सलाम चंदूच्या जिद्दीला (श्रीकृष्ण कुलकर्णी)

श्रीकृष्ण कुलकर्णी
रविवार, 16 जुलै 2017

‘जगात अशक्‍य असं काहीच नाही’ हे वाक्‍य काही लोकांच्या बाबतीत खरंच ठरतं. ते आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करत असतात. नाशिक जिल्ह्यातल्या खोबाळे (ता. सुरगाणा) या आदिवासी पाड्यावरच्या चंदू चावरे हा खो-खोपटूंही त्यापैकीच एक म्हणता येईल. दुर्गम भाग, हलाखीची परिस्थिती आणि इतर अनेक समस्यांवर मात करत राष्ट्रीय स्तरावर आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेल्या या खेळाडूविषयी.

खो-खोपटू चंदू सखाराम चावरे. वयं वर्ष चौदा. नाशिकपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावरच्या सुरगाणा तालुक्‍यातल्या खोबाळे या आदिवासी पाड्यावर राहणारा मुलगा. गावाची लोकसंख्याही चारशे-पाचशे एवढीच. आईवडिलांची कोरडवाहू शेती, कौटुंबिक परिस्थिती तशी हलाखीचीच. खेळासाठी शूज किंवा इतर साहित्य घेण्याचीही ऐपत नाही, त्यामुळं खेळाच्या सरावासाठी रोजचा प्रवास करावा लागेल, पैसे लागतील एवढेही पैसे जवळ असण्याचा तर प्रश्‍नच नाही. मात्र, जिद्द, प्रबळ महत्त्वाकांक्षा आणि खो-खोच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाच्या संघाचा खेळाडू होण्याचं आणि देशाला सुवर्णपदक मिळवून द्यायचं त्याचं स्वप्न. याच जोरावर अवघ्या चौदाव्या वर्षी चार राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग घेण्याबरोबरच वैयक्तिक सुवर्णपदकं मिळवत त्यानं आपली घौडदौड सुरू ठेवली आहे. इयत्ता तिसरीपासून त्यानं खो-खो खेळायला सुरवात केली. सुरवातीला या खेळात त्याला फारसा रस वाटला नाही. अगदी खो-खो सोडून देऊन शिक्षणाकडंच पूर्ण लक्ष केंद्रीत करायचं, असं त्याला वाटू लागलं; पण पाचवीमध्ये त्यानं आपल्या गावापासून ६५ किलोमीटरवर असलेल्या अलंगुण प्राथमिक आश्रमशाळेत प्रवेश घेतला. त्याला खो-खोचा राष्ट्रीय खेळाडू, महाराष्ट्र संघाचा कर्णधार गणेश राठोड याचा सहवास लाभला आणि त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून चंदूनं उत्कृष्ट खेळाडू बनण्याचं मनी ठरवलं आणि तो या खेळात सक्रिय झाला.

दैनंदिन नियमित शिक्षण घेत असताना खो-खोचा सकाळ-सायंकाळ सराव करणं आणि सुटीच्या कालावधीत गावी येऊन वडिलांना शेतीत मदत करणं हे नित्याचंच. हे सर्व करताना खेळाकडंही दुर्लक्ष होणार नाही ना, याची काळजी तो स्वतः आणि प्रशिक्षकही घेऊ लागले. पाचवीत असताना चंदपूरच्या चौदा वर्षांच्या आतल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याला पहिल्यांदा सहभागाची संधी मिळाली. या स्पर्धेतून त्यांच्याच शाळेतल्या गणेश राठोड आणि वनराज जाधव यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. त्यामुळं चंदूचाही हुरूप वाढला, उत्साह द्विगुणित झाला. त्याच वर्षी नंतर असोसिएशनतर्फे मुलुंडला झालेल्या स्पर्धेतल्या कामगिरीनं त्याची राष्ट्रीय पातळीवर प्रथमच निवड झाली आणि पाचवीतच चंदू खो-खोचा राष्ट्रीय खेळाडू बनला. सांगलीतल्या स्पर्धेत त्यानं सर्वोत्तम कामगिरी नोंदवत वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं. सहावीत असताना भुवनेश्‍वर (ओडिशा) इथं झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत तर त्यानं कमालच केली. या स्पर्धेत चंदूला महाराष्ट्राच्या कर्णधारपदाची संधी मिळाली आणि त्याच्याच नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघानं सुवर्णपदक पटकावलं. त्याची ही सुरू असलेली घौडदौड रोखण्यासाठी भल्याभल्यांनी प्रयत्न केले; पण चंदूनं चिकाटी, जिद्द आणि प्रामाणिकपणे सराव करण्याच्या पद्धतीमुळं आपली पताका फडकवत ठेवली. सातवीत असतांना देवासच्या (मध्यप्रदेश) राष्ट्रीय शालेय गटाच्या स्पर्धेत त्याला पुन्हा महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. स्पर्धेत महाराष्ट्रानं तिसरं स्थान पटकावलं.

नाशिकला २०१६-१७मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चंदूनं पुन्हा आपला दबदबा कायम ठेवला. या स्पर्धेत महाराष्ट्राला अजिंक्‍यपद तर मिळालंच; पण चंदूलाही अष्टपैलू खेळाडूचा बहुमान मिळाला. या स्पर्धेत त्याला भरत पुरस्कार आणि पाच हजार रुपये रोख रक्कमही प्रदान करण्यात आली. नागपूरला झालेल्या आश्रमशाळांच्या प्रकल्प स्पर्धेतही चंदूनं ठसा उमटविला. त्याच्याच नेतृत्वाखाली अलंगुण शाळेच्या कळवण प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. स्पर्धेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी चंदूला राष्ट्रीय खेळाडूचं पारितोषिक प्रदान केलं.

कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना आदिवासी पाड्यावरच्या या खेळाडूची घौडदौड इतरांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे. कितीही संकटं आली, तरी खो-खो खेळ मात्र सोडायचा नाही, असा चंग त्यानं मनी बांधला असून, भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवण्याबरोबरच एक ना एक दिवस सुवर्णपदक पदक नक्की मिळवीन, अशी इच्छा त्याच्या मनात आहे. शाळेतले मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचं त्याला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन लाभत आहे.

‘चंदूनं खूप मोठं व्हावं’
चंदूचे वडील सखाराम, आई यशोदा यांना चंदूबद्दल खूप अभिमान आहे. त्यानं मिळवलेली पदकं, प्रमाणपत्रं आणि छायाचित्रं पाहताना त्यांचं मन भरून येतं. चंदूचा सामना अजून पाहिला नाही; पण तो खूप छान खेळतो हे इतरांकडून कळलं आहे. ‘‘पाड्यावरून नाशिक शहरात जायला भाड्यासाठी पैसे लागतात, ते पुरेसे पैसे आमच्याकडं नसल्यानं सामना पहायला जात नाही. आम्ही दोघं पती-पत्नी आणि चंदूचे भाऊ-बहिणी शेतीच्या कामासाठी कायम सज्ज आहोत. चंदूनं आपल्या खेळाकडं लक्ष केंद्रित करावं आणि देशासाठी खेळावं, खूप मोठं व्हावं,’’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Shrikrishna Kulkarni