सहकारातील संवेदनशील साहित्यीक- श्रीकांत देशमुख

shrikant deshmukh
shrikant deshmukhsakal media

सहकारातील संवेदनशील साहित्यीक- श्रीकांत देशमुख

- मीरा ढास

दैनंदिन शासकीय कामकाजात अधिकाऱ्यांचे 'साहेब' आणि साहेबांचे 'मोठे साहेब' बनत जातात, पण सर्वसामान्य नागरिकांसाठी आपण एक प्रशासकीय अधिकारी असण्या सोबतच माणूस म्हणूनही खूप चांगले काम करु शकतो हा विचार घेऊन चौकटीच्या बाहेर जाऊन काम करणारे किती अधिकारी असतात हा मोठा प्रश्न आहे. काही अधिकारी चौकटीत राहूनही समन्यायी भूमिका घेणारे व प्रशासनाची भूमिका साकारणारे असतात. चांगले अधिकारी प्रशासनात असले तर नित्यनवीन प्रयोगातून जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी चांगली होण्याची शक्यता असते.

श्रीकांत देशमुख यांनी आपल्या शासकीय सेवेत केलेली कामे या दोन्हीही प्रकारात मोडणारी आहेत. ते अतिशय संवेदनशील साहित्यीक ,असून शासनात काम करताना सकारात्मकता कायम ठेवून समाजमनाचे आकलनाने त्यांनी वेगळी भूमिकेने कामे केली आहेत. याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांना असणारी समाजमनाची जाण आणि लोकजीवनाचे आकलन. अधिकारी असा असला तरच तो अधिक प्रभावी कामकाज करू शकतो,आणि अधिकाधिक लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो. समाजाभिमुख काम करणारा अधिकारी वर्ग तसा संख्येने मोजकाच ,त्या मोजक्या अधिकऱ्यात देशमुख यांची गणना करावी लागेल.

लातूर विभागीय माहिती कार्यालयात काम करत असताना प्रशासनाची टीम म्हणून कधी विविध आढावा बैठका अथवा कार्यक्रम यांच्या निमित्ताने सर्व शाखा प्रमुख एकत्र येत असूत , तेंव्हा सहकार विभागाचे विभागीय सह निबंधक म्हणून काम करणारे श्रीकांत देशमुख म्हणजे शेती, सहकार, शेतकऱ्यांचे अर्थविश्व आणि भावविश्व समजून घेऊन तेवढ्याच संवेदनशीलतेने काम करणारे सहकार विभागाला लाभलेले प्रशासनातील डोळस अधिकारी म्हणून त्यांचा परिचय आम्हा सर्व टीमला आहे. सहकार विभागातील महत्वाचे काम म्हणजे शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करणे आणि शासनाच्या कर्जमाफी योजनेच्या लाभातून कर्जामुळे होणारे नुकसान टाळणे हे आहे.

याबरोबरच विविध प्रकारच्या सहकारी संस्था विषयीं प्रशासकीय, न्यायालयीन कामकाज हा विभाग करीत असतो. देशमुख यांचा प्राध्यापक ते विभागीय सह संचालक, सह निबंधक सहकारी संस्था या पदापर्यंतच्या प्रवासात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे रुपांतर शेतकरी बांधवांच्या हितासाठी ते करीत आलेले आहेत. तसेच कार्यालयातील त्यांचे इतर कर्मचारी अथवा पदाने कनिष्ठ सहकारी यांच्याशी असलेले वागणे नेहमीच आदराचे,प्रेमाचे रहात आले आहे. श्रीकांत सर एक उत्तम व्याख्याते , वक्ते म्हणूनही सुपरिचित आहेत. त्यांची विविध कार्यक्रमास लाभलेली उपस्थिती विध्यार्थी, नवोदित लेखक, अधिकारी यांच्यासाठी मार्गदर्शक व दिशादर्शक ठरली .आमच्या माहिती विभागाच्या विभागीय प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केलेले मार्गदर्शन लातूर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कायम आठवणीत राहणारे आहे.

