‘मिस्टर’ शेफ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

नवीन पदार्थाची ‘आयडिया’

नवीन पदार्थाची ‘आयडिया’

बरीच जुनी गोष्ट आहे. माझी दोन्ही मुलं लहान होती. वय पाच व सात वर्षं. पत्नी नातेवाइकांकडं काही कार्यक्रम असल्यामुळं बाहेर गेली होती. मुलांना भूक लागल्यामुळे ती आईची वाट पाहत होती. मी विचार केला आणि मुलांना म्हणालो, ‘‘तुम्ही कधी ‘आयडिया’ खाल्ली का? आपण ‘आयडिया’ करू आणि खाऊ.’’ घरात शिळी भाकरी होती. भाकरी मिक्‍सरमध्ये टाकून बारीक केली. परंतु, ही गोष्ट मुलांना सांगितली नाही. त्यांनी शिळी भाकरी खाल्ली नसती. भाकरीच्या कुस्कऱ्यात थोडं शेंगदाणे कूट टाकलं. त्यावर ताक टाकून त्याला हिरवी मिरची, जिरे-मोहरी, कढीपत्ता टाकून चटकदार फोडणी दिली. कांदा बारीक चिरून टाकला व दोन-तीन चमचे साखर टाकली. शिळ्या भाकरीच्या या काल्याला मी नाव दिलं ‘आयडिया!’ नाव वेगळं असल्यामुळं मुलांनी फोडणीची ही भाकरी आवडीनं खाल्ली. अर्थात सोबत पोटात भूक होती, त्याचाही उपयोग झाला. 
दुपारी आई आल्यावर मुलांनी तिला सांगितलं, ‘‘आम्ही ‘आयडिया’ खाल्ली.’’ तसं मला स्वयंपाकशास्त्र काहीच माहिती नाही. तशी मला वेळही आली नाही; परंतु वेळ तर मारून नेली. 
- त्रिंबक अनगळ, पुणे

---

रव्याऐवजी वरईचा शिरा

ही गोष्ट साधारण सहा महिन्यांपूर्वीची असेल. रविवारची साधारण वेळ चार-साडेचारची. घरात मी आणि दोन मुलं. पत्नी शॉपिंगला गेली होती. मनातं हुक्की आली आणि एक कल्पना सुचली. मुलांना म्हणालो, ‘‘आज मी मस्तपैकी गोडाचा शिरा बदाम, काजू टाकून करणार आहे. अरे! माझ्या हातचा शिरा खाऊन बघाल तर बोट चाटत बसाल! आहात कुठं!’’
मुलं म्हणाली, ‘‘बाबा, जरा लवकर हं! नाही तर जेवणाची वेळ व्हायची.’’ ती टीव्ही पाहण्यात गुंग झाली. मी गाणं गुणगुणतच स्वयंपाकघरात शिरलो. पाणी तांब्याभर घेतलं. गॅस पेटवून ते गरम करून घेतलं आणि डब्यातला रवा, तूप घेतलं. कढईत अंदाजे तूप टाकून रवा भाजून घेतला. बदाम, काजू टाकले. मस्तपैकी एक वाफ येऊ दिली आणि गॅस बारीक केला. मुलांना म्हणालो, ‘‘चला बच्चे कंपनी, गोडाचा शिरा ‘रेडी’ आहे. पटापट डिश आणि चमचे घ्या.’’ हॉलमध्ये भारतीय बैठक बसली. तेवढ्यात पत्नीचं घरात आगमन झालं. ती थेट स्वयंपाकघरात शिरली. तिला हे काय चाललय हे कळेचना. वासावरून म्हणाली, ‘‘वा, लय भारी.’’ हॉलमध्ये कढई आणली. मी हळूच कढईवरचं झाकण काढलं. मुलं आणि पत्नी एकमेकांकडं पाहायला लागली. त्यांच्या भुवया उंचावल्या. पत्नी म्हणाली, ‘‘अहो तुमच्या लक्षातं येतंय का? जरा डोकं हलवा-डोक चालवा. तुम्ही वरईचा शिरा केलाय.’’ तिनं बोटानं चाटून पाहिलं, तर त्यात साखरही नव्हती. मी अतिउत्साहाच्या भरात साखर घालायला विसरलो. पत्नी म्हणाली, ‘‘अहो, एकादशीची वरई शिल्लक होती ती. रवा घरात शिल्लकच नाहीये. सामान अजून भरायचयं.’’ 
मला कळलं, मी रवा समजून वरईचा शिरा केला. मनातून मी खजील झालो. पण पत्नीनं सावरून घेतलं आणि म्हणाली, ‘‘आपण ना उद्या गच्चीवर जाऊन छोट्या छोट्या पापड्या करून वाळत टाकू. अशा पापड्या थोड्याच खायला मिळणार?’’ शेवटी बाईक काढली. खिसा सैल केला. रोहितचा वडा-पाव आणि भेळ घेऊन आलो. तरीही माझी ओढ स्वयंपाकघरात धाव घेतेच! आणखी काही तरी नवीन पदार्थ करण्याची अंगात खुमखुमी येतेच. मुलं आणि पत्नी अधूनमधून म्हणतात, ‘‘बाबांनी वरईचा शिरा केला. खरच ‘लय भारी’ होता की नाही! बोट चाटत बसावं वाटत होतं.’’ मलाही कळतं-माझी चेष्टा करतात. पण मी एक दिवस मास्टर शेफ होऊनच दाखवणार! पाहालच तुम्ही.
- किशोर बा. थोरात, पुणे

