थरारक, चित्तवेधक (समीर केतकर)

समीर केतकर
रविवार, 28 जानेवारी 2018

काही परदेशी मालिका पहिल्या एक-दोन एपिसोड्‌समध्येच असा काही अनुभव देतात, की तुम्ही अक्षरशः झपाटल्यासारखे बाकीचे एपिसोड्‌स आणि पुढचे सीझन्सही बघत बसला. ‘ब्रेकिंग बॅड’ ही अशीच एक मालिका. कुटुंबासाठी काहीही करायची तयारी असणाऱ्या एका प्राध्यापकाची कहाणी सांगणारी ही मालिका खिळवून ठेवते.

काही परदेशी मालिका तुम्हाला अक्षरशः ओढून नेतात. पहिल्या एक-दोन एपिसोड्‌समध्येच तुम्हाला असा काही अनुभव मिळतो, की तुम्ही अक्षरशः झपाटल्यासारखे बाकीचे एपिसोड्‌स आणि पुढचे सीझन्सही बघत बसला. ‘ब्रेकिंग बॅड’ ही अशीच एक मालिका. पहिले काही सीझन बघून संपवले, की मग मात्र एखाद्या व्यसनाधीन माणसाला ती संबंधित गोष्ट मिळत नसली तर होतं तशी आपली अवस्था होऊन जाते. इंग्लिश भाषेतली ही मालिका. अमेरिकेतली. कथानकाच्या मुख्य पात्राचं नाव मिस्टर वॉल्टर व्हाइट (ब्रायन क्रॅन्स्टन). वय ४९. हा एका कॉलेजमध्ये प्राध्यापक असतो केमिस्ट्रीचा. पगार पुरत नाही म्हणून लपूनछपून एका गॅरेजमध्ये गाड्याही धुवायचं काम करणारा. घरी बायको आणि एक मतिमंद मुलगा. एके दिवशी वॉल्टरला कळतं, की त्याला क्षयरोग आहे आणि फक्त एक वर्ष वेळ आहे! आता पुढं काय?... कुटुंबाला कसं सांभाळणार, घरखर्च कसा भागवणार?... 

नेमके त्याच दिवशी त्याचे काही मित्र आणि जवळचे नातेवाईक त्याच्या घरी त्याला बर्थडे ‘सरप्राइज’ पार्टी द्यायला आलेले असतात, अर्थात बायकोनंच ठरवलेलं असतं सगळं. त्या सर्व पाहुण्यांमधे वॉल्टरचा मेव्हणा म्हणजे हॅंक श्रेडरही असतो. तो ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे डीईएमध्ये नोकरी करत असतो. टीव्हीवर न्यूज चालू असतात तेव्हा बातमीमध्ये त्याचाच उल्लेख. अमुक ठिकाणी अमुक हॅंक आणि त्याच्या डीईए टीमनं छापा घालून अमुक पैसे आणि ड्रग्ज जप्त केले वगैरे!

श्रेडर बोलताबोलता वॉल्टरला त्याच्या आगामी छाप्यासाठी ‘आमंत्रण’ देतो. वॉल्टरला नाही म्हणता येत नाही. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणं छापा घालण्याच्या वेळी श्रेडर वॉल्टरला सोबत घेतो. छापा सुरळीत पार पडतो; पण एक गुन्हेगार मात्र सुटतो. बंगल्याच्या खिडकीतून उडी मारून सटकताना वॉल्टर त्याला पाहतो; पण श्रेडरला सांगत नाही. त्याच्या मनात वेगळीच गणितं चालू आहेत. 

जेस्सी पिंकमन हा वॉल्टरचा माजी विद्यार्थी. त्यानंच त्या बंगल्यातून पळ काढलेला आहे! वॉल्टर त्याच्या घरी जाऊन त्याची वाट बघायला लागतो. त्याला बघताच जेस्सी पळून जायचा प्रयत्न करतो; पण वॉल्टर त्याला थांबवतो. म्हणतो ः ‘‘तुझ्याकडं अंमली पदार्थ घेणाऱ्या लोकांची यादी असेलच आणि माझ्याकडं खास क्षमता आहे- जी तुझ्यात नाहीये- ती म्हणजे ‘केमिस्ट्री!’ आपल्या दोघांचा फायदा आहे यात.’’ निव्वळ कमीत कमी वेळात प्रचंड पैसा मिळवण्याचा वॉल्टरचा एकूण उद्देश. कुटुंबाच्या भविष्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची त्याची तयारी असते. जेस्सीही तयार होतो... आणि सुरवात होते खऱ्या ‘ब्रेकिंग बॅड’ला.

