करामत (मेघना परांजपे)

meghna paranjpe
meghna paranjpe

"समीर नाही, तर केतकी आपली किती काळजी घेते! तशी चांगली आहे, कधीकधी उगाच आपल्याला तिचा राग येतो,' असं पुटपुटत ललिताबाईंनी जेवायला पान घेतलं. पातेल्याचं झाकण उघडताच कटाच्या आमटीचा वास दरवळला. मायक्रोवेव्हमध्ये त्यांनी अन्न गरम करून घेतलं आणि त्या जेवल्या. 'आज केतकीनं अगदी मनापासून स्वयंपाक केलेला दिसतोय. बटाट्याची भाजी, कटाची आमटी. वा! सगळं जेवण मनासारखं चविष्ट झालंय,'' तृप्तीचा ढेकर देत ललिताबाई स्वतःशीच म्हणाल्या. रोजच्यापेक्षा दोन घास जास्तच जेवल्या. केतकी नुसती सुटलीच होती. कधी बिशीबिळीअन्ना, तर कधी शाही पुलाव. कधी आलू मटर, तर कधी छोले. एकेक पदार्थ इतके स्वादिष्ट, की ललिताबाई तिच्यावर एकदम खूष झाल्या.

तशी व्हिसाची वगैरे कामं झाली होती. ऑफिसमधले प्रोजेक्‍ट्‌स समीरनं मार्गी लावले होते. प्रेझेंटेशनवर या वेळेला खूपच मेहनत घेतली होती. न्यूयॉर्कला जायची संधी त्याला प्रथमच मिळत होती. आतापर्यंत दुबई, हॉंगकॉंग अशा पूर्वेकडच्या शाखामध्ये तो जाऊन आला होता; पण या वेळेस न्यूर्याकला जायचं होतं. अमेरिकेला जायचं त्याचं खूप दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होणार होतं. मात्र, तरी समीर जरा काळजीत दिसत होता. त्याचा चिंताग्रस्त चेहरा बघून केतकी त्याच्याजवळ येत लडिवाळपणे म्हणाली ः 'आपलं लग्न होऊन जेमतेम दोन महिने झाले. मला सोडून जावं लागतंय, म्हणून असा काळजीत पडलास का? अरे पंधरा दिवसांचाच तर प्रश्‍न आहे. रोज फोन करत जाऊ.''
केतकीच्या या बोलण्यातली मिश्‍कीलपणाची छटा समीरला जाणवली. आपल्या मनातली खळबळ लपवत समीर केतकीला म्हणाला ः 'अगं, पंधराच काय, चांगले पं..ध..रा दिवस! खूप होतात ग! तुला सोडून जायचं म्हणजे...''
'हो ना रे! मला रजाही मिळत नाहीये. नाही तर आईकडे तरी गेले असते रे.'' 'अन्‌ मातुःश्री? त्यांचं काय?''
'माझी आठवण बिठवण काही नाही. आता खऱ्या मुद्‌द्‌यावर आलास बघ. तुझी काळजी मला चांगलीच समजतीये. पं..ध..रा.. दिवस आई माझ्या तावडीत असणार म्हणून काळजी वाटतीये. हो ना?''
'अगं, तावडीत काय म्हणतेस?''
'सध्या त्यांना डोळ्यामुळं गॅसपाशी जाऊ नका, असं डॉक्‍टरांनी सांगितलंय ना? म्हणजे त्यांना आता माझ्या हातचं खावं लागणार. हो ना! नेमक्‍या राधाबाईही त्यांच्या गावी चालल्या आहेत.''
केतकीला स्वयंपाक यथातथाच येतोय. कसं काय होणार, असा विचार करत समीर नेटवर सर्फिंग करू लागला. केतकीला मात्र अजिबात टेन्शन नव्हतं. तिचं काम करताकरता ती आपल्याकडं बघून हसते आहे, असा समीरला भास झाला.
'समीर, तुला सोडायला यायची इच्छा होती रे,'' ललिताबाई समीरला म्हणाल्या.
'अहो आई, ऑफिसच्या कामाला फक्त 15 दिवसांसाठी चाललाय हा. पोचवायला कशाला जायचं? ताई नेहमी एकटीच जाते...'' ः केतकी.
'तुझी ताई सारखीच जाते गं. हा पहिल्यांदाच चालला आहे ना आणि तेसुद्धा अमेरिकेला. लांबचा प्रवास आहे ग म्हणून आपलं वाटतं.''
समीर ः 'आई, केतकी म्हणते ते खरं आहे. पहिल्यांदा दुबईला गेलो, तेव्हा तू आणि बाबा दोघं आला होतात की सोडायला. आता नेहमीचंच झालं आहे हे.''