----

कढीचं झालं पिठलं

लग्न होईपर्यंत माझा साधा चहा करण्याशीही कधी संबंध आला नाही. मात्र, लग्नानंतर बायको मला व्यवसायात पूर्णवेळ मदत करू लागली. त्यामुळं मीही तिला घरकामात जमेल तशी मदत करू लागलो. 
एके दिवशी तिला मी बाहेरून अर्धा किलो लोणी आणून दिलं. तिनं ते नेहमीप्रमाणं कढवलं. त्यानंतर ती दुसऱ्या कामात होती. त्यामुळं मी विचार केला, की नेहमी बायको तूप गाळून ठेवते, त्याप्रमाणं गाळून ठेवावं. गाळणं घेऊन तूप गाळायला सुरवात केली. तर गाळण्याच्या जाळीचा पूर्ण भागच गायब झाला. तेवढ्यात बायको तिथं आली आणि बघितल्यावर हसायला लागली. तेव्हा कळलं, की गरम तुपासाठी वेगळी स्टीलची गाळणी वापरली जाते. प्लॅस्टिकची गाळणी वापरल्यामुळं जाळीचा पूर्ण भाग वितळून तुपात पडला आणि सगळं तूप वाया गेलं. 
व्यवसायाच्या धावपळीमुळं आम्ही संध्याकाळी पोळी, भाजी न खाता भाताचे प्रकार, डोसा, इडली, सॅंडविच, पंजाबी, गुजराती इत्यादी पदार्थ बदल म्हणून खातो. त्यामुळं एका संध्याकाळी मी तिला म्हणालो, ‘‘आज कढी-भाताचा बेत मी करतो.’’ कढी कशी करतात ते साधारण माहीत होतं. त्याप्रमाणं दही घुसळून बऱ्यापैकी बेसन पीठ टाकलं. पाणी टाकून पुन्हा चांगलं घुसळलं. नेहमी पाहतो त्याप्रमाणं मोहरी, जिरे, लसूण, मिरची, हिंग टाकून फोडणी केली. त्यात आधीचं मिश्रण टाकलं. थोडी उकळी येण्याची वाट पाहू लागलो. मात्र उकळी येता-येता कढी बऱ्यापैकी घट्ट झाली. 
थोड्या वेळानं बायकोनं जेवण वाढायला घेतल्यावर तिलाच कळेना, की मी कढी केली की पिठलं? तिला कढी सविस्तर कशी केली ते सांगितलं, तेव्हा मी दुपटीपेक्षा जास्त बेसन पीठ टाकल्याचं लक्षात आलं. दोघांनी अगदी कशीबशी ती कढी किंवा ‘ताकातलं पिठलं’ संपवलं. मात्र, तेव्हापासून ठरवलं, की कोणताही नवा पदार्थ करताना पहिल्यांदा थोडा करून पाहायचा. जमला, की सर्वांना करायचा. रोजच्या सवयीनं आता महाराष्ट्रीयन, गुजराती, राजस्थानी, पंजाबी, चायनीज, साऊथ इंडियन आणि काही प्रमाणात इटालियन डिश सहज करता येतात. आपली अर्धांगिनी तिची घरकामं सांभाळून आपल्याला व्यवसायात मदत करत असेल, तर आपणही आपला व्यवसाय/नोकरी सांभाळून तिला घरकामात मदत करायला काहीच हरकत नाही. 
- बाळासाहेब ठुबे, पुणे

