ध्येय, कष्ट, जिद्दीच्या ओंजळीत 'पद्म'वृष्टी 

Arvind Gupta
Arvind Gupta

ज्यांच्या कष्टाच्या व जिद्दीच्या ओंजळीत "पद्म'वृष्टी झाली असे बहुतेक जण वयाची सत्तरी, नव्वदी गाठलेले आहेत. त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ध्येयाची, यशाची देशानं दखल घेतली म्हणून कौतुक करावं, समाधान मानावं, सरकारला धन्यवाद द्यावेत, की इतकी वर्षं ही रत्नं-माणकं दुर्लक्षित राहिली म्हणून खंत व्यक्‍त करावी? 

केरळमधल्या लक्ष्मीकुट्टी अम्मा अन्‌ कर्नाटकातल्या सुलागट्टी नरसम्मा यांच्यासारख्या अनेकांच्या विस्मयकारक यशकथांचं कोंदण यंदाच्या "पद्म' सन्मानांना लाभलंय. एकशे तीस कोटी लोकसंख्येच्या महाकाय देशातल्या कानाकोपऱ्यांत विशिष्ट ध्येयानं झपाटलेल्या दुर्लक्षित व्यक्‍तींचा "पद्म' सन्मानांनी गौरव करण्याची नवी प्रथा गेल्या प्रजासत्ताक दिनाला मोदी सरकारनं सुरू केली अन्‌ सलग दुसऱ्या वर्षी त्यानिमित्तानं अशी आणखी ध्येयवादी माणसं देशाच्या, जगाच्या पुढं आली. 

आदिवासी कानी जमातीतल्या लक्ष्मीकुट्टी अम्मांचं औपचारिक शिक्षण जुनी तिसरी, तीदेखील 1950 मधली; पण पुस्तकातल्या ज्ञानापेक्षा मोठा खजिना त्यांनी जमवला तो म्हणजे पाचशेहून अधिक वनौषधींचा. त्यात महत्त्वाचं आहे तो, साप-विंचवाच्या विषावर उतारा देणारी वनौषधी. स्वत:चा मुलगा सर्पदंशानं मृत्यू पावल्यानं कष्टानं मिळविलेलं ते ज्ञान अनेकांना जीवदान देऊन गेलंय. हा ठेवा त्यांनी जपला तो केवळ निरीक्षणाच्या व अभ्यासाच्या आधारावर. त्या जडीबुटींची त्यांनी कुठलीही नोंद ठेवलेली नाही. मुळात त्या असल्या नोंदींच्याबाबतीत मुख्य प्रवाहापासून कोसो दूर. जंगलात जिथं ज्या राहतात तिथं जायला साधा रस्ताही नाही. तो म्हणे 1952 मध्ये मंजूर झाला, तेव्हापासून कागदावरच आहे. "पद्मश्री'बरोबरच रस्ता द्यावा, अशी अम्मांची अपेक्षा! 

कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातल्या पावगडा भागातल्या 97 वर्षांच्या नरसम्मा भूमिहीन शेतमजूर कुटुंबातल्या. सुईण किंवा दाई म्हणून आजूबाजूच्या अनेक गावांत प्रत्येकाच्या ओठावर असलेलं नाव. नरसम्मांनी 1940 मध्ये सुईण म्हणून स्वत:च्या मावशीचंच पहिलं बाळंतपण केलं. "नरसू तुझ्या हातात जादू आहे', असं सांगणाऱ्या आजी मरगम्मांची ती परंपरा पुढं नेणारा तो प्रसंग. जिथं हॉस्पिटल, डिलिव्हरी, सीझर वगैरे शब्द अजून पोचलेले नाहीत, अशा दुर्गम भागात अडल्यानडल्या दीड हजाराहून अधिक गर्भवतींच्या ओटीत मातृत्वाचा आनंद त्यांनी गेल्या साडेसात दशकांमध्ये टाकलाय. 

भंगारातून वैज्ञानिक खेळणी बनवणारे, गेली चार दशके त्यातलं विज्ञान अत्यंत सोप्या पद्धतीनं हजारो शाळांमधल्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणारे पुण्याचे अरविंद गुप्ता यांचं "पद्मश्री' विजेत्यांच्या यादीतलं नाव अनेकांना सुखद धक्‍का देणारं ठरलं. "कानपूर-आयआयटी'तून पदवी घेतलेला एक अवलिया होशंगाबादला एका प्रशिक्षणाला जातो काय, तिथं विज्ञान समजून घेण्यातली लहान मुलांची नेमकी अडचण प्रकट होते काय अन्‌ ती सोडविण्यासाठी "टेल्को'तली नोकरी सोडून मुलांमध्ये विज्ञान प्रसाराला वाहून घेतो काय, हजारो शॉर्टफिल्मद्वारे "कबाड से खिलौने' बनवणारा भन्नाट विज्ञानवादी म्हणून देशभर, जगभर ओळखला जातो काय, सारंच चाकोरीबाहेरचं. पैशांसाठी वेड्या बनलेल्या समाजासाठी विचित्र वाटावं असं. 