'हे असते तर तुला कशाला विचारत बसले असते रे?'' ललिताबाईंचा आवाज गहिवरला.
'आई, अगं तेव्हा दुपारची फ्लाइट होती. आता रात्री तीनची फ्लाइट आहे. तुम्ही दोघी रात्री अपरात्रीच्या कशा घरी जाणार? उगाच मला काळजी राहील.''
'तेही खरंच. माझ्या लक्षात आलं नाही खरं,' स्वतःला सावरत ललिताबाई म्हणाल्या.
समीरला जाऊन दोन दिवस झाले. केतकी ललिताबाईंची व्यवस्थित काळजी घेत होती. मात्र, जेवणाचे वांधेच होते.
'आई, सध्या ऑफिसमध्ये जरा जास्त काम आहे, म्हणून मला लवकर घरी येता येत नाही. तोपर्यंत जेवणाचं जरा यथातथाच होईल. मात्र, हे काम पूर्ण झालं की बघा लवकर येईन आणि जेवण अगदी फर्मास बनवीन. दुसऱ्या दिवशीची तयारी आधी करून ठेवायला वेळ मिळेल. मग बघा कसा स्वयंपाक करते ते!'' केतकीनं ललिताबाईंना आश्‍वास दिलं. केतकीची ओढाताण त्याही बघत होत्या. त्यामुळे त्या काही बोलत नव्हत्या आणि बोलणार कुणाजवळ? केतकी त्या उठायच्या आधीच जायची अन्‌ रात्री परतायची. शेजारच्या शोभामावशीही दोन दिवस त्यांच्या लेकीकडे गेल्या होत्या. बरं कामवाल्या बाईंशी बोलावं तर त्यांना भरपूर घाई. फटाफट काम उरकून कधी पळते, असं त्यांना होई.
त्या दिवशी केतकी संध्याकाळी साडेसातला घरी आली. ललिताबाईंना खूप बरं वाटलं. चहापाणी झाल्यावर केतकीनं त्यांना आवर्जून विचारलं ः 'आई, उद्या कोणती भाजी करायची?'' हा प्रश्‍न ललिताबाईंना अनपेक्षित होता. 'अगं, तुझ्या या धावपळीत तुला जी जमेल ती कर; पण मीठ जरा बेताचं घाल हं. काल भाजी खारट झाली होती,'' ललिताबाईंनी तेवढ्यात सुनवलं. सगळा स्वयंपाक उरकून केतकी नेहमीप्रमाणं ऑफिसला गेली. आज ती फारच खुशीत होती. ललिताबाईंनी उठल्यावर त्यांची नेहमीची कामं उरकली. त्यांची आवडती सिरिअल बघितली. आता थोडं वाचन करूयात, अशा विचारांत असतानाच फोन वाजू लागला. त्यांनी रिसिव्हर कानाला लावला.
'आई, मी केतकी बोलते आहे.''
'का गं, काय झालं. सगळं ठीक आहे ना?''
'हो. सगळं ठीक आहे. तुम्ही जेवलात का हे विचारण्यासाठी फोन केला.'' 'नाही अजून. थोड्या वेळानं बसेन.''
'उगाच उशीर करू नका. आता बारा वाजलेत. एकच्या आधी जेवून घ्या. ऍसिडिटीचा त्रास होईल नाही तर.''
'हो ग बाई. आता बसतेच बघ. तुझं झालं का जेवण?'' 'कॅन्टीममध्ये एकलाच जेवण मिळतं. बाय.''
"समीर नाही, तर केतकी आपली किती काळजी घेते! तशी चांगली आहे, कधीकधी उगाच आपल्याला तिचा राग येतो,' असं पुटपुटत ललिताबाईंनी जेवायला पान घेतलं. पातेल्याचं झाकण उघडताच कटाच्या आमटीचा वास दरवळला. मायक्रोवेव्हमध्ये त्यांनी अन्न गरम करून घेतलं आणि त्या जेवल्या. 'आज केतकीनं अगदी मनापासून स्वयंपाक केलेला दिसतोय. बटाट्याची भाजी, कटाची आमटी. वा! सगळं जेवण मनासारखं चविष्ट झालंय,'' तृप्तीचा ढेकर देत ललिताबाई स्वतःशीच म्हणाल्या. रोजच्यापेक्षा दोन घास जास्तच जेवल्या. त्यामुळे रात्री नुसत्या दहीपोह्यावर त्यांचं भागलं.
केतकी नुसती सुटलीच होती. कधी बिशीबिळीअन्ना, तर कधी शाही पुलाव. कधी आलू मटर, तर कधी छोले. एकेक पदार्थ इतके स्वादिष्ट, की ललिताबाई तिच्यावर एकदम खूष झाल्या. केतकीसुद्धा नेटवरून रेसिपी बघत असावी, असा त्यांचा अंदाज होता. काही असो, त्या तिच्या स्वयंपाकावर जाम खूष होत्या. इतक्‍या, की चक्क केतकीच्या देखत समीरशी बोलताना त्यांनी तिची तोंडभरून स्तुती केली.
