मोदीविरोध म्हणजे काँग्रेसचा फायदा नव्हे!

मोदीविरोध म्हणजे काँग्रेसचा फायदा नव्हे!

एकेकाळी लोकशाहीतील नेते सर्व घटकांशी संवाद साधत. निवडून आल्यानंतर ते लोकहिताचा विचार करीत. यामध्ये त्यांना कौल न देणाऱ्यांचाही समावेश असे. आता जो तो केवळ त्याच्या मतपेढीचा विचार करताना दिसतो. इतर त्यांच्या खिजगिणतीत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांना कोट्यवधी लोक वाचाळ मूर्ख आणि वर्णद्वेषी म्हणतात. या लोकांना ते जेवढे मूर्ख वाटतात, तेवढेच त्यांच्या चाहत्यांना ते योग्य वाटतात. तुम्ही मला मत दिले नाही, तर माझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नका, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. हिंदू मतांच्या लाटेवर नरेंद्र मोदींचा भाजप सत्तेवर आला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. हाच प्रकार २० टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतही. दोन्ही ठिकाणी भाजपला जोरदार विजय मिळाला. त्यांचा जनाधार प्रामुख्याने उच्च व मध्यम जातीतील वर्ग आहे, त्यामुळे त्यांना मुस्लिम आणि दलितांना वगळणे शक्‍य होते. यामुळेच कार्यकाळ संपत आलेल्या या सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक मागासांना १० टक्के आरक्षण देण्याची सर्वांत मोठी खेळी खेळली. 

राहुल गांधी कोणत्या वर्गाला डोळ्यांसमोर ठेवत आहेत? त्यांचा जनाधार नेमका कोणता? मोदीविरोध हे एकमेव समीकरण तुम्ही देशासमोर ठेवू शकत नाही. मोदींना केवळ ३१ टक्के भारतीयांनी २०१४ मध्ये मते दिली होती, त्यामुळे त्यांचा चाहता नसलेला अथवा त्यांच्याशी सहमत नसलेला मोठा वर्ग असल्याचे दिसते. राहुल यांच्या मोदींवरील हल्ल्यांनी त्यांचे मनोरंजन होण्यासोबत या वर्गाला प्रोत्साहनही मिळते. मात्र, ते राहुल यांनाच मत देतील याची खात्री नाही. केवळ मोदीविरोध हे तुमचे बळ मानणार असाल, तर उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी एक पर्याय ते निवडतील. बंगालमध्ये ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष, बिहारमध्ये लालू यादव, केरळमध्ये डावे, तेलंगणमध्ये केसीआर, ओडिशामध्ये नवीन पटनाईक, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांसह अनेक पर्याय उपलब्ध असतील. राहुल यांच्या एकहाती हल्ल्याने मोदींच्या प्रतिमेला तडा गेला असून, काही ठिकाणी जनतेने त्यांना नाकारलेही आहे. याचा अर्थ, ते काँग्रेसला निवडतील असा होतो का? आजच्या घडीला तर ही शक्‍यता दिसत नाही, कारण मोदी हा वाईट पर्याय आहे, म्हणून काँग्रेस आपोआप चांगला पर्याय ठरत नाही. 

काँग्रेसचा जनाधार १९८९ पर्यंत एवढा व्यापक होता, की ते सर्व काही जिंकत होते. यामध्ये कनिष्ठ जाती, आदिवासी, काही मध्यम जाती आणि मोठ्या संख्येने गरीब होते. भाजप हा शहरी व्यापारी आणि हिंदू मध्यम वर्गापुरता मर्यादित होता. याचमुळे इंदिरा गांधी या जनसंघ / भाजपला बनियांचा पक्ष म्हणत; मात्र हिंदू पक्ष म्हणत नसत. त्यांच्याकडे धुरा असेपर्यंत भाजपनेही काँग्रेसला मुस्लिम पक्ष म्हटले नव्हते. ‘यूपीए’च्या दशकात पोटा कायदा रद्द केल्यानंतर मोदींनी काँग्रेसवर मुस्लिम पक्षाचा शिक्का मारला. राजीव गांधी यांचा जनाधार १९८९ मध्ये कमी होऊ लागल्यानंतर काँग्रेस विस्कटलेला जनाधार आणि भाजपविरोधी शक्ती यांच्या जोरावर सत्तेत टिकून राहिली. आता पक्षाला २०१४ पूर्वीचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांना खूप परिश्रम करावे लागतील. 

