राजवाडे यांचा ‘थिसिस’

सदानंद मोरे
रविवार, 28 मे 2017

वि. का. राजवाडे यांची समर्थकवृत्ती आणि राजारामशास्त्री भागवत यांची भंजकवृत्ती या दोहोंचा समन्वय श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या लेखनात आढळतो. भागवत आणि राजवाडे यांच्यातले संबंध मार्क्‍सवादी परिभाषेत ‘थिसिस-अँटीथिसिस’ असे सांगता आले, तर केतकर यांच्या विचारांना ‘सिंथेसिस’ ठरवावं लागेल. दुर्दैवानं केतकर यांच्या मांडणीला ‘थिसिस’ समजून तिचा विस्तार किंवा प्रतिवाद करायला कुणी पुढं न आल्यामुळं एका थोर विचारपरंपरेचा मृत्यू ओढवला, असंच म्हणावं लागतं.

वि. का. राजवाडे यांची समर्थकवृत्ती आणि राजारामशास्त्री भागवत यांची भंजकवृत्ती या दोहोंचा समन्वय श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या लेखनात आढळतो. भागवत आणि राजवाडे यांच्यातले संबंध मार्क्‍सवादी परिभाषेत ‘थिसिस-अँटीथिसिस’ असे सांगता आले, तर केतकर यांच्या विचारांना ‘सिंथेसिस’ ठरवावं लागेल. दुर्दैवानं केतकर यांच्या मांडणीला ‘थिसिस’ समजून तिचा विस्तार किंवा प्रतिवाद करायला कुणी पुढं न आल्यामुळं एका थोर विचारपरंपरेचा मृत्यू ओढवला, असंच म्हणावं लागतं.

धुनिक महाराष्ट्रात जे विद्वान-विचारवंत व संशोधक होऊन गेले, त्यांच्यात सगळ्यांत धाडसी कोण असेल तर ते म्हणजे राजारामशास्त्री भागवत. प्रवाहाच्या विरुद्ध पोहत आणि मुख्य म्हणजे स्वजनांची इतराजी सहन करत भागवतांनी आपले विचार मांडले आहेत, हे विसरता कामा नये. त्यांना सूक्ष्म व भेदक अशी विश्‍लेषणबुद्धी लाभली होती. परंपरेनं प्राप्त झालेल्या संस्कृतच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी इतरांप्रमाणे परंपरेचं समर्थन करण्यासाठी न करता परंपरेचं ‘विशकलन’ (हा त्यांचाच शब्द) करण्यासाठी केला. त्यांनी केलेल्या विशकलनाचं आजच्या भाषेत वर्णन करायचं झालं, तर त्यासाठी Deconstruction हा इंग्लिश शब्द वापरण्याखेरीज पर्याय नाही.

भागवतांच्याच तोलाची तर्कबुद्धी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनाही लाभली होती. तथापि, राजवाडे यांनी तिचा उपयोग परंपरेचं समर्थन करण्यासाठी अधिक केला.
राजवाडे यांची समर्थकवृत्ती आणि भागवत यांची भंजकवृत्ती या दोहोंचा समन्वय श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या लेखनात आढळतो. भागवत आणि राजवाडे यांच्यातले संबंध मार्क्‍सवादी परिभाषेत ‘थिसिस-अँटीथिसिस’ असे सांगता आले, तर केतकर यांच्या विचारांना ‘सिंथेसिस’ ठरवावं लागेल. दुर्दैवानं केतकर यांच्या मांडणीला ‘थिसिस’ समजून तिचा विस्तार किंवा प्रतिवाद करायला कुणी पुढं न आल्यामुळं एका थोर विचारपरंपरेचा मृत्यू ओढवला, असंच म्हणावं लागतं.

भागवत-राजवाडे-केतकर यांच्या कालखंडाचा विचार केला तर, एकीकडं ब्रिटिशांचं राज्य स्थिर होत असतानाच दुसरीकडं त्या राज्याविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त होण्याचा तो काळ होता आणि राजकीय क्षेत्राच्या पलीकडं जाऊन पाहायचं झाल्यास या काळात भारतीय विचारवंतांनी व अभ्यासकांनी आधुनिक पाश्‍चात्य विचारसरणी आणि विचारपद्धती आत्मसात केली होती, असं निश्‍चित म्हणता येतं. सन १८५७ मध्ये जो राजकीय उठाव झाला, त्या काळी ब्रिटिश नेमके कोण, कुठले, त्यांची विद्या काय प्रकारची आहे व दर्जाची आहे, याचा आवाका आलेले लोक हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखे असतील-नसतील. नंतरच्या ५० वर्षांत परिस्थिती पालटली असताना रानडे, भागवत, राजवाडे, केतकर, शिंदे, आंबेडकर असे विद्वान पुढं आले. यातल्या शिंदे आणि आंबेडकर यांचा विचार तूर्त बाजूला ठेवू.

