ होत होती. चित्रकला येणारा कार्यकर्ता पडदे रंगवत असे तर विजेच्या यंत्रणेची माहिती असणारा कार्यकर्ता वायरी जोडत असे. 

चांगले सांस्कृतिक कार्यक्रम असण्याच्या ठिकाणी पूर्वी गर्दी होत असे. कसब्यातील फडके हौद चौकाजवळील वज्रदेही मारूती मंडळासमोर रस्त्यावरच सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची परंपरा होती. अनेक दिग्गज कलावंतांनी रस्त्यावरील या मैफिलींमध्ये आपली कला "श्रीं'च्या चरणी अर्पण केली आहे. काही मंडळे रस्त्यावर पडदा बांधून चित्रपट दाखवत. त्यालाही गर्दी होई. कसब्यातील सरदार मुजुमदार वाड्यात किर्तनादी कार्यक्रमांचा कल्लोळ असे. 

आराशीमध्ये काळानुरूप वैविध्य येत गेल्याचे पुण्यातील उत्सवाच्या पाऊलखुणा पाहिल्या की दिसते. काही वेगळे प्रयोग करण्याची अहमहमिका मंडळांमध्ये लागत असे. नगाऱ्याच्या तालावरील विद्युतरोषणाईचा असाच प्रयोग हुतात्मा बाबु गेनू मंडळाने केल्याचे आठवते. हिराबाग मंडळाने गणपतीच्या आकाराचा फुगा करून त्यात हवा भरून तो मोठा होताना दाखवला होता. धार्मिक, पौराणिक देखावे कायमच होत होते, पण आता सामाजिक देखाव्यांचीही त्यात लक्षणीयरित्या भर पडली आहे. हुंडाबळी, पर्यावरणरक्षण, कचरा निर्मूलनाच्या आधुनिक पद्धती आदी अनेक विषय मंडळे हाताळू लागली. जिवंत देखाव्यांची परंपरा काही मंडळांनी जपली आणि देखाव्यातील विषयाला नाट्यरूप देऊन कलाकार मंडळी तो साकारू लागली. सुरवातीच्या काळात त्वष्टा कासार समाज मंडळाने काही वर्षे हा प्रयोग केला आणि सहकारनगरच्या गवळीवाड्यापर्यंतची अनेक मंडळेही त्याकडे वळली. त्वष्टा कासार मंडळाने महिलांना मोठ्या संख्येने उत्सवात आवर्जून आणले. बुधवारातील साईनाथ मंडळाने जवानांच्या संघर्षापासून ते मुलांच्या लैंगिक शोषणापर्यंतचे अनेक नाजूक विषयही हाताळले. शुक्रवारातील सेवा मित्र मंडळाने ध्वनिचित्रफितींद्वारे देखावा सादर करण्याची प्रथा अनेक वर्षे पाळली. रात्री दहाला ध्वनिवर्धक बंद करण्याच्या आदेशामुळे दहानंतर प्रत्येक प्रेक्षकाच्या कानात हेडफोन देऊन त्याद्वारे देखाव्यातील संवाद ऐकवण्याचा वेगळाच उपक्रम पेरूगेट मंडळाने राबवला. मेहुणपुरासारखी शनिवार-नारायण पेठांतील काही मंडळे दरवर्षी वैज्ञानिक विषयांवर आधारित देखावे सादर करण्यात पुढे असल्याचे दिसते. 

गणेशोत्सव आणि आर्थिक उलाढाल हाही एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरावा. या उत्सवात पुण्यामध्ये तसेच राज्यातही कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते आणि त्यामुळे हजारो जणांना रोजगार मिळतो. गणपती तयार करणारे कारागीर, मांडववाले, विद्युत व्यवस्था सांभाळणारे, प्रसाद-फुले-पाट-वाती विकणारे, मोटारी-बैलगाडेवाले, चित्रकार, दागिने विकणारे सराफ आदी अनेकांना प्राप्ती होते. 