मोठ्या परीक्षेची वेळ जवळपास शंभर दिवसांवर आली आहे. काँग्रेसकडे आजच्या घडीला पंजाब वगळता इतर कोणत्याही राज्यात निष्ठावान कार्यकर्त्यांचे जाळे नाही. राहुल यांची सध्याची वाटचाल अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे सुरू आहे. केजरीवाल यांनी अण्णा हजारे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना सोबत घेऊन ‘यूपीए’ची विश्वासार्हता नष्ट करण्यात मोठी भूमिका बजावली. विशेषतः त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. हे त्यांनी एवढ्या पद्धतशीरपणे केले, की काँग्रेसच्या नेत्यांना बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. याचे श्रेय भाजप आणि विवेकानंद फाउंडेशनला देणे चुकीचे आहे. काँग्रेसविरोधी लढ्यातील प्रमुख अस्त्र होते केजरीवाल. ते तरुण, विश्वासू, स्वच्छ चारित्र्याचे आणि पारंपरिक राजकारणाच्या चौकटीत न बसणारे होते. ‘सब चोर है’, अशी त्यांनी काँग्रेसची प्रतिमा निर्माण केली. यामुळे लोक काँग्रेसपासून दूर झाले; मात्र केजरीवाल यांच्याकडे गेले नाहीत. त्यासाठीचा जनाधार त्यांना तयार करता आला नाही. त्यांचे यश दिल्लीपुरते मर्यादित राहिले. इतर ठिकाणी त्यांनी मतदार मोदींकडे वळविण्याचे काम केले. कोणताही पर्याय न देता विरोधाचे राजकारण करण्याचा हा परिपाक. हे टाळण्यासाठी प्रथम तुम्हाला नेमका वर्ग ठरवावा लागतो. येथेच नेमका राहुल यांना धोका आहे. लोकशाहीत तुम्ही बंडखोरपणा केल्यास त्याचा फायदा तुम्ही दुसऱ्याला करून देता. मध्य भारतातील तीन राज्यांमध्ये राहुल यांचा विजय त्यांचे ट्विटरवरील विचारवंत समर्थक, मोदीविरोधी डावे - उदारमतवादी यांच्या कल्पनाशक्तीला खतपाणी घालणारा ठरला. परंतु, ही त्यांची मते अतिशय कमी आहेत आणि कोट्यवधी रिट्विट आणि लाइकची गणना ‘ईव्हीएम’मध्ये होत नाही. राहुल यांचा गनिमी कावा सुरू असला, तरी त्याचा फायदा किती प्रमाणात झाला? यामुळे काय नेमकी भर पडली? 

मुस्लिम पक्ष हे विशेषण दूर करण्यासाठी राहुल मंदिरांना भेटी देत आहेत. त्यांनी जानवे आणि ब्राह्मण गोत्राचे उघड प्रदर्शन केले आहे. याचवेळी महत्त्वाच्या धर्मनिरपेक्ष मुद्द्यांवर ते मौन आहेत ः तोंडी तलाक, शबरीमला आणि सवर्ण आरक्षण. याचवेळी त्यांनी नागिरकत्व कायद्यातील दुरुस्तीवेळी लोकसभेतून सोईस्करीत्या बाहेर पडणे पसंत केले. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाच्या घटनेला आव्हान दिले जात असताना काँग्रेसने सभात्याग करण्याचा पर्याय निवडला. आसाम आणि इतर ठिकाणचे हिंदू आणि मुस्लिम हे पाहत होते. भाजपच्या हे पथ्यावर पडणार असून, त्यांच्या मतपेढीला हेच हवे आहे. बेकायदा घुसखोरांचा विषय निघाला, की भाजपचे समर्थक खूष होतात. आता काँग्रेसचा विचार केल्यास त्यांना मतपेढी कळत नसल्याचे चित्र आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या प्रचारात त्यांना कोणता वर्ग समोर ठेवायचा हे ठरवावे लागेल. मोदीविरोध ही विचारसरणी अथवा निवडणुकीतील पर्याय ठरू शकत नाही. मोदींची धाव २०० जागांच्या आत राहील, एवढे नुकसान तुम्ही करू शकता. यातून तुम्हाला १०० पेक्षा अधिक जागा मिळणे शक्‍य आहे का? भारताचा नकाशा बारकाईने पाहा आणि राज्ये मोजा. मे महिन्यापर्यंत भाजपने पूर्णपणे भ्रमनिरास केल्यासही अनेक राज्यांमध्ये काँग्रेस एकमेव पर्याय ठरणार नाही. राहुल गांधी यांनी हे कठोर वास्तव तपासून पाहायला हवे.

मोदींना लक्ष्य करून सर्वांना आकर्षित करणे अवघड
उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार आणि आसाम या राज्यांतील आदिवासी भाजपसोबत, दलित इतर कोठे आणि मुस्लिमांना इतर पर्याय उपलब्ध आहेत. याचवेळी शहरी मध्यम वर्ग, प्रामुख्याने २५ वयोगटातील मतदार मोदींच्या बाजूने आहे. केवळ मोदींना लक्ष्य करून सर्व घटकांना आकर्षित करणे अवघड आहे. तुम्ही मोदींचे नुकसान करू शकता; मात्र त्याचा फायदा इतर मित्र आणि शत्रूंमध्ये विभागला जाईल. 

(अनुवाद - संजय जाधव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com