'अरे समीर, केतकी अगदी सुगरण आहे हो. आम्हाला शिकायला वेळ लागला; पण ही पठ्ठी अगदी तयार झाली आहे बघ. रोज नवनवीन अगदी स्वादिष्ट जेवण करून घालती आहे बघ.''
समीरनं ओळखायचं ते ओळखलं. बहुधा केतकी सगळं हॉटेलमधून आणून ठेवत असेल आदल्या दिवशीच. मागं एकदा तिच्यावर स्वयंपाकाची वेळ आली, तेव्हा त्यानंच तिला हॉटेलमधून आणून दिलं होतं सारं. काही असो. दोघींचं चांगलं जमतंय हे ऐकून समीरला बरं वाटलं. त्याची मोठी काळजी मिटली होती. त्याचं ऑफिसचं काम आता संपलं होतं. रेवाताईकडे जाऊन मग विक्रमकडे तो जाणार होता आणि मग मुंबई.
इकडे शोभामावशी मुलीकडे जाऊन आल्या होत्या. दुपारी ललिताबाईंकडे आल्यावर त्यांनी त्यांच्या लेकीचे गोडवे गायला सुरवात केली. 'फार उरक्‍याची आहे! सगळ्यांचं करून ऑफिसला जाते; परंतु संध्याकाळी आल्यावर काहीतरी वेगळी डिश. पाणीपुरी, रगडा पॅटिस वगैरे वगैरे,'' असं त्या सांगत राहिल्या. ललिताबाईंनीही आपल्या सुनेचं वारेमाप कौतुक केलं ः 'अहो शोभामावशी, केतकी तर इतका स्वादिष्ट स्वयंपाक करते, की काही विचारूच नका. रोज वेगळी आमटी, वेगळा भात. चव आहे पोरीच्या हाताला.''
"नेहमी काहीतरी खोट काढणाऱ्या ललिताबाई सुनेचं एवढं कौतुक करत आहेत? काय भानगड काय?,' असा प्रश्‍न मनात येऊन शोभामावशींची मुद्रा साशंक झाली. त्या मुद्रेकडे बघत ललिताबाई म्हणाल्या ः '"खोटं वाटतंय ना? असं करा, उद्या तुम्ही माझ्याबरोबर जेवायलाच या कशा. दोघी मिळून जेवू या इथंच.''
ठरल्याप्रमाणं शोभामावशी जेवायला आल्या. केतकीनं आज ललिताबाईंच्या आवडीची बटाट्याची आमटी, लेमन-राईस असा झकास बेत केला होता. खोबऱ्याची चटणी आणि कैरीचं लोणचं होतंच तोंडी लावायला. ललिताबाईंनी नेहमीप्रमाणं आमटी मायक्रोवेव्हमध्ये गरम गेली. त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. 'बघा, कसा झकास वास सुटलाय आमटीचा,'' असं त्या म्हणाल्या. मात्र, शोभामावशींना काही बासबिस येत नव्हता. त्या आपलं ललिताबाईंच्या हो ला हो म्हणाल्या इतकंच. शोभामावशींनी घरून भाजी, भात सगळं ताटच वाढून आणलं होतं. दोघींनी एकमेकींना वाढलं आणि त्या जेवायला बसल्या. जेवताना ललिताबाई जेवणाची खूपच स्तुती करत होत्या. शोभामावशींना केतकीचा स्वयंपाक चविष्ट लागला नाही. त्या बुचकळ्यात पडल्या होत्या. "अगदीच बेचव पदार्थांना चोखंदळ ललिताबाई इतकं स्वादिष्ट कसं काय म्हणत आहेत? वयोमानानं जिभेत काही फरक झाला असेल का?,' असा विचार त्या करायला लागल्या. खरं तर वय वाढलं, की चवीची जाणीव कमी होते आणि अन्न बेचव लागतं, असं त्यांनी कुठेस वाचलं होतं; पण काय माहीत? आपल्याच जिभेची जाणीव बदलली आहे का?... त्या संभ्रमात पडल्या आणि आपल्याच विचारात घरी निघून गेल्या.
"आपल्या सुनेनं एवढा चांगला स्वयंपाक केला म्हणून शोभामावशींची बोलती बंद झाली असावी,' असा विचार ललिताबाईंच्या मनात घोळत होता. संध्याकाळी त्यांनी हे केतकीला बोलूनही दाखवलं.