रानडे, भागवत, राजवाडे, केतकर यांच्या संदर्भात असं म्हणता येतं, की एकीकडं परकीय ब्रिटिश राजवटीच्या विरोधात काही बोलायचं किंवा करायचं झाल्यास संपूर्ण हिंदुस्थान हेच एक एकक किंवा राष्ट्रीय वस्तू समजून बोलणं भाग होतं (त्यासाठी इंडियन नॅशनल काँग्रेसचे आभार मानायला हवेत); परंतु त्याच वेळी महाराष्ट्राचा विचार स्वतंत्रपणे केला पाहिजे, याची जाणीव या चार विचारवंतांना (रानडे-भागवत-राजवाडे-केतकर) होती. महाराष्ट्राचा इतिहास आणि भवितव्य अपरिहार्यपणे हिंदुस्थानच्या इतिहासाशी आणि भवितव्याशी जोडलं गेलं आहे, हे या मंडळींच्या लक्षात येऊन चुकलं होतं. म्हणून तर राजवाडे यांच्या - पुण्यात स्थापन झालेल्या - इतिहाससंशोधकांच्या संस्थेचं नाव ‘महाराष्ट्र इतिहाससंशोधक मंडळ’ असं न ठेवलं जाता ‘भारत इतिहाससंशोधक मंडळ’ असं तिचं नामकरण करण्यात आलं. त्या वेळी रानडे हयात नव्हते व भागवत बहुधा शेवटच्या घटका मोजत असावेत आणि केतकर शिक्षणासाठी परदेशी (आणि आंबेडकरही त्याच मार्गानं जाणार होते). अर्थात रानडे-भागवत यांना या मंडळाच्या नावात वा भूमिकेत काही आक्षेपार्ह वाटण्याचं कारण नव्हतं.

मात्र, भागवत यांच्या आणि नंतर केतकर यांच्याही नजरेसमोर रानडे-राजवाडे यांच्याप्रमाणे सतराव्या-आठराव्या शतकातली मराठेशाही नव्हती. ते प्राचीनच काय; परंतु अतिप्राचीन कालासंबंधी काही सांगू पाहत होते. असा काहीसा प्रयत्न राजवाडे यांचाही असल्याचं निश्‍चितच दिसून येतं; परंतु राजवाडे यांच्या विचारांत ‘अंतिमतः महाराष्ट्र नावाच्या ‘वस्तू’ची स्वायत्तता; इतकंच नव्हे तर, अस्तित्वच धोक्‍यात येतं व ती उत्तरेकडून आलेल्या ब्राह्मण-क्षत्रियांची स्थानिक लोकांना दुय्यम स्थान देऊन उभारलेली वसाहत उरते’! भागवत पूर्णतः आणि केतकर अंशतः का होईना, महाराष्ट्राची स्वायत्तता जपत, प्रसंगी महाराष्ट्राला मध्यवर्ती ठेवून भारताचा विचार करतात.
त्यातल्या त्यात भागवतांचं वैशिष्ट्य म्हणजे ते ‘समकालीन हिंदुस्थानातसुद्धा महाराष्ट्रातले लोक कसे अग्रेसर आहेत आणि त्यांचं हे अग्रेसरत्व व कृतिशीलता त्यांच्या इतिहासाशी कशी सुसंगत आहे,’ हे आवर्जून लक्षात आणून देतात आणि त्याच्याही पुढं जाऊन भविष्यातसुद्धा ते तसेच वागतील, असा आशावादही व्यक्त करतात.