कालांतराने उत्सवात काही हिणकस बाबी शिरल्या. उत्सवाची आरास ठरविणे, देखाव्यातील मूर्ती मूर्तीकारांकडून करवून घेणे, मांडव उभारून उत्सव पार पाडणे ही कामे सांघिकरित्या केली जात आणि त्यामुळे कार्यकर्ता घडत जाऊन एकीचे शिक्षणही मिळत असे, मात्र गेल्या काही काळापासून कंत्राटी पद्धतीचे देखावे येऊ लागले. इंदूर, मुंबई, नगर आदी ठिकाणच्या कलाकारांनी केलेले देखाव्यांचे तयार सेट भाडेतत्त्वावर घ्यायचे आणि त्याचे दहा दिवसांचे व्यवस्थापनही त्याच कंत्राटदाराकडे सोपवायचे अशी पद्धत सुरू झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्सवातील थेट सहभाग कमी झाला. 

संगीताच्या तालावर नाचणारी विद्युत रोषणाई हे आकर्षण उत्सवात आले, मात्र नंतरच्या काळात त्याचा अतिरेक होऊ लागला. मोठमोठ्या ध्वनिवर्धकांच्या भिंती रचल्या जाऊ लागल्या. त्यामुळे कानठळ्या बसविणारे आवाज येऊ लागले. ध्वनिप्रदूषण वाढत होते. मिरवणुकीतही या भिंती येऊ लागल्या, डॉल्बी यंत्रणा धुमाकूळ घालू लागली. त्यामुळे काही नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली. "ध्वनिवर्धक वापरताना काटेकोर निर्बंध पाळावेत', असा आदेश उच्च न्यायालयाने 1996 मध्ये दिला होता. त्यानंतर उत्सवात रात्री दहानंतर ध्वनिवर्धकांना बंदी घालण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्याविरोधात राज्य सरकारच न्यायालयात गेले आणि रात्री बारापर्यंत ही परवानगी द्यावी, अशी मागणी केली, मात्र 2 सप्टेंबर 2005 ला न्यायालयाने सरकारचा अर्ज फेटाळला. त्यानुसार केवळ गणेशोत्सवच नव्हे तर मोकळ्या जागा, बंदिस्त सभागृहांतही रात्री दहानंतर ध्वनिवर्धक लावता येणार नव्हते. मंदिरातील भजन, कीर्तन, मशिदीतील पहाटेची बांग, सांस्कृतिक कार्यक्रम, विवाह समारंभ आदींचाही त्यात समावेश होता. त्याचे तीव्र पडसाद उमटून त्या वर्षी मिरवणुकीत जाळपोळ, दगडफेक झाली. पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि मिरवणूक काही तास बंद पडली. वर्षातील एकूण उत्सवांपैकी काही दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्याचा अधिकार राज्य सरकारला होता. त्यानुसार गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीसह काही दिवस बारापर्यंतची परवानगी सरकार देऊ लागले. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाही रात्री बारानंतर परवानगी नसल्याने त्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्याची दखल घेत रात्रभर पारंपरिक वाद्ये वाजविण्यास सरकारने 2012 च्या सप्टेंबर महिन्यात परवानगी दिली. उत्सवातील गर्दीने फुलून जाणाऱ्या रात्रींची संख्या उत्सवातील आवाज रात्री दहापर्यंतच ठेवण्याच्या निर्णयाने कमी झाली. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. उत्सवातील रात्री पुण्यातील रस्ते माणसांच्या पुराप्रमाणे दिसतात आणि पुणेकरांचा तो एक आनंदसोहळाच ठरतो. घरोघरी बसविल्या जाणाऱ्या गणपतींमुळे आबालवृद्धांमध्ये चैतन्य येते. असे चैतन्य असणाऱ्या रात्रींची उत्सवातील संख्या निर्बंधामुळे कमी झाली. 

