#MokaleVha : विचार करण्याच्या अयोग्य पध्दती

Mokale-Vha
Mokale-Vha

नकारात्मकता हा एक सर्वार्थानं घातक दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन असलेली व्यक्ती एखाद्या परिस्थितीत वाईटच किंवा प्रतिकूलच घडणार, हे गृहीतच धरते. याला situational pessimism म्हणतात. साधारणपणे या व्यक्ती एकूण आयुष्याबद्दल उदासीन असतात. त्यांना व्यक्तींमधल्या किंवा प्रसंगांमधल्या वाईट गोष्टीच महत्त्वाच्या वाटतात. आयुष्यात आनंदी राहता येत नाही. त्यांनी नकारात्मक विचार करण्याची पद्धत बदलून सकारात्मक विचार करण्याची पद्धत शिकून घेणं गरजेचं ठरतं आणि हे प्रयत्नांती शक्‍य आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण ट्रकच्या मागे ‘विचार बदला, नशीब बदलेल’ असं लिहिलेलं अनेकदा वाचतो. गमतीदार वाक्‍य म्हणून हसून सोडून देतो. पण, वास्तविक खरोखरच आपलं नशीब बदलायला, आपली मन:स्थिती बदलायला आपले विचारच कारणीभूत असतात. सकारात्मक विचार आपल्याला सर्वार्थानं ऊर्जितावस्थेला नेतात. तर नकारात्मक विचार, नकारात्मक स्व-संवाद आपलं खच्चीकरण करू शकतात. जगात घडणारी प्रत्येक चांगली घटना, मग ती निसर्गातली असो वा मानवाच्या आणि समाजाच्या संदर्भात असो ती फक्त सकारात्मक ऊर्जेवरच घडत असते. सकारात्मक विचारांचा मनावर, शरीरावर आणि प्रगतीवर सकारात्मक परिणाम होतो. तर नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम होतो. नकारात्मक विचारांमुळे राग, दुःख, नैराश्‍य आणि एकूणच मानसिक अस्वास्थ्य निर्माण होतेच आणि प्रगतीच्या सगळ्या शक्‍यता संपुष्टात येतात. आत्मविश्वास नाहीसा होतो. नात्यांवर विपरीत परिणाम होतो. 

cortisol आणि andranalin सारख्या स्ट्रेस हार्मोन्स सतत स्रवल्यामुळे शारीरिक आजार, मनोकायिक आजार निर्माण होऊ शकतात. नकारात्मक विचार हे बहुधा Negative Automatic Thoughts म्हणजे आपोआप मनात निर्माण होणारे विचार असतात. सतत एखादी व्यक्ती नकारात्मक विचार करत राहते तेव्हा जणू ती स्वत:ला एकप्रकारे negatively programmed करत राहते.  हे ओळखून, समजावून घेऊन त्यावर काम करायला लागते. तेव्हा अशी नकारात्मक विचारसरणी नाहीशी व्हायला मदत होते.

नकारात्मक विचार कुठल्या कुठल्या पद्धतीचे असू शकतात?
१. घडणाऱ्या घटना, गोष्टी, वागणूक इत्यादी काळ्या-पांढऱ्या प्रकारातच पाहणे-टोकाचा विचार करणे, काळ्या आणि पांढऱ्यामध्ये ग्रे किंवा राखाडी शेड असते, हे मान्यच नसणे. उदा. मी एखादी गोष्ट परफेक्‍ट केली नाही तर त्याचा अर्थ मी पूर्णपणे अपयशी आहे, असा विचार करणे.
२. Overgeneralization - आपल्या हातून एखादी चूक झाली तरीसुद्धा ‘मी एकही काम नीट करू शकत नाही’ असा विचार करणे.
३. The mental filter - घडणाऱ्या सकारात्मक, अनुकूल घटनांकडे दुर्लक्ष करणे आणि एखाद्या नकारात्मक किंवा प्रतिकूल घटनेवरच लक्ष केंद्रित करणे.
४. Diminishing the positive - कौतुकास्पद काम झालं आणि कोणी अभिनंदन केलं तरी ते अभिनंदन केवळ मला बरं वाटावं म्हणून केलेलं आहे. खरंतर काम काही इतकं चांगलं झालं नाही आहे, असा विचार करणे.
५. Jumping to conclusions - कुठलाही सबळ पुरावा किंवा तर्कविचार हाताशी नसताना प्रतिकूल गोष्टच घडेल हा जणू निर्णयच घेऊन टाकायचा. उदा. कंपनीमध्ये माणसं काढणार आहेत, अशी बातमी आहे. त्यात माझा नंबर नक्की असणार. माझी नोकरी जाणार. माझं कुटुंब रस्त्यावर येणार.
६. Emotional reasoning -  आपल्याला जसं वाटतंय, ते खरोखरच वास्तव किंवा वस्तुस्थिती आहे, असं मानून चालणं. उदा. मी अपयशीच आहे, असं मला वाटतं. आता मला आतून तसं वाटतंय म्हणजे तसंच असलं पाहिजे.
७. ‘Shoulds’ and ‘should-nots’ - स्वत:ला ‘च’च्या कुलपात अडकवून टाकणं. म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडून विशिष्ट पद्धतीनं झालीच पाहिजे. झाली ‘च’ पाहिजे हा अट्टहास असतो. किंवा एखादी गोष्ट माझ्याकडून होता ‘च’ कामा नये. तशी ती झाली ‘च’ किंवा झाली ‘च’ नाही तर स्वत:वर विलक्षण चिडचिड होते.
८. Labeling - पूर्वी आलेल्या लहानशा अपयशामुळे आपण म्हणजे ‘मूर्तिमंत अपयश’ असं लेबल स्वत:ला लावून टाकायचं आणि आपल्याकडून चांगलं असं काही होऊच शकणार नाही, हे ठरवून टाकायचं.
९. Personalising - काही विपरीत, प्रतिकूल घडलं किंवा काही चुकीचं घडलं, तर दोष स्वत:कडं घेण्याची प्रवृत्ती. आपणच या चुकीला जबाबदार आहोत. आपण असं वागलो म्हणून हे असं प्रतिकूल घडलं, असा विचार करण्याची सवय.
१०. Magnification - आपल्या बाबतीत सगळं छान घडत असताना त्याच्याकडं दुर्लक्ष करून एखादी लहानशी कमतरता उगाळत बसणे.
आपली विचार करण्याची पद्धत वरील प्रकारात मोडते का हे तपासायला हवं. या सगळ्या विचार करण्याच्या चुकीच्या पद्धती आपल्या प्रगतीच्या आड येतात. आपली मन:स्थिती ही ब्रेन केमिस्ट्रीवर अवलंबून असते. प्रत्येक विचार मग तो सकारात्मक असो वा नकारात्मक, आपल्या ब्रेन केमिस्ट्रीवर परिणाम करतो. सकारात्मक विचार ब्रेन केमिस्ट्रीमध्ये चांगले बदल घडवून आणतात. आपण कार्यप्रवृत्त होतो. मुख्य म्हणजे, जीवनातला प्रत्येक क्षण रसरसून आनंदानं जगायला प्रवृत्त होतो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com