-----

वाचकांसाठी आवाहन 

घरातल्या स्त्रीच्या ताब्यात असणारं स्वयंपाकघर आता घरातले पुरुषही कधी कधी ताब्यात घेऊ लागले आहेत. फूड चॅनेल्सवर सुरू असणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रेक्षकांमध्ये पुरुषांचं प्रमाण वाढायला लागलं आहे, असं एक निरीक्षण सांगतं. या चॅनेल्सवरचे ‘रस’रशीत कार्यक्रम बघून पुरुषांच्याही मनात ‘आपणसुद्धा यातलं काहीतरी करून पाहावं,’ ही इच्छा एखाद्या खाद्यपदार्थाच्या खमंग वासासारखी दरवळू लागते...आणि मग इतके दिवस फक्त खाण्यासाठी हातभार लावणारी पुरुषमंडळी पदार्थ तयार करण्यासाठीही खऱ्या अर्थानं ‘हात’भार लावू लागतात. कधी लुडबूड म्हणून, तर कधी मदत म्हणून प्रकट होणारं ‘मिस्टर शेफ’चं हे रूप रोचक नक्कीच आहे. काही वेळा ही लुडबूड खूप मजा आणते, तर काही वेळा तापसुद्धा देते. काही वेळा पदार्थ घडतात, काही वेळा बिघडतात. अनेक पदार्थांची नवनवी मिश्रणंही त्यातूनच तयार होतात.

तुम्हीही आहात का तुमच्या घरातले ‘मिस्टर शेफ’? तुम्हीही कधी स्वयंपाकघरात लुडबूड केलीय? तुमचा एखादा पदार्थ बिघडलाय किंवा तुम्ही एखादा नवीन पदार्थ जन्माला घातलाय? तर मग तुमच्यासाठी हे खास राखीव टेबल! पदार्थ कसे करायचे वगैरे कृती आम्हाला नकोत. आम्हाला हवेत स्वयंपाकघरातले तुमचे खास, रसरशीत, खमंग अनुभव. ...तर ‘मिस्टर शेफ’, तुमच्या अनुभवांच्या, मजेशीर प्रसंगांच्या ‘कृती’ आठवा आणि सजवा या सदराच्या टेबलवर. 

लेखन पाठवण्याचा पत्ता : सकाळ, सप्तरंग पुरवणी विभाग,  ५९५, बुधवार पेठ, पुणे -४११००२ ई-मेल आयडी saptrarng.saptrang@gmail.com
(लेखन ई-मेलनं पाठवलं तरी पूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांक आणि स्वतःचं छायाचित्र अत्यावश्‍यक. लेख व छायाचित्रं एकत्र स्कॅन करू नयेत. छायाचित्रं स्वतंत्रपणेच पाठवावीत)

--

मजकूर पाठवताना पुढील सूचना 
कटाक्षानं लक्षात घ्याव्यात :
१) लेखाच्या खाली स्वतःचा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक किंवा लॅंडलाइन क्रमांक अत्यावश्‍यक. (वाचक-सहभागाच्या या सदरातली पत्रं वाचून वाचक एखाद्या पत्रलेखकाशी/पत्रलेखिकेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात व त्यातून वाचकमैत्रीचा सेतू उभारला जात असतो. त्यासाठी पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आवर्जून द्यावा.)  
२) स्वतःचं छायाचित्र लेखालाच जोडावं. ते पाकिटात सुटं टाकू नये. छायाचित्राच्या मागं स्वतःचं संपूर्ण नाव व संपर्क क्रमांक अत्यावश्‍यक. 
३) ‘मिस्टर’ शेफ असा उल्लेख पाकिटावर आवर्जून करावा. 
४) लेखात संस्थांची, व्यक्तींची नावं येणार असतील, तर ती पूर्ण (प्रथम नाव, आडनाव अशा स्वरूपात) असावीत. केवळ नाव किंवा केवळ आडनाव असं अपुरेपण त्यात असू नये.

 

 

 

Web Title: mister chef article