गणेशोत्सव मिरवणुकीला पुण्यात लागणारा प्रचंड वेळ ही मिरवणुकीचा आनंद कमी करणारी गेल्या काही दशकांतील महत्त्वाची बाब ठरली. त्यामुळे मिरवणूक नेमकी कधी सुरू करायची, यावरही चर्चा झाली. इतिहासात पाहिले तर दुपारी दोन, तीन, सकाळी अकरा अशा विविध वेळी मिरवणूक सुरू झाली आहे. चार तासांपासून ते साडेतेहतीस तासांपर्यंतचा वेळ वेगवेगळ्या वर्षी या मिरवणुकीला लागलेला आहे. हा वेळ कमी करण्यासाठी दरवर्षी प्रयत्न होतात, पण त्याला यश येत नाही. त्यामुळे दुसरा दिवस उजाडल्यानंतरही मिरवणूक सुरू राहते आणि अनेक मंडळांची रोषणाई वाया जाते. वेळ कमी करण्यासाठी मिरवणुकीच्या मार्गांमध्ये वाढ करण्याचा उपाय योजण्यात आला, मात्र त्याचा परिणाम झालेला नाही. मिरवणुकीचा 1951 पर्यंत एकच मार्ग होता, त्या वर्षी दोन मार्ग करण्यात आले तर नंतर लक्ष्मी, केळकर रस्त्याबरोबरच कुमठेकर, टिळक या रस्त्यांवरूनही स्वतंत्र मिरवणूक सुरू झाली. लष्कर भागातील स्वतंत्र मिरवणूक, कर्वे रस्त्यावरील मिरवणूक याबरोबरच छोट्या उपनगरांतील गणेशांचे विसर्जन त्या त्या भागातील तळ्यांमध्ये किंवा हौदामध्ये करणे सुरू झाले. तरीही मिरवणुकीचा वेळ कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. 

विसर्जन मिरवणुकीमधील अचकट-विचकट नृत्य करणारी तरूणांची टोळकी गेल्या काही वर्षांपासून कमी होत असून शिस्तबद्धरित्या केले जाणारे जोशपूर्ण ढोलवादन त्याची जागा घेते आहे. पुण्यात शंभरावर ढोलपथके विविध गणपतींपुढे वादन करतात. ते पाहणाऱ्या-ऐकणाऱ्याचे पायही नकळत हलू लागतात. ढोल-नगारं घुमू लागता अन लयीत पाऊल पडू लागता मागं राहणं मर्दाचं काम नाही, हे पटून तरूणवर्ग ढोलाला पसंती देतो आहे. मात्र पथकातील ढोलांची संख्या "वाढता वाढता वाढे' अशी झाल्यानं पूर्ण रस्ताच व्यापून जातो अन रसिकांना उभं राहायला, ये-जा करायला जागात राहात नाही. त्यामुळं ढोलांची, वादकांची संख्या मर्यादित ठेवण्याची गरज व्यक्त होते. अर्थात ती पाळली गेल्यास सर्वांनाच ढोल-ताशांसारख्या रणवाद्यांचा आनंद लुटता येईलच, पण त्याचबरोबर गणपतीपुढील अचकट-विचकट नाचालाही आळा बसेल आणि तरूण पिढी एका चांगल्या कलेकडे ओढली जाईल. 

बदलत्या काळानुसार उत्सवानेही बदलले पाहिजे, याचे भान हळूहळू येऊ लागले असले तरी त्याची अंमलबजावणी अधिक व्यापकरित्या होणे आवश्‍यक वाटते. मातीच्या गणेशमूर्तींची पर्यावरणपूरक परंपरा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे गेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून भंग पावली आहे. प्लॅस्टर पाण्यात सहजी विरघळत नाही तसेच त्यावरील रंगही विषारी असतात. या प्लॅस्टरच्या काही लाख मूर्ती नदीपात्रात गेल्याने पाणी प्रदूषित होते. त्यामुळे पुन्हा शाडू मातीच्या मूर्तींचा आग्रह धरला पाहिजे. थर्माकोलही प्लॅस्टर ऑफ पॅरिसप्रमाणेच सेंद्रीय नसल्याने कागदी आरास पुढे आली. त्यांसाठी मोहिमा सुरू झाल्या असल्या तरी त्यांना आणखी बळ मिळायला हवे. 

