Meenal Thipse explain Definition of richness
Meenal Thipse explain Definition of richness sakal

श्रीमंतीची व्याख्या

पूर्वी दूधदुभतं नीट असेल घरात, तर ती श्रीमंती होती. मुलाबाळांना खायला प्यायला भरपूर असेल, तर ती श्रीमंती होती. घरात पैपाहुण्यांचा राबता असेल, तर ती श्रीमंती होती...?
Summary

पूर्वी दूधदुभतं नीट असेल घरात, तर ती श्रीमंती होती. मुलाबाळांना खायला प्यायला भरपूर असेल, तर ती श्रीमंती होती. घरात पैपाहुण्यांचा राबता असेल, तर ती श्रीमंती होती.

पूर्वी दूधदुभतं नीट असेल घरात, तर ती श्रीमंती होती. मुलाबाळांना खायला प्यायला भरपूर असेल, तर ती श्रीमंती होती. घरात पैपाहुण्यांचा राबता असेल, तर ती श्रीमंती होती. आल्यागेल्याचं नीट करता आलं, तर ती श्रीमंती होती. संस्कारांची श्रीमंती होती... संध्याकाळी शुभंकरोतीचे सूर कानी पडणारे आणि तुळशीसमोर रोजची सांजवात होणारे घर श्रीमंत होते. अर्थात, शैक्षणिक पाया उत्तम असणारे घरदार श्रीमंत होते!

आता प्रगती खूप झाली. कित्येक सुखं पायाशी लोळण घेत असतात. हव्या त्या वस्तू हव्या त्या वेळेला विकत घ्यायची ऐपत असते. पूर्वी फक्त दिवाळीला होणारा फराळ हल्ली रोज घरी दारी असतो. क्षणिक सुखासाठी कित्येक पैसे खर्च करायची तयारी असते. मुलांना अगदी हवं ते पालक म्हणून आई-वडील आणून देत असतात. स्त्रिया कमावत्या झाल्या आहेत. अगदी लाखो करोडो रुपये मिळवणारे मध्यमवर्गीयसुद्धा आहेत; पण तरीही समाधानाची श्रीमंती हरवलीय... छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याची श्रीमंती हरवलीय.

कोरोनाच्या काळात प्रत्येक जण आपल्या कुटुंबासह घरी होता. घर या चार भिंतींनी प्रचंड आधार दिला. सुखाच्या व्याख्या बदलत गेल्या. कुठंतरी अलवार सगळं उमजायला लागलं. त्या मोगऱ्याच्या कळ्यांनासुद्धा समजून घ्यायला शिकता आलं, जुन्या-नव्याची सांगड घालता घालता दमछाक झालेल्या मनावर सांजवेळी तुळशीजवळ लावलेल्या दिव्याचीसुद्धा जवळीक वाटू लागली, नभी अवतरलेल्या त्या कोवळ्या किरणांपासून ते कातरवेळी मावळात जाणाऱ्या अगाध रंगांच्या काळोखाचासुद्धा आधार वाटू लागला, हातातून सुटत चाललेली नाती पुन्हा मायेच्या आलवणाखाली आली, तर हातात धरलेल्या वाळूसारखा वेळ हातातून सुटत चालला आहे याची जाणीव होऊ लागली. मित्रांचे कट्टे ओस पडले होते; पण आठवणींनी डोळ्यांच्या कडा ओल्या होत्या. नात्यांची वीण सारखी करायला थोडा वेळ मिळाला होता; पण हातातून निसटून काही जाऊ नये, म्हणून प्रत्येक जण लढत होता!

उद्या काय असेल, याची काकणभर शाश्वती नसताना उमेदीच्या आश्वासनात सूर्यास्त होत होता. ‘होईल होईल सगळे नीट. निर्धास्त राहा’ म्हणत घरचे कर्ते उसनं अवसान आणत होते. ‘अहो, का काळजी करता? आहे ना मी तुमच्यासोबत,’ म्हणत अर्धांगिनीही नकळत हातावर हात ठेवत होत्या. आपली चिमणी पाखरं कावरीबावरी झाली, तरी मायबापांना आधार देत त्यांची सय सोपी करत होती.

कुठंतरी आशेवरच जगायचंय, उत्तम वाचायचंय, उत्तम लिहायचंय, संस्कारक्षम पिढी घडवायचीये, अजून खूप अनुभवायचंय...यातूनही बाहेर पडायचंय! हीच खरी श्रीमंतीची व्याख्या.

हौसेला मोल नसतं आणि आयुष्य साधं आणि मस्त जगायचं असेल, तर अगदी साधी गोष्ट करायची ती म्हणजे एखादा छंद जोपासणं. गोष्टी अगदी सोप्या असतात; पण सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रसन्न मनानं केल्या जाणाऱ्या सगळ्याच गोष्टी खूप समाधान देऊन जातात. आणि हे असं ऐश्वर्य उपभोगायलासुद्धा नशीब लागतं. माझी श्रीमंतीची व्याख्याच भौतिक सुखांपेक्षा वेगळी झालीये हल्ली. इवलंसं चाफ्याचं रोपटं आपल्या प्रेमाच्या खतपाण्यानं आपल्या उंचीएवढं होतं आणि भरभरून पिवळ्या धमक रंगाची उधळण आणि श्वासात भरून ठेवावा अशा सुगंधानं आसमंत भरून जातो, तर कधी एखाद्या पावसाच्या सरीनंतर ‘अहों’नी अगदी नाजूक मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणावा!

गजरा माळावा इतकं सुखद प्रेम असावं

तो केसात माळताना तुझ्या हाताने

स्मित हसऱ्या डोळ्यात पटकन दिसून यावं

इतकं साधं सरळ श्रीमंत ते प्रेम असावं!

- मीनल ठिपसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com