भगतसिंगांचा नास्तिक होण्याचा प्रवास शेतकरी आंदोलनातून

bhagatsing
bhagatsing

प्रसंग 1898 मधला. दुष्काळामुळं विदर्भातल्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली होती. सरदार किशनसिंग यांना हे समजलं. ते लाला बिशंबभर सहाय आणि लाला शिवराम वकील यांच्यासह धान्य घेऊन विदर्भात पोहोचले. कुठं जालंदर आणि कुठं विदर्भ.. पण त्यांच्या मनातली देशभक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. केवळ मदतीचं वाटप करतील ते किशनसिंह कसले. ते येताना एकटे परतले नाहीत तर सोबत विदर्भातील आत्महत्या केलेल्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या 50 हून अधिक अनाथ मुलांना ते सोबत घेऊन गेले. फिरोजपूरला अनाथालय उघडून या मुलांची सोय केली. त्यावेळी किशनसिंग यांचं वय होतं 20 वर्षं! हे किशनसिंह म्हणजे शहीद भगतसिंग यांचे वडील.

देश बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी धावून जाण्याची वृत्ती असलेल्या या कुटुंबातच भगतसिंग जन्माला आला. शेतकरी आणि सर्वसामान्यांचं जगणं पाहूनच भगतसिंग घडले. त्यांच्या दृष्टीनं क्रांतिकार्य म्हणजे या लोकांच्या आयुष्यात बदल घडवणं. आजही शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत. ज्या देशउभारणीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान केले, त्यांचे स्वप्न आजही अपूर्ण आहे.

हा प्रश्न केवळ पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट शेतकर्‍यांचा नसून देशभरातील शेतकर्‍यांचा आहे अशी एक तीव्र भावना शेतकर्‍यांमध्ये पसरली आहे. ‘पगडी संभाल जट्टा’ म्हणत आज शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. पण या घोषणेचा संदर्भ आजचा नसून 125 वर्षांपूर्वीचा आहे. 1907 च्या दरम्यान ब्रिटिशांनी तीन शेती कायदे संमत केले होते. त्यावेळी भगतसिंग यांचे काका अजितसिंग यांनी पंजाबमधल्या सगळ्या शेतकर्‍यांना एकत्र करत या विरोधात आवाज उठवला होता. त्यांनी जागोजागी सभा घेतल्या. लाला लजपतराय यांनाही बोलावलं होतं. लाला बांके दयाल यांनी या आंदोलनात त्यांची ‘पगडी संभाल जट्टा’ ही कविता वाचली. या कवितेत शेतकर्‍यांचे प्रश्न, त्यांच्यावर होणारा अन्याय याबद्दल वर्णन होतं. या कवितेनं आंदोलनाला ‘पगडी संभाल जट्टा’ ही घोषणाच दिली. ती इतकी लोकप्रिय झाली की त्यावरून आंदोलनाचं नावंच तेच पडलं. ब्रिटिश सरकारला तीनही शेती कायदे रद्द करावे लागले. आज सरकार आपलेच असले तरीही 115 पेक्षा अधिक दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे असेच म्हणावे लागेल.

शहीद भगतसिंग यांचे सहकारी दुर्गाभाभी, विरेंद्रजी आणि भगतसिंग यांचे भाऊ कुलतारसिंग यांच्याशी वेळोवेळी मी केलेल्या चर्चांमध्ये एक संदर्भ पुढे आला. तो म्हणजे आर्य समाजाचे संस्कार असलेले, धार्मिक कुटुंबातील भगतसिंग नास्तिक का झाले ? भगतसिंग असे म्हणाल्याचे सांगण्यात येते, की आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे, मात्र शेतकर्‍यांवर आणि कष्टकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, यासाठी सध्याची व्यवस्था बदलणे गरजेचे आहे. भगतसिंगांचा नास्तिक होण्याचा प्रवास पंजाबच्या शेतकरी आंदोलनातून सुरू झाला होता. हे त्यांच्या उद्गारामधून दिसून येते.

शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य माणसांची दयनीय अवस्था पाहूनच त्यावर चिंतन करून भगतसिंगानं स्वतःला जे प्रश्न विचारले, त्यातूनच त्यांचा प्रवास नास्तिकतेकडे झाला. ‘ही पृथ्वी सर्वशक्तिमान विधात्यानं निर्माण केली तर हे जग दैन्य आणि यातनांनी का भरलेलं आहे?’ असा प्रश्नही त्यांनी विचारला. ‘श्रमिक जनतेसह सर्व मानवी समाजाची भांडवलशाहीच्या दास्यातून मुक्तता तो का करत नाही?’ असाही प्रश्न ते विचारतात. ‘शेतकरी आणि सर्वसामान्यांचा विचार करणारे अगणित स्त्री-पुरुष तयार होतील, ज्यांच्या मनात केवळ मानवजातीची सेवा हाच विचार असेल, तेव्हाच खर्‍या अर्थानं स्वातंत्र्ययुगाचा आरंभ होईल,’ असं भगतसिंग यांनी म्हटलं आहे.

‘शेतकरी आणि मजूर हे समाजाचे सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत. मात्र याच घटकांची सगळ्यात जास्त लूट समाजाकडून केली जाते. त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासूनही वंचित ठेवलं जातं. जे शेतकरी सगळ्यांसाठी अन्नधान्याची निर्मिती करतात, त्याच शेतकर्‍यांना भुकेनं मरावं लागतं. जे मजूर सगळ्यांसाठी कापड विणतात, ते त्यांच्या मुलांना अंगभर कपडे देऊ शकत नाही. जे मोठमोठ्या महालांचं बांधकाम करतात, त्यांना राहायला साधं घर नाही, अशी स्थिती आहे. भांडवलदार मात्र आरामात आयुष्य व्यतीत करत आहेत.’ भगतसिंगांच्या विचारांमध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला किती महत्त्व होतं, हे यातून सहज लक्षात येईल. भगतसिंग यांना फाशी दिली जाण्यापूर्वी दोन महिने आधी त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. त्यात ‘जमीनदारी प्रथेचा अंत’, ‘शेतकर्‍यांची कर्जमाफी’, ‘जमिनीचं राष्ट्रीयीकरण करून सामूहिक शेतीला चालना’, ‘सगळ्यांना राहायला घर’, ‘सर्व प्रकारच्या करांतून शेतकर्‍यांची मुक्ती’, ‘देशातल्या उद्योगांचं राष्ट्रीयीकरण’, ‘सर्वांना शिक्षण’, ‘मजुरांच्या कामाचे तास कमी व्हावेत’ अशा मुद्द्यांचा ऊहापोह होता. देश म्हणून अजूनही याच मुद्द्यांसाठी आपली धडपड सुरू आहे.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा एक विरोधाभास लक्षात घेण्यासारखा आहे. तो म्हणजे आंदोलक शेतकरी भगतसिंगांचा फोटो वापरत आहेत आणि ज्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे, ते केंद्रसरकारही भगतसिंग यांचा फोटो वापरत आहे. या देशामध्ये कष्टकरी शेतकर्‍यांना सन्मानाने जगता येईल असा विश्वास शेतकर्‍यांमध्ये निर्माण करणे आणि तशी कृती करणे हीच खरी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांना आदरांजली ठरेल.

(लेखक हे सरहद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com