राहता राहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समाज सांधण्याचा. उत्सवाची सुरवातच मुळी समाज एक करण्याच्या हेतूने झाली असली तरी त्याच उत्सवाच्या निमित्ताने विविध समाजांत दुही पसरवण्याचे प्रयत्न होत असतील तर ते खेदजनक म्हणावे लागेल. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीचा आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभाचा पुण्यातील काळ हा सामाजिक, शैक्षणिक बदलांच्या श्रीगणेशाचा होता. पुणे हा पूर्वापार सनातन्यांचा बालेकिल्ला होता. पूजा-अर्चेपासून ते सामाजिक प्रतिष्ठेपर्यंतच्या बाबी समाजातील कथित उच्चवर्णियांसाठीच होत्या. स्पृश्‍य-अस्पृश्‍यतेच्या अमानवी कल्पनेमुळे काही समाज गावकुसाबाहेर असत. त्यांची सावलीही निषिद्ध मानली जाई आणि ती अंगावर पडली तरी पुन्हा स्नानसंध्या करण्यात येई. पुण्याची पर्वती आदी देवस्थानांतही समाजातील इतर वर्गांना प्रवेश नसे. त्यामुळेच त्याविरोधात तत्कालीन अस्पृश्‍य समजला जाणारा समाज इंग्रजांच्या बाजूने भीमा कोरेगाव येथे पेशव्यांविरूद्ध लढला. त्यात इंग्रजांना विजय मिळाला. ज्या योगे पेशवाईची अखेर दृष्टीपथात आली. पारतंत्र्यात कोण होते ? ज्यांचे राजकीय स्वातंत्र्य म्हणजेच समाजावर वर्चस्व राखण्याची मक्तेदारी संपुष्टात आली आहे, ते मुख्यतः पारतंत्र्यात होते. ब्रिटिशांनी लादलेल्या पारतंत्र्याने शोषित वर्गाचे नुकसान झाले का फायदा हा वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. त्यातच ब्रिटीश काळात पाश्‍चात्य विद्येच्या सोयी झाल्याने आणि मुळात शिक्षण सर्व समाजाला खुले झाल्याने बहुजनांना नवी दृष्टी येत होती. त्यामुळे या शोषितांसह सर्व समाजाला आधी एकत्र करणे आणि नंतर ब्रिटिशांविरोधात उभे करणे हे महाकठीण काम होते. त्यात टिळक-रंगारी-खासगीवाले आदी धुरिणांना यश आले. ही पार्श्‍वभूमी ध्यानी घेतली तर टिळकांनी लिहिलेल्या पुढील ओळींचा अर्थ समजतो. टिळक 18 सप्टेंबर 1894 च्या अग्रलेखात लिहितात, ""गणपती देवता आजपर्यंत पांढरपेशे वगैरे लोकांमध्ये असून त्या देवतेसंबंधाने घरोघरी उत्सव, मंत्रपुष्प, जाग्रणे, कीर्तने वगैरे थाटाने होत असत हे खरे आहे, तथापि यंदा आम्हा मराठ्यांचा आधारस्तंभ जो वैश्‍यवर्ग अगर प्रत्यही निढळाच्या घामाने पैसे मिळवून आम्हां सर्वांची तोंडे उजळ करणारा साळी, माळी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, वाणी, उदमी इत्यादि औद्योगिक वर्ग यांतील लोकांना यंदा विलक्षण रीतीचे सार्वजनिक स्फुरण येऊन त्यांनी हा दिवस साजरा करण्यासाठी जी काही मेहनत घेतली ती केवळ अपूर्व आहे...'' याच अग्रलेखात मिरवणुकीबाबत ते लिहितात, ""साळी, माळी, सुतार, रंगारी, ब्राह्मण, व्यापारी, मारवाडी, चांभार देखील या सर्व जातींनी क्षणभर आपआपला जातिमत्सर सोडून देऊन परस्परांशी एका दिलाने व एका धर्माभिमानाने मिसळले व या सर्वांनी हातभार लावल्यामुळे सर्व समारंभ शेवटास गेला असता - खेद करण्याकरती ती काय गोष्ट झाली ?... हिंदू धर्माची नालस्ती करणाऱ्या ब्राह्मणविद्वेषी लोकांनी मराठे आणि ब्राह्मण यांच्यामध्ये फूट पाडून सर्व हिंदु समाजाचे अकल्याण करण्याच्या प्रयत्नास सुरवात केली आहे. करिता आपण सर्वत्रांनी या वेळी सावध असले पाहिजे... ब्राह्मण आणि मराठे यांचा जो एकोपा आहे तो आहे तसाच राहिला पाहिजे इतकेच नव्हे तर हल्लीच्या सज्ञान काळात तो वृद्धिंगतही होत गेला पाहिजे...'' अर्थात, टिळकांना "मराठे' या वर्गात मराठा, बलुतेदार- इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी एवढे बहुजन अपेक्षित असल्याचे दिसते. तरीही त्या काळच्या सामाजिक स्थितीत ते ऐक्‍यही महत्त्वाचे होते. 

