'माउली' अमेरिकेत (संतोष भिंगार्डे)

संतोष भिंगार्डे
रविवार, 24 डिसेंबर 2017

संत ज्ञानेश्वरमहाराजांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या ‘माउली’ या नृत्यनाटिकेचे प्रयोग अमेरिकेत सध्या होत आहेत. ही नृत्यनाटिका ‘शिकागो महाराष्ट्र मंडळा’च्या वतीनं सादर करण्यात येते. अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांच्या मुलांचा सहभाग असलेल्या या नृत्यनाटिकेविषयी... 

संत ज्ञानेश्वरमहाराजांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या ‘माउली’ या नृत्यनाटिकेचे प्रयोग अमेरिकेत सध्या होत आहेत. ही नृत्यनाटिका ‘शिकागो महाराष्ट्र मंडळा’च्या वतीनं सादर करण्यात येते. अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांच्या मुलांचा सहभाग असलेल्या या नृत्यनाटिकेविषयी... 

ज्ञानेश्वरी आणि तीही पावणेदोन-दोन तासांत एका नृत्यनाटिकेद्वारे उलगडणं तसं अवघड आणि आव्हानात्मक काम. कारण, आजही कित्येकांना ज्ञानेश्‍वरी समजून घेण्यासाठी कित्येक दिवस आणि कित्येक वर्षंही लागतात. मग असं असताना हे कसं काय शक्‍य झालं असावं, असा प्रश्न साहजिकच कुणाच्याही मनात येऊ शकेल. या नृत्यनाटिकेची संहिता लिहिणारे (सहलेखिका ः कल्पना निमकर) रवी जोशी यांच्याकडून तेच जाणून घेतलं. 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वरमहाराजांचा जीवनपट या नृत्यनाटिकेद्वारे उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

दिग्दर्शन आहे अनुपमा धारकर यांचं. तब्बल ५५ कलाकार या नृत्यनाटिकेत काम करतात. तिचे आतापर्यंत पाच प्रयोग अमेरिकेतल्या विविध शहरांत झाले असून, मागणीनुसार आणखीही प्रयोग होणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली. 

मूळचे पार्लेकर असलेले जोशी यांचं शालेय शिक्षण दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. अभियांत्रिकीत पदवी घेतल्यानंतर काही वर्षं त्यांनी भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम केलं आणि त्यानंतर ते गेल्या दहा वर्षांपासून अमेरिकेतल्या शिकागो इथं स्थायिक आहेत. 

जोशी हे ‘शिकागो महाराष्ट्र मंडळा’चे विद्यमान अध्यक्ष असून, मराठी बांधवांसाठी विविध प्रकारचे उपक्रम ते तिथं राबवतात. त्यांची पत्नी विद्या ‘बृहन्महाराष्ट्र मंडळा’च्या सचिव आहेत. या वर्षी जुलै महिन्यात बृहन्महाराष्ट्र मंडळाचं १८ वं अधिवेशन अमेरिकेत पार पडलं. तिथं ‘शिकागो महाराष्ट्र मंडळा’नं ‘माउली’ ही नृत्यनाटिका सादर केली. 

यासंदर्भात अधिक माहिती देताना जोशी म्हणाले ः ‘‘बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात काही तरी वेगळं करावं असा विचार सुरू होता. नेहमीच्या पठडीतले डान्स किंवा संगीत असा प्रकार आम्हाला नको होता. भारतीय संस्कृती आणि परंपरा जपणारी, तसंच अगदी सोपी, सगळ्यांना समजणारी व प्रबोधनपर अशी कलाकृती आम्हाला हवी होती. सर्व मराठी बांधवांनी एकत्रित येऊन अशा कलाकृतीचा आनंद घ्यावा, हा उद्देश होता. मग ज्ञानेश्वरमहाराजांवर एक नृत्यनाटिका बसवावी, असा विचार त्यातून पुढं आला. खरं तर हे काम अवघड होतं. कारण, त्यासाठी खूप संशोधन करावं लागणार होतं; परंतु आताच्या पिढीला ज्ञानेश्वरी समजली पाहिजे...ज्ञानेश्वराचं माहात्म्य कळलं पाहिजे या उद्देशानं हे शिवधनुष्य पेलण्याचं ठरवलं. मग मी भारतातून पंचवीसेक पुस्तकं मागवली. त्यांचं वाचन आणि संशोधन केलं. चारेक महिन्यांच्या संशोधनानंतर संहिता तयार झाली. मुळात सुरवातीला दोनेक महिने मला लिहायला काहीच जमलं नाही. मात्र, त्यानंतर तीन-चार महिन्यांत लेखन झालं.’’

‘‘ ‘माउली’ या नाट्यकृतीत तीन संचांमध्ये ज्ञानेश्वरी सांगितली जाते. पहिल्या संचात आठ वर्षांचे ज्ञानेश्वर आणि चार जणांचा संच, दुसऱ्या संचात बारा वर्षांचे ज्ञानेश्वर आणि चार जणांचा संच आणि तिसऱ्या संचात सोळा वर्षांचे ज्ञानेश्वर असा हा ज्ञानेश्वरीचा प्रवास उलगडण्यात आला आहे. पहिल्या संचात ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अर्णव गोडांबे, अंशुमन वेलणकर (निवृत्ती), आहान जुन्नरकर (सोपान) व आद्या राईलकर (मुक्ताबाई) या बालकलाकारांच्या भूमिका आहेत. दुसऱ्या संचात राजेश विसाळ, अनिकेत जोगळेकर, सौमील नाईक व मिहिका जोशी, तसंच तिसऱ्या संचात अनिश खोत, अल्केश सुमंत, आर्यन वैद्य व आदिश्री काठीकर यांनी अनुक्रमे ज्ञानेश्‍वर, निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई यांच्या भूमिका साकारल्या आहेत. आळंदी, सिद्धपेठ, पैठण आणि पंढरपूर अशा चार ठिकाणी फिरणारी ही कथा आहे. दोन ते ७५ अशा वयोगटातल्या कलाकारांच्या या नृत्यनाटिकेत भूमिका आहेत,’’ जोशी यांनी माहिती दिली. 

