लग्नाच्या बाजारात! 

Valentines Day
Valentines Day

नमस्कार मंडळी... 
सिंगल लोकांसाठी Valentine Day म्हणजे भळभळणाऱ्या जखमेवर मीठ चोळण्याचा दिवस... काही वेगळं नसतं या दिवशी, काही लोकांच्या मनात फुलपाखरं बागडतात पण अनेकदा ती फक्त बागडतातच... पण तुम्ही लग्नाच्या वयात येईतोपर्यंत प्रेम केलेलं नसणं किंवा तुम्हाला तुमचा पार्टनर नसणं म्हणजे महापाप झालंय हल्ली. अहो... हसू नका, खरंय हे... 

लव्ह करणारे आणि सगळं सेट असलेले फक्त आईवडील तयार होतील ना? किंवा मुलगा सेट कधी होईल आणि लग्न कधी होईल याच टेन्शनमध्ये असतात. आमच्यासारख्या सिंगल लोकांना म्हणजे माणूस शोधण्यापासून श्रीगणेशा करायचा असतो. बरं एवढं सगळं करूनही सिंगल लोकांचा Valentine Day अनेकदा रोजच्यासारखाच जातो ती गोष्ट वेगळीच... 

मुळात लग्न ठरणं आणि ते होणं ही प्रोसेस सध्या इतकी भयावह झाली आहे की लग्न म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो हल्ली. लग्नाच्या बाजारात तुमची किंमत कशावरून होईल आणि तुम्हाला काय प्रश्न विचारले जातील याची माहिती गुप्तचर यंत्रणाही लावू शकत नाहीत. 

परवा एका स्थळाला कॉल केला असता झालेला संवाद काहीसा असा...  

इंजिनिअरिंग आणि डॉक्टर न होणं म्हणजे पाप असतं हे मला परवाच कळलं... साल जरा वेगळ्या क्षेत्रात काम करणं आणि नव्या वाटा निवडणं आपल्या आयुष्याची 'वाट' लावू शकतं, हे अरेंज करताना नव्याने कळाय लागलंय.  

तर परवाचा संवाद काहीसा असा

ते : तुम्ही काय शिक्षण घेतलंय 
मी : Graduation 

ते : कशात 
मी : जर्नालिझममध्ये   

ते : ते काय असतं?
मी : बॅचलर ऑफ मास मीडिया म्हणून Graduation आहे काका... यात मी Jouranlism मध्ये specialisation केलं आहे. गेली ६ वर्षे पत्रकारितेत उप-संपादक म्हणून काम करत होतो. सध्या एका Ad Agency मध्ये Content Writer म्हणून काम करतोय... 

ते : म्हणजे तुम्ही नक्की काय करता?
मी : जाहिराती करतो... 

ते : बरं... पॅकेज किती आहे?
(इथे आपला संयम संपलाय... संपलाय म्हणजे संपलाय भौ...)
मी : काका मला महिन्याला अमुक एवढा पगार मिळतो... (अजून पॅकेज सांगण्याएवढा पगार नाही बाबा आमचा)

ते : बरं... आम्ही पत्रिका बघून कळवतो... 
मी : Ok... कळवा... 

नाही, पोरीच्या बापाला पोरीची काळजी आहे वगैरे हे असलं घरच्यांसारखं लेक्चर आता तुम्ही झाडू नका... 
ही अशी प्रश्नावली तुम्ही इतरांना लावता का?
म्हणजे एखाद्याने ८ लाखाच्या वरचं पॅकेज सांगितलं की त्याच्या कंपनीचं नावही विचारत नाही तुम्ही...  त्यांना काय काजव्यासारखा दिवाय का?

बरं ही झाली मुलांची बाजू... मुलींचं रंगरूप, जाडी, उंची यावरून सर्रास नकार दिले जातात. हल्ली पॅकेज हा मुद्दा मुलीच्या बाजूनेही स्ट्रॉंग असला तर मग ती आणखीनच पेचात सापडते... होकार येत नाही म्हणून स्वतःलाच दोष देत कुढत, रडत बसते. मुलींवरची बंधन आजही कमी झालेली नाहीत हा त्यामागचा आणखीन एक मुद्दा... मुलीनी कसं राहावं, काय कपडे घालावेत, कसं बोलावं हे सगळं समाजाने ठरविण्याचे दिवस गेले हो आता... 

मुलीनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास सुरुवात केल्यामुळे आता त्याही अपेक्षा ठेवू लागल्या आहेत, सो अमूक तमूक पगाराचाच नवरा पाहिजे असं म्हणणं म्हणजे चुकीचं आहे असं म्हणता येत नाही. मुलांनाही गोरी, उंचीला साजेशी अशी मुलगी हवीच असते की... मुळात अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीच पण अवास्तव अपेक्षा ठेवणं नक्कीच चुकीचं म्हणावं लागेल...  

असो, यावर मार्ग मात्र आपल्याच हातात असतात नाही का? 

व्हॅलेंटाईनसारख्या संधीचा लाभ घेऊन आपल्या मनातलं समोरच्याला सांगून तरी टाका.... काय होईल ते होईल एकदाच... सिंगल राहण्यापेक्षा बोलून रिकामं झालेलं बरं नाही का? पण हा टाईमपास करू नका, मनापासून आवडलेल्या माणसाला मनापासून स्वीकारून त्याच्यासोबत आयुष्यभर Valentine साजरा करणं म्हणजे खरा Valentine साजरा करण आहे... 

या विचारांना फालतू म्हणणाऱ्यांचं भविष्य उज्वल आहेच आणि आज कुणाला तरी आयुष्याभरासाठी Valentine करण्यासाठी धडपडणाऱ्या सिंगल जीवाना शुभेच्छाही आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com