लातूर येथे कार्यरत असतानाच त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार- २०१७ ला प्राप्त झाला. योगायोगाने त्यांची स्थानिक पातळीवरची पहिली मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. त्या मुलाखतीत त्यांनी स्वतः पेक्षा साहित्य आणि समाजमन यावर जास्त भाष्य केले होते. लातूरच्या साहित्यीक आणि सांस्कृतिक योगदानात प्रशासनातल्या एका अधिकाऱ्याची राष्ट्रीय पातळीवर साहित्य क्षेत्रात दखल घेतली गेली याचा आनंद आणि अभिमान यावेळी मला वाटला. तसे तर साहित्यीकांना आपण वाचक त्यांच्या लिखित साहित्याच्या वाचनातून जाणून घेतो. हे जाणताना पण त्याला स्वत:ला भावनासंपन्न असणं आणि व्यक्त होण जमायला हवं. दुर्दैवाने आपल्याकडे या गोष्टींची प्रचंड टंचाई आहे. श्रीकांत देशमुख यांनी आपल्या लिखीत साहित्यातून चेहरा नसलेल्या जगाच्या वेदना मांडल्या आहेत.साहित्य हे केवळ मनोरंजन करण्यासाठी नसून समाजाला परिवर्तनाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठीही आहे,ही त्याची भूमिका आहे.

'पिढीजात' या त्यांच्या बहुचर्चित कादंबरीत मांडलेले प्रशासनाचे स्वरुप अनेक अर्थाने ती एक प्रकारची नवी शोषण व्यवस्था आहे,हेच चित्रित करणारे आहे. प्रशासनाकडून असणाऱ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतात का ? त्यांना अपेक्षित असणारा किमान न्याय त्यांना मिळतो का ? या प्रश्नाची उत्तरे अजूनही नकारात्मकच आहेत. मग ही व्यवस्था नेमकी कश्यासाठी आहे,हा प्रश्न ही कादंबरी वाचून पडतो.सरकारी अधिकाऱ्यांना हस्त पुस्तक म्हणूनही या कादंबरीचा उपयोग होऊ शकेल, इतकी ती महत्वाची आहे. आपल्या भोवतालचे समाज वास्तव, प्रशासकीय वास्तव चित्रित करुन कोणत्या प्रकारच्या प्रशासनाची आवश्यकता आपल्याला आहे याची दिशा दाखवणारी ही महत्वपूर्ण कादंबरी. बांधिलकी जपणारे असे एक साहित्यीक आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून देशमुख यांच्याकडे पहावे लागते. सरकारी काम करीत असताना देखील त्यांनी ही बांधिलकी कायम जपली आहे,हे महत्त्वाचे. केवळ विचार मांडून कामे होत नसतात,तर त्याला कृतीचीही जोड द्यावी लागते, याचे एक उत्तम उदाहरण म्हणून देशमुख यांच्याकडे पहावे लागेल.

नोकरदार वर्गाची सध्याची मानसिकता घर, मुले, नोकरी या तीन पटाच्या बाहेर गेलेली दिसत नाही. कुटुंबाची जी व्याख्या शासनाच्या परिभाषेत आहे त्यात आई, वडिल, भाऊ, बहिण, यांचाही समावेश असतो. ती आता संकुचित करुन नोकरदार वर्ग नात्यातील, वागण्यातील आणि आपल्या कर्तव्याप्रती असणारी भावनाच विसरला की काय ? असं कधी - कधी कायम वाटत राहतं. समाजवास्तवाची जाणीव करुन देणारे लिखाण त्यांनी सातत्याने केले आहे . त्याचबरोबर निसर्ग, संवेदना, माणूसपण याकडे जाणारी भूमिका घेऊन दिशादर्शक ठरणारे विचार त्यांनी सातत्याने आपल्या लेखनातून मांडले आहेत. देशमुख आपल्या बोलण्यातून नकळत समोरच्याला चिंतन करायला लावतात. प्रशासन हे समस्या सोडवण्यास साह्यभूत ठरणारी प्रभावी यंत्रणा असून आपण त्याचा सकारात्मक संवेदना जागृत ठेवून काम केल्यास We are problem slover या गटात खऱ्या अर्थाने असू असं त्यांच मत आहे.

