‘मिस्टर’ शेफ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

साबुदाणा खिचडीचे गोळे

साबुदाणा खिचडीचे गोळे
नोकरीनिमित्तानं मी शेडाणी (ता. मुळशी) इथं प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत होतो. तिथं लाँचशिवाय कसलीच वाहनांची सोय नव्हती. त्या गावी किराणा दुकान जवळ नव्हतं. एकीकडं धरणाचं पाणी आणि दुसरीकडं डोंगर अशा ठिकाणी काम करत होतो. पावसाळ्यात मी एकटाच राहत होतो आणि पत्नी व मुलाला गावी पाठवत होतो. तिथं मी स्वतःच स्वयंपाक करून खात होतो. एकदा मोठी गंमत झाली. आषाढी एकादशी आल्यावर उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी करण्याचं ठरवलं. पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेतले आणि खलबत्यात कुटून घेतले. नंतर साबुदाणा दोन वाट्या पाण्यात भिजत ठेवला. दाण्याच्या कुटात हिरवी मिरची कुटून टाकली आणि ते कूट मिसळून बाजूला ठेवलं.

नंतर चुलीवर कढई ठेवली. त्यात दोन चमचे तूप टाकलं आणि तूप तापल्यावर थोडेसे जिरे टाकले. फोडणीत भिजवलेला साबुदाणा, कूट टाकलं. नंतर मीठ टाकलं आणि तो साबुदाणा हलवला. थोडं पाणी शिंपडलं आणि झाकण ठेवलं. पाच मिनिटांनी झाकण काढलं आणि खिचडी चमच्यानं हलवू लागलो तर काय गंमत, त्या खिचडीचे गोळे-गोळेच झाले होते. पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यानं चिकट गोळे झाले होते. खिचडी मोकळी फडफडीत झालीच नाही. आता काय करायचं सुचेना. मग भूक लागल्यानं तशीच गोळ्यांच्या स्वरूपातली खिचडी खाल्ली.
- मधुसूदन लंके


पिठल्याचा उडाला रंग
मी   शाळेत इयत्ता सातवीत होतो. स्काऊटमध्ये असल्यामुळं स्वावलंबीपणा लहानपणात रुजला होता. सर्व कामांत भाग घेणं, हा जणू स्वभावच झाला होता.
स्काऊटच्या मुलांचा कॅंप चार ते पाच दिवस राजेवाडी इथं ठरला होता. घरची परवानगी मिळाली. सरांनी सांगितल्याप्रमाणं प्रत्येकानं चार जणांना पुरेल एवढा एक दिवसाचा शिधा आणायचं ठरलं. प्रत्येक दिवशीचा स्वयंपाक काय करायचा ते ठरलं. पहिल्या दिवशी दुपारी गाडीनं राजेवाडी इथं गेलो. संध्याकाळी पोचलो. अंधार पडला. आमचा मुक्काम एका शाळेत ठेवला होता. मात्र, एक अट होती. स्वयंपाक शाळेच्या आवारात करायचा. वर्गात नाही. झोपण्यासाठी वर्ग दिले होते. गावात लाइटचा पत्ता नव्हता. शाळा सकाळीच भरायची. लाइटची आवश्‍यकताच नव्हती. मग काय प्रत्येकाकडं मेणबत्तीसारखं रॉकेलचं टुकटुकं. बाकी सगळा अंधार.

सरांनी सांगितलं, ‘‘सगळ्या ग्रुपनी आपापलं पिठलं करायचं आहे.’’ त्यांनी जाळण्यासाठी लाकडं, काड्या दिल्या. ‘‘चूल करा आणि पिठलं करा,’’ असं सांगितलं. पहिला माझा दिवस. माझ्याकडचंच पिठल्याचं सामान वापरायचं होतं. अंधारात सगळा शिधा बाहेर काढला. पीठ, मोहरी, तेल, मीठ, तिखट, हळद सगळी तयारी झाली. भांडीपण काढली.