दुसऱ्या दिवशी समीर घरी आला. अमेरिकेहून त्यानं केतकीसाठी छान ड्रेस आणि त्याच्यावर मॅचिंग पर्स आणली होती. शिवाय रेवाताईंनी तिच्यासाठी घड्याळ पाठवलं होतं. त्यामुळे केतकी एकदम खुशीत होती. आईसाठीही पायाला मसाज होईल असं "स्पा' आणलं होतं. त्यामुळे ललिताबाईही खूश होत्या.
रात्री झोपायला बेडरूममध्ये आल्यावर समीरनं केतकीला प्रश्‍न केला ः 'काय बाईसाहेब, रोज वेगवेगळ्या हॉटेलमधून जेवण आणत होतात, की रोज एकाच हॉटेलमधून?''
'समीर, जेवण मी स्वतः बनवत होते.''
'शक्‍यच नाही. आई, तुझ्या जेवणाचं एवढं कौतुक करत होती, म्हणजे नक्कीच ते तू बनवलेलं नसणार.''
'मला माफ कर समीर. मीच बनवलं.... पण स्वयंपाकाला आणि आईंनाही.''
'म्हणजे?'' 'अरे, तुला माहीत आहे ना, आमच्या कंपनीत रिसर्च चालला आहे ते! चवीचा आणि वासाचा आभास निर्माण करणारी स्मार्ट चिप आम्ही तयार केली आहे. अजून ती प्रायोगिक तत्त्वावरच आहे. काही देशी पदार्थांसाठी चाचण्या झाल्यात. सेन्सर्स उत्तम काम करतायत. मी आईंवर तो प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वी झाला. समीर, आहेस कुठं?''
'काय? आईवर प्रयोग केलास? अगं, पण तू हे साधलंस कसं! तिला काही कळलं नाही?''
'ऑफिसला जायच्या आधी विशिष्ट ठिकाणी म्हणजे जिथून आपल्याला चवीचं, वासाचं ज्ञान होतं ना, तिथं आईच्या केसात मी ती चिप बसवून जायची. त्यांच्या नकळत! ती चिप इतकी पातळ आणि अगदी आपल्या त्वचेसारखीच आहे, की त्यांना ती लावलेली कळलीसुद्धा नाही. त्या चिपमुळे त्यांना माझं जेवण अगदी सुग्रास वाटायचं.''
'केतकी, अगं स्मार्ट चिप शोधून काढलीत, ते चांगलंच आहे; पण असं एखाद्याच्या नकळत त्याच्यावर प्रयोग करणं म्हणजे शुद्ध फसवणूकच आहे. तिला विचारून करायला पाहिजे होतंस.''
'ग्रेटच आहेस. त्यांनी दिली असती का परवानगी? आणि हे बघ, तू इथं नव्हतास. उगाच साध्या जेवणावरून आमच्यात वादविवाद झालेले तुला आवडले असते का? रोज रोज हॉटेलचं परवडणार नाही आणि त्यांना सोसणारही नाही. म्हणून मी अशी आयडिया केली. शिवाय आमच्यासारख्यांवर म्हणजे ज्यांना माहीत आहे, अशांवर प्रयोग करून झालाय. त्याचे रिझल्ट्‌स चांगले आहेत; पण ज्यांना काही कल्पना नाही त्यांचा रिस्पॉन्स बघायचा होता. म्हणूनही आईंवर हा प्रयोग करण्याचं धाडस मी केलं.''
'बरं का समीर. सध्या या स्मार्ट चिपमध्ये इरेझेबल टेस्ट प्रोग्रॅम बसवले जातात. ते कायमस्वरूपी कसे बसवता येतील, यावर संशोधन सुरू आहे. शिवाय सेन्सर्स (संवेदक) फक्त सात तास परिणामकारक राहू शकतात. त्याचीही रेंज वाढवायची आहे. मी आईंना रोज एकच्या आत जेवण करून घ्या, अशी आठवणीनं आठवण करून द्यायची फोन करून ते एवढ्याचसाठी.''
'वा! म्हणजे तुझा प्रयोगही झाला आणि आईही खूश झाली. मॅडम, फारच चांगली करामत केलीत; पण हे आईला कळेल तेव्हा?''
'आईंना कसं कळेल? मी तर काही सांगणार नाही. आणि तूही पचकू नकोस.''
'नाही बाई. मी अजिबात सांगणार नाही. हॅप्पी?'' समीर म्हणाला. समीरच्या हास्यानं केतकी सुखावली, तरी समीर गप्प राहील की नाही, याबद्दल ती साशंक होती. 'जाऊ दे. पुढचं पुढे बघू. कळेल तेव्हा कळेल सासुबाईंना. कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल कोण जाणे? आता तरी आपण त्यांना आभासी जगाची सफर घडवून आणण्यात यशस्वी झालो,'' या विचारानं केतकी आनंदली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com