चोराच्या वाटेनंच पोचलो चोरापर्यंत... (एस. एस. विर्क)

How MS Virk cracked a police case
How MS Virk cracked a police case

माझी योजना तपशिलानं ऐकल्यावर पोलिस अधीक्षकांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. ते म्हणाले ः  ‘‘योजना उत्तम आहे; पण एक लक्षात ठेव, सगळ्याच योजना यशस्वी होतातच असं नाही. आता ते कोण आहेत, हे तुम्हाला समजलं आहे. त्यामुळे भुसावळमध्ये ते नाही सापडले तरी इंदूरला जाऊन तुम्ही त्यांना पकडू शकता. कळवत राहा, काय काय होतंय ते...’’ 

चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक...या न्यायानं पिशवी कापून पैसे लांबवण्याच्या प्रकरणात आम्ही शांतारामची मदत घ्यायची ठरवली. कुष्ठरोगाचा बळी ठरलेला शांताराम भीक मागून जगत असला तरी त्यानं आधीचा पाकीटमारीचा धंदा सोडलेला नव्हता. नाल्याच्या कडेला वसलेल्या एका झोपडपट्टीत आम्हाला शांताराम आढळला. शांतारामला इंदूरच्या दोन गुन्हेगारांचा संशय होता. माझा त्याच्यावर विश्‍वास बसला नाही. ‘गुन्हेगारांना कुठलं आलंय हद्दींचं बंधन?’ असं विचारणाऱ्या शांतारामला आम्ही पोलिस ठाण्यात घेऊन आलो. 

शांताराम आणि त्याच्याबरोबरच्या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन आम्ही शहर पोलिस ठाण्यात आलो. शांताराम सांगत होता त्यानुसार, त्याच्याबरोबरची दोन्ही मुलं न्यायालयात हजर होती, याची आम्ही खात्री करून घेतली. माझं कार्यालयही शहर पोलिस ठाण्यातच होतं. इंदूरच्याच पाकीटमारांचं हे काम आहे, हे  शांताराम सतत सांगत होता. ‘साहेब, इंदूरला जायला जळगावहून थेट रेल्वेगाडी नाही. इंदूरला जाण्याकरता गाडी पकडायला त्यांना भुसावळला जावं लागेल आणि गाडी मिळेपर्यंत त्यांना भुसावळ रेल्वे स्टेशनजवळच्या एखाद्या स्वस्तातल्या लॉजमध्ये काही तास घालवावे लागतील. आपण जर त्या भागातले लॉज शोधले तर ते सापडू शकतात,’ असा तर्कही शांतारामनं मांडला. ‘आप मेरी बात मान के देखो...मैं आप को ये केस पकड के देता हूँ...’ शांताराम त्याच्या म्हणण्यावर ठाम होता. थोड्या विचाराअंती मी त्याच्याशी सहमत झालो. 

जळगावपासून भुसावळचं अंतर जवळपास वीस किलोमीटर आहे. भुसावळला जाण्यासाठी मी ठाणे अंमलदाराला दोन टीम बनवायला सांगितल्या. ठरलं होतं ते असं ः साध्या कपड्यांमधली एक टीम खासगी वाहनात असेल आणि गणवेशातल्या एका उपनिरीक्षकाच्या नेतृत्वातली दुसरी टीम पोलिसांच्या वाहनात असेल. शांताराम पहिल्या टीमबरोबर राहील. पोलिस व्हॅन आणि पहिली गाडी यांच्यात सत्तर-ऐंशी यार्डांचं अंतर राखलं जाईल. दोन्ही वाहनं वायरलेसवर संपर्कात राहतील. जिल्हा पोलिस अधीक्षकांना मी आमचा प्लॅन सांगितला. त्यांनी होकार दिला आणि मला त्यांच्या कार्यालयात बोलावलं. त्याआधी मी दोन्ही टीमना, त्यांना नेमकं काय करायचं आहे, ते समजावून सांगितलं. पहिल्या वाहनातले साध्या कपड्यातले पोलिस शांतारामच्या मदतीनं संशयितांची ओळख पटवतील आणि दुसरी टीम त्यांना ताब्यात घेईल. दुपारी तीनच्या सुमारास दोन्ही गाड्या भुसावळच्या दिशेनं निघाल्या. 

***

माझी योजना तपशिलानं ऐकल्यावर पोलिस अधीक्षकांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. 

