वो चाँद खिला, वो तारे हॅंसे...

कोवळ्या तारुण्यातलं पहिलं प्रेम थेट व्यक्त करायला कुणाचंही मन सहसा धजावत नाही. काहीतरी इशारे, काहीतरी खाणाखुणा, काहीतरी सूचक वक्तव्यं, सूचक हालचाल यांद्वारेच प्रेमाची व्यक्तता होत असते.
nutan and raj kapoor
nutan and raj kapoorsakal

वो चाँद खिला, वो तारे हॅंसे

ये रात अजब मतवारी है

समझनेवाले समझ गये है

ना समझे, ना समझे वो अनाडी है

कोवळ्या तारुण्यातलं पहिलं प्रेम थेट व्यक्त करायला कुणाचंही मन सहसा धजावत नाही. काहीतरी इशारे, काहीतरी खाणाखुणा, काहीतरी सूचक वक्तव्यं, सूचक हालचाल यांद्वारेच प्रेमाची व्यक्तता होत असते. हा इशाऱ्यांचा खेळ तारुण्यसुलभ लज्जेमुळं सहसा ‘ती’ सुरू करत असते. मात्र ते इशारे, त्या खाणाखुणा किंवा ती सूचक वक्तव्यं, ‘त्या’च्या लक्षात यायला हवी असतात.

काही वेळा ‘त्या’च्या पटकन लक्षात येतातही ते इशारे; पण बऱ्याच वेळा असं घडतं की काहींना - खरं तर काही ‘बावळटां’ना - ते इशारे समजतच नाहीत! पुष्कळ सूचकता दाखवूनही त्याला आकलन न झाल्यानं ती वैतागतेसुद्धा. स्वत:चा बावळटपणा लक्षात आल्यानं एका गाण्यात धर्मेंद्र म्हणतोसुद्धा ‘मै जट यमला पगला दीवाना, ओ रब्बा, इत्तीसी बात न जाना, के के के वो मैंनु प्यार करती है, साडे उत्ते वो मरदी है’.

तिनं सगळं काही इशाऱ्यांतूनच सूचित केलं; पण मीच येडपट, मला नाही ते समजलं! अगदी रात्रीच्या अंधारात तिनं भर चौकात दिवा लावून ठेवला; पण मी वेडाच, नाही समजू शकलो! तर, प्रेमाची अभिव्यक्ती ही अशी असते. ती आकळून घ्यावी लागते.

आरतीची मनःस्थिती अशीच काहीशी झाली आहे. राजकुमारशी तिचा नुकताच परिचय झाला आहे. त्याचा निरागस भोळेभाबडेपणा तिच्या मनात भरलाय. तो चांगला चित्रकारदेखील आहे. त्याचं देखणं रूपही तिला आकर्षित करत आहे. ती स्वत:ही नाजूक, रूपवान तरुणी आहे. काहीतरी निमित्त पाहिजे म्हणून आरतीनं त्याला हजार रुपये कबूल करून एक चित्र करायला दिलं होतं. आज ते चित्र घेऊन तो तिच्या घरी आला आहे. त्या दोघांतला हा रोमॅंटिक; पण मजेशीर संवाद ऐका :

तो : मैं आप को चित्र देने आया हूँ.

ती : चित्र नही होता तो नही आते? चलो, कहीं पार्क में चलते है.

तो : आजकल अकेली लडकी ने पार्क में जाना ठीक नही है.

ती : अभी आप चलेंगे भी या नही?

तो : मुझे आज नौकरी पे जाना है. बरसों इंतजार के बाद नौकरी मिलने का सुख आप क्या जाने?

ती : एक तो मैं ने मुष्किल से जान छुडाई. आप कुछ नही समझते. अगर समझते, तो ये मालूम नहीं होता आप को कि मैं आप के साथ बाहर क्यूँ आना चाहती हूँ?

तो : क्यूँ आना चाहती है बाहर?

ती : (डोक्यावर हात मारून घेत) पूछते हो ‘क्यूँ?’ तुम बिलकुल अनाडी हो. अनाडी...अनाडी...अनाडी...

ती : वो चाँद देखो, कितना अच्छा है

अनाडी : हाँ, पूनम का है ना?

ती : यह रात कितनी हसीन है?

अनाडी : हं, ठंड है ना!

ती : और ये फूल देखो...कितना अच्छा है. मुझे बालो में लगाना पसंद है.(असं म्हणत फूल त्याच्याकडे देण्याचा प्रयत्न करत ती डोक्याचा मागील भाग त्याच्याकडे वळवते.)

अनाडी : तो तुम लगा लो ना.

...आणि, त्याच्या या भोळसटपणावर मधुर सुहास्य करत ती गाऊ लागते :

वो चाँद खिला, वो तारे हॅंसे

ये रात अजब मतवारी है

समझनेवाले समझ गये है

ना समझे...ना समझे...या ठिकाणी ती थांबते.

अशा रोमॅंटिक वातावरणाची भुरळ ज्याला पडत नाही त्याला आता काय म्हणावं, असा प्रश्न ती त्यालाच विचारते. तोसुद्धा तितक्याच उत्स्फूर्तपणे स्वत:लाच उद्देशून म्हणतो : ना समझे वो अनाडी है.

