मिशन एव्हरेस्ट: हवामानाचा रुसवा कायम

उमेश झिरपे
शुक्रवार, 12 मे 2017

सह्याद्री किंवा भारतातील इतर पहाडी, डोंगराळ भागांमधील हवामान आणि एव्हरेस्ट परिसरातील हवामान यांत प्रचंड फरक आहे. मुख्य म्हणजे पर्वतराजीत अर्थात माऊंटनमध्ये तुमची बॉडी कशी रिऍक्‍ट होईल, हे नेमकेपणाने सांगता येत नाही. एखादी छोट्या चणीची व्यक्ती चुटकीसरशी चढाई करेल, पण हेच डबलहड्डीवाल्या व्यक्तीची दमछाक होऊ शकेल

यंदाच्या एव्हरेस्ट मोहिमेसमोरील हवामानाचा अडथळा कायम आहे. मी काल (गुरुवार) सांगितले त्याप्रमाणे पौर्णिमेनंतर दोन दिवसांनी हवामान सेटल होते. सध्या मात्र हवामान फारच प्रतिकूल आहे. हिमवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. प्रतिकूल हवामानामुळे "रुट ओपनिंग'चे काम थांबवावे लागले आहे. बाल्कनीच्या पुढे काही मीटरपर्यंतच रुट ओपन झाला आहे. हे काम अर्धवट सोडून शेर्पांना खाली बेस कॅंपवर परत यावे लागले आहे. 14 मे नंतरचा वेदर पॅटर्न चांगला राहील असा अंदाज आहे. इथे मला एक नमूद करावेसे वाटते की, शेर्पांचा सिक्‍थ सेन्स फारच चांगला असतो. आकाशाकडे पाहून त्यांना हवामानाचा अंदाज येतो. शेर्पा हे एव्हरेस्टच्या अंगाखांद्यावर खेळलेले असतात असे म्हणणे अतिशयोक्तीचे वाटू शकेल, पण त्यांची चोमोलुंग्माशी (एव्हरेस्टचे तिबेटी भाषेतील नाव) नाळ जुळलेली आहे.

दरम्यान, डींगबोचे येथे एका भारतीय ट्रेकरचा मृत्यु झाला. त्याचे नाव फिरोज अहमद चीना असे आहे. महंमद रहीम नावाच्या मित्राबरोबर तो या ट्रेकवर आला होता. हे दोघे बंगळूरचे रहिवासी आहेत. दोघे सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स आहेत. चीनाला दोन दिवसांपासून बरे वाटत नव्हते. दम लागला असेल असे त्याला आणि रहीमला वाटले. अखेरीस त्याचा झोपेतच मृत्यु झाला. मी रहीमचे सांत्वन केले. त्याच्याकडून मिळालेली माहिती ऐकून मात्र मला धक्काच बसला. या दोघांचा हा आयुष्यातील पहिलाच ट्रेक होता. या दोघांनी बंगळूरमधील नोकऱ्या सोडून ट्रेकिंगमध्ये काही तरी भव्यदिव्य करायचे आणि मग जर्मनीत जाऊन नवी नोकरी करायची असे स्वप्न पाहिले होते. यातील एका देशातील नोकरी सोडून दुसऱ्या देशात जाण्याविषयी मला काही म्हणायचे नाही, पण ट्रेकिंगचा भाग फार चिंताजनक आहे.

मी काल म्हटले होते की, गिर्यारोहकांसाठी एव्हरेस्ट हे ऑलिंपिक आहे. त्याच धर्तीवर ट्रेकरसाठी सुद्धा इबीसी अर्थात एव्हरेस्ट बेस कॅंपचा ट्रेक जणू काही ऑलिंपिकच म्हणावा लागेल. या दृष्टिकोनालाही माझा आक्षेप नाही, पण इबीसी ट्रेक ही काही इतकी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी जणू काही कमांडोसारखे ट्रेनींग करावे लागते. मुख्य म्हणजे त्याआधी छोटे-मोठे ट्रेक करून आपला दमसास, तंदुरुस्ती, पर्वतराजीत आपले शरीर कसे प्रतिसाद देते, अशा अनेक गोष्टींची चाचपणी करावी लागते.

सह्याद्री किंवा भारतातील इतर पहाडी, डोंगराळ भागांमधील हवामान आणि एव्हरेस्ट परिसरातील हवामान यांत प्रचंड फरक आहे. मुख्य म्हणजे पर्वतराजीत अर्थात माऊंटनमध्ये तुमची बॉडी कशी रिऍक्‍ट होईल, हे नेमकेपणाने सांगता येत नाही. एखादी छोट्या चणीची व्यक्ती चुटकीसरशी चढाई करेल, पण हेच डबलहड्डीवाल्या व्यक्तीची दमछाक होऊ शकेल. नित्यनेमाने ट्रेक करणारे किंवा माऊंटनमध्ये जाणारे लोक एकमेकांवर बारकाईने लक्ष ठेवतात. आपला मित्र आज नेहमीसारखा दिसत नाही, कमी बोलतोय, त्याचा चेहरा सुकलाय, असे बदल ते लगेच टिपतात. मुख्य म्हणजे ते त्या व्यक्तीच्या लक्षात येत नसते. अनेकदा कमीपणा वाटेल म्हणून काही जण आपले दुखणे अंगावर काढतात. अलिकडच्या काळात हे प्रमाण वाढले आहे. या बाबतीत आणखी एक मुद्दा म्हणजे त्यांनी पोर्टर किंवा गाईड घेतला नव्हता. पर्वतराजीत अनेकदा हवामान अचानक प्रतिकूल होते. अशावेळी स्थानिक व्यक्ती तुम्हाला अचूक मार्गदर्शन करू शकते.

एव्हरेस्ट बेस कॅंपच्या ट्रेकमध्ये आणखी एक चिंताजनक प्रकार दिसून येतो. ते म्हणजे अगदी सहा-सात वर्षांच्या मुलांना सुद्धा काही जण हौसेने घेऊन येतात. हे सुद्धा चुकीचे आहे. आता हा ट्रेक करायचे किमान वय काय असा मुद्दा उपस्थित होईल, मी आतापर्यंतच्या अनुभवावरून इतकेच सांगेन की, किमान 12 वर्षांची वयोमर्यादा घालायला हरकत नाही. खरे तर हा आणखी विस्ताराने लिहिण्यासारखा विषय आहे. त्याविषयी बोलायला मला नक्कीच आवडेल...तूर्त अल्पविराम देतो..
(क्रमशः)

Web Title: Mission Everest