समकालीन महाराष्ट्राच्या कर्तृत्वाविषयी राजवाडेसुद्धा निःशंक आहेत. राजवाडे यांनी तर ब्रिटिशकाळात होऊन गेलेल्या/विद्यमान असलेल्या प्रतिभावान व कर्त्या पुरुषांची यादीच केली होती. अशीच यादी भागवतही थोड्या वेगळ्या पद्धतीनं करतात. (या दोघांच्या याद्यांची तुलनात्मक चर्चा मी ‘गर्जा महाराष्ट्र’ या ग्रंथात केलेली आहे. तिच्या पुनरुक्तीची गरज नाही). राजवाडे यांना तर ‘हिंदुस्थानला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून सोडवण्याचं कार्य महाराष्ट्रच करील’ याविषयी खात्रीच होती.

असं असताना भागवत-राजवाडे यांच्यामधले संबंध ‘थिसिस-अँटिथिसिस’ असे का होतात, याची चर्चा इथं प्रस्तुत ठरते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राजवाडे यांची महाराष्ट्रमीमांसा उत्तराभिमुख, आर्यवंशकेंद्रित, इतकंच नव्हे तर, ब्राह्मणश्रेष्ठत्वाकडं कललेली आहे, तर भागवत यांची मीमांसा दक्षिणाभिमुख, बहुवंशवादी आणि क्षत्रिय श्रेष्ठत्वाकडं झुकणारी आहे. या अर्थानं भागवत यांची ही मीमांसा म्हणजे राजवाडे यांच्या भूमिकेचा व्यत्यास आहे. अँटिथिसिस तर आहेच आहे.

राजवाडे-भागवत यांच्या विचारांची मांडणी करताना आपण त्यांचे विचार कालानुक्रमे मांडून ती करत नसून, त्या दोन विचारप्रणाली समोरासमोर ठेवून त्यांच्यातले संबंध आपण पाहत आहोत. त्यामुळं इथं आधी कोणता विचार व मग कोणता, हा प्रश्‍न अप्रस्तुत होय. व्यत्यासाचे किंवा उलटापालटीचे परिणाम कालिक नसून तार्किक आहेत. त्यामुळं कुणाच्याही विचाराला थिसिस मानून दुसऱ्याच्या विचाराला अँटिथिसिस म्हणता येईल. असो.

याअगोदरच स्पष्ट केल्यानुसार, राजवाडे व भागवत (आणि नंतर केतकर) यांची शोधपद्धती मुख्यत्वे भाषिक,  त्यातल्या त्यात व्युत्पत्तिशास्त्रीय आहे, याची इथं आठवण करून देण्याची गरज आहे.

राजवाडे-भागवत यांच्या भाषिक पद्धतीत साहजिकच संस्कृत आणि प्राकृत भाषांची चर्चा अर्थातच येणार. त्यातही महाराष्ट्री प्राकृत आणि तदुद्भव मराठी यांना प्राधान्य राहणार. कारण, त्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या भाषा आहेत.

भाषांच्या बरोबरीनंच त्या भाषा बोलणाऱ्या लोकांविषयी चर्चा करावीच लागणार. राजवाडे ही चर्चा त्या लोकांचे वंश अर्थात कुलं समोर ठेवून, म्हणजेच कौलिक अंगानं करतात. भागवतसुद्धा असा विचार टाळत नाहीत.

मग फरक कुठं आहे?

राजवाडे कौलिक विचार करताना युरोपीय भाषाशास्त्रज्ञांचा व मानववंशशास्त्रज्ञांच्या आर्यकुलश्रेष्ठत्वाचा आणि वर्चस्वाचा सिद्धान्त अनुसरतात. आर्यांची समाजरचना, संस्था, विचार आदी गोष्टी इतर वंशांपेक्षा श्रेष्ठ आहेत, असंच ते समजतात. इतकंच नव्हे तर, जगाच्या पाठीवरच्या ब्रिटिश, जर्मन आदी अन्य आर्यकुलांपेक्षा भारतातलं आर्यकुल वांशिक, म्हणजेच बीजशुद्धीच्या दृष्टीनं वरच्या प्रतीचं समजतात.

भारतीय आर्यांच्या या वांशिक श्रेष्ठतेचं रहस्य आर्यांच्या समाजरचनेत व सामाजिक संस्थांमध्ये सामावलं असल्याचं राजवाडे यांचं म्हणणं आहे. चातुर्वर्ण्यव्यवस्था ही आर्यांची समाजरचना होय. ‘जगाच्या पाठीवर इतर आर्यकुलांनी या व्यवस्थेचा त्याग केल्यानं त्यांच्यात वर्णसंकराचं प्राचुर्य वाढलं व त्यांची शुद्धता आणि अर्थातच अनुषंगानं श्रेष्ठत्व यांची प्रत घसरत गेली. भारतीय आर्यांनी मात्र ही व्यवस्था जिवापाड जपल्यामुळं त्यांच्यातला आर्यत्वाचा अंश जगातल्या कोणत्याही देशातल्या आर्यकुलापेक्षा कांकणभर अधिकच आहे. ते अधिक शुद्ध बीजाचे, रक्ताचे व अतएव श्रेष्ठतम आर्य आहेत,’ हा राजवाडे यांचा सिद्धान्त!