प्रणयी जीवांना भुरळ पाडील अशा रम्य चांदण्यातल्या भोवतालाचं सुंदर वर्णन ती करते :

चाँदी सी चमकती राहें

वो देखो झूम झूम के बुलाए

किरनों ने पसारी बाहें

के अरमाँ नाच नाच लहराए

बाजे दिल के तार

गाए ये बहार

उभरे है प्यार जीवन में

अशा छान वातावरणात माझ्या हृदयातल्या विणेच्या तारा झंकारत आहेत...जीवनात प्रेमाची लहर उचंबळून आली आहे...अशा शब्दांत ती आपल्या भावना व्यक्त करते.

किरनों ने चुनरियाँ तानी

बहारे किस पे आज है दिवानी

चँदा की चाल मस्तानी

है पागल जिस पे रात की रानी

तारों का जाल

ले ले दिल निकाल

पूछो न हाल

मेरे दिल का

असं गात गात ती त्याला उद्देशून पुनःपुन्हा ‘ना समझे वो अनाडी है’ असं लडिवाळपणे खिजवत जाते. रुपेरी चंद्रमा नभी उमलला आहे... तारकादल खळाळून हसत आहे...ही रात्र कशी अद्भुतरम्य, मंतरलेली आहे...त्या रात्रीचा तो इशारा समझनेवाले समझ गये...पण त्या वेड्याला नेमकं तेच उमगत नाहीये. तो आहेच अनाडी!

गीतकार हसरत जयपुरी यांनी फुलं-वेली-चंद्र-चांदणं-तारे अशा नेहमीच्याच रूपकांतून ही सुंदर गीतरचना केली आहे. आपल्या आसपास कुठं तरी हिरवा चाफा लपलेला आहे आणि त्याचा सुगंध दरवळत यावा तसा या गाण्यातल्या लता मंगेशकर यांच्या स्वराचा सुवास ऐकणाऱ्याच्या मनात दरवळत जातो. ‘ना समझे वो अनाडी है’ असं मुकेशच्या स्वरातलं एकच वाक्य आहे आणि ते योग्य ठिकाणी चपखलपणे बसलं आहे.

ॲकॉर्डियन, बासरी, ढोलक यांच्या नाचऱ्या संगीताच्या तालावर गाण्याची मस्त सुरुवात होते : ‘वो चाँद खिला...’

‘चाँदी सी चमकती राहें...वो देखो झूम झूम के बुलाए’ या ओळीनंतर बासरीचा एक झरोका येतो! त्यापाठोपाठ हलकीशी ढोलकी...फार सुंदर म्युझिक पीस वाजतो. मग पुढच्या ओळी येतात. तशाच रीतीनं ‘बाजे दिल के तार, गाए ये बहार, उभरे है प्यार जीवन में’ या ओळीनंतर ॲकॉर्डियनचा जबरदस्त पीस येतो. मग परत पुढच्या ओळी...‘तारों का जाल...पूछो न हाल मेरे दिल का’ या ओळी लता मंगेशकर यांनी एका दमात गायिल्या आहेत. त्यापाठोपाठ येणारे म्युझिकचे तुकडे मजा आणतात.

एरवी कोणत्याही गाण्यात दोन अंतऱ्यांच्या मधे म्युझिक असतंच; पण त्याशिवाय काही काही पंक्तींच्या मध्ये मध्ये सोलो वाद्याचे पीसेस टाकणं ही संगीतकार ‘शंकर-जयकिशन शैली’ची खासियत या गाण्यात ठिकठिकाणी दिसून येते.

...आणि नूतन! तिच्या निरागस अवखळपणानं सगळं गाणं व्यापून टाकलं आहे. तिनं ‘अनाडी’ असं संबोधल्यावर त्यानं केसांत फूल खोवण्याचा प्रयत्न करताच लटक्या रागानं दूर जाण्याचा तिचा अभिनय...तसंच तो हाती फूल घेऊन मागं लागतो तेव्हा त्याला खिजवून हसत हसत दूर जातानाचा अभिनय...गाणं गात गात तिचं बागडणं...डोळ्यांचे विभ्रम...सगळंच अगदी लाजवाब.

त्या चंद्र-ताऱ्यांचं मंद मंद तेज तिच्या मुद्राभिनयातून प्रकाशमान होतंय जणू! अनेक क्लोज अप्समधून दिसणारा तिचा निर्मळ-नितळ-निरागस चेहरा, तिचं मोहक स्मितहास्य त्याला (आणि आपल्यालासुद्धा!) आणखी आणखी वेडावतं. राज कपूर तिच्यासमोर खराखुरा अनाडी दिसतो.

शंकर-जयकिशन यांचं संगीत आणि लता मंगेशकर यांचा आवाज या दोन बाबींसाठी हे गाणं जितकं ऐकण्याजोगं आहे तितकंच या गाण्यात पडद्यावर नूतन आहे म्हणूनही ते पाहण्याजोगं आहे.

अर्थात्, सन १९५९ मधल्या ‘अनाडी’ चित्रपटाला दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांचा झालेला स्पर्शसुद्धा तितकाच परिणामकारक आहे.

‘बुगडी माझी सांडली गं’ हा लेख या सदरात गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला. त्या लेखात ‘सांगत्ये ऐका’ हा चित्रपट पुण्यात आर्यन चित्रपटगृहात १२५ आठवडे सुरू होता’ असा उल्लेख आहे. मात्र त्याऐवजी, ‘हा चित्रपट विजयानंद चित्रपटगृहात १३१ आठवडे होता’ अशी दुरुस्ती अनेक वाचकांनी मेलद्वारे सुचवली आहे. वाचकांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

- डॉ. कैलास कमोद

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com