‘‘योजना उत्तम आहे; पण एक लक्षात ठेव, सगळ्याच योजना यशस्वी होतातच असं नाही. आता ते कोण आहेत, हे तुम्हाला समजलं आहे. त्यामुळे भुसावळमध्ये ते नाही सापडले तरी इंदूरला जाऊन तुम्ही त्यांना पकडू शकता. कळवत राहा, काय काय होतंय ते,’’ असं सांगत त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. प्रोत्साहन दिलं. एक कप चहा घेऊन मी माझ्या कार्यालयात परतलो. साधारणतः रात्री आठ वाजेपर्यंत कारवाईबाबत काही तरी समजेल अशी माझी अपेक्षा होती. मी काही राहिलेली कामं करत असतानाच साडेपाचच्या सुमारास अचानक माझा वायरलेस ऑपरेटर धावत आला. त्याच्याकडं भुसावळ पोलिस ठाण्यातून संदेश आला होता ः ‘‘आरोपी पकडले, पैसे मिळाले, परत येत आहोत.’’ ताबडतोब पोलिस अधीक्षकांना फोन करून हे वृत्त सांगितलं. ते म्हणाले ः ‘‘फारच छान. खूप कमी वेळात जमवलंत तुम्ही हे. मी लगेचच येतो आहे तिकडं.’’ 

पोलिस अधीक्षक माझ्या ऑफिसला आले आणि थोड्याच वेळात दोन्ही टीम त्या दोन्ही गुन्हेगारांना घेऊन पोचल्या. पोलिस अधीक्षकांनी शांतारामला ‘हे वैयक्तिक माझ्यातर्फे’ असं म्हणत शंभर रुपये बक्षीस दिलं. आमच्या सगळ्यांकडून मिळून शांतारामला त्या दिवशी तीनेकशे रुपये बक्षिसादाखल मिळाले. गुन्हेगार सापडल्यामुळं आम्हाला सगळ्यांनाच बरं वाटत होतं; पण शांतारामही खूश होता. 

त्या कामगिरीवर गेलेल्या उपनिरीक्षकाकडून सगळी हकीकत कळली. ती अशी ः भुसावळ रेल्वे स्टेशनकडं जात असतानाच शांतारामनं त्या दोघांना ट्रकमधून उतरून एका वाइन-शॉपमध्ये शिरताना पाहिलं. त्यांनी लगेच मागून येणाऱ्या दुसऱ्या टीमला सावध केलं. दारू खरेदी करून ती दुक्कल दुकानातून बाहेर पडताच दुसऱ्या टीमनं त्यांना तातडीनं ताब्यात घेतलं. झडती घेतल्यावर त्यांच्याकडं स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या जळगाव शाखेची लेबलं असलेली नोटांची बंडलं सापडली. एकूण नऊ हजार ९९० रुपये होते. ते त्यांनी बॅंकेतूनच उडवले होते, यात शंका नव्हती. त्या दुकानातून त्यांनी दहा रुपयांची दारू खरेदी केली होती. ती बाटलीही त्यांच्याकडं मिळाली. 

मुख्य आरोपीची चौकशी केल्यावर त्यानं बॅंकेत पिशवी कापून पैसे लांबवल्याचं मान्य केलं. तक्रारदारानंही त्याला ओळखलं. ‘बॅंकेच्या रांगेत आपल्या मागं हाच माणूस उभा होता,’ असं त्यानं सांगितलं. कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातल्या अशोक दादलानीनं (बदललेलं नाव) शिक्षण अर्धवट सोडून गुन्हेगारीचा रस्ता धरला होता. काही प्रकरणांत त्याला शिक्षाही झाली होती. त्याच्यावरचे काही खटले अजून सुरूच होते. अशोकनं दोन्ही हातांच्या अंगठ्याच्या नखांमध्ये एक पोकळी करून घेतली होती. तीत तो एक छोटं ब्लेड लपवायचा. असं काही केलं असेल याची शंकाही येणार नाही इतक्‍या बेमालूमपणे त्यानं हे केलं होतं. सफाईनं बोटं चालवण्यात तो वाकबगार होता. कापडाची कोणतीही पिशवी तो लीलया कापू शकत असे.