आता उत्सवाने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाला सुरवात केली असता सामाजिक स्थिती बरीच बदलली असल्याचे दिसून येते. राज्य घटनेतील समानतेच्या तत्त्वाचा अवलंब होत असतानाही पुन्हा धर्मीय, वर्गीय, जातीय भावना डोके वर काढू लागल्याचे दिसू लागले आहे. सकस वाद खेळण्याची, मुद्‌द्‌याला मुद्‌द्‌याने उत्तर देण्याची परंपरा या महाराष्ट्राने गेल्या शंभर-दीडशे वर्षांत निर्माण करून जपली. दुसऱ्याच्या विचाराच्या विरोधातील विचार मांडण्याची मोकळिक त्या काळात प्रत्येकाला होती आणि दुसऱ्याच्या मताचा आदरही राखला जात होता. स्वातंत्र्य आणि समानतेचे तत्त्व अंगीकारून काही दशके उलटली असताना ती तत्त्वे अधिक परिपक्व होणे अपेक्षित होते. दुर्दैवाने तसे न होता समाज पुन्हा जाती-पातीच्या कुंपणाआड जात चालला आहे आणि दुसऱ्याचा विरोधी विचार विचाराने नव्हे तर बळाने आणि सांस्कृतिक दहशतीने दाबण्यात येतो आहे. 

... त्यामुळेच सार्वजनिक गणेशोत्सवाची गरज उत्सव सुरू करण्याच्या वेळेस जेवढी होती, त्यापेक्षा अधिक गरज आज 2017 मध्ये जाणवू लागली आहे. म्हणूनच सर्व जाती-धर्म-पंथाच्या व्यक्तींना सुज्ञ नागरिकांनी गणेशाच्या मांडवात एकत्र आणून त्यांचे खऱ्या अर्थाने मनोमीलन केले तरच "महाराष्ट्र अन मानव धर्म राहिला काही तुमचे कारणे...' असे पुढच्या पिढ्या म्हणतील. संपूर्ण उत्सवावर प्रभाव पाडू शकणारे आधुनिक भाऊसाहेब रंगारी आणि आधुनिक लोकमान्य टिळक आज नसले तरी उत्सवातील पुढच्या पिढीने एकदिलाने प्रयत्न केल्यास ती उणीस जाणवणार नाही, एवढे निश्‍चित...! 