मालिकेच्या सुरवातीचा वॉल्टर आणि मालिकेचा शेवटचा वॉल्टर... त्याच्या चेहऱ्यात, वागण्यात जो काही आमूलाग्र बदल घडवला आहे, केवळ अप्रतिम! मालिकेची अजून एक जमेची बाजू म्हणजे प्रत्येक पात्राची मांडलेली बाजू. फक्त मुख्य पात्राला पूर्ण महत्त्व न देता, इतर पात्रांना, कलाकारांनाही तेवढंच महत्त्व दिलं गेलं आहे. वॉल्टरची बायको स्कायल व्हाइट (ॲना गन). तिनं आधी दिलेला पाठिंबा, नंतर तिचा विरोध, नंतर त्यांच्या मुलामुळं झालेली ओढाताण, वॉल्टरच्या मुलाचं-वॉल्टर व्हाइट ज्युनिअरचं- अपंगत्व (आरजे मिट्टे) या सगळ्या गोष्टी छान मांडल्या आहेत. ज्युनिअरची भूमिका खऱ्याच पोलिओग्रस्त मुलानं केलीय. 

मालिकेत चार-पाच खलनायकही आहेत. मुख्य खलनायक गस (गिआनकार्लो) यानं सहजसुंदर अभिनय केला आहे. खलनायकाची जोडी पण आहे एक! लिओनेल आणि मार्को हे दोन भाऊ. त्यांच्या वडिलांच्या खुनामुळं अस्वस्थ झालेले हे दोघं अतिशय क्रूर दाखवले आहेत. बाकीच्या व्यक्तिरेखाही अगदी स्वतःची खास छाप पाडून जातात. महत्त्वाचं, लक्षात राहणारं पात्र म्हणजे सॉल गुडमॅन (बॉब ओडेनकर्क). एखादा क्रिमिनल लॉयर कसा असतो, याचं खट्याळ उदाहरण. त्याची बोलण्याची-वागण्याची पद्धत, कपडे सगळंच वैशिष्ट्यपूर्ण. 

अजून एक खासियत आहे या मालिकेची ती म्हणजे दिग्दर्शन! प्रत्येक भागाचं दिग्दर्शन वेगवेगळ्या दिग्दर्शकानं केलं आहे. काही भाग तर खुद्द व्हिन्स गिलिगननंच केले, तर काहींचं ब्रायन क्रॅन्स्टननं. अल्बुकर्कच्या आसपास बहुतांश चित्रित झालेल्या ‘ब्रेकिंग बॅड’च्या चित्रीकरणामध्ये पिवळ्या रंगाचा उत्कृष्ट वापर करण्यात आला आहे. त्यामुळं उन्हाळ्याचा चटका जाणवतो बऱ्याच ठिकाणी. पार्श्वसंगीतातही कमालीची वैविध्यता आहे. ‘कंट्री म्युझिक’ ते ‘हिप-हॉप’ अशी सुंदर भेळ आहे. तुम्ही या मालिकेच्या विश्वात हरवून जाता. प्रत्येक भाग संपला, की पुढं काय, अशी उत्सुकता कायम राहते. मालिकेचे एकूण पाच सीझन्स झाले. म्हणजेच एकूण पाच वर्षं लागली ती संपायला. मात्र, ती संपल्यानंतर अजूनही तिचा ठसा पुसेल, अशी मालिका अजून तरी जाणवलेली नाही. 

पूर्वी झटपट कथानक पुढं गेलं, की ती मालिका आवडायची; पण ‘ब्रेकिंग बॅड’नं दृष्टीकोनच बदलून टाकला. संथ गतीनं पुढं सरकणारी असूनही, केवळ कथानकाच्या अप्रतिम ‘हॅंडलिंग’मुळं मालिका कंटाळवाणी वाटत नाही! व्हिन्स गिलिगनच्या कल्पनेतून साकार झालेली आणि आयएमडीबीवर दहापैकी तब्बल साडेनऊ गुुण मिळवणारी ही मालिका पाहाच! ‘प्राइमटाइम एमी ॲवॉर्ड फॉर आउटस्टॅंडिंग ड्रामा सिरीज’ आणि अजून खूप पारितोषिकं मिळवून या मालिकेनं भरघोस यश कमावलं. या मालिकेनंतर विन्सनं तिचा पूर्वार्ध सांगणारी मालिकाही काढली. ‘बेटर कॉल सोल’ हे तिचं नाव. एकूणच बघण्याचा पुरेपूर आनंद देणारी ‘ब्रेकिंग बॅड’ ही जाणकारांसाठी ‘मस्ट वॉच!’

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news Saptarang breaking bad serial Sameer Ketkar