पोलिस अधीक्षकांना खरोखरच खूप आनंद झाला होता. काही निश्‍चित तर्काच्या आधारे पाकीटमारीचा छडा लावल्याचं मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. पाकीटमार सापडतात; पण तो निव्वळ योगायोग असतो. ‘तुम्ही अगदी व्यावसायिक पद्धतीनं कौशल्य दाखवत खरोखरंच उत्तम काम केलं आहे, असं म्हणत त्यांनी मला मिठीच मारली. ‘शांतारामला एक प्रशस्तीपत्र आणि पारितोषिक द्यावं’ असं मी त्यांना सुचवलं. त्यांनी ती सूचना लगेच मान्य केली. आठवड्याभरातच शांतारामला एक प्रशस्तीपत्र आणि पारितोषिकादाखल पाचशे रुपये देण्याचा एका छोटेखानी समारंभ पार पडला. बॅंकेकडून आणि लोकांकडूनही आमचं कौतुक झालं.

यथावकाश दोन्ही आरोपींविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आणि दोघांनाही पाच पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली.
***

शांतारामची गोष्ट इथंच संपत नाही. तो त्यानंतरही माझ्या संपर्कात होता. आणखी काही प्रकरणं उघडकीस आणण्यातही आम्हाला त्याची मदत झाली. बॅंकेतल्या चोरीप्रकरणात आम्हाला मिळालेल्या यशामुळं मी खूपच आनंदात होतो. माझ्या सांगण्यावरून शांताराम पोलिसांना मदत करायला तयार झाला, एक गुन्हेगार पोलिसांना अशी मदत करतो याचंच माझ्याबरोबर काम करणाऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना आश्‍चर्य वाटत होतं. या सगळ्या प्रकरणात मला एक जाणवलं, की पोलिस अधिकारी म्हणून आमचं गुन्हेगारी जगताचं आणि गुन्हेगारांच्या मानसिकतेचं ज्ञान जवळजवळ नगण्य आहे. मग ते ज्ञान मिळणार कुठून? बराच काळ गुन्हेगारी क्षेत्रातच घालवलेल्या लोकांपेक्षा अधिक माहीतगार कोण असणार? कधी औषधोपचारांसाठी किंवा अन्य काही अडचणींमध्ये मदत केली तर खूप महत्त्वाची माहिती अशा लोकांकडून मिळू शकते. मग मी आमच्या ताब्यात असणाऱ्या इतर काही गुन्हेगारांशी बोलायचा प्रयत्न सुरू केला. त्यात एकच गोष्ट होती व ती म्हणजे हे सगळं खूपच वेळखाऊ होतं. कारण, माहिती देण्यासाठी त्या गुन्हेगारांना तुमच्याविषयी विश्वास वाटणं आवश्‍यक होतं; पण त्यामुळं गुन्हेगारीच्या अंतरंगात शिरण्याची एक वेगळीच वाट उघडली गेली होती. घरफोड्या करणारे, पाकीटमार, साखळीचोर आणि लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांबद्दलची भरपूर माहिती माझ्याकडं थोड्याच काळात जमा झाली. या माहितीच्या आधारे गुन्हे रोखणं तुलनेनं फार अवघड नव्हतं. शांताराम कधीतरी येऊन जायचा. त्याच्याकडं प्रचंड माहिती होती. त्याला आता माझ्याबद्दल विश्वास वाटायला लागला होता. लांबलांबच्या गावांमध्ये जाऊन पाकीटमारी करणाऱ्या मुंबई-पुण्यातल्या, नाशिक, ठाण्याकडच्या पाकीटमारांबद्दल तो सांगायचा. एखादे वेळी ‘सावजा’चा पाठलाग करताना, त्या सावजानं जर त्या पाकीटमाराची ‘हद्द ओलांडली’ तर ते सावज दुसऱ्या पाकीटमाराला कसं ‘विकलं’ जायचं आणि ज्यानं ते विकत घेतलंय तो सावजाला लुबाडण्यात यशस्वी झाला तर त्या सावजाची खबर देणाऱ्या व्यक्तीला त्या लुटीतला एक बऱ्यापैकी हिस्सा कसा मिळायचा, अशी सगळी माहिती त्याच्याकडून मिळायची. शांतारामकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही रेल्वेगाड्यांवर आणि बसवर लक्ष ठेवायला सुरवात केली. त्यामुळं अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसायला मदत झाली. 

(उत्तरार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com