अकाली... : मौजचे प्रकाशक संजय भागवत यांचे निधन

अकाली... : मौजचे प्रकाशक संजय भागवत यांचे निधन

मौज प्रकाशन गृहाबददल प्रत्येक मराठी वाचकाप्रमाणे नितांत आदर.मुंबईत आल्यानंतर ज्या गोष्टींचे तीव्र आकर्षण वाटे त्यात गिरगावातल्या खटाव वाडीचे फार वर.श्री.पुंचे चतुरंग पुरस्कारातले आखीव आणि आशयसंपन्न भाषण ऐकले, मग राम पटवर्धनांनीही भेटीची वेळ दिली. मराठी साहित्यव्यवहार नव्या बदलाकडे पहात असण्याचा हा काळ.मौजेचा पंथ दलित आणि अन्य प्रवाहांनी टिकेचा धनी केला होता.अकारण की कसे उत्तर शोधायची गरज वाटत नव्हती. साहित्यिक श्रीपु थकले आहेत,आता मौजेचे काय असा प्रश्‍न करत होते. चार्टर्ड अकांउंटंट असणाऱ्या संजय भागवतांनी मौजेची जबाबदारी सांभाळणे सुरू केले असल्याची बातमीही हळुहळू सर्वदूर पोहोचू लागली.सकाळ तेंव्हा मराठी सांस्कृतिक व्यवहाराला वाहिलेली पुरवणी काढत होता. ज्येष्ठ संपादक डॉ.अरूण टिकेकर यांच्या देखरेखीखाली साहित्यव्यवहाराची विचक्षण जाण असलेले सुनील कर्णिक या पुरवणीचे संपादन करीत.राजकीय बातमीदारीचा कंटाळला आला की दोघेही या पुरवणीत बागडण्याचे स्वातंत्र्य मुक्‍तपणे देत असत.डॉ.टिकेकरांना तर असली मुशाफिरी केलेली फार आवडे.मौजेचे कार्यालय पहायचे आहे असे डॉ.टिकेकरांना म्हणताच त्यांनी लगेचच सांगितले जा की,भेट संजयला. 