जोशी म्हणाले : ‘‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या चार भावंडांमध्ये आम्ही दोन दोन वर्षांचं अंतर दाखवलं आहे आणि त्यानुसारच कलाकारांची निवड करण्यात आली. ज्ञानेश्‍वर आठ वर्षांचे असताना मुक्ताबाई दोन वर्षांची दाखवण्यात आली आहे. भिंत चालवणं, रेड्याकडून वेद वदवून घेणं अशा सगळ्या प्रसंगांचा नाटिकेत समावेश आहे. या प्रसंगांसाठी नेपथ्य हा महत्त्वाचा भाग होता. ती जबाबदारी मी उचलली. त्यासाठी रामदास थत्ते, समीर सावंत व अमित रोग्ये यांची मदत झाली. सेट्‌स आणि स्पेशल इफेक्‍ट्‌स यामुळं आम्ही प्रेक्षकांना थेट तेराव्या शतकातल्या आळंदीत घेऊन गेलो आहोत. ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले, पाठीवर मांडे भाजले आणि भिंत चालवली हे प्रसंग नेपथ्याद्वारे रंगमंचावर सादर करणं म्हणजे मोठं आव्हान होतं; परंतु त्यासाठी आम्ही काही ट्रिक्‍स वापरल्या आहेत. हे नेपथ्य बहुतेकांना आवडल्याचं आम्हाला प्रेक्षकांच्या प्रतिसादातून कळलं. ज्ञानेश्वरांचे अभंग आणि विराण्या या नृत्यनाटिकेत आहेत. विराण्या नृत्यप्रकारात बसवणं ही खूप अवघड आणि कठीण बाब; तरीही आम्ही तो प्रयत्न केला आहे.’’ या नृत्यनाटिकेसाठी विद्या जोशी आणि संदीप गाडगीळ यांनी विविध पातळ्यांवरच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. अद्वैत पटवर्धन हा पुण्यातला हरहुन्नरी कलाकार आणि संगीतकार. त्यानं माउलींच्या पारपंरिक रचनांना आगळ्यावेगळ्या चाली दिल्या आहेत. पार्श्वसंगीतानं नटलेला साउंड ट्रॅक त्यानंच तयार केला आहे. अनुपमा धारकर, सुनील मुंडले, श्रीधर जोशी आणि मधुरा साने यांनी

मुलांना अभिनयाचं व नृत्याचं प्रशिक्षण दिलं. यातली नृत्यं मधुरा साने-भिडे यांनी सादर केली आहेत.  जोशी म्हणाले ः ‘‘या नृत्यनाटिकेसाठी मुलांची निवड करणं ही तारेवरची कसरत होती. मुलांना अभिनय येणं तर आवश्‍यक होतंच; त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, त्यांना व्यवस्थितरीत्या मराठी बोलता येणं आणि संवादांमधला भावार्थ त्यांनी समजून घेत त्या पद्धतीनं तो सादर करणं आवश्‍यक होतं. ‘आम्ही मराठी शाळेत अशा प्रकारचे ‘प्रोजेक्‍ट’ करतो,’ असं जेव्हा मुलांनी सांगितलं तेव्हा आम्हाला आम्हाला आश्‍चर्यही वाटलं आणि ‘काम तेवढं अवघड नाही,’ असंही वाटलं! या नृत्यनाटिकेत कित्येक मुलं सहभागी होण्यास तयार झाली; त्यामुळं आम्हालाही चांगला नटसंच निवडणं शक्‍य झालं. त्यानंतर प्रशिक्षण वगैरे गोष्टी पार पडल्या. सुरवातीला मी सगळ्यांना ‘प्रभात’चा सन १९४० मधला ‘संत ज्ञानेश्‍वर’ हा चित्रपट दाखवला. त्यातल्या ‘या चार भावंडांचा जीवनप्रवास या नृत्यनाटिकेतून आपण उलगडणार आहोत,’ असं त्यांना सांगितलं. त्यानंतर सहा महिने कार्यशाळा घेऊन काहींना नृत्याचं प्रशिक्षण दिलं आणि मग प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. मुलांच्या पालकांनीही आम्हाला चांगलं सहकार्य केलं. शिकागो इथं पहिला प्रयोग सादर केल्यानंतर आम्ही सेट्‌स तोडले होता; परंतु नंतर विविध ठिकाणांहून मागणी येऊ लागल्यामुळं सेट्‌स पुन्हा उभारण्यात आले. आमच्याकडच्या मराठी मुलांचं पसायदानही आता पाठ झालेलं आहे. शिकागो इथं एका कार्यक्रमात ४४ मुलांनी स्टेजवरून पसायदान सादर केलं. आजच्या मुलांना ज्ञानेश्‍वरी माहीत व्हावी...तीमधला संदेश त्यांच्यापर्यंत पोचावा हा आमचा या नृत्यनाटिकेमागचा उद्देश आहे.’’ 

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Santosh Bhingarde