मुख्यमंत्री महोदय, इकडे लक्ष द्यावे....! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukhyamantri Mohoday Ikde laksh dyave by Dr Rahul Ranalkar nashik news psl98

मुख्यमंत्री महोदय, इकडे लक्ष द्यावे....!

फाळके फिल्म सिटी अन् शूटिंग झोन
नाशिकच्या अनमोल ठेव्यांपैकी एक सर्वोत्तम ठेवा म्हणजे दादासाहेब फाळके आणि त्यांच्या चिरंतन स्मृती. दादासाहेब फाळके स्मारकाला (Dadasaheb Falke smarak) शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अलीकडेच भेट दिली. फाळके स्मारकात फिल्म सिटीची निर्मिती करता येणे शक्य आहे. फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. फाळके स्मारकात फिल्म सिटी उभारण्यासोबत नाशिक आणि नाशिकमधील इगतपुरी, घोटी आणि त्र्यंबकेश्वर परिसराला शूटिंग झोन जाहीर केल्यास देशातील चित्रपटसृष्टी नाशिकमध्ये अवतरु शकते. सध्या मुंबईतील फिल्म सिटीवर आणि एकूणच चित्रपट व्यवसायाशी संबंधित घटकांवर प्रचंड ताण आलेला आहे. त्यात नाशिकमध्ये शक्यता निर्माण झाल्या तर दादासाहेब फाळके यांची भूमी चित्रपट क्षेत्रात मोठ्या उंचीवर पोहोचू शकते. समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक उपयोग या क्षेत्रासाठी होऊ शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या विषयांत लक्ष घालावे.

हेही वाचा: पीएम किसान योजनेतील गैरव्यवहार अन् बोगस लसीकरण प्रमाणपत्रे!

चित्रपटांच्या, मालिकांच्या शूटिंगसाठी विविध खात्यांच्या ५-६ परवानग्या लागतात. यासाठी एक खिडकी योजना जर नाशिकमध्ये उभारता आली, तर सोने पे सुहागा. सहकार्याची भावना असलेली एक खिडकी योजना असावी, एका खिडकीत ''अनेक खिडक्या'' नसाव्यात. कोरोना काळात सगळं ठप्प असताना दमणने परवानगी दिल्याने तब्बल ३६ सीरियल्सचे शूटिंग तिथे होऊ शकल्या, हे ध्यानात घ्यायला हवे. आपल्या देशात शूटिंगसाठी यावे, म्हणून इंग्लंडमध्ये अनेक सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळे अगदी मराठी सिनेमांचे शूटिंग इंग्लंडमध्ये होऊ लागले आहे. जर आपली मंडळी इंग्लंडमध्ये जावू शकतात, तर नाशिकमध्ये नक्कीच येऊ शकतील. रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर २९ एकर जागेमध्ये दादासाहेब फाळके फिल्म सिटी उभारल्यास इकडे ओढा निश्चितपणे वाढेल. चित्रपटांशी संबंधित सगळ्या शक्यता नाशिकमध्ये या निमित्ताने आकाराला येऊ शकतात, प्रश्न इच्छाशक्तीचा आहे. सध्या चित्रपटसृष्टीत नैसर्गिक लोकेशन्सला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर परिसराला शूटिंग झोन जाहीर केल्यास त्याचा मोठा फायदा चित्रपटांना मिळू शकतो. २४ तास शूटिंगची परवानगी या लोकेशन्सला मिळायला हवी.

हेही वाचा: राजकीय खेळी मालेगावची अन् तयारी धुळ्याची


फिल्म सिटीमध्ये राहण्याची उत्तम सोय निर्माण करता येऊ शकते. त्यामुळे कमी पैशांत शूटिंग स्टाफला राहता येईल. या शिवाय शासकीय आणि खाजगी रिसॉर्टमध्ये सवलतीच्या दरात राहण्याची सोय इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर परिसरात चित्रपट कलावंत यांच्यासह सगळ्या टीमची होऊ लागली तर मुंबईवरचा सध्याचा भार नक्कीच हलका होईल. अगदी परराज्यातूनही शूटिंगसाठी नाशिक एक हॉट डेस्टिनेशन ठरेल. फाळके फिल्म सिटीचे निर्माण नियोजनबद्ध रित्या करायला हवे. संचालकपद निर्माण करुन सुनियोजित पद्धतीने उभारणी व्हायला हवी. चित्रपटाशी संबंधित घटकांसाठी कोर्सेस तयार केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी नाशिकमध्ये निर्माण होऊ शकतात. चित्रपटांना स्किल्ड लेबरची गरज असते. जसे लाईटमन, मेकअप आर्टिस्ट, एडिटिंग, ग्राफिक्स, ज्युनिअर आर्टिस्ट, स्पॉटदादा, प्रॉडक्शन विभाग, वेषभुषाकार वैगरे. या विषयांचे लहान कोर्सेस फिल्म सिटीत सुरु करता येतील. यासह आयटीआयमध्येही हे कोर्सेस सुरु करुन त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हे प्रशिक्षित मनुष्यबळ नाशिकमधून अन्य राज्यातही पाठवता येणे शक्य आहे. या सगळ्यांना कायमस्वरुपी काम चित्रपटसृष्टीत आहे. विशेष म्हणजे चित्रपटांसाठी लागणाऱ्या ग्राऊंड स्टाफचं प्रशिक्षण अन्यत्र कुठेही दिलं जात नाही. यासाठी विशेष पारंपरिक शिक्षणाची अट नाही. त्यामुळे एक मोठं क्षेत्र या माध्यमातून नाशिकसाठी, विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगरसाठी खुलं होऊ शकतं.

हेही वाचा: मंत्री महोदय आदित्यजी, नाशिककरांना हवा विकास आणि पर्यावरणही ...

दादासाहेब आणि नाशिक
धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके हे भारतीय सिनेसृष्टीचे जनक. दादासाहेबांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी त्र्यंबकेश्वरचा. तर वयाच्या ७३ व्या वर्षी १६ फेब्रुवारी १९४४ रोजी अखेरचा श्वास नाशिकच्या भूमीत घेतला. भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चचंद्र त्यांनी १९१३ मध्ये साकारला. चित्रपटसृष्टीतील १९ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी तब्बल ९५ चित्रपट आणि २६ शॉर्टफिल्म साकारल्या. १९६९ मध्ये दादासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार देणे केंद्र सरकारने सुरु केले. अवघ्या काही ओळींत दादासाहेब फाळके यांच्या कारकीर्दीचा आढावा यासाठी की त्यांचे थोरपण पुन्हा एकदा मांडले जावे. नाशिकशी असलेलं त्यांचं नातं अधोरेखीत व्हावं. हे नातं अधिक घट्ट करण्यासाठी आणि राज्यातील चित्रपट उद्योगाला उभारी येण्यासाठी राज्य शासनाने आणि नाशिक जिल्हा प्रशासनाने तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ही आशा नक्कीच करता येऊ शकते....

Web Title: Mukhyamantri Mohoday Ikde Laksh Dyave By Dr Rahul Ranalkar Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top