काही वर्षापूर्वी त्यांचं आयएएस च्या पदासाठी नामनिर्देशन यादीत नाव असतानाही ते त्यांना माहिती नव्हतं ही बाब त्या पदाविषयी असणारं त्यांचं निर्लेपपन सांगणारी आहे. अश्या गोष्टीचा कित्येक अधिकारी किती पाठपुरावा करतात, जमेल त्या मार्गाने अशी पदे मिळवतात पण देशमुख यांना त्याचा लवलेशही नव्हता.पद मोठं किंवा छोटं नसून आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी खऱ्या अर्थाने आहे त्या परिस्थितीत काम करणं हे महत्वाचं मानल्याने वरच्या पदाचा त्यांनी लोभ ठेवला नाही.

उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्याबरोबरच मराठवाड्यातील दुष्काळी भागात जेथे पाणी, शेती आणि पुढाऱ्यांचा सुकाळ असणाऱ्या या भागात काम करण्याचं आव्हान, पुणे, मुंबईचा ग्रीन बेल्टचे आकर्षण न ठेवता केलेली शासकीय नोकरी म्हणजे 'विकासात्मक प्रशासना' मध्ये सहभाग त्यांनी नोंदवला आहे. प्रत्येक समुहाचे प्रतिनिधीत्व सत्तेत किंवा प्रशासनात पोहोचले म्हणजे त्यांचे प्रश्न सुटले, असे मानणे गैर आहे. मुळात आपल्या तथाकथित लोकशाहीत सामान्यांचे प्रश्न अधिक जटिल झालेत. प्रशासन हे सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे की वाढवण्यासाठी, असा प्रश्न निर्माण झालेला हा काळ आहे. खरे तर अश्या काळात शोषित समूहाशी अथवा घटकांशी जोडलेलं रहाणं अधिक गरजेचं आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रशासन लोकाभिमूखपणे काम करण्यात अधिक यशस्वी होऊ शकते. सामान्यासाठी असामान्य कार्य प्रशासकीय अधिकारी करु शकतात, ही जाणीव फार कमी अधिकाऱ्याजवळ असते.काही अधिकारी कामे न करताही आपणच हे केले,असा आभास निर्माण करण्यात यशस्वी होताना दिसतात. यामुळे मुळात उत्तम कामे करणारा अधिकारी दुर्लक्षित रहातो.

'ग्लॅमरस' न मिळवणारा व त्याचे आकर्षणही नसणारा साहित्यिक अधिकारी म्हणून देशमुख यांच्याकडे पहावे लागते. कामातून मिळणारा आनंद त्यांना महत्वाचा वाटतो. खरे तर असेच अधिकारी, काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी वर्गासाठी अधिक प्रेरणादायी असतात. कुठल्याही प्रकारचा अभिजातपणा कधी निवृत्त होत नसतो, तर तो काळानुरूप अधिक प्रगल्भ होत जातो. असा अभिजातपणा कार्यात आणि प्रशासनात श्रीकांत देशमुख यांनी निरंतर कायम ठेवला ,तो आपल्या लिखाणातून त्यांनी तो अधिक प्रवाही केला. मराठवाड्यातील साहित्याला आणि एकूण मराठी साहित्याला समृध्द करण्यासाठी मार्गदर्शक ठरावे असे सरांचे लेखन आजवर झाले,पुढेही तसेच होत राहील ही अपेक्षा आपण ठेवूयात. त्यांनी 'रिटायर्ड 'न होता साहित्यातील संवेदनशीलता 'रिट्राय' पुनर्रचनात्मक पध्दतीने मांडावी. श्रीकांत देशमुख यांच्या सृजनात्मक अशा शेती आणि साहित्यातील योगदानासाठी माझ्या व माहिती विभागाच्या वतीने शुभेच्छा……!!

मीरा ढास

सहायक संचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, लातूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com