पिठलं तयार करायची तयारी झाली. ते कसं करायचं, त्याची पद्धत सरांनी सांगितली. चूल पेटवली. पातेलं ठेवलं, फोडणी केली, पीठ कालवलं. पाण्यात, फोडणीत घातलं. झालं पिठलं तयार. केवढा आनंद झाला. सगळ्यांचा मेनू तोच. सगळ्यांनी भात पण केला. पहिल्या दिवसाच्या पोळ्या घरून आणल्या होत्या. सरांनी जेवायला बसायला सांगितलं. आम्ही चार मित्र जेवायला बसलो. सरांनी ओझरती तपासणी केली. बॅटरी आणली होती. जेवणं झाली. सरांनी सांगितलं, ‘‘जे उरलं असेल, ते आपण सकाळी एकत्र करू. गायी/म्हशींना खायला घालू.’’ रात्र झाली. झोपायला गेलो; पण आम्हा चौघांना चैन पडत नव्हती. आपलं पिठलं चिकट का झालं होतं, हे कळत नव्हतं. एक जण म्हणाला- ‘‘पिठात फरक असतो.’’

सकाळ झाली. सरांनी उरलेले पदार्थ घेऊन बोलावलं. एका डब्यात गोळा करत होतो. आमचा नंबर आला. मी राहिलेलं पिठलं घेऊन सरांकडं गेलो. सकाळी उजेडात पिठलं बघितलं, तर आमचं पिठलं पांढरं. सरांनी विचारलं, ‘‘हा काय प्रकार आहे?’’ शिधा तपासला तेव्हा कळले, डाळीचं पीठ तसंच होतं. पिशवीतलं कणकेचं पीठ संपलं होतं. आमचा चेहरा पण ‘पांढरा’ पडला. मग लक्षात आलं की, रात्री गव्हाचं पिठलं तयार केलं होतं. सर्वांचा हशा पिकला....पण अनुभव पदरी पडला.
- प्रमोद देशपांडे, पुणे


‘उकडहंडी’ची ‘स्वादिष्ट’ आठवण
सा     धारणतः तीस वर्षांपूर्वी मी मामाकडं राहून माध्यमिक शिक्षण घ्यायचो. शनिवार-रविवार, सुटीचा दिवस आणि विविध सणांसाठी मूळ गावी म्हणजे खारेकुरणला (पालघर) यायचो. एकदा असंच होळीच्या सणासाठी तीन-चार दिवसांसाठी गावी आलो असताना आम्ही काही मित्रांनी हंडीचा बेत आखला. माझ्या काही मित्रांना स्वयंपाकाचं थोडंसं ज्ञान होतं. आम्ही ‘उकडहंडी’ या प्रकाराचा बेत आखला. अर्थातच, या खाद्यप्रकारासाठी साहित्याची जमवाजमव सुरू झाली. मातीचं मडकं, वालाच्या शेंगा-गोळे, शेवग्याच्या शेंगा, बटाटा, वांगी, रताळं, विविध प्रकारच्या आवश्‍यक भाज्या, मसाला अशी सगळी जमवाजमव पूर्ण झाली. सगळी मित्रमंडळी आनंदात आणि उत्साहात कामाला लागली. या सगळ्या वस्तू छोट्या प्रमाणात तुकडे करून मातीच्या मडक्‍यामध्ये भरण्यात आल्या. त्यानंतर मडक्‍याच्या वरच्या भागाला करजं झाडाच्या पानांचा वापर करून झाकण तयार करण्यात आलं आणि मडकं उलटं करण्यात आलं. त्यानंतर सर्व मित्रांनी झाडांचा सुकलेला पालापाचोळा गोळा करून मडक्‍यावर आणि आजूबाजूस अग्नीचा जाळ केला. त्यानंतर मातीच्या मडक्‍यामधले सगळे पदार्थ पूर्णपणे शिजेपर्यंत जाळ चालूच ठेवला. झाली तयार ‘उकडहंडी.’
‘उकडहंडी’ हा पदार्थ कसा असेल, याची आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता होती. तो तसाच स्वादिष्ट झाला होता. या आगळ्यावेगळ्या पदार्थाची चव आजही आठवणीत आहे. आजही आम्ही एकत्र आलो की, त्या बालपणीच्या आठवणी निघतात.
- जयंत देसले, वसई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mr shef article in saptarang