चातुर्वर्ण्य हे आर्य समाजरचनेचं असाधारण संस्थात्मक वैशिष्ट्य असल्याचं राजवाडे यांचं म्हणणं मान्य केलं, तरी जातिव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित होतोच. जगातल्या इतर आर्यकुलांमध्ये वर्णव्यवस्था आहे; पण जातिव्यवस्था नाही. भारतात मात्र वर्णव्यवस्थेबरोबरच जातिव्यवस्थाही नांदते आहे, याचं स्पष्टीकरण कसं करायचं? ज्याअर्थी ती इतर ठिकाणांच्या आर्यकुलांमध्ये नाही, त्याअर्थी एकतर ती अनार्यांची असली पाहिजे किंवा ती वर्णव्यवस्थेतली विकृती मानावी लागेल. हे दोन्ही पर्याय राजवाडे यांच्या अंगलट येणारे आहेत! त्यांच्या विचारचौकटीत ‘आर्य हे मुळातच अंगभूतपणे श्रेष्ठ असल्यानं ते अनार्यांची संस्था स्वीकारणारच नाहीत, अनार्यांचं अनुकरण करणारच नाहीत.’

जातिव्यवस्थेला वर्णव्यवस्थेची विकृती मानल्यानं तरी प्रश्‍न सुटेल का? अर्थातच नाही. तो विद्यमान भारतीय आर्यांच्या समाजव्यवस्थेचा हजारो वर्षांपासून अविभाज्य भाग बनला असल्यानं, तिला विकृती मानलं तर तिच्या उपसर्गानं, प्रभावानं मूळ वर्णव्यवस्थाही विकृत होणार. मग ‘झाडाचं खोड अविकृत व शाखा विकृत’ असं कसं म्हणता येईल?

आर्य समाजासारख्या सुधारणावादी पंथांनी ‘जातिसंस्था ही नंतरची उपरी गोष्ट आहे,’ असा पवित्रा घेतला होता; पण ती उत्पन्न झालीच कशी, याची समाधानकारक संगती ते लावू शकत नव्हते.

राजवाडे यांनी जातिसंस्थेच्या एका पारंपरिक उपपत्तीच्याच आधारे या पेचातून मार्ग काढला. त्यांचा तो ‘मार्ग’ म्हणजे ‘जातिव्यवस्था ही वर्णव्यवस्थेचं संरक्षण करण्यासाठीच निर्माण केली गेली आणि तीसुद्धा आर्यांकडूनच!’

वर्णव्यवस्था धोक्‍यात येणं किंवा अशुद्ध होण्यामागचं एकमेव कारण म्हणजे अर्थातच वर्णसंकर. वर्णसंकर म्हणजे दोन भिन्न वर्णांमधल्या स्त्री-पुरुषांमध्ये झालेला संबंध. समजा, ब्राह्मण पुरुष आणि वैश्‍य स्त्री यांच्यात अशा प्रकारचा संबंध आला आणि त्यातून पुत्राचा जन्म झाला तर त्या पुत्राचा वर्ण कसा ठरणार, हा प्रश्‍न इथं कळीचा ठरतो. त्याला पित्याचा म्हणजे ब्राह्मणवर्ण द्यायचा ठरवलं, तर तो पित्याइतका ब्राह्मण असणार नाही म्हणजेच त्याचं ब्राह्मणत्व ‘गढूळ’ होणार ! आणि समजा त्याला आईचा म्हणजे वैश्‍यवर्ण द्यायचं ठरवलं, तर पित्याच्या ब्राह्मणत्वामुळं त्याचं वैश्‍यत्व ‘कमअस्सल’च होणार.