सळसळत्या उत्साहाची सव्वाशे वर्षे... 
पुण्यनगरीचा गणेशोत्सव म्हणजे पुणेकरांसाठी सळसळत्या उत्साहाची, आनंदाची पर्वणीच. वर्षभराच्या रामरगाड्यात अडकलेल्या पुणेकरांना दहा दिवस वेगळ्याच भारलेल्या वातावरणात नेण्याची ताकद या उत्सवात आहे. लाखो पुणेकर एकाच विचाराने, आचाराने एकत्र येतात आणि ही परंपरा सव्वाशे वर्षे अखंडपणे चालते, हीच बाब मुळी लक्षणीय ठरते. 

संसारी जिवांचे वर्षातील दहा दिवस आनंदाचे, चैतन्याचे, एकमेकांना भेटण्याचे, आरत्यांच्या कल्लोळात बुडून जाण्याचे, मोदकादी प्रसादाने तोंड अन मन गोड करण्याचे असतात. घरच्या गणपतीची आरास करण्यात मुले रममाण होतात. त्यामुळेच गणपतीच्या आगमनाची चाहूल लागली की आबालवृद्ध मनातून मोहरू लागतात आणि गणपती विसर्जन झाल्यावर त्यांना चुटपुट लागून राहाते. दहा दिवस कापरासारखे भुर्रकन उडून जातात. गणपती बघायला जाण्यात अनेक रात्री निघून जातात. 

गणेशोत्सवाच्या सव्वाशे वर्षांच्या परंपरेचा आढावा घेतला तर संपूर्ण शहराला एका सूत्रात गोवणारा हा एकमेव सामाजिक सण असल्याचे लक्षात येते. जवळपास सर्वच शहराला रस्त्यावर आणणारा हा उत्सव. पुण्यात सुमारे आठ लाख घरे असून त्यापैकी किमान निम्म्या म्हणजे चार लाख घरांमध्ये गणपतीच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली जाते. पूर्वीच्या वाडेसंस्कृतीमध्ये सर्व घरांमधील आरत्यांना जाणे, तिथे मोठ्या आवाजात टाळ्या-टाळ अन घंटी वाजवत अनेक आरत्या म्हणणे, नानाविध प्रसादांच्या चवी चाखणे हा पुणेकरांचा नित्यक्रम असायचा. त्याद्वारे माणसं एकत्र यायची, एकमेकांशी सुखदुःखाच्या गोष्टी करायची, एकमेकांना आधार द्यायची. आता वाडासंस्कृती मागं पडली अन सोसायट्या, अपार्टमेंट उभे राहू लागले. त्यामुळे काही अंशी माणसं एकमेकांपासून दूर जाऊ लागली तरी अनेक सोसायट्यांमध्ये सोसायटीचा गणपती बसवण्यात येऊ लागल्याचे आणि त्यानिमित्ताने पुन्हा माणसं एकत्र येऊ लागल्याचे चित्र दिसू लागले. "गणपती बघायला जाणे' म्हणजे गणपतीची आरास, देखावे बघायला जाणे. काही दशकांपूर्वी आपल्या गणपतीची आरास-देखावा इतर गणपतींच्या तुलनेने वेगळा, चर्चेचा कसा होईल, यासाठी कार्यकर्ते जोरकस प्रयत्न करताना दिसत. अनेक मंडळे आपली ही ख्याती कटाक्षाने टिकवून ठेवत. अजूनही काही मंडळे ही परंपरा चालवत आहेत. 

स्वातंत्र्यापूर्वी या एकीचा वापर ब्रिटीश सत्तेविरोधात करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर त्याचे उद्दिष्ट बदलले. गणेशोत्सवाने होणाऱ्या मनोरंजनामुळे वर्षभर पुन्हा आपले काम कार्यक्षमतेने करण्याची उमेद पुणेकरांना येते. त्याचबरोबर ऐक्‍याने निर्माण होणारी उर्जा अनेक सामाजिक, विधायक कामांसाठी वापरता येत असल्याने त्यादृष्टीने समाजातील आधुनिक धुरिणांनी प्रयत्न केले आणि अजूनही ते होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com