मौजेच्या कार्यालयात मुद्रण सुरू होते. त्यावेळी मुंबईत स्ट्रॅण्ड बुक स्टॉल जोरात होता.परदेशी पुस्तकांचे रीतसर हक्‍क मिळवून ती पुस्तके पुन:मुद्रीत करून स्ट्रॅण्डमध्ये विक्रीसाठी ठेवली जात. उत्तम दर्जाची वाचकांची निकड पूर्ण करण्यावर स्ट्रॅण्डचे मालक शानबाग यांचा भर असे. हे काम मौजेत होते असे ते सांगत.संजय भागवतांना भेटायला जीना चढून वर जात असताना जे मुद्रण दिसत होते ते अशाच पुस्तकांचे असावे.संजय फार बोलत नाहीत अशी कानी आलेली माहिती आणि मौजेच्या विदयापीठाबाबत मनात असलेला आदर यामुळे संवाद किती होईल याची खरे तर शंकाच होती. पण ते अत्यंत आस्थेने संवाद साधू लागले. हवेली बुलंद थी च्या बाकीच्यांच्या मनात दाटून राहिलेल्या जाणिवेपेक्षाही संजय वेगळे होते.त्यांना मराठी साहित्य व्यवहारासमोरची आव्हाने माहित होती.मौजेचा दरारा कायम ठेवणे ही आपली जबाबदारी असल्याची जाणिवही दिसत होती.द.भा.धामणस्करांची कविता आठवली परंपरेचे ओझे खांदयावर घेतल्यावर वडिलांनाच म्हाताऱ्या दिसू लागलेल्या मुलाची. क्षणात ययाती आठवला पण हे सगळे मनाचे खेळ होते. संजय भागवत आव्हानात्मक परिस्थितीत भागवतसंप्रदाय पुढे चालू ठेवण्यासाठी परिश्रम करणार हे दिसत होते. त्याबददल बोलताना कोणताही आव नव्हता ,खानदान की परंपरा सांगण्याची ईर्ष्या नव्हती. ग्रंथव्यवहाराबददल ते मोजकेच बोलले पण त्याबददलची आस्था मात्र जाणवत होती. ते सगळे ठिकाण हेरिटेज वास्तू भासत होते.बरे वाटले होते आणि श्री.पुं.चे पुतणे एकत्रितरित्या जबाबदारी सांभाळणार आहेत हे लक्षातही आले होते.मग संजय भेटत राहिले.सार्वजनिक कार्यक्रमात भेटत,मोजके बोलत पण त्यात मार्मिक टिप्पणी असे.कालांतराने मोनिका गजेंद्रगडकरांशी छान संवाद सुरू झाला अन मग श्रीकांत भागवत आणि त्यांच्या ंकुटुंबाशी पण ओळख झाली. एक दिवस अचानक संजय आजारी आहेत कळले अन विश्‍वास ठेवणे कठीण झाले.त्यांची पत्नी भाग्यश्री हे आजारपण खूप धीराने घेत होत्या असे ज्योत्स्ना प्रकाशनाचे विकास परांजपे , ज्येष्ठ लेखक़ आणि पत्रकार अंबरीश मिश्र सांगत असत.संजय कुठे कार्यक्रमात दिसतही.ओळखले का या प्रश्‍नावर हो असे उत्तरही देत.अकाली आलेल्या या आजारपणाने कुटुंबियांसमोर बरीच आव्हाने उभी केली असणार. त्याही परिस्थितीत त्यांच्या मुलाने परीक्षेत उत्तम यश मिळवल्याचेही त्यांच्या संबंधातली लेखक मंडळी आवर्जून सांगत.नानाविध उपचारांना ते प्रतिसाद देत आहेत हेही कानावर येई.मग काही दिवसांपूर्वी ते घरातच पडले ,शस्त्रक्रीया करावी लागली असेही समजले अन आज अचानक बातमी आली की सगळे संपले.ते कितीतरी दिवस आधीच संपले होते का? शरीर होते पण त्यातले प्राण,जाणिवा कुडीला सोडून दूरदेशी परागंदा झाले होते काय? महेश एलकुंचवारसर ,श्रीनिवास विनायक कुळकर्णी सारेच या अकाली विकल करून गेलेल्या आजारपणाबददल खंत व्यक्‍त करीत.संजय त्या पल्याड गेले असावेत.भागवतांचे कुटुंब खूप मोठे . त्यातल्या यशोदा , स्मिता अशा सुना आजाराशी सुरू असलेल्या या जिददी झुंजीचा उल्लेख करीत. मग मौज प्रकाशनाचा पत्ता बदलला , गिरगावातले बिऱ्हाड विलेपार्ल्यात हलले.दिवाळी अंकाबददल श्रीकांत भागवत आस्थेने बोलत.खूप साहित्य आले आहे असे गणपतीच्या आसपास समजे.मोनिका गजेंद्रगडकरांची संपादन करताना होत असलेली धावपळही समजे.सत्यकथा काळाच्या पडदयाआड झाल्याचे दु:ख पण जुने झाले . मौज आब राखूनआहे.त्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढल्या पिढीत पुढाकार घेणाऱ्या मितभाषी संजय भागवतांची अकाली एक्‍झिट या पार्श्‍वभूमीवर अधिकच चटका लावणारी आहे.अशोक मुळे या प्रकाशकांनी आर्थिक अडचणीत संजय यांनी कसा आधार दिला त्याबददल लिहिले आहे.भारती बिर्जे डिग्गीकर या कवयित्रीने त्यांनी दर दिवाळीअंकासाठी कविता पाठवत रहा असा निरोप आस्थेने दिला होता याबददल व्हॉटसअप समुहात उल्लेख केले आहेत. वि.पु .आणि श्री.पु.हे तर भागवतसंप्रदायाचे अध्वर्यू ,मराठी सारस्वत त्यांच्या कर्तृत्वाबददल कायम कृतज्ञ राहील.पडझडीच्या काळात मौज राखण्यासाठी संजय यांनी केलेल्या परिश्रमांचीही दखल घेतली जाईल ना ? भागवतांचे विशाल कुटुंब ग्रंथव्यवहाराची जबाबदारी उचलेलच पण इंग्रजीप्रमाणे आपल्याकडे पब्लिशिंग हाउसचा व्यवहार व्यापक होण्याची गरज संजय यांचा मृत्यू अधोरेखित करतो आहे काय?त्यांच्या स्मृतीला अभिवादन .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com