अशा प्रकारे कमअस्सल ब्राह्मण किंवा कमअस्सल वैश्‍य यांचा समावेश ब्राह्मणांमध्ये किंवा वैश्‍यांमध्ये होणं याचा अर्थ संस्था या नात्यानं वर्णव्यवस्थेच्या शुद्धतेची पातळी खालावणं! हा न्याय उर्वरित क्षत्रीय आणि शूद्रवर्णांनाही लागू होतो.

यातून असं निष्पन्न होतं, की वर्णव्यवस्था अभेद्य आणि शुद्ध ठेवायची असेल, तर अशा वर्णसंकरातून जन्मलेल्या अपत्याला आई किंवा बाप या दोघांपैकी कुणाचाही वर्ण बहाल करून व्यवस्थेत समाविष्ट करू नये. पण मग अशा अपत्यांचं करायचं काय, त्यांचा दर्जा कोणता, असे प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांची उत्तरं देऊन वर्णव्यवस्था व पर्यायानं आर्यत्व अबाधित राखण्यासाठी या अपत्यांचा एक स्वतंत्र गट मानावा, अशी कल्पना निघाली. हा गट म्हणजेच जात!

काळाच्या ओघात Combination-Permutation च्या गणिती नियमानं विविध वर्णांच्या संकरांतून नानाविध जाती आणि उपजाती निर्माण झाल्या. हीच जातिव्यवस्थेची उत्पत्ती होय.

थोडक्‍यात सांगायचं झाल्यास, जातिव्यवस्था ही वर्णव्यवस्थेची बचावयंत्रणा (Defence-mechanism) होय! आर्यकुलशुद्धतेच्या दृष्टीनं विचार केला तर तिला विकृती म्हणताही येईल; पण ती अशी विकृती असली तरी तिचं स्थान Necessary Evil अशा प्रकारचं आहे. ती नसती तर भारतीय आर्यांची चातुर्वर्ण्यव्यवस्था भारताबाहेरच्या आर्यांप्रमाणे लोप पावली असती. जातिसंस्थेमुळं वर्णव्यवस्थेचं रक्षण झालं, हे तिचं योगदानच म्हणायचं की! जातिव्यवस्था हे अशा प्रकारे वर्णव्यवस्थेचं कवच ठरलं. पूर्वी गावात प्लेगची साथ पसरली, की घरोघरी तपासणी होऊन प्लेगच्या खऱ्या किंवा संशयित रुग्णाला गावाबाहेरच्या छावणीत (Quarantine) ठेवून घरातल्या उर्वरित जिवंत माणसांचं रक्षण करण्याची पद्धत होती. असाच हा प्रकार होय!

प्लेगचीच उपमा पुढं न्यायची झाल्यास असं म्हणता येईल, की निरोगी जिवंत लोकांपेक्षा लागण झालेल्यांचीच, रुग्णांचीच संख्या अधिक झाली तर काय करायचं? अशा विषम परिस्थितीत निरोगी लोकांना रोग होण्याची संभावना अधिकच असणार, हे उघड आहे.

अशा पद्धतीत सर्वोत्तम मार्ग म्हणजे उरल्यासुरल्या जिवंत निरोगी लोकांनी गाव सोडून स्थलांतर करावं. अशा ठिकाणी जावं की जिथं रुग्ण नसतीलच किंवा असलेच तर अत्यल्प असतील.

‘जगातल्या आर्यांमध्ये भारतातले आर्य श्रेष्ठ आणि भारतातल्या आर्यांमध्ये महाराष्ट्रातले आर्य श्रेष्ठ...कारण, त्यांच्यात इतर आर्यांपेक्षा अधिक आर्यत्व आहे,’ असं राजवाडे सांगतात; पण हे शक्‍य कसं झालं? तर त्यांच्यानुसार, ‘उत्तरेकडच्या संकरग्रस्त वातावरणाचा त्याग करून काही थोडे शुद्ध आर्य आपली समाजरचना व सामाजिक संस्था घेऊन महाराष्ट्रात आले...महाराष्ट्राचं महत्त्व हे अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या मूळ रहिवाशांच्या कर्तृत्वाचा परिपाक नसून, उत्तरेतून येऊन इथं वसाहत केलेल्या आर्यांच्या पराक्रमाचा परिणाम आहे.’

आता हा जर राजवाडे यांचा ‘थिसिस’ असेल, तर भागवत यांच्या विचारांना त्याचा ‘अँटिथिसिस’ मानण्याशिवाय पर्याय नाही.

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal V K Rajwade Sadanand More Marathi Articles