मुरलीकांत पेटकर हे असंच एक झाकलं माणिक. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव झाला अन्‌ कमरेखाली पांगळेपण नशिबी आलं; पण आयुष्याचा पांगुळगाडा नाही बनू दिला त्यांनी. 1972 च्या जर्मनीतल्या हेडलबर्ग परॉलिंपिकमध्ये 50 मीटर फ्रीस्टाइल जलतरणात विक्रमी वेळेसह देशाला पहिलं सुवर्णपदक त्यांनी मिळवून दिलं. तब्बल 45 वर्षे पेटकर दुर्लक्षित राहिले. अर्जुन पुरस्कारासाठी त्यांचा अर्ज तीन वेळा नाकारला गेला. आता पुरस्काराची आशा जवळपास मावळली असताना "पद्मश्री' जाहीर झाला. क्रिकेटपटू राहुल द्रविड, नेमबाज अभिनव बिंद्रा वगैरे मंडळींनी त्यासाठी केलेले प्रयत्न फलद्रूप झाले. 

"द लंडन जंगल बुक'मधल्या कलाकृतींसाठी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळालेले गोंड चित्रकार भज्जू श्‍याम. मध्य प्रदेशात जबलपूर, मंडला, शाहडोल भौगोलिक त्रिकोणाच्या खोबणीतल्या डिंडोरी जिल्ह्यातलं नर्मदेच्या दक्षिणेकडं पाटनगड हे त्यांचं गाव. घरची गरिबी. दहावीत शाळा, गाव सोडावं लागलं. अमरकंटक गाठलं. रोपवाटिकेत मजूर, रखवालदार, इलेक्‍ट्रिशियन असं पडेल ते काम केलं. चुलत्यांमुळं पारंपरिक चित्रकला हाती गवसली. रोपवाटिकेत एका रोपाचे दोन रुपये मिळायचे, तेव्हा दिल्लीत पाच चित्रे बाराशे रुपयांना विकली गेली. लंडनच्या एका रेस्टॉरंटमध्ये म्यूरलचं काम मिळालं अन्‌ नशीब पालटलं. पाच विदेशी भाषांमध्ये प्रकाशित "द लंडन जंगल बुक'च्या तीस हजार प्रती खपल्या. 

संपूर्ण जगापुढं प्लॅस्टिकच्या भस्मासुराचं मोठं संकट उभं आहे. त्यावर उपाय म्हणून प्लॅस्टिकचा भुगा रस्तेबांधणीसाठी वापरण्याचा तमिळनाडूमधील राजगोपालन वासुदेवन यांचा प्रयोग त्यांना "पद्मश्री' देऊन गेला. वीस वर्षे काबाडकष्ट करून पश्‍चिम बंगालच्या सुभाषिनी मिस्त्री यांनी गरिबांसाठी हॉस्पिटल उभं केलं. त्या कामाची दखल "पद्मश्री' देत सरकारनं घेतली. 

मध्य प्रदेशात मराठी ठसा... 
गडचिरोलीत आदिवासींना आरोग्यसेवा देणारं अभय व राणी बंग हे डॉक्‍टर दांपत्य, थॅलेसेमिया रुग्णांसाठी आयुष्य वेचलेले (कै.) संपत रामटेके अशी महाराष्ट्राला काम माहिती असलेली आणखी काही नावं. मध्य प्रदेशातल्या चौघा "पद्म' विजेत्यांमध्ये भोपाळच्या मालती जोशी व उज्जैनचे नव्वदीतले संस्कृत पंडित-भाष्यकार डॉ. केशवराव सदाशिवशास्त्री मुसळगावकर हे दोघे मराठी. मालती जोशी यांचा जन्म औरंगाबादचा, 1934 मधला. चाळीसहून अधिक मराठी, हिंदी पुस्तकांच्या लेखिका. भोपाळच्या साहित्यवर्तुळात आदरानं घेतलं जाणारं नाव. मुसळगावकर कुटुंबाचा संबंध शिंदेशाहीशी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com